मार्क लँडलर
ब्रिटिश राजघराण्याचा बडिवार कमी केला पाहिजे, असा विवेकी विचार ब्रिटनचे विद्यमान राजे तृतीय चार्ल्स यांनी फार पूर्वीपासून , म्हणजे ते युवराज होते तेव्हापासून मांडलेला आहे. पण त्यांच्याच धाकट्या मुलाचे – हॅरीचे- जे नवीन पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे, त्याने तर हा विचार भलत्याच मार्गाने, अगदी आकस्मिकरीत्या खरा ठरू शकतो!
हे धाकटे राजपुत्र हॅरी अद्याप तरी ‘ड्यूक ऑफ ससेक्स’ या उपाधीने ओळखले जातात. ‘स्पेअर’ नावाच्या पुस्तकाने हॅरी यांनी आपण राजघराण्यापासून का विभक्त झालो, त्यामागे कोणत्या कटू घटना आहेत, याच्या आठवणी अगदी तपशीलवार सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक १० जानेवारी रोजी अधिकृतरीत्या बाजारात येण्याआधीच त्यात हॅरी यांचे मोठे बंधू युवराज विल्यम, विल्यमची पत्नी कॅथरीनऊर्फ केट, वडील (राजे) चार्ल्स, त्यांची राणी कॅमिला (डायनानंतरची दुसरी पत्नी, हॅरीची सावत्र आई) यांच्याबद्दल तक्रारीच्या सुरातला इतका मजकूर आहे की, यापुढे हॅरी हे वडिलांशी समेट करून परत येतील अशा कोणत्याही शक्यता नजीकच्या काळात तरी नष्टच झालेल्या आहेत.
राजघराण्याचे वासे पोकळच कसे आहेत, असा या पुस्तकाचा सूर असून एकमेकांवर कुरघोड्या करणे, त्यासाठी सनसनाटी बातम्या देणाऱ्या ‘टॅबलाॅइड’ वृत्तपत्रांनाच हाताशी धरणे आणि एकमेकांविरुद्ध खोटीनाटी माहिती पुरवणे हे प्रकार विशेषत: कॅमिला यांच्यामुळे कसे सुरू झाले, अशी बाजू हे पुस्तक मांडते.
हॅरी हे आता पत्नी मेगन यांच्यासह अमेरिकेत, दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये राहतात; राजगादीवर वर्णी लागण्यासाठी युवराज विल्यम यांचा क्रमांक आता पहिला असून विल्यमच्या तिघा मुलांचे क्रमांक दुसरा, तिसरी आणि चौथा असे आहेत. त्यांच्यानंतर पाचवा क्रमांक हॅरीचा. थोरला पुत्र म्हणून विल्यमचा क्रमांक वरचा, हे ठरल्यामुळे ब्रिटिश राजघराण्याबद्दल सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांत विल्यम हेच ‘हेअर’ (वारस) आणि हॅरी ‘स्पेअर’ (वारसासाठी पर्याय) म्हणून ओळखले गेले… पण अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे ‘स्पेअर’ हे नाव जणू ‘सुटा भाग’ या अर्थाचा अवमानकारक शब्द म्हणूनच पाहिले जाते आहे! (पुस्तकात विल्यम आणि हॅरीच्या एका मारामारीचा प्रसंग आहे- त्यात म्हणे विल्यम म्हणतो : मी तुला फार नाही मारणार… तू तर ‘स्पेअर’ आहेस!)
तडा सांधणे कठीण
हॅरीच्या म्हणण्यानुसार, जे लोक राजघराण्यात उरले आहेत, तेदेखील विखारी स्पर्धेत अडकले आहेत. या गलिच्छ स्पर्धेसाठीच ते बाहेरच्या लोकांशी जनसंपर्क वाढवतात, आणि मग लोक आमच्या कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करतात. तो लिहितो की, त्याच्या वडिलांच्या आणि सावत्र आईच्या एका सहायकाने विल्यम आणि त्याची पत्नी कॅथरीन यांच्याबद्दल लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये नकारात्मक कथा छापवून आणल्या – मग या असल्या कागाळ्यांचा पायंडाच पडला आणि त्या चिखलफेकीच्या प्रथेचा त्रास त्याला आणि मेगनलाही झाला, त्यामुळे तर राजवाडा सोडण्याच्या निर्णयाला हातभारच लागला.
‘अशा प्रकारे वापरून घेतले गेल्याबद्दल मला चीड होती, आणि मेगनबाबत असे केले जात असल्याबद्दल मी संतापलोच होतो’ असे हॅरीने पुस्तकात म्हटले आहे. ‘पण त्याआधी विलीच्या बाबतीत असेच घडत होते हे मला मान्य करावे लागले. आणि तो त्याबद्दल न्याय्यपणे चिडलादेखील होता’ असेही त्याच परिच्छेदात नमूद आहे. तरीही, विल्यमबद्दल फारशी सहानुभूती या पुस्तकात नाही.
