राजकीय नेते आणि उद्याोगपती यांचे संबंध काय स्वरूपाचे असावेत हा जगभरात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. राजकारणासाठी लागणारा अमाप पैसा उभा करण्यासाठी राजकीय नेत्यांना उद्याोगपतींची गरज भासते. खासगी उद्याोगांच्या हातातील प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून राजकीय नेते स्वत:ची प्रतिमानिर्मिती करू पाहतात. उद्याोगपतींच्या मालकीच्या वाहनांचा/ विमानांचा वापर राजकीय नेत्यांनी केला आहे अशीही अनेक उदाहरणे आहेत. याउलट उद्याोगपतींना सरकारी कंत्राटे मिळवणे, स्वत:साठी अनुकूल धोरणे तयार करणे, प्रशासनाकडून आपली कामे करवून घेणे यासाठी राजकीय नेत्यांची गरज लागते. अशा रीतीने राजकीय नेते आणि उद्याोगपती यांचे नाते परस्परावलंबी असते. मात्र या नात्याचे स्वरूप काय असावे? उद्याोगपतींचा सरकारवर किती प्रभाव असायला हवा? सरकार केवळ उद्याोगपतींसाठीच काम करते की व्यापक जनहित समोर ठेवते? सरकारी आश्रयाशिवाय उद्याोगपती व्यवसायविस्तार करू शकतात का? सरकारने उद्याोगांची बाजू घ्यावी का? घेतली तर किती प्रमाणात घ्यावी? उद्योजक राजकीय पक्षांना पैसे देणार हे गृहीतच आहे. मात्र कोणत्या कंपन्यांनी कोणत्या पक्षाला, किती पैसे, कधी दिले हे जनतेला कळायला हवे की नको, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येतात. हे प्रश्न व्यावहारिक राजकारण आणि राजकारणाची ‘थिअरी’ या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न १९व्या शतकातदेखील होते आणि आता २१व्या शतकातदेखील त्याचे महत्त्व आहेच. आपल्या आजूबाजूला पाहिल्यास या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी अनेक उदाहरणे ठळकपणे समोर येऊ शकतात. या लेखात ‘इलॉन मस्क’ यांच्या निमित्ताने या प्रश्नांची चर्चा केली आहे.

मस्क यांची वाटचाल

‘इलॉन मस्क’ ही व्यक्ती कोण आहे आणि तिची इतकी दखल का घ्यावी? मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्याोगपती आहेत. दक्षिण आफ्रिकेत जन्म झालेले मस्क अमेरिकेचे नागरिक आहेत. ते अतिशय बुद्धिमान आणि चतुर उद्याोगपती असून ‘स्पेस एक्स’ या अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीसाठी ते ओळखले जातात. मस्क यांची ओळख ‘टेस्ला’ या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनीसाठी देखील होते. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ या दोन्ही भविष्यवेधी कंपन्या आहेत. भविष्यात अवकाश प्रवास सर्वसामान्यांच्या आटोक्यात येईल तेव्हा त्यामागे ‘स्पेस एक्स’सारख्या कंपन्यांचे योगदान असेल. वातावरण बदल रोखण्यासाठी ‘टेस्ला’सारख्या इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात खळबळ माजवलेल्या ‘चॅट जीपीटी’ या तंत्रज्ञानासाठी तयार केलेल्या ‘ओपन एआय’ या कंपनीच्या संस्थापकांमध्ये मस्क होते. मस्क यांची अलीकडच्या काळातील ओळख म्हणजे त्यांनी २०२२ मध्ये ‘ट्विटर’ ही कंपनी विकत घेतली. ‘ट्विटर’ ताब्यात आल्यानंतर मस्क यांनी या कंपनीतील ७५ टक्के कर्मचारी कमी केले. तसेच सोशल मीडिया कंपन्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर नको ती बंधने लादतात असे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी ‘ट्विटर’वर असे होऊ नये यासाठी धोरणे बदलायला सुरुवात केली. ६ जानेवारी २०२१ ला ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना अमेरिकेच्या ‘कॅपिटॉल हिल’वर हल्ला करण्यास चिथावणी दिल्यामुळे ट्विटरने त्यांच्यावर बंदी घातली होती. अशा ट्रम्प यांना मस्क यांनी आपल्या ताब्यातल्या या माध्यमावर पुन्हा आमंत्रित केले.

