सूरज एंगडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लॅक पँथरचा उदय हा अमेरिकन नागरी हक्कांच्या लढ्याची एक मोठी मर्यादा दाखवतो. नागरी हक्काची लढाई ही एकत्रित आलेल्या अनेक संघटनांनी स्वबळावर लढवली. मुळात अमेरिका या खंडातल्या राष्ट्रांची- विशेषत: आज अमेरिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘यूएसए’ या देशाची- सुरुवात ही एकंदर भांडवलशाहीच्या ‘फायदा’ या तंत्रातून झालेली आपल्याला दिसते. युरोपातले भांडवलदार जगाच्या आर्थिक बाजारपेठेत आपले वर्चस्व वाढवण्यासाठी नवीन क्षेत्रांचा शोध घेत होते. त्यांनी आपापल्या देशांमधल्या प्रस्थापितांना व राजघराण्यांना आपल्या योजनांची रेषाकृती सांगितली. तिथल्या सत्ताधारी वर्गाने नव्या क्षेत्रांच्या शोधासाठी आर्थिक गुंतवणूक केली.

अशा प्रक्रियेतूनच वसाहतवादाची रोपे रोवली गेली. तसेच अमेरिकेचा ‘शोध’ हा काही नवीन शोध नव्हता. इथे राहणारे मूळ निवासी हे लाखो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या सभ्यतेची स्वाक्षरी ठरणाऱ्या खुणा अमेरिकाभर आढळतात. किंबहुना त्यांची जोरदार पकड ही अख्ख्या दक्षिण अमेरिका या खंडावर होती. युरोपमधून पोर्तुगीज राज्य, स्पॅनिश राज्य, फ्रेंच, डीनिश, ब्रिटन अशा प्रमुख राष्ट्रांची वसाहतवादाद्वारे इथे हिंसक उपस्थिती तयार करण्यात आली.

अमेरिकन राज्यव्यवस्थेची सुरुवात सरासरी १६१९ या वर्षी दाखवली जाते. त्याचे कारण हे की, इथे अफ्रिकेतून पहिल्या गुलामांची बोट व्हर्जिनिया राज्यातल्या जेम्स टाऊन इथे आली. अमेरिकेचा इतिहास हा गुलामांच्या बेडीतून तयार करण्यात आलेल्या इथल्या परंपरेचा आहे. यानंतर इथल्या स्थानिक मूलनिवासींचा (नेटिव्ह अमेरिकन) नरसंहार करून त्यांच्या साधन संपन्न जमिनी ताब्यात घेण्यात आल्या.

अशा परिस्थितीत २४४ वर्षे गुलामांच्या रक्ताने अमेरिका विकसित झाली. १८६३ साली नागरी युद्धानंतर अब्राहम लिंकन या राष्ट्राध्यक्षाने गुलामांना मुक्त करण्याची घोषणा (इमॅन्सिपेशन प्रोक्लमेशन) केली. साधारण त्याच वर्षापासून सुरू होते इथल्या ‘ब्लॅक’ समुदायाच्या हक्कांची लढाई. म्हणून विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्या लढ्याला नव-शिक्षित ब्लॅक युवकांच्या फळीने जोर दिला. त्यानंतर काही दशकांच्या लढ्यानंतर नागरी हक्क या विषयावर काम करणारे अनेक चेहरे जगप्रसिद्ध होताना दिसतात. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. दुबॉईस, डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, इला बेकर, माल्कम एक्स, रोझा पार्क्स यांसारखी अनेक नावे झळकतात. या संघटित लढ्याचा अंतिमत: उदय अनेक कायद्यांच्या (‘सिव्हिल राइट्स ॲक्ट’) मार्फत दिलेल्या हक्कांमधून होतो.

पण हे होत असताना विरोधही जोरदार सुरू होताच. या कायद्यातल्या तरतुदी व योजनांना गोऱ्या लोकांचा विरोध होता. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर वा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांची गोळी मारून हत्या केली गेली. या वरच्या स्तरातील नेत्यांची ही अवस्था असेल तर मग सामान्य जनतेचे काय? गोऱ्या लोकांनी ब्लॅक लोकांना भीतीच्या वातावरणात राहण्यासाठी भाग पाडले. तिथले पोलीस याकडे दुर्लक्ष करीत होते. मुलांना शाळेत जाण्याची तरतूद असतानादेखील त्यांना शाळेपासून दूर ठेवले गेले. पोलिसांची, राज्याची व गोऱ्या संघटनांची जोरजबरदस्ती अतितीव्र स्वरूपाची होती. कृष्णवर्णीय लोकांना छोट्या छोट्या कारणांपायी मारहाण करून कारागृहात टाकून दिले जाई. अन्यायाचा पारा सहनशीलतेच्या वर निघून गेला होता. सगळे पीडित हतबल झाले होते. शिकलेल्या युवकांनी याविरोधात नारा दिला. अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी स्वरक्षणाची एक फळी तयार केली. त्यांनी त्या चमूचे नाव ‘ब्लॅक पँथर’ असे ठेवले.

