शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांसह महाविकास आघाडीची सामाजिक कामगिरी उत्तम आहे म्हणून मतदारांनी तीस जागांवर त्यांना विजयी केले असे विश्लेषण व आकलन करणे म्हणजे महाराष्ट्र न समजणे होय. तसे असते तर मंत्री नारायण राणे, उदयनराजे भोसले आणि श्रीकांत शिंदे हे विजयी झालेच नसते. पण याचा अर्थ मतदारांना महायुती हवी होती असाही नाही. वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना आश्वासनांखेरीज काहीच दिले गेले नाही, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी विश्वास जनमानसात निर्माण झाला नाही. बेरोजगारीचे वास्तव भेडसावत असतानाच नशेखोरीने महाराष्ट्र हवालदिल झाला आहे. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर असतानाच सर्व प्रकारच्या गुन्हेगारीने हे राज्य त्रस्त झाले आहे. वर्तमानकाळातील सर्व प्रकारच्या प्रश्नांची मुळे कालच्या काँग्रेसच्या कारकिर्दीतच आहेत असे सांगून वेळ मारून नेण्याची आणि जबाबदारी झटकण्याची विचित्र सवय गेल्या १० वर्षांत सत्ताधारी भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांना जडली आहे. या खोटारडेपणाचा महाराष्ट्राला खरा राग आला आहे.

लोकप्रतिनिधींच्या चुकांचेही समर्थन अत्यंत मग्रूरीने करणे, विरोधकांचा उन्मत्तपणे अपमान करणे, भांडवलदारांना सोयीच्या ठरतील अशा भूमिका घेत त्यासाठी कृती करणे, इतिहासाचा विपर्यास करणे या आणि अशा अनेक गोष्टींचा मतदारांना अक्षरशः वीट आला आणि त्यांनी महायुतीला नाकारण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाविकास आघाडीला ३० जागांवर यश मिळवता आले, पण दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सुशिक्षित अंधभक्तांनी अक्षरशः जिवाचे रान करत विजयासाठी प्रयत्न केले या निरपेक्ष प्रयत्नांमुळे भाजपाप्रणीत महायुतीला १७ जागांवर का होईना यश मिळवता आले हेही खरे आहे. निवडणूक प्रचारातही अंधभक्तीचा उन्माद दिसतच होता.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
The ploy of power by creating conflicts between castes Prime Minister Narendra Modi accuses Congress Print politics news
जातीजातीत भांडणे लावून सत्तेचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

आणखी वाचा-लोकांनी मोदींना इतर राजकारण्यांच्या पातळीवर आणून ठेवले आहे…

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य असेही आहे की मागच्या निवडणुकीत जनतेने कौल दिलेल्या काही छोट्या राजकीय पक्षांना यावेळी त्यांच्या धोरणे व भूमिकांमध्ये समतोल साधला आला नाही आणि अस्मितांचे राजकारणही करता आले नाही. कोणाशी धड युती करता आली नाही आणि स्वबळावरही लढून विजयही मिळवता आला नाही. मागच्या निवडणुकीत ‘माना’चे स्थान मिळवणाऱ्या सत्तेवर प्रभाव टाकणाऱ्या काही पक्षांना आणि राजकीय संघटनांना यावेळी ‘नाममात्र’ स्थानही मिळाले नाही.

शिंदेंचे महत्त्व वाढले

या निवडणुकीने देशाच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व जरा कमी केले आणि मंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढवले आहे. नारायण राणे यांच्या विजयाचे श्रेय महायुतीपेक्षा त्यांचे स्वतःचेच आहे. आता भाजपला नारायण राणे यांना टाळता येणार नाही. सात जागांवर विजय मिळवून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेशिवाय भाजपासह महायुतीला पर्याय नाही हे सिद्ध केले आहे. सात खासदारांच्या कामगिरीवर यापुढे शिंदे आणि त्यांचे सहकारी फडणवीस यांची राजकीय नाकेबंदी करू शकतात. कारण केंद्रीय सत्ता टिकवण्यासाठी सात खासदार हा आकडा मोठा आणि महत्त्वाचा आहे. परिणामी महायुतीत आता शिंदेंची शिवसेना हा मोठा भाऊ असे चित्र दिसले तर नवल नाही. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीतील कामगिरी एकाच जागेपुरती असल्याने त्यांची महायुतीतील राजकीय स्पेस मिळवण्याचे राजकारण शिंदेंची शिवसेना नक्कीच करेल. परिणामी आगामी काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण शिंदे यांच्या सेनेच्या कुबड्या घेतलेले असेल.

आणखी वाचा-राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना ‘आरसा’ दाखवणारी निवडणूक !