हेही वाचा : पतौडींचा सैफ आणि समाजाचा कैफ

मस्क आणि ट्रम्प

तसेही डेमोक्रॅटिक पक्षाला आणि डाव्या विचारसरणीला विरोध करणे यामुळे २०२० पासून मस्क क्रमाक्रमाने उजव्या विचारसरणीकडे आणि रिपब्लिकन पक्षाकडे आकर्षित झाले होते. त्यातच मस्क यांच्या एका मुलीने आपण ‘ट्रान्स वुमन’ आहोत असे घोषित केल्यापासून ते अजूनच खवळले. डावीकडे झुकलेल्या विचारवंत, कलाकार, लेखक आणि पत्रकारांनी ‘आयडेंटिटी’ या मुद्द्याचे महत्त्व नको तितके वाढवले असून त्यातूनच अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने पडतात असे मस्क आणि तत्सम अनेकांचे मत आहे. विविध स्वरूपांचे अल्पसंख्य गट, ‘एलजीबीटीक्यू’ या नावाने ओळखले जाणारे गट, जगभरात शोषण होत असलेले गट, इ. अनेकांचा विचार आपण करायला हवा, त्यांना झुकते माप द्यायला हवे असा प्रवाह अमेरिकेत जोर धरत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये याचे प्रतिबिंब पडताना दिसते. कमला हॅरिस यांना अध्यक्षीय उमेदवारी देणे यातही हे ‘आयडेंटिटी’ या घटकाचे महत्त्व दिसलेच होते. अशा या विचारसरणीला ‘wokeism’ या नावाने ओळखले जाते. या विचारसरणीला विरोध करायला हवा असे अनेकांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचे या मुद्द्यावर एकमत आहे. तसेच अमाप पैसे कमावलेल्या मस्क यांना आपला प्रभाव वाढवण्याची, देशाच्या ध्येयधोरणांना आकार देण्याची महत्त्वाकांक्षा असणे हे साहजिक आहे. त्यामुळेच २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मस्क यांनी आपले वजन पूर्णत: ट्रम्प यांच्या बाजूने टाकले. ट्विटरचा वापर करून ट्रम्प यांच्या उमेदवारीचा प्रसार करणे, त्यांच्या प्रचारासाठी पैसे ओतणे आणि ट्रम्प यांच्या सभांमध्ये भाषणे करणे, इ. उद्याोग मस्क यांनी जातीने केले. यामागे ट्रम्प यांच्यावर प्रभाव टाकणे, ते सत्तेत आले तर आपल्या कंपन्यांसाठी सरकारी धोरणे अनुकूल करून घेणे, इ. छुपे हेतू होतेच.

