डॉ. अजित रानडे
‘जेव्हा संभाषण, मुक्त अभिव्यक्ती, मुक्त वादविवाद, मतमतांतरे आणि प्रसंगी टीका, उपमर्द करण्याचे स्वातंत्र्य असते तेव्हाच बाजार त्याचे कार्य उत्तमरीत्या करू शकतात. समाजाने अधिक स्वातंत्र्याकडे विकसित होत जाणे गरजेचे आहे,’ हे स्कॉटिश तत्त्ववेत्ते ॲडम स्मिथ यांचे विचार आजही रसरशीत, समर्पक आणि पर्यायाने आकर्षक ठरतात. अर्वाचीन आर्थिक विचारप्रणालीची रुजुवात करणाऱ्या स्मिथ यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त..
अर्वाचीन आर्थिक विचारप्रणालीची रुजुवात ज्यांनी केली ते स्कॉटिश तत्त्ववेत्ते ॲडम स्मिथ यांची ३०० वी जयंती जूनमध्ये साजरी केली जात आहे. त्यांचा सर्वाधिक चर्चित ग्रंथ ‘ॲन इन्क्वायरी इनटू दी नेचर अँड कॉजेस ऑफ दी वेल्थ ऑफ नेशन्स’ १७७६ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी ब्रिटिश सत्तेला झुगारून अमेरिकेने स्वातंत्र्याची घोषणा केली. या योगायोगाचे आणखी एक लक्षणीय औचित्य असे की, आधुनिक जगात मुक्त अर्थव्यवस्थेवर आधारित भांडवलदारी व्यवस्थेची पताका सर्वप्रथम हाती घेण्याचे आणि हा बुरूज इतका काळ चिवटपणे तगवण्याचे काम अमेरिकेनेच केले आहे. ती जगातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक समृद्ध अर्थव्यवस्था आहे. मुक्त बाजारपेठ व्यवस्थेच्या तत्त्वाचा अंगीकार तिने केला आणि प्रात्यक्षिक राबविले हे त्यामागील एक कारण निश्चितच! बाजारप्रणीत व्यवस्थेत व्यक्तिगत उद्यमसाहस आणि स्वहित व स्वार्थाच्या ध्यासातूनच अर्थव्यवस्थेतील वाढ साधली जात असते. स्मिथ यांच्या मूलतत्त्वांचा हाच आत्मा आहे. ‘वेल्थ ऑफ नेशन्स’मध्ये त्यांनी मांडलेले मत सर्वज्ञातच आहे की, ‘‘आपल्यापुढे येणारे जेवणाचे ताट हे खाटीक, दारू गाळणारा किंवा पाव बनविणारा यांच्या परोपकारामुळे येत नसते, तर त्या प्रत्येकाच्या स्वार्थाची ती परिणती असते. आपल्या दृष्टीने त्यांच्यातील मानवतेचा भाव नव्हे तर त्यांच्या आत्मप्रीतीला महत्त्व असायला हवे. त्यामुळे त्यांच्याशी आपल्या गरजांविषयी नव्हे तर त्यांना होऊ घातलेल्या फायद्यांविषयी बोलले जाणेच इष्टतम.’’
स्वार्थाचा ध्यास हा सामाजिक उत्कर्ष आणि समृद्धीलाही चालना देतो. मात्र ही स्वार्थसिद्धी सुरचित नियम-कानूंनुसार (जसे मालमत्तेचा हक्क) व्हायला हवी. हे मूलभूत तत्त्व आजही विधिमान्य आणि वैध आहे. उद्योजक किंवा गुंतवणूकदार नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा कमावलेला नफा त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या जीवनातही सुधारणा घडवून आणतो. स्मिथ यांनी त्याच पुस्तकात इशारा देताना म्हटले आहे की, ‘‘आर्थिक विकास उत्तम प्रकारे तेव्हाच शक्य आहे जेव्हा व्यक्तीला तिच्या मालमत्तेचे (म्हणजेच भांडवलाचे) व्यवस्थापन करू दिले जाईल आणि सरकारच्या हस्तक्षेपातून किंवा ‘केंद्रीय नियोजना’तून त्याची वासलात लागेल हे पाहिले जाईल. बाजार जे साध्य करू शकतो त्यापेक्षा चांगले काही कोणत्याही सरकारला साधता येऊ शकत नाही आणि भांडवलाची विभागणी करण्याचे अधिकार सरकारच्या हाती असणे हे तद्दन मूर्खपणाचे आणि शक्यतो संकट ओढवून घेणारेच आहे.’’
