जागतिक समाजशास्त्राचा चेहरामोहरा बदलून त्याला लोकाभिमुख करणारे सिद्धान्तकार आणि जागतिक वैचारिक नेते म्हणून मायकल बुरावे जगातील लक्षावधी सामाजिक शास्त्रज्ञांच्या मनात कायमचे राहतील, यात शंका नाही. ३ फेब्रुवारीला लॉस एंजेलिसमध्ये त्यांच्या झालेल्या अपघाती निधनाने आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र संघटनेचे हजारो सदस्य, आफ्रिका आणि अमेरिकेतले त्यांचे सहकारी, विद्यार्थी आणि त्यांचे जगभरातले वाचक-चाहते सर्व सुन्न झाले आहेत.

कितीही नकारात्मक परिस्थिती असली, तरी प्राध्यापक बुरावे पुढाकार घेऊन समता आणि न्यायासाठी झटत राहिले. युक्रेनवरील हल्ला असो, गाझातील अमेरिका-इस्रायल पुरस्कृत अमानवी हत्याकांडे असोत वा न संपणारा वंशवाद- त्यांचा ते न थकता निषेध करत राहिले. विद्यापीठीय व्यवस्थेतील आणि त्याबाहेरच्या जगातील विषमता आणि अन्यायाला त्यांनी कृतीतून विरोध केला.

त्यांना भेटलेल्या प्रत्येकाला त्यांच्या लांबलचक पुस्तकांच्या यादीमुळे आलेला ताण त्यांचे हसरे, लुकलुकते डोळे आणि मैत्रीपूर्ण चेहरा यांमुळे लगेच निघून जाई. अगदी शेवटपर्यंत त्यांच्या लुकलुकत्या डोळ्यातील आशा, ‘मला काय करता येईल’ हा स्वत:ला विचारलेला प्रश्न आणि या जगात विचारातून आणि व्यासंगातून केलेल्या कृतीतूनच परिवर्तन होऊ शकते, हा त्यांचा ठाम विश्वास कधीही कमी झाला नाही.

ब्रिटनमध्ये जन्मलेले बुरावे केम्ब्रिजमध्ये गणिताची पदवी आणि पुढे झांबियात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत संशोधनासाठी गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही समाजांत औद्याोगिक संबंधांमध्ये, श्रम व्यवहारामध्ये विशिष्ट प्रकारचे बदल झपाट्याने दिसून आले. ते कसे झाले, याचा शोध बुरावे यांनी शिकागो शहरातील एका कारखान्यात लेथ मशीन चालवण्याची नोकरी पत्करून, त्या दहा महिन्यांच्या अनुभवांच्या आधारे घेतला. भांडवलशाहीचे स्वरूप बदलले की कामगारांच्या शोषणाचे स्वरूपही बदलते. ‘अमेरिकन भांडवलशाहीतील कामगार स्वत:च्या शोषणात सहभागी असतो,’ हे त्यांनी दाखवून दिले. हे पीएच.डी.चे संशोधन ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ या पुस्तकात प्रसिद्ध झाले.

त्या पुढच्या काळात झांबियातील तांब्याच्या खाणीतील सामान्य कामगार म्हणून आणि नंतर भट्टीवर काम करणारा कामगार म्हणून इतर कामगारांसोबत मिसळून नोकरी करत केलेले त्यांचे संशोधन अनेक ग्रंथांमधून, संशोधनपर लेखांतून, शेकडो व्याख्यानांमधून जगासमोर येत राहिले.

जगातल्या विविध देशांत खाण कामगारांत, कारखान्यातील कामगारांमध्ये मिसळून केलेल्या धारदार समाजशास्त्रीय निरीक्षणांवर आधारित अशी त्यांची कामगार वर्गाच्या जगण्याविषयी, कामाविषयी, श्रमव्यवहाराविषयीची अनेक पुस्तके अतिशय गाजली. आपला सूक्ष्मदर्शक कामगारांवर रोखून धरतानाच त्या कामगारांच्या श्रमव्यवहारांवर, सामाजिक नातेसंबंधांमध्ये कोणते बदल होतात, शोषणातून आलेली असहाय्यता आणि त्याच वेळी गरीब शोषित कामगारांतली निडरता या सगळ्याचा बोलका वेध त्यांनी सातत्याने घेतला. अस्सल मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञाप्रमाणे बुरावे यांनी भांडवलशाहीचे त्या त्या काळातले स्वरूप जसे बदलते, तसे श्रमव्यवहाराचे, कामाचे, शोषणाचे, नफ्याचे स्वरूप बदलते ते कसे, याचा शोध घेतला. कामगारांच्या दैनंदिन आयुष्यात सहभागी होऊन मक्तेदारी भांडवलशाहीमुळे होणारे आफ्रिकन समाजाचे ‘झांबियाकरण’ कसे झाले या प्रकारच्या नव्या संकल्पना त्यांनी समाजशास्त्राला दिल्या.