निवडणूक जिंकल्यावर ट्रम्प यांनी मस्क आणि विवेक रामास्वामी या दोघांना ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कमिशनवर बसवले आहे. अनावश्यक सरकारी खर्चात कपात करणे आणि सरकार अधिकाधिक कार्यक्षम करणे हा यामागचा हेतू आहे. या कमिशनला नेमके काय अधिकार असतील याविषयी पुरेशी स्पष्टता नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देणे याच स्वरूपाचे काम असेल तर मस्क आणि रामास्वामी यांच्या सूचनांना फारसा अर्थ नसेल. मात्र या कमिशनकडे अंमलबजावणीचे अधिकार दिले गेले तर मात्र त्यातून अनेक प्रश्न उद्भवू शकतात. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मस्क आणि रामास्वामी यांचे ऐकतील? त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रम्प आपल्या मंत्र्यांना राजी करू शकतील? सरकार चालवणे आणि खासगी कंपनी चालवणे यात मूलभूत फरक असतो. सरकारचा हेतू ‘व्यापक समाजहित’ हा असतो तर ‘नफा’ ही उद्याोगामागील मुख्य प्रेरणा असते. मात्र अनेक उद्योजकांना हे कळत नाही. मस्क हे यशस्वी उद्याोगपती आहेत पण याचा अर्थ त्यांना इतर क्षेत्रातले कळते असा होत नाही. त्यामुळेच राजकीय क्षेत्रात विशिष्ट विषयाच्या तज्ज्ञांपेक्षा ‘जनरॅलिस्ट’ स्वरूपाचे लोक लागतात. हे भान ठेवून मस्क यांच्या उद्याोगांकडे पाहायला हवे. इथे हेही स्पष्ट करायला हवे की, मस्क यांनी ट्रम्प यांना राजकीय सल्ला देणे यात गैर काहीही नाही. मात्र एकाच वेळी उद्याोगपती आणि अध्यक्षांचे राजकीय सल्लागार या दोन्ही भूमिका पार पाडू नयेत. कारण यात ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात हितसंबंधांचा संघर्ष आहे.

धोकादायक का?

इलॉन मस्क यांच्यामुळे काय स्वरूपाचा धोका आहे? तीन प्रमुख मुद्दे समोर येतात: एक, मस्क यांच्या वर्तनामुळे जगातील इतर अनेक देशांतील उद्याोगपती सत्ताधाऱ्यांशी आपली किती जवळीक आहे हे उघडपणे मिरवू शकतात. अनेक उद्याोगपती राजकीय नेत्यांच्या जवळ असतात. मात्र ते आपली जवळीक मिरवत नाहीत. प्रत्यक्ष राजकारणापासून आपण दूर आहोत असे दाखवतात. याउलट मस्क हे सतत ट्रम्प यांच्या अवतीभोवती दिसतात. अशी जवळीक उघडपणे दिसते यामुळे आनंद व्यक्त करावा की अमेरिका असूनही असे वर्तन चालू राहते याविषयी दु:ख वाटावे? ट्रम्प यांच्याविषयी असे सांगितले जाते की अधिकारपदावर कोण आहे यापेक्षा त्यांच्या आजूबाजूला कोण वावरते यावरून काय निर्णय घेतला जाईल याचा अंदाज बांधता येतो. मस्क आणि ट्रम्प यांची जवळीक अशीच राहिली तर अमेरिकी सरकारची धोरणे मस्क यांच्या फायद्यासाठी राबवली जाणार हे उघड आहे. उदा: जर एखाद्या देशाने मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीच्या प्रवेशावर निर्बंध लादले तर अमेरिकेच्या सरकारची शक्ती वापरून त्या देशाला धडा शिकवला जाऊ शकतो. ट्रम्प यांच्या काळात हे अगदीच शक्य आहे. अमेरिकेच्या राजकारणात याआधी देखील उद्याोगपती, तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी मंत्रिमंडळात होते. अमेरिकेत उघडपणे एखाद्या क्षेत्राची बाजू घेऊन ‘लॉबी’ करणारे गट आहेत. मात्र त्यापैकी कोणीही अमेरिकी सरकारच्या व्यापक धोरणांवर प्रभाव टाकू शकला नाही. याआधीचे अध्यक्षदेखील ट्रम्प यांच्यासारखे नव्हते. मस्क यांच्याकडे ट्विटर नावाचे शक्तिशाली माध्यम आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी जवळीक ही दोन आयुधे आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून मस्क काय उद्याोग करू शकतात याची कल्पना केलेली बरी.