‘बकिंगहॅम पॅलेस’ राजवाडा या पुस्तकाबद्दल काहीही बोललेला नाही… त्या राजवाड्यात राहाणारे ब्रिटनचे राजघराणे सहसा कधीही पुस्तके/ चित्रपट आदींमधून आपल्यावर होणाऱ्या टीकेच्या संदर्भात काहीही भाष्य करीत नाही. इथे मात्र खुद्द घरातल्या- आता दुरावलेल्या- मुलाने आरोप केलेले आहेत, तरीदेखील तेच धोरण राजघराण्याने आतापर्यंत तरी पाळले असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधीच त्याच्या प्रचारासाठी हॅरीने दिलेल्या दूरचित्रवाणी मुलाखतींमधून राजघराण्यावरील हे आरोप उघड बोलून दाखवले होते, तरीसुद्धा राजवाड्यामार्फत कोणतेही भाष्य त्यावर केले गेलेले नाही.
ब्रिटनच्या राजघराण्याबद्दल बातम्या देणारे बातमीदार, या राजेशाहीचे इतिहासकार आणि अभ्यासक यांचे साधारण मत मात्र, राजघराण्याने हॅरीच्या या आराेपांबाबत काहीएक पावले उचलणे गरजेचे आहे, या बाजूने झुकलेले दिसते. राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचा मोठा सोहळा येत्या मे महिन्यात होणार आहे. त्याआधी विल्यम आणि हॅरी यांची दिलजमाई दिसावी लागेल, अन्यथा राज्याभिषेकासाठी हॅरी यांना निमंत्रणच नसणे हे त्या सोहळ्यावरील सावटच ठरेल, असे या अभ्यासकांना वाटते.
खुद्द राजावरच आरोप
राजघराण्यामध्ये १९९७ नंतर उठलेले हे दुसरे मोठे वादळ, असे निरीक्षण हॅरीच्या पुस्तकानंतरच्या वादंगाबद्दल हे अभ्यासक नोंदवतात. तत्कालीन युवराज्ञी (हॅरी आणि विल्यम यांची आई) डायना यांचा १९९७ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर हॅरी-मेगन प्रकरण हेच सर्वात मोठे वादळी प्रकरण आहे, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले. राणी किंवा राजाच गप्प कसे, ते असे का वागताहेत यांसारखे प्रश्न निर्माण होण्याचा प्रकार डायनाच्या मृत्यूनंतर राणी एलिझाबेथ गप्प राहिल्या तेव्हा झालेला होता. त्यानंतर आता राजे चार्ल्स यांच्याबद्दल असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. बीबीसीसाठी राजघराण्याच्या बातम्या देणारे माजी वार्ताहर पीटर हंट म्हणाले, “भूतकाळात प्रत्येक वेळी त्यांची सुटका करणारी मुख्य गोष्ट म्हणजे राणी निंदेच्या वर होती… परंतु आता खुद्द राजावरच भावाभावांमध्ये फूट पाडल्याचा आरोप होतो आहे.”
“राजवाड्याने असे सूचित केले आहे की हॅरी आणि मेगन यांना राज्याभिषेकासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. असे सुचवले आहे की चार्ल्स अजूनही सामोपचाराची आशा करताहेत. परंतु रविवारी अमेरिकी ‘आयटीव्ही’ चित्रवाणी वाहिनीच्या टॉम ब्रॅडबी यांना दिलेल्या मुलाखतीत, राजवाड्याकडून निमंत्रण आले तरीही आपण ते स्वीकारणार की नाही, हे हॅरी यांनी अजिबात स्पष्ट केलेले नाही- “आता आणि नंतर बरेच काही घडू शकते,” एवढेच ते म्हणाले. आधीच इतके घडले आहे की हॅरी राजेशाही पोशाखात, वडील आणि थोरल्या भावासोबत वेस्टमिन्स्टर ॲबीकडे कूच करत आहे याची कल्पना करणे कठीण आहे, ” – असे पीटर हंट यांचे म्हणणे आहे.
राजघराण्याचे संस्थात्मक अपयश
ब्रिटिश इतिहासकार एड ओवेन्स यांनी राजघराणे आणि प्रसारमाध्यमे यांच्या संबंधावर विशेष अभ्यास केलेला आहे. त्यांच्याही मते, दिलजमाई कठीणच दिसते. “हे राजघराणे दिसते तितके घट्ट नाही, त्याची वीणच उसवली आहे, हे एव्हाना पुरेसे उघड झालेले आहे. राजघराण्याचेच हे संस्थात्मक अपयश आहे” – असा निष्कर्ष ओवेन्स यांनी मांडला.
