भुशी धरण परिसरातील धबधब्यावर वर्षाविहाराचा आनंद लुटताना त्यांना अजिबात कल्पनाही नसेल, की इतके मायाळू वाटणारे पाणी क्रूर होऊन आपल्यावर झडप घालणार आहे. पाण्याचा अंदाज नाहीच लागत असा. ते छायाचित्रे टिपत होते, दृश्यफिती चित्रित करत होते. त्यांना त्या सगळ्या अनुभवाची आनंदी आठवणखूण तयार करायची असणार. पण, ते करताना पाण्याने आपला प्रवाह इतका वेगवान केला, की आत्ता आत्तापर्यंत लडिवाळ स्पर्श करत पायाला बिलगणारे पाणी विळखा होऊन घट्ट आवळू लागले. त्यापुढे काय झाले आणि ते कसे वाहून गेले, हे समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या दृश्यफितींमधून एव्हाना लाखो जणांनी पाहिले आहे. जे झाले, ते भयानक होते. ही दृश्यफित प्रसारित झाली, तेव्हा ती पाहून मन विषण्ण झाले. आजूबाजूला असलेल्यांना त्यांना वाचवायची इच्छा असूनही पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे त्यांचेही काही चालले नाही. ही हतबलता अधिक उद्विग्न करणारी आहे.

ही घटना आणि ताम्हिणीमध्ये पोहायला उडी मारलेला तरुण वाहून गेल्याची घटना, दोन्ही लागोपाठच घडल्या. पावसाळा हा ऋतू निसर्गाचे सौंदर्य खुलवणार असतो. ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि तो अनुभव छायाचित्रे किंवा दृश्यफितीत साठवून ठेवण्यासाठी कोणीही उत्सुक असणार यात शंका नाही. पण, या दोन्ही घटना त्या पलीकडच्या आहेत; अजाणतेपणी असेल, पण धोके न कळल्याने काय संकट ओढवू शकते, याची पुन:पुन्हा आठवण करून देणाऱ्या आहेत; दर पावसाळ्यात अशा घटना घडून जीव जातात, तरीही आपण त्यातून काहीच धडा घेत नसल्याचे स्मरण करून देणाऱ्या आहेत. कोणताही आनंद हल्ली ‘मनाला आनंद झाला, पुरे,’ अशा स्वरुपाचा असून भागत नाही. त्यासाठी विशिष्ट गोष्टी केल्याचे ‘टिकमार्क’ करावे लागते. म्हणजे उदाहरणार्थ, पावसाळा आला, की अमुक एक किंवा तमुक इतक्या सहली झाल्याच पाहिजेत आणि पुरावा म्हणून त्यांची छायाचित्रे, दृश्यफिती समाज माध्यमांवर झळकलीच पाहिजेत, असे. हे असे करण्यासाठी आणि इतरांपेक्षा वेगळे ठरण्यासाठी कृतीत काही तरी वैचित्र्य आणावे लागते. भान सुटण्याचा हाच बिंदू असतो. जीव गेल्याच्या दोन घटना घडूनही रीलसाठी बंधाऱ्यावर पाण्यात झोकून देणाऱ्या तरुणीची दृश्यफित समोर येते, तेव्हा या बिंदूपासून सुरू होणारी सीमारेषा बरेच जण विसरले आहेत, याची खात्री पटते.

हेही वाचा – विद्यार्थ्यांतून शिधायोजनांवर विसंबून राहणारा वर्ग घडवायचा आहे का?