हेही वाचा : गोवा खरंच ओस पडू लागलं आहे का? एका एक्स पोस्टवरून सरकार का बिथरलंय?

दोन, इलॉन मस्क यांच्या वर्तनामुळे अनेक देशांच्या राजकारणात खळबळ माजू शकते. मस्क यांचे स्वत:वर, ट्रम्प यांच्याप्रमाणेच, नको इतके प्रेम आहे आणि आपल्याला सगळे कळते असे त्यांना वाटते. त्यामुळे ट्विटरवरून इतर देशांच्या राजकारणाविषयी, तेथील राजकीय नेत्यांविषयी त्यांची मते ते बेधडकपणे व्यक्त करत राहतात. गेल्या काही दिवसांत अशी मते व्यक्त करून त्यांनी बरीच खळबळ उडवून दिलेली आहे. जर्मनीत होऊ घातलेल्या निवडणुकांत मस्क यांनी अतिउजव्या पक्षाला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी एक लेखही लिहिला. हा त्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप मानता येऊ शकतो. मस्क यांनी ब्रिटनमधील अतिउजव्या ‘रिफॉर्म पार्टी’च्या नेत्यावर टीका केलेली आहे. ब्राझीलच्या सरकारशी ट्विटरच्या निमित्ताने वाद झाल्यावर तिथल्या अध्यक्षांच्या पत्नीने मस्क यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना मस्क यांनी लिहिले की, ते (पक्षी: ब्राझीलचे सध्याचे अध्यक्ष) पुढील निवडणूक हरणार आहेत. मस्क यांच्या अशा विधानांना एका बाजूने पाहिले तर काहीही अर्थ नाही. एका श्रीमंत उद्याोगपतीची वैयक्तिक मते म्हणून त्याला सोडून देता येईल. मात्र ट्रम्प यांच्याशी जवळीक असल्याने उद्या मस्क यांच्यामुळे ट्रम्प यांची या देशांविषयीची धोरणे बदलली तर? जगात जेफ बेझोस, मार्क झकरबर्ग इ. अनेक गर्भश्रीमंत उद्योजक आहेत. मात्र ते अशा स्वरूपाची विधाने करताना दिसत नाहीत. त्यांना स्वत:च्या प्रतिमेची आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या उद्याोगांची काळजी असते. त्यामुळे मग मस्क यांना काय म्हणावे? ते प्रामाणिक आहेत? बेधडक आहेत? अतिशहाणे आहेत? की वेडे आहेत?

तीन, मस्क यांचा वैयक्तिक फायदा आणि अमेरिकेचे राष्ट्रीय हित यातून निवड करण्याची वेळ येईल तेव्हा ट्रम्प काय निवडतील? मस्क काय सल्ला देतील? हा धोका कोणत्याही देशात, कोणत्याही काळात राहिलेला आहेच. अमेरिकेच्या सरकारी धोरणात या स्वरूपाचे प्रश्न याआधीही येऊन गेले आहेत. खुद्द ट्रम्प हे एक उद्योजक आहेत आणि मागील वेळेस त्यांनी स्वत:चे राजकारण आणि उद्याोग यांना बाजूला ठेवण्याविषयीचे सर्व संकेत आणि नियम धाब्यावर बसवले होते. याही वेळेस असे होईल? ट्रम्प, मस्क आणि रामास्वामी यांच्या कंपन्यांचा फायदा होईल अशी धोरणे ट्रम्प यांचे अमेरिकी सरकार राबवेल? रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा मस्क यांच्या कंपन्यांसाठी रशिया फारसा महत्त्वाचा नव्हता. त्यामुळे त्यांच्या ‘स्टारलिंक’ कंपनीचे इंटरनेट युक्रेनने वापरले आणि त्या देशाला आक्रमणाचा सामना करण्यासाठी त्याचा खूप फायदा झाला. मात्र उद्या चीनने तैवानवर हल्ला केला तर मस्क काय करतील? अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी तैवानचे संरक्षण होणे आवश्यक आहे. मात्र मस्क यांच्या व्यावसायिक हितसंबंधांच्या दृष्टीने चीन खूपच महत्त्वाचा आहे. मग अशा वेळेस मस्क ‘स्टारलिंक’चा वापर तैवानला करू देतील? ट्रम्प यांना ते काय सल्ला देतील?