१९९० नंतर, सोव्हिएत रशियाचे तुकडे झाल्यावर हंगेरीमधील एका कारखान्यात भट्टी चालवण्याचे काम करत भांडवलशाहीच्या प्रवेशानंतर सरकारी समाजवादाचे काय होईल, याचा वेध त्यांनी एका स्थानिक संशोधकासोबत घेतला. नंतरच्या काळात आफ्रिकेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी ‘कॉन्व्हर्सेशनस विथ बोर्द्याू’ या नावाचे एक अनोखे पुस्तक कार्ल व्होन होल्ट या सहलेखिकेबरोबर सिद्ध केले. बोर्द्याू हा महत्त्वाचा फ्रेंच समाजशास्त्रज्ञ. तो अमेरिकेत आणि युरोपात सुप्रसिद्ध असला, तरी आफ्रिकेतील प्राध्यापक-शिक्षकांना तोवर त्याचे फारसे अप्रूप नव्हते.

या पुस्तकात त्यांनी एक वेगळा प्रयोग केला. बोर्द्याूचा मार्क्सवाद्यांशी संवाद अशी कल्पना करून त्यांनी बोर्द्याू आणि ग्राम्शी, बोर्द्याू आणि मार्क्स, बोर्द्याू आणि सिमॉन द बुर्व्हुआ, बोर्द्याू आणि सी. राईट मिल्स, बोर्द्याू आणि पावलो फ्रेरी, अशा प्रकारची प्रकरणे लिहिली. ही प्रकरणे दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटर्सरँड या प्रसिद्ध विद्यापीठातील त्यांच्या काही वर्षांच्या अकादमिक वास्तव्यात दिलेल्या व्याख्यानांतून आकाराला आली. बोर्द्याू यांनी सांकेतिक पातळीवर आणि सांस्कृतिक पातळीवर प्रस्थापित होणाऱ्या सामाजिक वर्चस्वाचा अप्रत्यक्ष प्रकारे धांडोळा घेतला असला, तरी त्यांनी मार्क्सवादी सिद्धान्तकारांचा तुच्छतेने उल्लेख केला आहे आणि अनेकदा त्यांना अनुल्लेखाने मारले आहे, हे बुरावे यांनी या ग्रंथात दाखवून दिले.

या पुस्तकात त्यांच्यासोबत सहलेखिका कार्ल व्होन होल्ट यांनी आफ्रिकेमधील वैचारिक भिंगातून बोर्द्याू यांचे लिखाण नक्की कसे दिसते, बोर्द्याू कोणकोणत्या गोष्टी खिजगणतीत धरत नाहीत आणि त्याचा आफ्रिकन समाजशास्त्रावर काय परिणाम होतो हे दाखवून दिले. असे विविध सहलेखकांबरोबरचे अनेक ग्रंथ बुरावे यांच्या प्रयोगशीलतेचे, नवोपक्रमाचे उदाहरण आहेत.

पद्धतीशास्त्रीय प्रयोग

शिकागो विद्यापीठात ते गेले तेव्हाचे तेथील समाजशास्त्र त्यांच्या मते अत्यंत कर्मठ आणि रूढीवादी होते. त्यांच्या पीएच.डी. संशोधनानंतरच्या अनेक प्रकल्पांमध्ये ‘सहभागी निरीक्षण’ या पद्धतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी ‘सखोल लोकालेख’ पद्धत वापरली. कधी झांबिया, तर कधी हंगेरी, तर कधी रशिया येथील कारखान्यांमध्ये संशोधन केले. श्रमाचे, कामाचे, उत्पादनाचे बदलते स्वरूप, कामगारवर्गाचे शोषणाचे मार्ग, राज्यसंस्थेचा शोषणाला असणारा अप्रत्यक्ष पाठिंबा, इतकेच नव्हे, तर स्वत: कामगारांचा त्यांच्या शोषणाला असणारा पाठिंबा आणि संमती हे अभ्यासतानाच जागतिक अर्थकारण, समाजकारण, राजकारणाचा एकेका कारखान्यातील रोजच्या व्यवहारांवर होणारा परिणाम असे सूक्ष्म आणि व्यापक पातळीवरील बदल ते एकत्रितपणे पाहात होते, हे त्यांच्या समाजशास्त्रीय प्रक्रियेचे वैशिष्ट्य. या सर्व अभ्यासातून त्यांनी लोकालेख आणि व्यष्टी अभ्यास या दोन्ही अभ्यासपद्धतींमध्ये बदल घडवला आणि ‘विस्तारित व्यष्टी अभ्यास’ (एक्स्टेंडेड केस स्टडी मेथड) ही नवी अभ्यासपद्धती विकसित केली.