काँग्रेसला लक्षणीय कौल

महाराष्ट्रात आज तरी लोकसभा सदस्यांची संख्या पाहू जाता अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या भरवशावर स्वयंघोषित विद्वान असणाऱ्या गल्लीबोळातील मरतुकड्या नेत्यांनी पंतप्रधान नेहरूंपासून अनेक महनीय व्यक्तींबाबत बेताल वक्तव्य करत काँग्रेसची कितीही अवहेलना केली आणि हा पक्ष नामशेष करण्याच्या प्रतिज्ञा करीत महात्मा गांधींवर कितीही टीका केली तरी आज महाराष्ट्राने काँग्रेसला लक्षणीय कौल दिला आहे. सांगलीत तर विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवून अपक्ष उमेदवार म्हणून दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रपुरात प्रतिभाताई धानोरकर यांनी भाजपला चारीमुंड्या चित केले आहे. १५ जागा लढवून १३ जागांवरचा काँग्रेसचा विजय विरोधकांना नामोहरम करणारा आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवून आठ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने महायुतीला ३० जागांवर पराभवाचे पाणी पाजले आहे. तर काँग्रेसच्या एका अपक्ष शिलेदाराने महायुतीची चांगलीच दमछाक केली आहे. पक्षफोडीचे खापर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या माथ्यावर फोडत बसणे यावेळी महायुतीला चांगलेच भोवले. पण अशा स्थितीतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडून देत महाराष्ट्राने जातिधर्मांचे राजकारण न करता विकास आणि माणुसकीला प्राधान्यक्रम देणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनतेचा पाठिंबा असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

अजित पवार, राज ठाकरे अपयशी

दुसरीकडे प्रशासनावर पकड असलेला नेता अशी ख्याती असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका ठिकाणी यश मिळाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन महायुतीने काय कमावले हे दोन्ही विषय बरेच दिवस चर्चेचे असणार आहेत. अजित पवार आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांना या निवडणुकीत राजकीय सूर गवसला नाही. त्यांचे महत्त्व कमी झाल्याचे नागरिकच बोलून दाखवत आहेत. समाजमाध्यमांवर त्यांच्या पूर्वीच्या भाषणांच्या क्लिप फिरविण्यात येत असल्यामुळे सध्या तरी जनतेचे पुरेपूर मनोरंजन होत आहे. महायुतीच्या बेताल आणि बेफाम नेत्यांना वास्तवाचे भान देण्यासाठी ही दोन्ही उदाहरणे पुरेशी आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेची खासदारकी मिळवत बेरजेचे राजकारण केले असले तरी त्यांना सोबत घेऊन महायुतीने आपली आदर्श वजाबाकी केली आहे. शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसमधून आलेले आयाराम यांच्यामुळे अंधभक्तांचे चाणक्य असणारे तडफदार नेते मात्र स्वप्रतिमा आणि पक्षप्रतिमा दोन्ही गमावून बसले आहेत. पण राजकारणात पुढे काय होईल हे आज सांगता येत नाही. आजची प्रतिमा पाहून नागरिक मतदान करतात, उद्याचे राजकारण काय असेल ते सांगता येत नसते.

आणखी वाचा-संविधान बदलाच्या चर्चेचा भाजपला फटका

अनेक वजाबाक्यांमधून बेरजेची समीकरणे सदसद्यःस्थितीत केवळ राजकारणातच निर्माण होणे शक्य आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भावनेच्या राजकारणातून बाहेर पडून सेवा, संघटना, विज्ञान, संविधान, धर्मनिरपेक्षता यांना प्राधान्य देत मराठी भाषा व मराठी माणसांच्या आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणासाठी नव्या जोमाने कामाला लागण्याची गरज आहे हे मुंबईतील मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले. महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांच्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करून संविधाननिष्ठा सिद्ध केली आहे, आगामी काळात संविधान,आरक्षण, विज्ञाननिष्ठा या मूल्यांशी महाविकास आघाडीने बांधिलकी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आरक्षणाचे राजकारण, जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन, जुनी पेन्शन न देण्याचे धोरण आणि संघटनांची फोडाफोडी, नाठाळ कृतिशून्य वाचाळांना दिलेले महत्त्व आणि प्राधान्य यांमुळे महायुतीची वाटचाल वजाबाकीच्या दिशेने होत राहिली. परिणामी आज तरी महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. सद्यःस्थितीत शरद पवार हेच महाराष्ट्रातील राजकारणातले खरे महानायक आहेत हे सिद्ध झाले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह यापेक्षाही पक्षाच्या नेतृत्वाची लोकमानसातील प्रतिमा आणि त्याचे कर्तृत्व महत्त्वाचे असते हेदेखील या निवडणुकीने दाखवून दिले आहे. मतदारांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध केले आहे, आता या राज्याला प्रगतिशीलतेच्या वाटेवर नेण्याची आश्वासने पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले पाहिजेत.

लेखक समीक्षक आणि राजकीय विश्लेषक आहेत.

ajayjdeshpande23@gmail.com