राजसत्ता आणि अर्थसत्ता

जगातील सर्वात सामर्थ्यवान राजकीय नेता आणि सर्वात श्रीमंत उद्याोगपती यांच्या युतीच्या पार्श्वभूमीवर मस्क नावाच्या धोक्यापासून बचाव कसा करावा असा प्रश्न पडू शकतो. ट्रम्प यांचा शपथविधी झाला की मस्क यांना त्यांचा ‘अॅक्सेस’ इतका सहज मिळणार नाही. सरकारी जबाबदाऱ्या आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यात आपसूकच एक अंतर तयार होईल. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच मस्क यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. आपण कोणाच्या तरी सल्ल्याने वागतो असा संदेश पसरला तर ट्रम्प स्वत:च मस्क यांना आपल्यापासून दूर करतील. ट्रम्प यांना स्वत:पेक्षा कोणीही डोईजड झालेले चालत नाही. जसजसे मस्क यांचे महत्त्व वाढत जाईल तसतसे अमेरिकेतील विविध नियामक यंत्रणा, इतर उद्योजक, काँग्रेस आणि सिनेट या स्तरावर मस्क यांना विरोध सुरू होईल आणि त्यांच्या नाकात वेसण घालण्याचे प्रयत्न होऊ लागतील. आताही हे काही प्रमाणात सुरू झालेच आहे. अगदी त्यांच्या कंपन्यांना सरकारी कंत्राटे न देणे ते त्यांच्या कंपन्यांवर मक्तेदारीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करणे असे काहीही होऊ शकते. अजून एक सुदैवाची बाब म्हणजे अमेरिका आणि पाश्चात्त्य जगातील माध्यमे, राजकीय व्यवस्था आणि सामाजिक कार्यकर्ते या स्तरावर मस्क यांच्या प्रभावाची दखल घेतली जात आहे. मस्क यांची सखोल चिकित्सा पाश्चात्त्य जगात सुरू झालेली आहेच.

हेही वाचा : यूजीसीच्या दोन अधिसूचना चर्चाग्रस्त ठरताहेत, कारण…

मस्क यांचा उद्योजक म्हणून मोठेपणा मान्य करतानाच त्यांच्या राजकीय प्रभावाला आळा घालणे कसे आवश्यक आहे हेही समोर येत आहे. राजसत्ता आणि अर्थसत्ता यांची अशी युती ही जनतेसाठी नेहमीच घातक असते. मात्र हेही खरेच की उद्योजक आणि राजकीय नेते यांच्या नात्याविषयी एकच एक असे उत्तर नाही. देश-काल आणि परिस्थिती पाहून उत्तरे बदलू शकतात. व्यापक दिशा ही देशाचे आणि समाजाचे हित साधले जाण्याची असावी हे गृहीत धरलेले असते. मस्क यांचे वर्तन आणि ट्रम्प यांच्याशी जवळीक यामुळे इलॉन मस्क नावाचा धोका काय आहे आणि तो किती गंभीर आहे याची चर्चा सुरू होणे आवश्यक आहे. त्या धोक्याला समांतर अशी उदाहरणे अनेक देशांत सापडतात. त्यामुळेच देशोदेशीचे इलॉन मस्क हे लोकशाहीसाठी आणि जनतेसाठी किती धोकादायक आहेत हे लक्षात घेऊन त्यांना वेसण कशी घालावी याचे मार्ग शोधायला हवेत.

(लेखक गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अध्यापन करतात.)

sankalp.gurjar@gmail.com

Story img Loader