वर्षाविहाराच्या वेळी झालेल्या दुर्घटनांनंतर धोकादायक पर्यटनाबाबत बरेच बोलले, लिहिले गेले. त्यातून खरेच काही हाती पडते का, हा खरा प्रश्न. सार्वजनिक आनंद साजरा करणे आणि उन्माद करणे यातील सीमा पुसली गेलेल्यालाही आता बराच काळ लोटला. पावसाळ्यात घाटांत, गड-किल्ल्यांवर दिसणारी दृश्ये याचे पुरावे. घाटातल्या एखाद्या वळणावर धबधबा कोसळत असेल, तर ते वळणच अडवून ठेवून धांगडधिंगा करणे, किल्ल्यांचे पावित्र्य न राखणे हे प्रकार गेली काही वर्षे सर्रास घडत आहेत. हे घडू नये, म्हणून लगेच पर्यटनात काही लष्करी शिस्त आणावी किंवा नियमांचे अवडंबर माजवावे, असे करणे मूर्खपणाचेच ठरेल. पण, म्हणून सार्वजनिकरीत्या व्यक्त होण्याच्या मर्यादा ओलांडाव्यात, असेही अपेक्षित नाही. निसर्गाचा आवाज ऐकावा, त्याच्या पाना-फुलांतून वाहणारे संगीत ऐकावे, इतकी अभिजातता यावी, हे फार आदर्श झाले. पण, एखाद्या धबधब्यात भिजताना गाड्यांच्या ध्वनिक्षेपकांवरून इतरांना त्रास होईस्तोवर कंठाळी संगीत वाजवत, रस्ते अडवून नाचणे म्हणजे व्यक्त होणे नव्हे, इतके भान तरी आले पाहिजे ना. या भानाबरोबरच जे काही करायचे आहे, ते स्वत:चा जीव सांभाळून करावे, हे सांगण्यासाठीही वेगळे नियम करण्याची गरज नसली पाहिजे. लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी येथे पावसाळी पर्यटन करायला गेल्यावर तेथील निसर्गाला गृहीत धरून कसे चालेल? परदेशात पर्यटन करताना आपण नकाशांपासून हवामानापर्यंत आणि खाण्याच्या ठिकाणांच्या चौकशांपासून कुठे काय करावे, करू नये याची नियमावली माहीत करून घेण्यापर्यंतची तयारी करत असू, तर आपल्या प्रदेशातील ठिकाणी जाताना ती का नसावी? पावसाळा सुरू झाला, की भुशी धरण भरते आणि तेथील सांडव्यावरून पायऱ्यांवर वाहणाऱ्या पाण्यात भिजायला दर वर्षी पर्यटक येतात. इथपर्यंत ठीकच. पण, पोहता येत नसूनही खोली माहीत नसलेल्या पाण्यात उतरण्याचे धाडस येते कुठून? मुळात हे धाडस नव्हे, हा हलगर्जीपणा आहे. पण, आपल्या शौर्याच्या कल्पना तद्दन फिल्मी असल्याने हे असे प्रसंग म्हणजे आपल्यातील नायकत्वाला झळाळी देण्याची जणू मोठी संधी आहे, अशा भंपक भ्रमाखाली ते केले जाते. अनेक जण ते ‘रील’बद्ध करून प्रसिद्धी मिळवतात आणि काही जणांना ते करण्यासाठी जिवंत राहायचीच संधी मिळत नाही.

