ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी रेल्वे, तार या यंत्रणा सुरू केल्या. छायाचित्रण, चलत्चित्रीकरण यांचाही तो बहराचा काळ होता. स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या चळवळीचा रेटा आणखी वाढवण्यात या तंत्रज्ञान प्रकारांचे मोठे योगदान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखं असतं. एकीकडे त्याच्याच बळावर ब्रिटिशांनी या मातीत पाय घट्ट रोवले तर एतद्देशीयांनी याच तंत्रज्ञानाला सावकाश अंगीकारत, आत्मसात करत ब्रिटिश साम्राज्याला धडक द्यायला सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे भारतामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संघटनात्मक बांधणीचे प्रयत्न राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या आधीपासून चालू झाले. कलकत्ता जर्नल ऑफ मेडिसिन हे भारतातील पहिले संशोधन प्रकाशन १८६८ मध्ये तर इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ही संघटना १८७६ मध्ये उदयास आली. तत्कालीन शास्त्रज्ञांमध्ये सरकारतर्फे केला जाणारा भेदभाव, संधींची अनुपलब्धता हा आधी ब्रिटिशविरोधी भावना भडकाविणाऱ्या सुरुवातीच्या काही घटकांपैकी एक घटक ठरला. डॉ. प्रमथा नाथ बोस यांना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी केवळ भारतीय असल्यामुळे बढती नाकारली गेली. बोस यांनी याविरोधात १९०३ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. भारतातील सत्याग्रहाची कदाचित ही पहिलीच घटना! त्यानंतर बोस यांनी जमशेदजी टाटा यांच्या समवेत टाटा स्टील या कंपनीची स्थापना केली आणि भारतीय उद्याोग क्षेत्राचा नवा अध्याय सुरू झाला.
भारतीय वैज्ञानिकांनी परदेशात जाऊन ज्ञान संपादन करून ते भारतीयांच्या भल्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी वापरण्यास सुरुवात केली. खरगपूर येथील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागाच राष्ट्रभावनेसाठी प्रेरणास्रोत ठरली होती. हे ठिकाण आधी हिजली स्थानबद्धता केंद्र या नावाने, ब्रिटिशांनी स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि संघटकांना तुरुंगात डांबण्यासाठी कुप्रसिद्ध होते. दडपशाही आणि जुलमाने ग्रस्त या भिंतींनी तांत्रिक शिक्षणाची लय पकडत राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न पाहिले. मेघनाद साहा हे भौतिकशास्त्रज्ञ होण्याआधी बंगालमधील क्रांतिकारी चळवळीत सहभागी होते. त्यांनी विज्ञान जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे काम केले, तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून समाजवाद-प्रेरित तंत्रज्ञान विकासाच्या योजनेचा पुरस्कार केला. विशेष म्हणजे महात्मा गांधींचे पुरस्कर्ते असलेले कित्येक लोक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करताना हिंसक मार्गांचा अवलंब करताना दिसले. देवचंद पारेख या त्यांच्या सहकाऱ्याने १९१० मध्ये अनेक स्थानिक रसायन उद्योग सुरू करून बॉम्बे संशोधन आणि निर्मितीस पाठबळ दिले. त्यांचे जावई टी. एम. शाह यांनी एमआयटीसारख्या प्रसिद्ध विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि सविनय कायदेभंग आणि चले जाव या दोन्ही चळवळींत देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगला.
