वप्पाला बालचंद्रन
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागतात आणि त्यापुढले- या एकंदर घटनेचा अभ्यास करून काही व्यूहात्मक निष्कर्ष काढण्याचे कामही तज्ज्ञमंडळींमार्फत केले जाते. हे दुसरे काम पुढल्या काळासाठीही उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा असते. त्या दृष्टीने अमेरिकेतील ‘९/११’च्या (वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्तीकरण) हल्ल्यानंतरचा ५८९ पानी अहवाल जगभरच्या दहशतवादविरोधी सुरक्षा अधिकाऱ्यांनी वाचलाच पाहिजे असा आहे. विशेषत: या अहवालातील ‘फोरसाइट अॅण्ड हाइन्डसाइट’ (हल्ल्याआधी आणि नंतर) या ११ व्या प्रकरणात ‘कल्पनाशक्ती’चे महत्त्वही अधोरेखित करण्यात आलेले आहे. धोका कसकशा प्रकारे असू शकतो, हे उमगण्यासाठी कल्पनाशक्ती वापरण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, म्हणजेच कल्पनाशक्तीचे ‘संस्थात्मीकरण’ झाले पाहिजे, असे हा अहवाल सांगतो. सप्टेंबर २०११ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, त्याआधी जानेवारी २००० ते ऑगस्ट २००१ या १८ महिन्यांत अशी कल्पनाशक्ती वापरण्याच्या किमान १० संधी ‘सीआयए’ आणि ‘एफबीआय’ या तपासयंत्रणांनी गमावल्याचे हा अहवाल सांगतो. अशीच अभ्यासपद्धती् मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या समितीनेही वापरली, तिचा मी दुसऱ्या फळीतला सदस्य होतो. हे सारे आता सांगण्याचे कारण अर्थातच पहलगामचा हल्ला.
प्रश्न असा की, ‘लष्कर- ए- तोयबा’ (एलईटी) कडून पहलगामसारख्या ठिकाणांना धोका असल्याची कल्पनाही आपल्याला नव्हती काय. विशेषत: काही दिवसांपूर्वीच, १० एप्रिल रोजी ‘२६/११ चा एक सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणले गेल्यामुळे आपण ‘दहशतवादावर मोठा विजय’ मिळवल्याच्या आनंदात होतो. अशा वेळी, दहशतवाद्यांचा तर्क आणि त्यांचे काम फारच निराळ्या प्रकारे चालतात हे आपण लक्षात घेतले नाही. मोठे हल्ले केल्यानंतर दहशतवादी संघटनांना मिळणारी सहानुभूती आणि त्यांच्याकडील पैशाचा ओघसुद्धा वाढू लागतो. हल्ल्याचा छडा लावणाऱ्या तपासयंत्रणांनी किती जणांना फासापर्यंत नेले, याकडे लक्ष न देता दहशतवादी संघटना पुढले बेत आखत असतात, या इतिहासाकडे आपले दुर्लक्ष झाले काय असाही प्रश्न यातून उरेल.
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या गुप्तहेर संघटनेसाठी ‘एलईटी’मार्फत काम करत होता, हे सर्वज्ञात आहे. डेव्हिड हेडलीच्या नोंदींमधून राणा आणि हेडली एकमेकांशी कसे सतत संपर्कात होते आणि ’२६/११’ नंतरच्या वर्षी (२००९) त्यांनी डेन्मार्कमधल्या (प्रेषित मुहम्मद यांची व्यंगचित्रे छापणाऱ्या) वृत्तपत्रावरील हल्ल्याची आखणी कशी करून दिली, याचा तपशील मिळतो. हेडलीने अमेरिकेतील नॉर्दर्न डिक्स्ट्रिक्ट ऑफ इलिनॉयच्या जिल्हा न्यायालयाला दिलेल्या जबाबातही ३३ वेळा राणाचे नाव आहे. ‘एलईटी’च्या म्होरक्यांसाठी २००३ पासून हेडलीने काम करणे सुरू केले तेच मुंबईत राणाच्या मालकीच्या जागेतून; आणि पुढल्या (विशेषत: २००६ नंतरच्या) मुंबई-भेटींमध्ये त्याने बोट भाड्याने घेऊन समुद्रकिनाऱ्याचेे व्हिडीओ चित्रीकरण, हल्ल्यांच्या ठिकाणांची निवड व त्यांचे जीपीएस लोकेशन अशी अनेक कामे ‘एलईटी’साठी केली, हे सारे हेडलीच्या जबाब व नोंदींतून स्पष्ट झालेले आहे. थोडक्यात, राणा आणि हेडली हे दोघेही ‘एलईटी’चे हस्तक होते, याचे पुरावे आहेत.
