‘एआय’ वापरून चीन कोणते युद्ध लादेल याच्या कल्पना या पुस्तकात आहेत.. पण त्या खऱ्या ठरल्या तर?
किरण गोखले
२२ फेब्रुवारी २०२४ : भारताचे पंतप्रधान अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचे राष्ट्रप्रमुख हजर असलेल्या क्वाड परिषदेला दिल्लीतून आभासी पद्धतीने संबोधित करायला सुरुवात करतात न करतात तोच त्यांची लाइव्ह छबी दाखवणारा दालनातील मोठा पडदा बंद पडतो. साहजिकच तांत्रिक कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चौकशीसाठी दालनाबाहेर जातात व त्वरेने परत येऊन गंभीरपणे सांगतात, ‘‘सर. आपल्यावर जबरदस्त सायबर हल्ला झाला आहे असे वाटते. आपली सर्व संपर्क यंत्रणा बंद पडली आहे. हा हल्ला चीनने केला असण्याचीच शक्यता आहे. २३ फेब्रुवारी २०२४ : सकाळी सात वाजताच मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक चालू होत आहे. हवाईदलप्रमुख सांगतात की, सशस्त्र चिनी ड्रोनच्या झुंडीच्या झुंडी आपल्या लष्करी ठाण्यांवर, रडार यंत्रणांवर व दळणवळण सामग्रीवर चालून येत आहेत व त्यांना नष्ट करत आहेत. लष्करप्रमुखांनी तर अधिकच भयंकर खबर आणली आहे- लडाखमध्ये बंदुकीच्या गोळीहूनही लहान आकाराचे असंख्य ड्रोन आपल्या जवानांच्या कपाळाचा वेध घेऊन त्यांच्या डोक्यात घुसत आहेत व तेथे स्फोट घडवून जवानांचे प्राण घेत आहेत ! या खुनी ड्रोनपासून बचाव कसा करायचा हेच समजेनासे झाले आहे.’’
प्रवीण सॉनी यांच्या ‘द लास्ट वॉर’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकातील कल्पनाविलासाची ही एक झलक. हॉलीवूडच्या कल्पनारम्य विज्ञान-चित्रपटांची आठवण करून देणारी अशी वर्णने संपूर्ण पुस्तकात वारंवार आहेत. पण सॉनी हे ललित साहित्यिक नाहीत तर गेली जवळजवळ दोन दशके दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या ‘फोर्स’ या संरक्षणविषयक इंग्रजी मासिकाचे सहसंस्थापक व संपादक आहेत; भारताच्या सुरक्षाविषयक ग्रंथांचे लेखक व नामवंत अभ्यासकही आहेत. त्यामुळे सॉनी यांनी आपल्या पुस्तकात रंगवलेले संभाव्य चिनी सामर्थ्यांचे दर्शन म्हणजे एक अतिशयोक्तियुक्त कल्पनाविष्कार वाटला तरी या पुस्तकात मजकूर केवळ वाचनीय, माहितीपूर्ण वैज्ञानिक मनोरंजन म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटलिजन्स – ‘एआय’) आधारित सशस्त्र यंत्रमानव, मानवी हस्तक्षेपाची गरज नसलेले स्वनियंत्रित मारक ड्रोन, ध्वनीपेक्षा कित्येक पटींनी सुसाट वेगाने जाणारी (ताशी वेग- १६ माक, म्हणजे सुमारे २०,००० किमी.) स्वयंपूर्ण क्षेपणास्त्रे, शत्रूची दळणवळण यंत्रणा, उपग्रह ठप्प व नष्ट करणारे अत्याधुनिक जॅमर तंत्रज्ञान यांत चीनने प्रभुत्व मिळवले असून भारताविरुद्धच्या भावी युद्धात चीन या सर्व शस्त्रास्त्रांचा एकत्रित वापर करून भारतीय सैन्याचा धुव्वा उडवेल असा इशारेवजा दावा सॉनी या पुस्तकात करतात.