राजसत्तेच्या बाजारातील हस्तक्षेपाच्या धोक्यांबद्दल स्मिथ आणि त्यांच्या नंतरच्या उदारमतवादी तत्त्ववेत्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांनी निश्चितपणे अनेकांना प्रेरित केले. त्याच कुळातील फ्रेडरिक वॉन हायेक यांचा ‘रोड टू सर्फडम’ ग्रंथ असाच धोक्याची ताकीद देणारे होते. एक हस्तक्षेप हा दुसऱ्याला जन्म देतो आणि लवकरच तुम्हाला पूर्णत्वाने बेडय़ा पडल्याचे दिसून येते. हे आपणही अनुभवतोच आहोत. भारतातील शेतमाल किंमत धोरणाचे पाहा. शेती अल्पखर्चीक राहील अशा प्रयत्नांत, शेतकऱ्यांना कर्ज, खते, बियाणे यासाठी अनुदान सरकार देते आणि मग पुढे उत्पादित मालाच्या किमतीही नियंत्रित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात एकाधिकार खरेदीतही सरकारच अग्रेसर, अशी ही नीती आहे. सरकारच्या हस्तक्षेपातून ओढवून घेतलेल्या संकटाचे भारतीय शेती हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यातून भारतीय शेतकरी आज आर्थिक गुलामीच्या बेडय़ांत संपूर्ण अडकलेला दिसतो. हस्तक्षेपवादी औद्योगिक धोरणाचेदेखील नि:संशय दुष्परिणाम आहेत. पण दुर्दैव असे की, त्या संबंधाने अलीकडे सुरू असलेला विचारदेखील आणखी अधिक हस्तक्षेपाची गरज प्रतिपादित करणारा आहे. जर तुम्ही बाजारपेठेला विना-बाधा काम करू दिले नाहीत, तर त्याचे वाईट परिणामच दिसून येतील. स्मिथच्या पावलावर पाऊल ठेवत ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’च्या प्रकाशनाच्या चार दशकांनंतर कार्ल मार्क्सनेदेखील ‘भांडवलशाही हा समाजाच्या विकासातील आवश्यक टप्पा’ असेच म्हटले आहे. अर्थात, भांडवलशाहीमुळे समृद्धी येते असे मानणाऱ्या स्मिथच्या विपरीत मार्क्सची भूमिका होती. भांडवलशाहीचा अंत हा तिच्या अंगभूत अंतर्विरोधांमुळे होईल, असे मार्क्सचे भाकीत होते.
स्मिथलादेखील एकाधिकारी बाजार नियंत्रणाच्या धोक्यांची जाणीव होती आणि बाजाराच्या संदर्भात मक्तेदारी पद्धतीवर त्याचा कटाक्ष होता. त्याने लिहिलेच आहे की, ‘‘एकसारख्या व्यापारात असणारे लोक अगदी आनंदासाठी किंवा विरंगुळा म्हणूनही क्वचितच एकत्र भेटतात, परंतु त्यांच्या अशा भेटीगाठी आणि संभाषणांचा शेवट नेहमीच लोकांविरुद्ध कट रचण्यात किंवा किमती वाढवण्याच्या हेतूनेच होतो.’’ भारतीय स्पर्धा आयोगासारखी नियामक यंत्रणा आज अस्तित्वात असणे आणि तिने मक्तेदारी प्रतिबंधासाठी जागरूकतेने देखरेख करणे हे स्मिथच्या त्या इशाऱ्याच्या बरहुकूमच म्हणायला हवे.
स्मिथला त्याच्या काळात फारशी लोकप्रियता मिळू शकली नाही, त्यामागचे कारण त्याच्या व्यापारीवादविरोधी भूमिकेत दडले असावे. तरीही त्याने अत्यंत सौम्य मार्ग निवडत त्याचा हा मुद्दा पुढे रेटला. त्याचे म्हणणे असे की, स्कॉटलंडमध्ये द्राक्षे पिकवून त्यापासून वाइन बनवण्याचा जर प्रयत्न केला तर तो ३० पट महागडा ठरेल. त्याऐवजी परदेशातून द्राक्षे आणली (म्हणजे आयात केली) तर ते तितकेच नफा देणारे होईल. प्रत्यक्षात आज, स्कॉटलंडमध्ये क्लॅरेट आणि बरगुंडी बनवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून, सर्व परदेशी वाइनच्या आयातीवर बंदी घालण्याचा कायदा करणे वाजवी ठरेल का? आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण होऊ शकतो का? अमेरिका एक ग्रॅमदेखील कॉफीचे उत्पादन घेत नाही किंवा ऊस पिकवत नाही आणि तरीही हा देश या दोन्हीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. सिंगापूर अन्न, ऊर्जा आणि अगदी पिण्याचे पाणीदेखील आयात करतो. तर मग आत्मनिर्भर असणे म्हणजे नेमके काय? स्मिथच्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात ‘आत्मनिर्भरता’ हा पैलू कसा समजून घेता येईल?
