शशिकांत सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द वेस्ट लॅण्ड’ या टी. एस. इलियटच्या कवितेला  १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यंदाच्या मार्चपासूनच ठिकठिकाणी लेख आले, काही चर्चासत्रंही झाली.. पण ही कविता शतायुषी होत असताना आजही आठवण होते ती इझरा पौंडची. इझरा पौंड जर नसता तर इलियटचे गुण कोणी ओळखले असते? हा मुळात अमेरिकी. नंतर त्यानं ब्रिटनचं नागरिकत्व पत्करलं. १९१६ मधली इलियटची ‘लव्ह साँग ऑफ जे. आल्फ्रेड प्रुफॉक’ ही ढोबळमानाने पहिली आधुनिक कविता मानण्यात येते.

पण आधुनिकतेचे अनेक टप्पे आहेत. तत्त्वज्ञानातील आधुनिकता १६व्या शतकात सुरू होते, देकार्तपासून. फ्रेंच कविता १८५०च्या सुमारास सुरू झाली. बॉदेलिएर, मलार्मे इत्यादी. आधुनिकतेतला चित्रकलेचा टप्पा म्हणाल तर तो १८८०च्या दशकात पॉल सेझानच्या चित्रांनी सुरू झाला. पॉल जॉन्सन हा इतिहासकार आपल्या आधुनिकतेवरच्या पुस्तकाच्या सुरुवातीला ‘१९२१ हा आधुनिकतेचा टप्पा’ असं जाहीर करतो. याचं कारण आइनस्टाईननं मांडलेला ‘प्रचंड वस्तुमान असताना प्रकाशकिरण वक्र होतात’ हा सिद्धांत त्या वर्षीच्या खग्रास ग्रहणात सिद्ध झाला. बरोबर त्यानंतर एक वर्षांनं, आधुनिकतेचं शिखर मानली गेलेली ‘द वेस्ट लँड’ ही कविता टी. एस. इलियटनं लिहिली. या ४३७ ओळींच्या कवितेत मुळात बराच मजकूर होता, तो इझरा पौंडनं कापला.

टी. एस. इलियट पॅरिसमध्ये होता, बँकेत नोकरी करत होता. हेमिंग्वेच्या ‘मूव्हेबल फीस्ट’मध्ये त्याचं वर्णन असं आढळतं : इझरा पौंड म्हणत असे की, आपल्याकडे एक उत्तम कवी आहे, जो बँकेत नोकरी करतो, त्याच्यासाठी आपण पैसे जमवले पाहिजेत. आणि खरंच या मंडळींनी पैसे जमवलेही. पण ते इलियटनं घ्यायला नकार दिला.  इलियट म्हणायचा की, कवीच्या चरित्राचा कविता समजून घ्यायला फारसा उपयोग नाही. तरीही इलियटची अनेक चरित्रं आहेत. त्यातही ‘द फोन्टाना बुक ऑफ मॉडर्न थिंकर्स’मध्ये काफ्का, कामू, क्लॉद लेव्ही-स्ट्रॉस या सर्वाच्या जोडीनेच टी. एस. इलियटही आहे आणि त्याचं चरित्र स्टीफन स्पेंडरसारख्या मोठय़ा कवीनं लिहिलं आहे.

इलियटची ‘लव्ह साँग ऑफ प्रुफॉक’ किंवा ‘वेस्ट लँड’ या कवितांनी खळबळ माजवली. इझरा पौंड आणि इलियट संपादित करत असलेल्या ‘क्रायटेरियन’मध्ये ती प्रसिद्ध झाली. हे त्रमासिक इझरा पौंड आणि इलियट दोघे मिळून संपादित करत असत. १९३१पर्यंत म्हणजेच ते बंद होईपर्यंत हे दोघे याचे संपादक होते. इलियटनं फारसं लिहिलं नाही. किंबहुना त्याच्या सगळय़ा कवितांचं मिळून जर एकत्रित पुस्तक घेतलं तर ते अडीचशे-तीनशे पानांचंच भरेल. पण त्याच्या मृत्यूनंतर त्यानं ज्या कविता अर्धवट सोडल्या होत्या, त्यांचं पुस्तक त्याहीपेक्षा जाड आहे. त्यानं काही नाटकं लिहिली आणि ‘फोर क्वार्टेट्स’ नावाचा चार कवितांचा संच लिहिला.

अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘द वेस्ट लँड’ किंवा ‘फोर क्वार्टेट्स’ यांचं अभिवाचन केलेलं आहे. ‘कविता केवळ शब्द नसते, कविता हा नाददेखील असतो’ याचं साक्षात प्रत्यंतर, ही अभिवाचनं यूटय़ूबवर ऐकताना येत राहतं. जाणवू लागतं की, नाद म्हणजे कॅडन्स या अर्थाने आणि कविता ही शब्दांची मालिका नसते. कविता म्हणजे वाक्यांची मालिकाही नसते. तिच्यातल्या प्रत्येक ‘विधाना’ला अर्थच असायला हवा, असंही काही नाही.

‘हॉल’ नावाच्या कवितेबद्दल बिटनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅलन गिन्सबर्ग या कवीवर अश्लीलतेचा खटला चालवण्यात आला. तेव्हा सरकारी वकिलानं एक-दोनदा विचारलं, की या ओळीचा अर्थ काय, त्या ओळीचा अर्थ काय. तेव्हा अ‍ॅलन गिन्सबर्गचा वकील म्हणाला, ‘कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ शोधायला गेलात तर ती कविताच राहणार नाही.’ बहुतेक कवींना हे वाक्य पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे, याचं कारण कविता म्हणजे काहीतरी ‘स्टेटमेंट’ करणं, असं अनेकांना वाटतं. म्हणजे चारोळय़ा असोत किंवा फुंकून फुंकून लिहिलेली मराठी सिरिअलसाठीची गाणी असोत!

मनमोहन, आरती प्रभू, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, असे अनेक महान कवी आपल्या देशात निपजले. त्याचबरोबर अग्रलेखासारख्या कविता लिहिणारेही कवी आहेत. इलियटला एकदा विचारलं होतं की, कविता आणि गद्यात फरक काय? तो म्हणाला होता की, कवितेला कमी जागा लागते. पण इलियटच्या कविता छोटय़ाशा अवकाशात कितीतरी सांगणाऱ्या असतात. ‘द वेस्ट लँड’ प्रसिद्ध झाली ती सहा भागांत. लॅटिनपासून संस्कृतपर्यंत जवळपास सहा-सात भाषांतील कोटेशन्स त्यात आहेत. अनेक विनोद आहेत, घटना आहेत.

टी. एस. इलियटची एक मैत्रीण होती, जिला त्याने जवळपास हजार पत्रे लिहिली होती. तिच्याबद्दलची गृहीतं यात आहेत. हा पत्रव्यवहार अलीकडेच उघड झाला आणि त्यातून इलियटचे हे संबंध लक्षात आले. इलियटचं व्यक्तिगत आयुष्य बरंच दु:खात गेलं. त्याची पत्नी मानसिकदृष्टय़ा आजारी होती आणि सांसारिक सुख त्याला कधीच मिळालं नाही. १९५७मध्ये त्याची सेक्रेटरी व्हॅलेरी फ्लेचर हिच्याशी त्यानं लग्न केलं. नंतर त्यानं ख्रिश्चन धर्मातील अँग्लिकन पंथ स्वीकारला आणि त्याचा परिणाम त्याच्या नंतरच्या कवितांत दिसतो, विशेषत: ‘फोर क्वार्टेट्स’मध्ये. ख्रिश्चनांमध्ये असणाऱ्या लेन्ट या व्रताबद्दल त्यानं मांडलं आहे.