पर्यटन धोकादायक ठरू नये, म्हणून वैयक्तिक भान राखणे हा एक पैलू झाला. तसाच दुसरा महत्त्वाचा पैलू आहे नियमनाचा. वैयक्तिक पातळीवरच इतकी शोकांतिका असताना, पर्यटनस्थळांची देखरेख आणि देखभाल करणाऱ्या प्रशासनाचे उपाय तरी किमान कल्पक असावेत, अशी अपेक्षा करावी, तर त्या पातळीवरही आनंदच. म्हणजे, वर्षा पर्यटनाला गेल्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालून काही करू नका, असे आवाहन करणे, तशा आशयाच्या सूचनांचे फलक वगैरे लावणे योग्यच, पण पर्यटक ऐकत नाहीत म्हणून पर्यटनावरच बंदी घालणे हा कोणता उपाय? गर्दी आवरत नाही, तर ती कशी आवरता येईल, याचा विचार करायचा, की थेट बंदी घालून पर्यटनच बंद पाडायचे? यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या घटनांनंतर असेच काही उपाय पुणे जिल्ह्यात योजले गेले. वन क्षेत्रातील किंवा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील बंदीवर कोणीच आक्षेप घेण्याचे कारण नाही. तसेच, खोल पाण्यात उतरणे, धोकादायक पद्धतीने वाहने लावणे, नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करणे आदींवरील बंदीही योग्यच. पण, बंदी आहे म्हणून तेथे कोणी फिरकणार नाही, याची खात्री कोण आणि कशी देणार? त्यासाठी आधी व्यवस्था नको का उभारायला? मध्यंतरी सिंहगड, कास पठार येथील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी ठरावीक संख्येनंतर प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. असे असूनही सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी झाल्याची, कोंडी झाल्याची छायाचित्रे येतातच. कळसुबाई शिखर, नाशिकचा हरिहर गड, लोहगड, राजमाची येथील गर्दी नुसती पाहूनच धडकी भरते. म्हणजे नियम तर आहेत, पण त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणाच नाही, असे चित्र. मग यावरचा टोकाचा जालीम उपाय म्हणजे अलीकडे देण्यात आलेला जमावबंदीचा आदेश. याची परिणामकारकताही एका मर्यादेपर्यंत असणार आहे, हे प्रशासनाला माहीत नसेल का? नियम केला, की तो हमखास मोडणारेच जास्त असतात, हे आता आणखी किती वेळा सिद्ध करायचे बाकी राहिले आहे? शिवाय, जेथे जाण्यास हरकत नाही, जेथे पर्यटकांच्या क्रयशक्तीवरच अनेकांचे हंगामी वा पूर्ण वेळचे व्यवसाय अवलंबून आहेत, अशा ठिकाणांवरील पर्यटनाचे काय? तेथे जर जमावबंदीसारखे आदेश लागू असतील, तर त्यातून नेमके काय साध्य होणार आहे?

हेही वाचा – बालकामगार या प्रश्नाला दररोज, प्रत्येक क्षणी विरोध केला गेला पाहिजे…

पर्यटनाला जसा सांस्कृतिक कोन आहे, तसा आर्थिक आयामही आहे. महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, गिरिस्थाने आणि गड-किल्ल्यांचे वैभव देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू आहे. त्या भोवती सध्या अर्थकारणही गुंफले गेले आहे, ज्याचे स्वतंत्र सशक्त अर्थव्यवस्थेत रुपांतर करण्यासाठी काही मूलभूत काम करावे लागणार आहे. परदेशांत पर्यटन करताना तेथील स्वच्छता आणि नियमपालनाचे कौतुक होते. पण, ते करण्यासाठी त्यांनी जी यंत्रणा उभी केली आहे, त्याची आपल्याकडील परिस्थितीला साजेशी प्रतिकृती उभी राहत नाही, तिचा साधा विचारदेखील होत नाही. तेथील समुद्रकिनाऱ्यांचेच उदाहरण घ्यायचे, तर कोणत्या किनाऱ्यावर फिरायचे, कोणत्या नाही, याची इतकी स्पष्टता असते, की मज्जाव असलेल्या ठिकाणी जाताच न येण्याची पुरेपूर व्यवस्था केली जाते. जेथे जाता येते, तेथे पुरेसे जीवरक्षक, इशारा व्यवस्था, स्वच्छतेची मानके असे सगळे सगळे यंत्रणेच्या पातळीवर अस्तित्वात असते. आणि, ते पर्यटकांकडून पाळलेही जाते. आपण मात्र अजूनही हे करण्याऐवजी तत्कालिक, फुटकळ उपाय करून वेळ मारून नेणे असेच करत आहोत. एकीकडे वैयक्तिक पातळीवर शिस्तीचा अभाव आणि दुसरीकडे मूलभूत काम करण्याबाबत अनास्था अशा कात्रीत आपल्याकडचे पर्यटनही अडकले आहे. एक समजून घ्यायला हवे, की आपल्याला पर्यटक म्हणून स्वयंशिस्तीचे वावडे आहे, कारण आपल्या व्यवस्थेलाही शिस्त नाहीये. काही केले तरी चालते, असे चालवून घेऊन नाही चालणार! पर्यटन हासुद्धा समाजाचा सांस्कृतिक मापदंड असतो, याची आपल्याला नीट जाणीव नाही. ती लवकर आली, तर बरी. अन्यथा, घसरण सुरूच आहे…

siddharth.kelkar@expressindia.com