बिरुदे आणि पदे

अमेरिकेतील प्रथितयश अशा अमेरिकन सोशियॉलॉजिकल सोसायटी या जागतिक कीर्तीच्या संघटनेचा २००४ मध्ये निवडून आलेला अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. एका अर्थाने अमेरिकन समाजशास्त्राला घरचा अहेर करून त्यांनी असोसिएशनचे हस्तिदंती दरवाजे दक्षिण गोलार्धातील समाजशास्त्रज्ञांसाठी उघडले.

२०१०-२०१४ च्या दरम्यान ते आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र संघटनेचे अध्यक्ष होते. या संघटनेच्या योकोहामा परिषदेतले २०१४ चे अध्यक्षीय भाषण अतिशय गाजले. त्सुनामी आणि अणुभट्टीच्या स्फोटानंतर जगभरातून जपानमध्ये आलेल्या हजारो तरुण, मध्यमवयीन आणि वृद्ध समाजशास्त्रज्ञांसमोर त्यांनी प्रगत भांडवलशाहीला उत्तर देण्यासाठी थॉमस पिकेटी यांच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाला जगातील विविध देशांतील नवनव्या सामाजिक अंतर्दृष्टींची जोड देऊन कसे न्याय्य उत्तर शोधावे लागेल, हे अत्यंत परिणामकारकपणे मांडले. सोबतच त्यांनी ‘ग्लोबल डायलॉग’ आणि ‘युनिव्हर्सिटीज इन क्रायसिस’ ही नवी व्यासपीठेही सुरू केली. आजही अनेक तरुण समाजशास्त्रज्ञ या व्यासपीठांवरून व्यक्त होत आहेत.

सार्वजनिक समाजशास्त्राचा आग्रह

त्यांचा लोकसंग्रह आणि संवादी स्वभाव ही बुरावे ह्यांची खासियत होती. अस्सल मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञाप्रमाणे प्रत्यक्ष परिवर्तनासाठी ते नेहमीच कृतिप्रवण राहिले. कृतिशील समाजशास्त्रज्ञ ही ओळख त्यांना कायम महत्त्वाची वाटली. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कलेतील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. सोबतच नवे विद्यार्थी घडवणे त्यांच्यासाठी एक कळीचा मुद्दा होता.

बुरावे यांनी समाजशास्त्राचे चार मुख्य प्रकार पाडले- धोरणांचे समाजशास्त्र, चिकित्सक समाजशास्त्र, व्यावसायिक समाजशास्त्र आणि सार्वजनिक समाजशास्त्र. आकडेवारी आणि तक्त्यांच्या तथाकथित शास्त्रीय पिंजऱ्यातून समाजशास्त्राला मुक्त करून त्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर समाजशास्त्राचा वापर केला, तर मानवी भविष्याविषयी आडाखे बांधणे अचूकपणे शक्य होईल, हेही त्यांनी दाखवले. ज्याप्रमाणे अर्थशास्त्र बाजारपेठेचा अभ्यास करते आणि राजकारणाचा/ राजकीय पक्षांचा राज्यशास्त्र करते, तद्वतच समाज या स्वायत्त, मानवी आयुष्यासाठी अपरिहार्य असणाऱ्या एककाचा आणि नागरी समाजाचा अभ्यास केवळ समाजशास्त्रच करते, याची आठवण त्यांनी करून दिली. दुसरीकडे समाजशास्त्रज्ञांनी शास्त्रीय परिभाषा आणि प्रयोगशाळेतले ठोकताळे यांपलीकडे जाभन भविष्यवेधी, लोकाभिमुख असे अभ्यास केले पाहिजेत, अशी कानउघाडणीही त्यांनी केली.

विज्ञान लोकाभिमुख हवे आणि प्रवाहीसुद्धा, हे त्यांचे म्हणणे कोणालाही नाकारता येणार नाही. जनमत घडवण्यात समाजशास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यायला हवा, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर भूमिका घ्यायला हवी, हे त्यांचे मतही आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे.

एकविसाव्या शतकातील लोकाभिमुख समाजशास्त्राचा आग्रही नायक ही त्यांची ओळख न पुसण्याजोगी आहे.

shruti.tambe@gmail.com

Story img Loader