डॉ. नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव
मी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी घेतली. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण घ्यावेसे वाटले. नंतर दुसरे काहीतरी करावेसे वाटले ते केले. प्रत्येकाला जे ज्या वेळेस करावेसे वाटते ते त्यावेळी करावे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण बऱ्याच वेळा हे केले, आता बदलून दुसरीकडे जाऊ कसे, ते जमेल का या निर्थक प्रश्नात आपण अडकतो. ते बरोबर नाही. माझे अक्षर सुंदर आहे असे आपण म्हणालात. त्याबद्दल आपले धन्यवाद. मी अजूनही कॅलिग्राफी करतो. कधी कधी मिटिंग कंटाळवाणी झाली तर मिटिंगध्येही करतो. मिटिंगमधल्या सदस्यांना ते दाखवितो किंवा त्यांच्याकडे सुपूर्द करतो. तरीही आमचे काम रुक्ष नाही. कंटाळवाणे नाही. रोज वेगळे काम असते. रोज वेगवेगळे लोक भेटतात. दर दोन-तीन वर्षांनी बदल्या होतात.
मला गाणे आवडते. मात्र मी गायक नाही. मी शास्त्रीय संगीत ऐकतो. मी बी. जे. मेडिकल कॉलेजला आल्यावर शास्त्रीय संगीताबद्दल मला प्रोत्साहन मिळाले. माझ्या मूळ गावात असले वातावरण नव्हते. तिथे बिनाका गीतमाला, चित्रपट संगीत, मराठी तसेच हिंदूी किंवा तमाशा, जत्रा याच्या पलीकडचे फार काही नव्हते. सरकारी सेवेत पहिल्यांदा पदभार सांगलीतील मीरज येथे स्वीकारला. मिरजेत उरूस मोठा असतो. उरूस हा सुफी संतांशी संबंधित असतो. मिरजेच्या उरुसात अनेक सुफी गायक सहभागी होतात. केवळ सेवा म्हणून ते गायन करतात. सध्या मी महाराष्ट्रातल्या तसेच पंजाबमधील उरुसाच्या सर्किटचा अभ्यास करतोय. ते झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुफी सर्किटबद्दल सविस्तर अभ्यास करण्याचा विचार आहे.
आमच्याकडे गावी ‘जावा’ ही जुनी गाडी होती. ती बंद झाली. नंतर ‘यज्डी’ आली. तीही बंद झाली. आणि आनंद मिहद्रा, बोमण ईराणी या लोकांनी पुन्हा सुरू केली. ती मी पुन्हा खरेदी केली. त्या मोटरसायकलची मजा काही औरच आहे. मला सायकल सफारीची आवड आहेच. गावातून येणाऱ्या प्रत्येक मुलाला सायकल आवड असतेच असे म्हणता येणार नाही, पण सायकलशिवाय गावाकडे पर्याय नसतो. गावाकडे अंतराचे फार देणेघेणे नसते. गाव आणि शहरामध्ये हा फरक आहे. त्यामुळे सायकल हा गावाकडे आयुष्याचा एक भाग असतो.
आमच्याकडे (नोकरशाहीत) फार स्पर्धा नसते. प्रत्येकाची हळूहळू प्रगती होत जाते. एकदा का निवड होण्याची स्पर्धा संपली की नंतर फारसे प्रश्न नसतात. कोणत्याही पदावर नियुक्ती झाली तरी काम करायला मजाच असते. नोकरी करायची झाली तर सनदी सेवेसारखी समाधान देणारी कोणतीही नोकरी नाही. सगळय़ात जास्त आनंद नवनिर्मितीचा असतो. तो नोकरीमधूनच घ्यायचा असेल तर यासारखी दुसरी कोणतीच नोकरी नाही.
(शब्दांकन : सिद्धेश्वर डुकरे)