खरे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या या सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांबाबत प्रामुख्याने अमेरिका, रशिया व चीन या तीन महाशक्ती तसेच इस्रायल व तुर्की ही दोन छोटी पण जिद्दी राष्ट्रे यांचे संशोधन व विकासाचे प्रयत्न चालू असून कोणतीच शस्त्रास्त्रे अजून प्रत्यक्ष रणभूमीवर वापरण्याजोगी सज्ज झालेली नाहीत. किंबहुना त्यामुळेच ती ना रशिया-युक्रेन युद्धात दृष्टीस पडली ना तैवानच्या आसपास काही दिवसांपूर्वीच चीनने केलेल्या धमकी-युद्धाभ्यासात त्यांची चाचणी घेतली गेली. ही सर्व शस्त्रास्त्रे अर्थातच अत्यंत महागडी आहेत, अर्धवट विकसित आहेत व त्यामुळे सॉनी सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या झुंडी वापरणे चीनलाही सोपे नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता असो, ‘फाइव्ह जी’ असो, सायबर हल्ले वा मारक ड्रोन व सैनिकी यंत्रमानव असोत, चीन या सर्व क्षेत्रांत प्रगतिपथावर आहे व दुसरीकडे भारत मात्र त्यांत अजूनही पहिल्या-दुसऱ्या पायरीवरच धडपडत आहे हे लेखकाचे प्रतिपादन खरे असले तरी चीन ही शस्त्रे भारताविरुद्ध प्रत्यक्षात वापरण्याच्या स्थितीत आज तरी नक्कीच नाही. त्यामुळे आजच्या घडीला चीनचे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित लष्करी-वैज्ञानिक सामथ्र्य म्हणजे लेखकाने उभा केलेला एक बागुलबुवाच मानायला हवा. त्यामुळे, भारताने सॉनी सल्ला देतात त्याप्रमाणे चीनशी युद्ध टाळण्याचा प्रयत्न करायला हवा हेही जरुरी नाही.
सबुरीचा सल्ला नको!
चीनपुढे सबुरीने वागण्याचा सॉनी देत असलेला सल्ला पटणारा नसला तरी या सर्व क्षेत्रांत चीन भारताकडे नव्हे तर अमेरिकेकडे आपला प्रतिस्पर्धी म्हणून बघत आहे व अमेरिकेवर कुरघोडी करण्याची स्वप्ने बघत आहे हे लेखकाचे मत वास्तववादी आहे. आज अमेरिकेत अनेक सरकारी व खासगी संस्था व अभ्यासक चीनच्या लष्करी व वैज्ञानिक वाटचालीकडे करडी नजर ठेवून आहेत व त्यासंबंधी प्रकाशित/अप्रकाशित अशा अद्ययावत माहितीचा प्रचंड ओघ सतत चालू असतो. चीनमधल्याही सुरक्षाविषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी असणाऱ्या सॉनींसारख्या युद्धपत्रकाराला तर ती माहिती सहजपणे उपलब्ध असणार. पण सॉनी यांनी या सर्व माहितीच्या जंजाळातून आपल्या ग्रंथ-विषयाशी संबंधित नेमक्या माहितीचे संकलन व तपशिलांत जाऊन चोख विश्लेषण केले आहे. चीन ज्या तंत्रज्ञानाचा व त्यावर आधारित शस्त्रास्त्रांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सैद्धांतिक व व्यावहारिक परिचय भारतीयांसाठी सुलभ व आकर्षक भाषेत करून देण्याचे महत्त्वाचे काम या पुस्तकात त्यांनी केले आहे. या सगळय़ा क्षेत्रांत अमेरिका व विशेषत: चीन व भारतही सध्या प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावर आहेत याचाही आढावा लेखकाने घेतला आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञानात रस असणारे वाचक, विज्ञान, तंत्रज्ञान, युद्धशास्त्र, रणनीती या विषयांतील विद्यार्थी, प्राध्यापक व पीएच.डी.धारक, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, रडार प्रणाली, शस्त्रास्त्रे, इंटरनेट ऑफ मिलिटरी थिंग्ज या विषयांशी संबंधित सरकारी व खासगी संस्थांत काम करणारे शास्त्रज्ञ व संशोधक तसेच भारतीय सैन्य दलांतील आजी-माजी अधिकारी यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे माहितीचा एक आयता खजिनाच आहे व आपण यांपैकी कोणत्या क्षेत्रांत प्रभुत्व मिळवून भारताला चीनसारख्या बलाढय़ शत्रूशी सामना करायला सक्षम करू शकू या कर्तव्याची तिखट जाणीव करून देणारा हा दस्तावेज आहे.