शस्त्रास्त्रांचा विचार करता ईस्ट इंडिया कंपनीचा मूलभूत हेतूच स्थानिक राजवटींना शस्त्रे पुरवून नफा कमविणे हा होता. १८१५ मध्ये, कंपनीच्या अहवालानुसार दक्षिण आशिया, इंडोनेशियन द्वीपसमूह आणि चीनमध्ये वार्षिक १,५१,५७२ तोफांची निर्यात केली गेली होती, ज्याचे मूल्य १,०३,४६३ पौंड इतके होते. मात्र सत्ताविस्ताराबरोबर या धोरणात बदल केला गेला ज्यान्वये आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा देशी राज्यकर्त्यांना मिळणे दुरापास्त झाले. नाइलाज झाल्यानंतर या संस्थानिकांना तैनाती फौजेच्या बंधनात अडकविले गेले. मद्रास येथे असणाऱ्या दारूगोळा कारखान्यात कोणत्याही कामासाठी भारतीय व्यक्तींना प्रवेश वर्जित होता जेणेकरून हे तंत्रज्ञान भारतीयांच्या हाती पडू नये. एव्हाना भारतीय क्रांतिकारकांनी परकीय भूमीवरून आधुनिक शस्त्रे हस्तगत करण्यास सुरुवात केली. अनुशीलन समिती, अभिनव भारतच्या सदस्यांनी लंडनमधून शस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली. गदर पार्टीने सशस्त्र क्रांतीतून ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याची योजना आखली. बॉम्बचा हत्याविरहित कल्पक वापर करत भगतसिंग आणि सहकाऱ्यांनी कायदेमंडळात बॉम्बफेक केली. रोड्डा दरोडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका घटनेत बंगाली क्रांतिकारकांच्या एका गटाने २६ ऑगस्ट १९१४ रोजी कोलकात्याच्या मध्यवर्ती भागात एक धाडसी चोरी केली आणि ५० जर्मन पिस्तुलांसह ४६ हजार काडतुसे चोरली, जी आर. बी. रोड्डा अँड कंपनीद्वारे जर्मनीतून ब्रिटिशांसाठी आयात केली गेली होती. या शस्त्रांचा वापर पुढे गदर चळवळ, काकोरी रेल्वे लूट आदी क्रांतिकारी घटनांसाठी झाला.
नागरी सुविधांसाठी विकसित केल्या गेलेल्या तार, रेल्वे या यंत्रणा भारतीयांनी संघटनात्मक पातळीवर कौशल्याने वापरल्या. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात, विविध नेत्यांमध्ये चर्चा घडविण्यात या तारेची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. ब्रिटिश संसदेचे पहिले बिगरब्रिटिश सदस्य बनण्यात दादाभाई नवरोजी यांनी तारेचा कुशल वापर करून घेतला. दादाभाई इंग्लंडमध्ये असताना त्यांचे सहकारी बेहरामजी मलबारी यांनी भारतीय उच्चभ्रू वर्गामध्ये दादाभाईंसाठी जनमत एकवटण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रेल्वेचा विचार करता भारतीयांसाठी रेल्वे म्हणजे अशी वाळवी होती जी देशात खोलवर घुसून संपत्ती पोखरून काढत होती. ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक बनलेल्या या रेल्वेवर १९०७ नंतर हल्ले सुरू झाले. अँर्ड्यू फ्रेझर या बंगालच्या फाळणीसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला मारण्यासाठी क्रांतिकारकांनी रूळ उखडून टाकण्याचे प्रयत्न केले मात्र तो प्रयत्न असफल ठरला. वारंवार होणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या प्रयत्नांमुळे रेल्वे मालमत्ता संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. सहा महिन्यांसाठी पूर्व बंगाल रेल्वे मार्गावर कडक गस्त लावण्यात आली. परंतु, अनेक छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात रेल्वे जाळ्याची सखोल पोहोच असल्यामुळे बॉम्ब फेकणाऱ्यांची ओळख पटणे कठीण झाले. १९२५ चा काकोरी कट रेल्वे या प्रतीकाचा विध्वंस करण्याचा सर्वोच्च बिंदू होता. दुसरीकडे याच रेल्वेने राष्ट्रबांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींसारखे देशव्यापी नेतृत्व रेल्वेशिवाय उदयास येणे अशक्य होते. त्यांचे रणनीतीत्मक तिसऱ्या वर्गातून भारतभ्रमण सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्यसंग्रामात ओढण्यासाठी आकर्षक ठरले. ‘गांधी महाराज की जय’ या घोषांनी दुमदुमून जाणारा तिसरा वर्ग आणि त्यांच्या सभांनी भरून गेलेले रेल्वे स्थानकांचे प्रांगण या मिलाफात रेल्वेचे साम्राज्यवादी प्रतीक आणि हेतू दोन्ही हरवले गेले.