ब्लॅक पँथरचे नाव ‘ब्लॅक पँथर्स पार्टी’ असेदेखील होते. ती संघटना ही १९६६ मध्ये तयार करण्यात आली. त्याचेे स्वरूप एक राजकीय व सामाजिक संघटन असे होते. ह्यूवी न्यूटन व बॉबी सील हे त्याचे दोन नेते. त्यांचे चिन्ह होते काळी बेरेट टोपी आणि काळे जॅकेट. ब्लॅक पँथर्सची सुरुवात ही अमेरिकेतील त्या काळातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती मॅल्कम एक्स यांच्या खुनानंतर होते. ब्लॅक पँथर्सचे नाव ‘ब्लॅक पँथर्स पार्टी फॉर सेल्फ डिफेन्स’ असेदेखील होते. म्हणजे स्वसंरक्षण हा त्यांचा मूळ मंत्र होता. ब्लॅक पँथर्स हे मूलत: मार्क्सवादी विचारांच्या जोरावर बनलेले एक पायाभूत संघटन होते. ब्लॅक पँथर्सचा वाढता प्रभाव, त्यांच्या वैचारिक तत्त्वज्ञानाची स्पष्टता, ब्लॅक राष्ट्रीयीकरणाची भूमिका यामुळे अमेरिकी ‘एफबीआय’ने त्या संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या. तरीसुद्धा, ब्लॅक पँथर्सचा दहा कलमी कार्यक्रम पीडित ब्लॅक लोकांच्या मनावर थेट ठसला. त्यामध्ये पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या शोषणाविरोधातील हाक, नोकरी, जमीन, घर न्याय यांपासून वंचित ठेवलेल्या ब्लॅक लोकांच्या समस्या अशा मुद्द्यांचा उल्लेख होता.

ब्लॅक पँथर्सची आक्रमकता पाहून जगातील अनेक देशांमधल्या पीडितांनी आपापल्या देशातदेखील ब्लॅक पँथर्सप्रणीत संघटना सुरू केल्या. भारतातील दलितांना वर्तमानपत्रांतून या चळवळीची माहिती मिळाली. ती मिळण्यासाठी मुंबईमध्ये राहण्याचा पुरेपूर फायदा झाला.
भारतातील ‘दलित पँथर’ आणि अमेरिकेतील ब्लॅक पँथर्स यांचा तसा काही वैयक्तिक किंवा अनौपचारिक संबंध आल्याचे आपल्याला दिसत नाही. यामागे कारणे अनेक आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे दोन्ही संघटना आपापल्या मायदेशात सरकारच्या दबावाखाली होत्या. दुसरा म्हणजे भाषेचा अभाव. तिसरा, थेट संपर्क- म्हणजे त्या काळात पत्र व्यवहारच- होण्यासाठी दोन्हीमध्ये असलेले अंतर. चौथा काळा/ आफ्रिकी वर्ण या कल्पनेला धरून अमेरिकेतला लढा तर इथे भारतातल्या दलितांची जात या व्यवस्थेच्या विरोधातली लढाई. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा फरक म्हणजे ब्लॅक पँथर्स हे प्रामुख्याने डाव्या विचारांचे संघटन होते, तर ‘दलित पँथर’ आंबेडकराईट – बुद्धिस्ट अशा दोन विचारांच्या आधारावर उभे राहिले.

ब्लॅक पँथर्सबाबत झाले तसे दलित पँथर्सबाबतही घडले. त्यांच्यामधील फाटाफुटी, नेतृत्वाबाबतचा संशय, एकाधिकारशाही व सरकारी गुप्तचर खात्याने पाडलेली फूट यामुळे दोन्ही संघटना अल्पायुषीच ठरल्या. परंतु त्यांचा प्रभाव त्या वेळेपुरताच न राहता तो स्थळकाळाच्या पलीकडे गेला. अख्खी सरकारी व्यवस्था आपले बळ व लक्ष घालून याच्या भीतीने खळबळून गेली होती.