धार्मिकता नव्हे, पण आध्यात्मिकता (स्पिरिच्युअ‍ॅलिझम) ही सहसा लेखकांची, कवींची ओढ असते आणि त्या अर्थाने कवींचा आणि कवितेचा जो निखळ अवकाश असतो, तो कायम स्त्री-पुरुष संबंध (रिलेशन/ सेक्स) किंवा जगण्यातली अस्वस्थता किंवा भारून टाकणारे गूढ अनुभव किंवा स्वप्नमय प्रदेश या सगळय़ांमध्ये कविता वावरत राहते. मग ती इलियटची असो किंवा ग्रेसची. इलियट म्हणत असे, सामान्य लेखक अनुकरण करतात, मोठे लेखक चोरतात. इलियटच्या सगळय़ा काव्यरचनेवर, काव्यप्रतिभेवर लफार्ग या फ्रेंच कवीचा प्रभाव आहे. किंबहुना असा एकमेकांचा प्रभाव मोठय़ा कवींवर असतोच. मर्ढेकरांनी जेव्हा आपली इंग्रजी कविता ‘इलस्ट्रेटेड वीकली’च्या संपादकाला दिली, त्यानंतर तो म्हणाला होता, ‘वेलकम मिस्टर जेराल्ड मॅनले मर्ढेकर.’ मर्ढेकरांच्या जागी त्यानं या प्रसिद्ध इंग्रजी कवीचं नाव घेतलं होतं. ही गोष्ट सर्वश्रुतच आहे.

लेखक, चित्रकार, कवी हे जडणघडणीच्या वयात कायमच कुठल्यातरी प्रभावाखाली असतात. इलियट त्या प्रभावातून वेळेत बाहेर तर पडलाच, पण दुसऱ्या बाजूनं त्यानं कवितेची जोपासना करणारं, कवितेला खतपाणी घालणारं एक मोठं काम केलं. ‘फेबर अँड फेबर’ या संस्थेत तो संपादक झाला. जिथून ‘क्रायटेरियन’सारखं साप्ताहिक निघत असे. त्यामुळे इलियट आपल्याला सापडतो, तो ३०० पानांच्या कवितासंग्रहात नाही तर चार खंडांच्या पत्रांमध्ये. एके ठिकाणी तो पत्रात एका नव्या लेखकाला म्हणतो, ‘तुमची कथा नवीन आहे, चांगली आहे, प्रायोगिक आहे. कुठलंही मासिक, साप्ताहिक ती छापेल. म्हणूनच आम्हाला ती छापायची नाही. आम्ही नव्याच्या शोधात आहोत.’ नव्याच्या शोधात असलेल्या या इलियटने पहिली नवकविता लिहिली, पहिलं नवखंडकाव्य लिहिलं आणि जन्मभर तो नवी कविता जोपासत राहिला. डब्लू. एच. ऑडेन, टेड ह्यूजेस, स्टिफन स्पेंडर यांसारख्या नव्या कवींची प्रतिभा इलियट हा संपादक म्हणून फुलवत राहिला. तर, ‘फेबर अँड फेबर’मार्फत अनेक नोबेल पारितोषिक विजेत्या कवींच्या कविता प्रसिद्ध झाल्या. मग तो डेरेक वॉल्कॉट असो किंवा सीमस हीनी. 

टी. एस. इलियटचं १९६५मध्ये निधन झालं. त्याने लावलेल्या रोपटय़ाचा आता वृक्ष झाला आहे. जगभरातले कवी त्याच्याखाली विसावताना दिसतात. त्याच्याच खाली क्षणभर पाठ टेकणारे एखादे वसंत आबाजी डहाके ‘सन स्टोन’ सारखी कविता अनुवादित करतात आणि मराठी कवितांची प्रतिमासृष्टी बदलते. त्याच्याच खाली काही काळ विसावणारे दिलीप चित्रे ‘जागतिक कवितेला सात छेद’ लिहितात आणि वॉलेस स्टीव्हन्ससारख्या अनवट कवीचा परिचय करून देतात. त्याच्याच सावलीत वाढणारा एखादा नवीन कवी नवे शब्द, नवी भाषा शोधत वर पाहतो तेव्हा त्याला आकाशाच्या आच्छादनासह इलियटच्या जोपासण्यामुळे तरारलेली पानंही दिसतात.