येत्या मंगळवारी दहीहंडीच्या निमित्ताने यंदाच्या सण महोत्सवाला प्रारंभ होईल. लगेचच गणेशोत्सव मग नवरात्र आणि नंतर दिवाळी… नाताळ… मग ‘थर्टीफर्स्ट’ची वर्षअखेर… हे सारे आता आपल्या जगण्याचे अविभाज्य घटक बनून गेलेत. दिवसभर कामाच्या दगदगीने दमलेल्या शहरवासियांना कार्यालयात जाताना आणि येताना सोसाव्या लागण्याऱ्या यातनाही आता दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. उत्सवाचा हेतूच मुळी स्वयंप्रेरित होण्याचा असतो, याचा विसर पडू लागला आहे की काय, अशी परिस्थिती गेल्या काही काळात दिसू लागली आहे. उत्सव सर्वांचा असतो. मूठभरांचा नसतो, हे लक्षात घेऊन त्याच्या आनंदादत अधिकाधिकांना कसे सामावून घेता येईल, याची काळजी करणे अधिक महत्त्वाचे. पण गेल्या काही वर्षांत असे उत्सव साजरे करणाऱ्यांचेच होऊ लागले आहेत. आपल्यामुळे इतरांना काही त्रास होऊ नये, होता कामा नये, अशी समंजस भूमिका घेणे हळूहळू कमी होत चालले आहे. त्यामुळे या उत्सवांमधील उत्साहाच्या जागी उन्माद येतोय की काय, अशी शंका येऊ लागते.

आनंद ही संवेदना असते. ती मानवाच्या ठायी व्यक्त करण्याची क्षमताही असते. मात्र आनंदाच्या अनेक परी असतात आणि मनाला होणारा अधिक वरच्या पातळीवरचा. जगण्याचा वेग जसजसा वाढू लागला, तसतसे आपण या आनंदाकडेच पाठ पिरवू लागलो. त्यामुळे अंतर्मुखतेकडून सारा समाज बहिर्मुखतेकडे वळू लागला. एकट्याने, छोट्या समूहाने आनंद साजरा करण्याची पद्धतही हळूहळू मागे पडू लागली. आता सगळा आनंद रस्त्यावर येऊन साजरा केल्याशिवाय चैन पडत नाही. तो साजरा करताना आपण एका मोठ्या समाजाचे घटक असतो, याची जाणीवही पुसट होऊ लागते आणि समूहानेच असे क्षण रस्त्यावरच साजरे करायचे असतात, अशी समजूत घट्ट होत जाते. हे दुर्दैवी आहे की नाही, याचा विचार करण्याची फुरसतही कोणापाशी नाही आणि तशी गरजही कुणाला वाटत नाही.

sebi bans anil ambani from securities market
अग्रलेख : ‘अ’ ते ‘नी’!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
loksatta editorial shivaji maharaj statue collapse
अग्रलेख: पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न!
Loksatta editorial on badlapur protest against school girl sexual abuse case
अग्रलेख: आत्ताच्या आत्ता…
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
loksatta editorial on supreme court in marathi
अग्रलेख: काळ नव्हे; कायदा!
loksatta editorial Attack of the Ukrainian army inside the territory of Russia
अग्रलेख: ‘घर में घुसके’…
Loksatta editorial National space day India Becomes 4th Country landed Successfully on Moon
अग्रलेख: नभाच्या पल्याडचे…