केवळ ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’ पुस्तकावरून स्मिथ समजून घेतल्यास, त्याच्याबद्दलची आपली जाण अपुरी आणि दिशाभूल करणारीही ठरेल. त्याच्या १७ वर्षांआधी, १७५९ मध्ये त्यांनी ‘थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स’ हे दुसरे पुस्तक लिहिले. हे पुस्तकच त्यांनी त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले आहे. स्कॉटिश प्रबोधनकाळाचे अग्रदूत म्हणून त्यांची भूमिका आणि उंचीवर या पुस्तकामुळेच लख्ख प्रकाशझोत पडला आहे. स्मिथ यांना न्याय आणि निष्पक्षतेची अतीव काळजी होती. इतरांना दुखवून कोणीही स्वत:चे भले करू इच्छिणार नाही यावर त्यांचा गाढा विश्वास होता. आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक ‘आत्म-प्रेक्षक’ आहे, ज्याचा आपण एक सदसद्विवेक असाही अर्थ लावू शकतो, जो आपल्याला सतत मार्ग दाखवत असतो. त्याने लिहिले आहे त्यानुसार, ‘‘मानवी आनंदाचा मुख्य भाग हा प्रिय असण्याच्या जाणिवेतून उद्भवतो.’’ येथे, प्रेम मिळवणे यामागे लोकांकडून सुख मिळविणे असा अर्थ अभिप्रेत नाही तर प्रशंसा आणि आदर मिळविणे स्मिथला अपेक्षित आहे. फक्त प्रेम मिळवण्याची इच्छाच नाही तर प्रेमळ असणे ही वृत्ती माणसात उपजतच असते. म्हणजेच, प्रेमास पात्र असणे आणि उच्च नैतिक स्तरावर जगणे हा मानवी स्थायिभाव असतो.
याचे अप्रत्यक्षपणे उमटलेले प्रतिध्वनी म्हणजे, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती एकदा म्हणाले होते की, त्यांना त्यांची कंपनी सर्वात मोठी किंवा सर्वात फायदेशीर किंवा सर्वोच्च बाजार मूल्य असलेली बनल्याचे पाहायचे नसून, ती प्रतिष्ठित व सर्वात आदरणीय ठरावी अशी त्यांची इच्छा आहे. स्मिथने लिहिले की, आम्हाला इतरांची दुर्दशा समजून घेता येणार नाही कारण आम्ही ती अनुभवली नाही. तरीसुद्धा, आपण स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून, त्यांना सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांची कल्पना करू शकतो. हे आहे सहानुभूतीचे सार, ज्याचा त्याने पुरस्कार केला. म्हणून खूप जास्त असमानता ही अन्यायकारक आणि अयोग्य आहे असा युक्तिवाद करणारा स्मिथ हा पहिलाच अर्थवेत्ता असावा. पण इतरांच्या जीवनाचे कल्याण हे सरकारी बळजबरी आणि कायद्याच्या सक्तीने नव्हे तर दानधर्म आणि परोपकारातून होईल यावरही त्याचा विश्वास होता. अर्थात, या त्याच्या भूमिकेवर मतमतांतरे असू शकतात, परंतु निष्पक्षता आणि न्यायाविषयी त्याच्या काळजीबाबत दुमत असूच शकत नाही.
अमर्त्य सेन यांनीदेखील स्मिथच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांच्या मतेही मानवी कल्याणासाठी चांगल्या व्यवस्थेमध्ये समाजाच्या विकसनाची प्रक्रिया ही जैव स्वरूपाची असायला हवी. सामाजिक उत्क्रांती ही केवळ परोपकारी हुकूमशहांच्या आणि समाजसंस्थांच्या सुयोग्य रचनेतून अथवा कोणा तारणहाराच्या कर्तबगारीतून घडून येऊ शकत नाही. ती घडेल ती स्वहितासाठी, म्हणजेच पर्यायाने समुदाय व समाजासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींकडून आणि त्यांच्यामार्फतच घडेल. व्यक्ती आणि तिच्या विमुक्त स्वातंत्र्यासह, मूळ पायापासून झालेले हे नैतिक बळकटीकरण अधिक जैवही असते.स्मिथ यांनी ग्लासगो विद्यापीठात तर्कशास्त्र आणि अलंकारशास्त्राचे अध्यापन केले आहे. साहजिकच, मन वळवण्याची कला त्यांच्या या प्रबंधातदेखील केंद्रस्थानी होती.
बाजारदेखील निरंतर संवाद-संभाषणाचा मंच आहे आणि येथे प्रत्येकाचा त्याच्या कल्पनांशी सुसंगत इतरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. शिलिंग देऊ करणे किंवा विक्रेत्याकडून ग्राहकाला काही तरी खरेदी करण्याची गळ घालणे, हीदेखील मन वळवण्याचीच एक कृती आहे. जेव्हा संभाषण, मुक्त अभिव्यक्ती, मुक्त वादविवाद, मतमतांतरे आणि प्रसंगी टीका, उपमर्द करण्याचे स्वातंत्र्य असते तेव्हाच बाजार त्याचे कार्य उत्तमरीत्या करू शकतात. समाजाने जैवरीत्या, सहमतीपूर्ण, संभाषणात्मक मार्गाने अधिक स्वातंत्र्याकडे विकसित होत जावे अशी स्मिथची इच्छा होती. म्हणून त्यांचे विचार आजही तितकेच रसरशीत, समर्पक आणि पर्यायाने आकर्षक आहेत, जसे ते तीन शतकांपूर्वी होते.
(लेखक अर्थतज्ज्ञ आहेत)