खरा भारत हा ग्रामीण भागात वसलेला आहे हे ओळखून, शहरी व ग्रामीण भागातील दरी सांधणारी शिक्षणप्रणाली गांधीजींना अपेक्षित होती. म्हणूनच ‘नयी तालीम’ या शिक्षण प्रणालीमध्ये गांधीजींनी त्यादृष्टीने विचार मांडले होते.
गांधीजींना ‘नयी तालीम’द्वारे सामाजिक सद्भावना जपणारी, विज्ञाननिष्ठ व स्वतंत्रपणे विचार करणारी, श्रममूल्य जपणारी, व्यवसाय आधारित शिक्षण घेणारी, स्वावलंबीत पिढी घडविणे अपेक्षित होते. मधल्या काळात जरी कुणाला ‘नयी तालीम’ची गरज जाणवत नसली तरी आजच्या काळात मात्र ती आवश्यक आहे. आज व्यवसायाधारित शिक्षण, सामाजिक सद्भावना व मूल्याधारित शिक्षण तसेच विज्ञाननिष्ठ व स्वतंत्र विचार करणारी पिढी घडणे ही निकडीची गरज आहे.
हेही वाचा – मराठी माणसा जागा हो, पण…
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गणेश देवी म्हणतात ‘ज्ञान हा शिक्षणाचा आत्मा असेल; आणि शिक्षण देशाचा मूलाधार असेल; तर, ज्ञान आणि शिक्षणाच्या दुरवस्थेविषयी देशाने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.’ (दि क्रायसिस विदिन नॉलेज अँड एज्युकेशन)
गांधीजींच्या अकाली हत्येने ‘नयी तालीम’ योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. परंतु विनोबा भावे, साने गुरुजी आदी शिक्षक ‘नयी तालीम’चे वारकरी होते. यांच्यानंतर मात्र ‘नयी तालीम’चे महत्त्व जाणणारे लोक कमी होत गेले. आजही ‘नयी तालीम’ शिक्षणप्रणालीमधील काही तत्त्वे वेगवेगळ्या शाळांमध्ये अवलंबिली जात आहेत, परंतु १९८६ साली राजीव गांधींनी सुरू केलेली ‘जवाहर नवोदय विद्यालय’ ही संकल्पना मात्र ‘नयी तालीम’चे प्रतिबिंब आहे. गांधीजींना नयी तालीममध्ये अपेक्षित असलेली बहुतेक तत्त्वे या योजनेमध्ये समाविष्ट झालेली दिसतात.
जवळपास प्रत्येक जिल्ह्यात एक, अशा प्रकारे भारतात ६६१ नवोदय विद्यालये या योजनेअंतर्गत सुरू आहेत. या शाळेसाठी प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता पाचवीच्या मुलांची परीक्षा घेऊन, जिल्ह्यातील ८० मुले निवडली जातात. यामध्ये ८० टक्के मुले ग्रामीण भागातील तर २० टक्के मुले ही शहरी भागातील असतात. त्यांना केंद्र सरकार मार्फत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण, वसतिगृह राहणीमान इत्यादी मोफत दिले जाते. विद्यार्थी पाचवीत असतानाच, जूनपासून ‘नवोदय’ प्रवेश अर्ज मिळू लागतात, तर प्रवेश परीक्षा नोव्हेंबरमध्ये होते.
वेगवेगळा आर्थिक स्तर, सामाजिक स्तर असलेली ही मुले एकाच प्रकारच्या खोल्यांमध्ये राहतात, एकत्र शिकतात त्यामुळे साहजिकच मुलांमधील आर्थिक, सामाजिक विषमतेच्या भिंती गळून पडतात. तीच गत जात धर्मांबाबत. समाजातील सर्वच जाती धर्मांतील मुले एकत्र रहात, जेवत-खात, शिकत असल्यामुळे सामाजिक सलोखा साधला जातो. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मकता जोपासली जावी म्हणून प्रत्येक वर्षी, प्रत्येक नवोदय विद्यालयातून काही विद्यार्थ्यांना परराज्यातील नवोदय विद्यालयामध्ये दोन वर्षांसाठी शिक्षणासाठी पाठवले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना परराज्यातील लोक, त्यांची संस्कृती, राहणीमान याची ओळख होते व राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते.
गांधीजींनाही ‘नयी तालीम’मध्ये सर्व घटकांप्रति सद्भावना जपणारे, सामाजिक भान जपणारे शिक्षण, राहणीमान अपेक्षित होते. गांधीजींना अपेक्षित असलेले ‘स्वावलंबन’ हे या योजनेमधलं आणखी एक वैशिष्ट्य. येथे विद्यार्थी स्वतःची कपडे स्वतः धुणे, रूमची, वर्गाची स्वछता ठेवणे, इतरांना जेवण वाढणे इत्यादी कामे स्वतः करतात. त्यामुणे शिक्षणाबरोबरच स्वावलंबी, श्रममूल्य जपणारी पिढी घडण्यास नक्कीच मदत होते.
‘आपण सरकारी योजनेमधून शिक्षण घेत आहोत, त्यामुळे आपण समाजाचं देणं लागतो’ ही भावना मुलांमध्ये रुजते. त्यामुळे नवोदय विद्यालयामध्ये शिकलेली मुलांमध्ये नैतिक मूल्यांची जाण जास्त असल्याचेही आढळून येते. ‘नयी तालीम’मध्ये गांधीजींना अपेक्षित असलेल्या शिक्षणाबरोबरच कला, संगीत, खेळ यांनाही या शाळेत प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.
अशाप्रकारे ही योजना ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, राहण्याची व्यवस्था याचबरोबर उच्च नैतिक मूल्यांचे शिक्षण, स्वावलंबन, कला क्रीडा आदी गुणांना वाव, धार्मिक सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता आदी मूल्यांना जपत, महात्मा गांधीजींच्या ‘नयी तालीम’च्या शैक्षणिक स्वप्नांची पूर्तता दुरान्वयाने का होईना करते.
कोणतीही सरकारी योजना इतक्या प्रदीर्घ काळ यशस्वीरीत्या चालणे हे अभावानेच घडते. परंतु गांधीजींच्या ‘नयी तालीम’ चे प्रतिबिंब असलेली, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे स्वप्न असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना मात्र आजही (नाव न बदलता) यशस्वीरीत्या सुरू आहे. आज जवाहर नवोदय विद्यालयाचे लाखो विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत, सामाजिक क्षेत्रांत योगदान देत आहेत व शिक्षण व्यवस्थेत महात्मा गांधींच्या ‘नयी तालीम’ च्या तत्वांचे महत्त्व अधोरेखित करत आहेत.
लेखक शिक्षणक्षेत्राशी थेट संबंधित नसले, तरी प्रयोगशीलता आणि ‘पेटंट’- प्रक्रिया यांविषयी विशेषत: ग्रामीण तरुणांना मार्गदर्शन करतात.
mahendra.pangarkar@rediffmail.com