या राणा आणि हेडलीचा जम्मू-काश्मीरशी काय संबंध, असा प्रश्न अनेकांना पडेल. हेडलीची कागदपत्रे मिळवून बातमीदारी करणाऱ्या स्टीफन टँकेल आणि सॅबेस्टियन रोटेला यांच्या लिखाणातून असे उघड होते की, ‘एलईटी’ आणि ‘आयएसआय’ यांचा रोख काश्मीर भारताकडून हिसकावणे हाच असल्याने त्यांच्या सर्व कारवाया काश्मीरच्या संदर्भातच चाललेल्या असतात. त्यास मुंबई हल्लासुद्धा अपवाद नव्हता. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, म्हणजे भारत सरकारला (काश्मीरसाठी) पैसा मुंबईतून सर्वाधिक मिळतो आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचे मुंबई हे केंद्र आहे. याच शहरावर, त्यातही पंचतारांकित हॉटेलांना लक्ष्य करून हल्ला केल्यास काश्मीरची भारतीय रसद कमकुवत करता येईल, ज्यूंच्या ‘छबाड हाउस’वर हल्ल्यातून अमेरिकेशी भारताचे आर्थिक संबंध कमकुवत होतील, असे तर्कट ‘२६/११’मागे असल्याचे हेडलीच्या नोंदींआधारे या दोघा पत्रकारांचे म्हणणे आहे. यापैकी टँकेल यांनी तर पाकिस्तानात आणि अमेरिकेत अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘स्टॉर्मिंग द वर्ल्ड स्टेज’ हे पुस्तकही २०११ मध्ये लिहिले होते. त्यातही नमूद आहे की, २००१ मध्ये हेडली हा ‘एलईटी’कडे ‘काश्मीर जिहाद’चे काम मागण्यासाठीच गेला होता; पण त्याला केवळ टेहळणीचे काम देण्यात आले. याखेरीज, ‘यापुढे काश्मीर आणि भारतावर लक्ष केंद्रित करावे की थेट अफगाणिस्तानात धडक मारून ‘ग्लोबल जिहाद’ पुकारावा’ अशी चर्चा ‘एलईटी’मध्येच सुरू झाली होती, ती पुन्हा काश्मीरकडे वळवण्यासाठी मुंबई हल्ला उपयोगी पडेल, असा ‘आयएसआय’चा हिशेब होता.
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हल्लीच काश्मीरला इस्लामाबादच्या ‘गळ्यावरली ठसठसती नस’ म्हटले आहे, त्याच्या कितीतरी आधी ही तयारी सुरू होती. प्रत्यक्ष ‘आयएसआय’शी हेडलीचा संबंध आला २००६ मध्ये. त्या वेळी त्याने काही तस्करांशी संधान बांधल्याच्या ‘आरोपा’वरून त्याला ताब्यात घेऊन ‘आयएसआय’तर्फे मेजर समीर अली आणि मेजर इक्बाल यांनी त्याची ‘चौकशी’ केली होती. मग मात्र, मेजर इक्बाल यांनीच मुंबईतल्या टेहळणीसाठी हेडलीला पैसा पुरवला. या समीर अली आणि इक्बाल यांच्याशी हेडली सतत संपर्कात राहिला. प्रत्येक टेहळणीच्या नोंदींचे- व्हिडीओ, नकाशे, इतर नोंदी असलेले- ‘पेन ड्राइव्ह’ हेडलीकडून ‘आयएसआय’ आणि ‘एलईटी’ या दोहोंना मिळत होते. यातूनच ‘एलईटी’चा साजिद मीर, ‘एलईटी’पासून फारकत घेतलेला पण ‘आयएसआय’ने पोसलेला सय्यद आणि ‘आयएसआय’चा मेजर इक्बाल यांनी २००७ संपेपर्यंत मुंबईतल्या ‘लक्ष्यां’ची निवडसुद्धा केली होती. प्रत्यक्ष कट रचला गेला तो मार्च २००८ मध्ये. त्या वेळी मुजफ्फराबाद येथे झालेल्या बैठकीत, समुद्रमार्गेच मुंबईत घुसायचे हेही ठरले होते. मग भारतीय नौदलाच्या गस्ती नौकांना गुंगारा देत मुंबईपर्यंत कसे यायचे याची तालीमही होऊन सागरी ‘जीपीएस लोकेशन’नुसार मार्ग आखला गेला. मात्र हल्ल्याच्या नेमक्या जागा एप्रिल २००८ नंतरच ठरल्या. टेहळणी करणाऱ्या हेडलीला, ‘भाभा अणुशक्ती केंद्रा’च्या फक्त रहिवासी इमारतींवर हल्ला करता येईल का हेही चाचपण्यास सांगण्यात आलेले होते- कारण एकमेकांच्या अणु-प्रकल्पांवर हल्ले करायचे नाहीत, हा आंतरराष्ट्रीय नियम पाळला नसता तर पाकिस्तानची पत पारच लयाला गेली असती.
२६/११ हल्ल्याच्या परिणामी ‘एलईटी’चे महत्त्व वाढले आणि या संघटनेकडे पैशांचा ओघही वाढलाच, असे टँकेल यांनी एका पाश्चात्त्य राजनैतिक अधिकाऱ्याचा हवाला देऊन लिहिले आहे. काश्मीरमध्ये- पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा माग काढतानाही बरेच मागे जावे लागेल. त्यासाठी कल्पनाशक्ती वापरावी लागेल आणि त्याआधारे शक्यतांची पडताळणी करावी लागेल.
आणखी एक म्हणजे, पहलगामच्या हल्ल्यानंतर कुणा हल्लेखोर संघटनेचे महत्त्व वाढू नये, याचाही बंदोबस्त भारताला करावा लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाचे माजी विशेष सचिव