ओवेन्स म्हणाले की विल्यम हा राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचेच पुस्तकामुळे विशेषत: नुकसान झाले आहे. हा मोठा भाऊ वाईट स्वभावाचा, आयते मिळालेला आणि मारकुटा आहे असे चित्रण हॅरी करतो. एका भांडणात विल्यमने मला जमिनीवर लोळवले आणि नंतरच्या एका भांडणात शर्टच हिसकावून घेतला, इतका तपशील हॅरीने दिलेला आहे. “आता हॅरीला ते कसे सांभाळून घेणार, यावरच सारे अवलंबून राहील” – अशा शब्दांत पुढल्या काळात हे संबंध सहजपणे सांधले जाणार नसल्याचे ओवेन्स यांनी स्पष्ट केले.
हॅरी यांनी दोन अमेरिकी वाहिन्यांना (आयटीव्ही आणि सीबीएस) मुलाखती देऊन या पुस्तकाचा प्रचार गेल्या आठवड्यात सुरू केला. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेले हे पुस्तक, त्याच्या ठरलेल्या प्रकाशन तारखेच्या जवळपास एक आठवडा आधीच, स्पेनमध्ये चुकून विक्रीसाठी ठेवले गेले, त्याआधीच प्रथम ‘द गार्डियन’ या ब्रिटिश दैनिकात त्याचा भाग प्रकाशित झाला होता आणि इतरही वृत्तपत्रांनी त्या पुस्तकाचे भाग छापण्याचा सपाटाच लावला. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने या पुस्तकाची प्रत लंडनमध्ये मिळवली. थोडक्यात, ते पुस्तक अनधिकृतपणे उपलब्ध झालेलेच आहे.
या पुस्तकाच्या आतापर्यंत वृत्तपत्रांमधून आलेल्या भागांमध्ये बरेच तपशील आहेत. टीकाटिप्पणीही आता सुरू झालेली आहे. अफगाणिस्तानमध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून २५ तालिबानी सैनिकांना ठार मारल्याच्या हॅरीच्या दाव्याची ‘डेली मिरर’ने हेटाळणीच केली आहे. पण याच पुस्तकात ‘फिलिप यांच्या (चार्ल्स यांचे वडील) अंत्यसंस्कारानंतर विली माझ्यावर खार खात होता’ असेही दावे आहेत. त्या अंत्यसंस्कारप्रसंगी दोघा भावांची झालेली भेट तणावपूर्णच होती, असे ‘द सन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
समेटाचे दार उघडे आहे?
मेगनला पहिले मूल होणार असताना राजघराण्यातील एका व्यक्तीने त्या भावी अपत्याबद्दल वर्णविद्वेषी मल्लिनाथी केली तेव्हा मी भडकलो, हा २०२१ साली ‘ओप्रा विनफ्रे शो’मध्ये हॅरीनेच सांगितल्यामुळे अनेकांना माहीत असलेला प्रसंग. मात्र या पुस्तकात त्याबद्दल काहीच तपशील कसा काय नाही, याविषयी काही दैनिकांनी नवल व्यक्त केले आहे.
‘हलक्या- फार अपायकारक नसलेल्या अमली पदार्थांची नशा मी गंमत म्हणून करायचो’ इथपासून ते ‘एका पबच्या मागे असलेल्या शेतात मी कौमार्य कसे गमावले,’ इथवरचे सारे प्रसंग अगदी खुल्लमखुल्ला सांगणाऱ्या या पुस्तकात वर्णद्वेषाच्या आरोपांचा काहीही उल्लेख नाही, याचा अर्थच मुळी ‘समेटाचे एक दार हॅरीने उघडे ठेवले आहे’ असा होतो, असाही दावा आता काही जाणकार करू लागलेले आहेत! सावत्र आई – आता राजपत्नी- कॅमिला यांच्यावरच या पुस्तकाचा रोख असल्याने समेट होणार कसा, हे कोडेच आहे. दोन्ही बाजूंना बरेच क्षमाशील व्हावे लागेल, बरीच व्यापक दृष्टी बाळगावी लागेल… अशा शब्दांत, समेट अशक्यच असल्याचा निर्वाळा सध्या तरी पीटर हंट यांच्यासह सारेच ब्रिटिश इतिहासकार देताहेत.
(मूळ मजकूर ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला असून तो अधिकृत करारानुसार येथे संकलित करण्यात आलेला आहे.)