डॉ हमीद दाभोलकर
दलाई लामांविषयी काही दिवसांपूर्वी उद्भवलेला वाद व त्यावरील खुलासा यांची तात्कालिक चर्चा ओसरल्यावर तरी, अध्यात्म आणि दैनंदिन मानवी जीवन यांच्या संबंधाविषयीच्या अधिक सखोल प्रश्नांची चर्चा करण्याची आणि ‘अध्यात्म अधिक मानवी व्हावे’ असे वाटू लागण्याचीही गरज आहे..
तिबेटियन बुद्धिझमचे धर्मगुरू दलाई लामा यांचा एक व्हिडीओ नुकताच प्रसृत झाला आहे. या व्हिडीओमध्ये दलाई लामांच्या मांडीवर बसलेल्या एका लहान मुलाच्या ओठाचे चुंबन घेताना ते दिसत आहेत. एवढेच नाही तर त्या मुलाला आपली जीभ तोंडात घेण्यास सांगत आहेत. दलाई लामांच्या ऑफिसने या विषयी आपले स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, ‘‘खेळकर पद्धतीने दलाई लामा अनेक लोकांना भेटतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या मुलाशी त्यांचा संवाद झाला’’. याउपर त्या मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची माफी देखील दलाई लामा यांनी मागितली आहे. असे करणे हा तिबेटमधल्या मध्ययुगीन परंपरेचा भाग आहे असे एक लंगडे समर्थन देखील काही अभ्यासकांनी केले आहे. प्रत्यक्षात तो व्हिडीओ पाहाता, दलाई लामांनी एका लहान मुलाशी अशा प्रकारे वागणे हे लैंगिकदृष्टय़ा अक्षेपार्ह वर्तणूक या सदरात मोडणारे वाटावे, असेच आहे. तसेच आजूबाजूच्या लोकांनी त्याचे टाळय़ा वाजवून कौतुक करणे हेदेखील अत्यंत आक्षेपार्ह आहे.
दलाई लामा यांच्या विचारांचा आणि ते मांडत असलेल्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव असणारा एक मोठा वर्ग जगभरात आहे. आधुनिक विज्ञान हे धर्म आणि अध्यात्म याच्या विरोधीच आहे अशी एककल्ली मांडणी करणाऱ्या धर्म मरतडांपेक्षा दलाई लामांची मांडणी वेगळी आहे. आधुनिक विज्ञानाशी संवाद करण्याचे दलाई लामा यांना वावडे नाही. मानवी मनाचे बुद्धिस्ट तत्त्वज्ञानानुसार केलेले आकलन आणि आधुनिक मेंदुविज्ञान या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख वैज्ञानिकांचे आकलन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. या दोन्हीमधील एकवाक्यतेचे आणि भिन्नतेचे प्रदेश कुठे आहेत हे तपासून पाहण्यात त्यांना रस राहिलेला आहे. भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल इंटेलिजन्स) या विषयी मूलभूत मांडणी करणाऱ्या डेव्हिड गोलमन याने संपादित केलेल्या ‘डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स’ या जगभर गाजलेल्या पुस्तकात ही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा लहान मुलाच्या प्रति सकृतदर्शनी लैंगिक वाटणारी कृती दलाई लामा यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी होते, तेव्हा त्याची प्रचलित विज्ञानाच्या आधारे चिकित्सा होणे हे क्रमप्राप्त आहे. त्या निमित्ताने संतपणाच्या संकल्पना आणि त्यामधून निर्माण होणारे ओझे याचीदेखील चर्चा करणे आवश्यक आहे.
त्यामधला पहिला प्रश्न असा की, ज्यांनी कुठल्याही मोहावर किंवा अस्वस्थ करणाऱ्या भावनेवर विजय मिळवण्याची साधना आयुष्यभर केली आहे अशा दलाई लामांच्या बाबतीत असे कसे घडू शकते? त्याचे उत्तर शोधताना आपल्याला दोन शक्यता लक्षात येतात. पहिली शक्यता अशी की, दलाई लामांचे वय आता साधारण ८८ वर्षे आहे. या वयात मेंदूची झीज होणे ही एक नैसर्गिक घटना आहे. खास करून मेंदूच्या पुढच्या भागाची झीज झाली तर सामाजिक बंधने ही पुसट होऊ शकतात. अशा प्रसंगी अयोग्य प्रकारची लैंगिक स्वरूपाची वर्तणूक देखील होऊ शकते. हे दलाई लामांच्या बाबतीत घडत असेल तर त्याचा अर्थ त्यांना मेंदू संबंधित तपासण्या आणि उपचार यांची गरज आहे असा काढता येईल. अशा परिस्थितीमध्ये ते दलाई लामा हे पद भूषवायला समर्थ आहेत की नाही हा प्रश्न निराळा. दुसरी शक्यता जरा अधिक गंभीर आहे. लैंगिक भावनेचे आयुष्यभर दमन करणे ही केवळ बैद्ध धर्मातच नव्हे तर अनेक इतर धर्मातदेखील संन्यासी बनण्यासाठीची पूर्वअट समजली जाते. आध्यात्मिक प्रगती आणि लैंगिक भावना या एकमेकांच्या विरोधी आहेत अशी ढोबळ मानाने ही मांडणी आहे. लैंगिक भावना ही भुकेच्या प्रमाणेच एक नैसर्गिक भावना असल्यामुळे तिचे दमन करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आयुष्यभर लैंगिक भावनेचे केलेले दमन हे काही वेळा अशा प्रकारे अत्यंत अनुचित पद्धतीने, व्यक्तिगत वर्तणुकीत डोकावू शकते. विविध धर्मातील संन्यासी म्हणून राहणाऱ्या लोकांमध्ये दिसून येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटना या जगाला नवीन नाहीत. पण या वास्तवाचा स्वीकार करणे आणि त्या विषयी चर्चा करणे हे नेहमीच ज्वालाग्राही ठरत आले आहे.. त्यामधून पटकन संबंधित धर्मीयांच्या भावना दुखावू शकतात, म्हणून ते टाळले जाते.