छायाचित्र आणि चित्रपट या तांत्रिक आविष्काराचा वापर भारतीयांनी स्वातंत्र्यलढ्यात खुबीने करून घेतला. कोट्यवधी भारतीय अशिक्षित होते तेव्हा राष्ट्रीय नेते, त्यांच्या सभा, अलोट गर्दी यांना दृश्य स्वरूपात दाखवून त्यांना शिक्षित करण्याचे काम छायाचित्रांनी केले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतीय छायाचित्रणाचा चेहरा बदलून न्यायवैद्याकीय पुरावे, ब्रिटिशांचे अत्याचार, युद्धे, दुष्काळ, सामाजिक असंतोष हे छायाचित्राचे विषय बनले. चित्रपटांमुळे ब्रिटिश अत्याचारांची जाणीव आणि स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा या गोष्टी सुलभ झाल्या. त्या काळी ब्रिटिश निर्बंधांमुळे थेट ब्रिटिशविरोधी चित्रण शक्य नव्हते. वतन (१९३८), किस्मत (१९४३) या चित्रपटांनी मध्य आशिया, दुसरे महायुद्ध आदी रूपके वापरून ब्रिटिशांचा कल्याणकारी बुरखा फाडला. व्ही शांताराम यांच्या ‘स्वराज्याचे तोरण’ (१९३१) या चित्रपटाचे नाव बदलून ब्रिटिशांनी ‘उदयकाल’ असे केले, कारण स्वराज्य या शब्दात द्रोहाची सुप्त बीजे होती. ‘भक्त विदुर’ (१९२१) हा मूकपट हा भारतातील बंदी घातलेला पहिला चित्रपट होता ज्यात विदुराची वेशभूषा महात्मा गांधींशी साधर्म्य दाखवत होती.
गांधींच्या सभांना गर्दी व्हायला लागल्यानंतर ध्वनी व्यवस्थेची गरज निर्माण झाली. १९३१ मधील काँग्रेसच्या कराची अधिवेशनात नाणिक मोटवाने या तरुणाने ध्वनिसंवर्धनाची यंत्रणा उभी करून शिकागो रेडिओ या कंपनीची स्थापना केली. याच कंपनीने ‘चले जाव’ चळवळीत उषा मेहता यांना गुप्त रेडिओ केंद्राची स्थापण्यास मदत केली. सर्व बडे नेते तुरुंगात होते, देशी प्रसारमाध्यमांवर निर्बंध होते. तेव्हा घडामोडींची माहिती पोहोचविण्यात या रेडिओने मोलाची भूमिका बजावली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापासून त्यांचे मनोबल उंचावण्यापर्यंत अनेक कामे रेडिओने केली. भारताने ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवले, तेव्हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी ५.३० वाजता पूर्णम विश्वनाथन यांनी रेडिओ प्रसारणाद्वारे भारताचे स्वातंत्र्य घोषित केले. ‘भारत हा एक स्वतंत्र देश आहे,’ हे स्वतंत्र भारतातील रेडिओवरील पहिले वाक्य होते. त्यानंतर नेहरूंच्या ‘नियतीशी करार’ या भाषणाचे पुन:प्रसारण करण्यात आले आणि रेडिओ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झाला.
दुसरे महायुद्ध, अण्वस्त्र वापर यांमुळे दिसलेला तंत्रज्ञानाचा नृशंस चेहरा गांधींना आधुनिकतेपासून दूरची वाट खुणावत होता तर नेहरूंसाठी तंत्रज्ञान ही राष्ट्रीय प्रगती आणि एकात्मतेची गुरुकिल्ली होती. मानवी मूल्याधिष्ठित आणि तंत्रकुशल समाज नागरीकरणाची वाटचाल संहाराकडून सृजनाकडे नेईल असा त्यांना विश्वास होता. यामागे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्यसंग्रामातील सहाय्य, विविध नेत्याबरोबरचे वादविवाद, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि २७ खंडांचा १९३८ च्या राष्ट्रीय नियोजन आयोगाचा अहवाल या सर्वांचा वाटा होता. लवकरच स्वातंत्र्याचा सूर्य नवभारताचे तंत्रज्ञानात्मक क्षितिज विस्तारणार होता…
तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक
pankaj@gmail.com