आणखी वाचा-मुलांचे लैंगिक शोषण आणि संस्थाचालकांची भूमिका

दहीहंडी असो की गणेशोत्सव, दिवळी असो की नववर्षाचे स्वागत, असे उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरे करून त्याचा ‘इव्हेंट’ करण्याकडे गेल्या काही वर्षांत कल वाढू लागला. त्यामुळे समाजात आपले स्थान ‘दिसण्या’साठी केलेला हा खटाटोप आहे की काय, अशी शंका येऊ लागते. खूप खर्च करून खूप लोकांना जमवून खूप आनंद निर्माण करण्याचा हा प्रयत्न अन्यांसाठी कष्टप्रद तर होत नाही ना, अशी शंकाही येऊ नये, इतका अतिरेकी उत्साह या उत्सवांच्या निमित्ताने पाहायला मिळू लागला आहे. जे सण घरांत, आप्तेष्टांसमवेत साजरे करून कुटुंबातले दुखरे सांधे जोडण्यासाठी असतात/असायला हवेत, ते सण रस्त्यावर येऊन अनोळखी लोकांबरोबर साजरे करण्याची नवी तऱ्हा दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. आपण सण साजरे करताना आपल्या आनंदाबरोबरच इतरांच्याही आनंदाचा आणि समाधानाचा विचार करायला नको का?

प्रश्न आहे, तो सणांच्या साजरे करण्याचा. ते कसे साजरे करायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न खराच. ज्या गणेशोत्सवाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली, त्याच गणेशोत्सवाने बदलत्या काळात अनेक नवे विधायक पायंडेही स्थापित केले. हे सारे कौतुकास्पदच. पण उत्सव सुरू होण्याच्या कितीतरी आधीपासून रस्त्यांवर मांडव उभे करणे, नवरात्र संपेपर्यंत ते तसेच ठेवणे, याचा शहरातील वाहतुकीवर किती परिणाम होत असेल, याचा विचार कुणी करायचा? समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या मंडळांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही आता राज्यातील शहरांची खरी गरज आहे. आधीच रस्ते अरुंद, त्यात दरवर्षी वाहनांची वाढती संख्या, त्यात या रस्त्यांवर असलेली खड्ड्यांचे नक्षीकाम, यामुळे त्रासलेल्या नागरिकांना सणांच्या उत्सवाचा आनंद घेण्यासारखी स्थिती निर्माण करणे, हे उत्सवात सहभागी होणाऱ्यांचेच कर्तव्य नव्हे काय?

आणखी वाचा-गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?

एकेकाळी शहराच्या मध्यभागात होणारा दहीहंडीचा उत्सव आता शहरांतील कानाकोपऱ्यात पोहोचलाय. त्यातील उत्साह वाखाणण्यासारखाच. पण तो उत्साह उसना तर नाही ना, याची काळजीही घ्यायलाच हवी. दुसऱ्याच्या हितसंबंधांसाठी आपला उत्सव दावणीला बांधण्याची गरज पडता कामा नये. सर्वांनी एकत्र येऊन, उत्सवाचा आनंद द्विगुणित कसा होईल, याचा काळजीपूर्वक विचार केला नाही, तर तो मूठभरांचाच राहील आणि अन्यांना त्याचा फक्त आणि फक्त त्रासच होत राहील… हा त्रास सहन करणारे आपलेच बांधव आहेत, हे लक्षात घेऊन त्यांचाही विचार करणे, हे उत्सव साजरा करणाऱ्यांचे कर्तव्यच. कानांचे पडदे फाटतील एवढा कर्कश्श आवाज, डोळ्यांची बुबळे बाहेर यावीत, अशा किरणांचा वापर, अश्लील वाटणाऱ्या गाण्यांवरील बीभत्स नृत्य…हे सारे कुणासाठी?

यंदाच्या या सगळ्या सण-उत्सवांना निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. प्रत्येक इच्छुकाला सामान्यांपर्यंत पोहोचण्याची ही नामी संधीच. त्यामुळे यावर्षी पैशांची उधळण होईल. मंडळांना हवे ते देण्याची तयारी दर्शवली जाईल. पण असे काही करताना ज्यांच्यासाठी आपण हे उत्सव साजरे करतो आहोत, त्यांच्या अडीअडचणींकडेही अधिक लक्ष देणे फार फार महत्त्वाचे. आनंद कैवल्याचा असावा, आनंद जगणे संपन्न करणारा असावा, आनंद जगणे सुसह्य होण्यास कारणीभूत व्हावा, याचे भान समाज म्हणून आपल्याला कधी येणार? सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

mukundsangoram@gmail.com