भावनांच्या दमनाचा प्रश्न
या निमित्ताने, ‘लैंगिक भावनांचे दमन करणे आणि त्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी खरेच इतकी महत्त्वाची गोष्ट आहे का?’ या विषयी सर्वानी विचार करणे आवश्यक आहे. एका टोकाला लैंगिक दमनातून आधात्मिक उन्नती आणि दुसऱ्या बाजूला ‘संभोगातून समाधीकडे’ अशा स्वरूपाची मांडणी यामध्ये सामान्य माणसाचे विचार आणि कृती हेलकावे घेत राहाते. आपल्या लैंगिक प्रेरणांचा सहज स्वीकार आणि त्याची इतर कोणालाही हानी होणार नाही अशी अभिव्यक्ती आणि त्यामधून निर्माण होणारी समाधानी वृत्ती हा समाजातील बहुतांश लोकांना उपलब्ध असलेला मार्ग हा देखील एक महत्त्वाचा मार्ग लक्षात घेतला पाहिजे.
आध्यात्मिक आचरण हे दर वेळी अत्यंत अवघड आणि समाजातील बहुतांश लोकांना कठोर प्रयत्नांनी देखील अप्राप्य असा मार्ग आहे, अशी जी धारणा आहे ती तपासून घेण्याची वेळ आली आहे का? हा प्रश्न देखील या निमित्ताने आपण विचारात घेतला पाहिजे. आपल्या नैसर्गिक भावनांचा योग्य स्वीकार करण्याचा प्रयत्न करत राहणे, दुसऱ्याला हानीकारक अशी कृती शक्यतो न करणे, जिथे शक्य असेल तिथे मदत करणे अशा साध्यासरळ मार्गाला पण आध्यात्मिक का समजले जाऊ नये, असा हा प्रश्न आहे. जसे लैंगिकतेबाबत आहे तसेच कदाचित बाकीच्या वर्तनाच्या बाबतीत देखील असू शकते. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणणारे संत-कवी सावता माळी आध्यात्मिक असू शकतात तर जीवनातील मूलभूत प्रेरणांचा स्वीकार करत त्या दृष्टीने कृती करण्याचा मार्ग हा देखील आध्यात्मिकच का समाजला जाऊ नये? त्यामध्ये दर वेळी टोकाचा त्याग, दमन, मृत्युपश्चात आयुष्य हे आणण्याची गरज आहे का? या सगळय़ा गोष्टींची चर्चा या निमित्ताने आपण केली पाहिजे.
अध्यात्माचे सामाजिक मॉडेल
गमतीचा विरोधाभास असा की, बुद्धिस्ट ध्यान परंपरेमधून उगम पावणारी ‘माइंडफुल मेडिटेशन’ ही ध्यान-पद्धती खरे तर कुठल्याही शाश्वत स्थिर मानसिकतेच्या शोधापेक्षा सद्य:स्थितीत आपली असलेली भावना आणि विचार हे अधिकात अधिक साक्षीभावाने पाहण्याला महत्त्व देणारी पद्धती आहे. आपल्या जगण्यातील आध्यात्मिक उद्दिष्ट हे रोजच्या जगण्यातील विचार भावना आणि कृतीशी संबंधित आहे. सर्व मोहांचा त्याग करून एक स्थिर मानसिक स्थिती शोधायचा प्रयत्न करणे हाच एक मोठा मोह आहे. हे समजून घेणे खरे तर फार अवघड नसतानादेखील मानवी मन परत परत त्याला बळी पडत राहते. हा जो ‘शाश्वताचा मोह’ मानवी मनाला आहे तोच पुढे मग आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष अशा चक्रांमध्ये आपल्याला अडकायला लावतो. बुद्धधर्म देखील त्यापासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकलेला नाही. त्यामधून दलाई लामांना ‘हिज होलीनेस’ अशी संबोधने वापरणे आणि मग त्यांनी केलेल्या कृतीचे लंगडे समर्थन करणे, सातत्याने त्यांना संतत्व आणि देवत्व देण्याचे प्रयत्न हे सुरू होते.
दलाई लामांच्या या एका घटनेतून आपले अध्यात्माचे जे सामाजिक प्रारुप आहे ते अधिक मानवी आणि सर्वाना शक्यतेच्या टप्प्यात असलेले, कुठल्या तरी टोकाच्या त्यागावर आधारित असण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील बऱ्या-वाईटाचा विचार करणारे आणि त्या दृष्टीने कृतिशील राहण्याचा प्रयत्न करणारे कसे असू शकेल, या विषयी शोध घेणारे असावे, असे वाटते