दलित पँथर्स – आकलन

दलित पँथरचे आकलन आज करण्यासाठी आपल्याला विश्लेषणाच्या नव्या साधनांचा (ॲनालिटिकल टूल्स) वापर करावा लागेल. दलित पँथरचा प्रभाव महाराष्ट्राच्या पलीकडे होता. म्हणून दलित पँथरचे आकलन आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता त्यापुढे जावे लागेल. इथली बीजे अनेक अंकुरांनी, विविध भाषांमध्ये विविध राज्यांत फुलली. गुजरात, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा प्रमुख राज्यांमध्ये ही चळवळ उभी राहिली. तिथल्या स्थानिक साहित्यिक मंडळींनी नव्या दलित साहित्याचा उगम आपापल्या भाषेत केला. अनेक कवी, लेखक, अनेक कलाकार यांनी एक नवक्रांती आणली. या चळवळीत वाढलेल्या, मोठ्या झालेल्या अनेक नेते व विचारवंतांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितदेखील करण्यात आले.

काय होती दलित पँथरच्या विचारातली ताकद?

दलित पँथरने दबलेल्या ज्वालामुखीला स्फोट होण्यासाठीची इच्छा दिली. दगाबाजी आणि अत्याचार या दोन वर्तुळांमध्ये अडकलेले दलित चळवळींचे वास्तव हे विरोध व लढा यांच्या नव्या आशयाची वाट पाहात होते. परंतु सगळीकडे एक निराश राजकीय स्थिती होती. तिच्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. भीती जास्त काळ राहिली की ती उद्रेकाचे रूप धारण करते. दलित पँथरने दमनातून येणाऱ्या विद्रोहाच्या नैसर्गिक उत्पत्तीला आपले मानले. त्यामध्ये साहित्याचे, नव्या अभिव्यक्तीचे भरघोस योगदान दिले आणि जात्यंतक क्रांतीचे विचार मनामनामध्ये रुजवले.

टीकाकारांनी दलित पँथर्सचे वर्णन ‘अपयशी (फेल्ड) चळवळ’ असे केले. दलित पँथरला फक्त त्या एका संघटनेपुरते पाहाणे अपूर्ण आकलन ठरेल, असे मला वाटते. दलित पँथर्सच्या यशापयशातून अनेक धागेदोरे निघतात. अनेक छोटे, मोठे नेते त्यांच्यातून तयार झाले. दुसरे म्हणजे दबलेल्या दलित व्यक्तीला लढण्यासाठीची हिंमत पँथरने दिली. संघटनात्मक दृष्टिकोनातून विचार केला असता असे दिसून येईल की, संघटनाला एक वैचारिक बळ अत्यावश्यक असते. त्या वैचारिक साच्याचा या चळवळीत अभाव होता. मात्र, चळवळ चालवत असताना आपण काय व कसे केले पाहिजे, संघटनेचे वर्तन कसे असले पाहिजे हे दलित पँथरने अप्रत्यक्षरीत्या तरी दाखवून दिले. म्हणूनच, कितीही अल्पायुषी असली तरी दलित पँथर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतरच्या काळातील महत्त्वाचा टप्पा ठरला. दलित पँथरने अनेक घडामोडींना राष्ट्रीय पातळीवर आणले. दलित पँथर व त्यांनी लढवलेल्या लढ्याच्या प्रेरणेतून कांशीराम यांच्यासारख्या विचारवंताने काही स्तरांवर आपले संघटनदेखील बांधले.
दलित पँथर आणि ब्लॅक पँथर यांच्यामधला आमूलाग्र बदल हा वैचारिक पार्श्वभूमीचा होता. ब्लॅक पँथरने आपल्या संघटनांमध्ये मार्क्स, लेनिन यांची शैली रुजवली. तर ‘आंबेडकरवाद’ महत्त्वाचा मानणाऱ्या दलित पँथर्सने डाव्या विचारांचा ‘लाल’ रंग नुसता जवळ आला तरी त्याला वाळीत टाकल्याचे प्रकार पाहावयास मिळतात.

दलित पँथरने स्वबळावर आपले विचारविश्व तयार करू पाहिले हे खरे, पण परिस्थितीचे आंबेडकरवादी आकलन म्हणजे काय, याची उत्तरे सामूहिकरीत्या शोधण्याऐवजी ती अनेक गटांमध्ये विभागली गेली. अशा परिस्थितीत दलित पँथरकडे एक चळवळ म्हणून पाहायचे, संघटन म्हणून पाहायचे, साहित्यिक प्रवास म्हणून पाहायचे की राजकीय शक्ती म्हणून, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला दलित पँथरपासून एका वेगळ्या आकलनाकडे नेतील.

लेखक हार्वर्ड विद्यापीठात संशोधक आहेत व ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीचे अभ्यासक आहेत