काही गृहीतकांच्या गफलती
भारताच्या राजकीय व लष्करी नेतृत्वाला चीनच्या या अज्ञात सामर्थ्यांची फारशी कल्पनाच आलेली नाही, हेही खरे. त्यामुळे भारताची सध्याची संरक्षण संरचना विमाने, रणगाडे, युद्धनौका, सीमा भागांतील रस्ते, सुलभ वाहतुकीची व्यवस्था यांवरच भर देत असून या गाफिलीचा जबरदस्त फटका भारताला बसू शकतो असे सॉनींना वाटते. हा इशारा देत स्वमग्न सेनाश्रेष्ठींना भानावर आणणे हाच हेतू असल्याने बहुधा लेखकाने आपल्या पुस्तकाचा डोलारा अनेक चुकीच्या गृहीतकांवर उभारलेला आढळतो. उदा. यापुढे जगात अणुयुद्ध होणार नाही हे लेखकाचे ठाम गृहीतक. पण अशा विनाशकारी अणुयुद्धाची धमकी देऊनच पुतिन यांनी अमेरिका व नाटो यांना युक्रेनच्या बचावासाठी प्रत्यक्ष युद्धात उतरण्यापासून यशस्वीरीत्या रोखले. सॉनी म्हणतात त्याप्रमाणे एआय-आधारित शस्त्रास्त्रांचा वापर करून चीनने अरुणाचल प्रदेश वा लडाखवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केलाच तर भारताला अणुयुद्धाचा धोका पत्करून असतील ती अण्वस्त्रे वापरून चीनची सर्व गणिते उलटीपालटी करावीच लागतील. यापुढचे भारत-चीन युद्ध हे भारतासाठी दणदणीत पराभवाचे व म्हणूनच पुस्तकाच्या शीर्षकात सांगितलेले अंतिम युद्ध (द लास्ट वॉर) असेल हे सॉनी यांचे आणखी एक चुकीचे गृहीतक. मोठा पराभव पचवून पुन्हा त्याच शत्रूशी युद्ध पुकारण्याचा पराक्रम अनेकांनी, अनेकदा गाजवला हा जगाचा इतिहास आहे.
हा ग्रंथ चीनच्या लष्करी-वैज्ञानिक सामर्थ्यांचा बागुलबुवा उभा करत असला तरी या बागुलबुवात प्राण फुंकून त्याला भारताविरुद्ध युद्धात उतरवण्याचे चीनचे अथक प्रयत्न चालू आहेत हे विसरता येणार नाही. या पुस्तकाची दखल घेऊन सरकारने पूर्णवेळ देणारा शंभर सदस्यांचा एक अभ्यास-कृतिगट तातडीने नेमायला हवा. या गटात पीएच.डी.धारक तरुण वैज्ञानिक, नावाजलेले प्राध्यापक, सरकारी व खासगी संशोधन संस्था तसेच माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतील कंपन्यांमधील संशोधक, उत्पादने-विकासक, अभियंत व निवडक आजी-माजी लष्करधुरीण यांचा समावेश असावा. अमेरिका, रशिया व इस्रायल या मित्र देशांतील काही तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ यांचाही या गटात समावेश (जर ते पूर्ण वेळ भारतालाच देणार असतील तर) करता येईल. सॉनी यांनी पुस्तकात उल्लेख केलेल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा व शस्त्रास्त्राचा तपशीलवार अभ्यास करून, ती निष्प्रभ, निकामी कशी करायची, याचे नियोजन करणे, या यादीतील काही शस्त्रास्त्रे आपल्याकडे विकसित करून चीन-पाकिस्तानला अवाक करणे हे या गटाचे पुढच्या काही वर्षांसाठी मुख्य काम असेल. या सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी, संशोधकांनी व तंत्रज्ञांनी देशाची ही तातडीची गरज लक्षात घेऊन स्वेच्छेने यातील एखाद्या तंत्रज्ञानाचा/शस्त्राचा सखोल अभ्यास व प्रतिबंधक उपाययोजनांची निर्मिती केली नाही तर मात्र चीनच्या या आव्हानाचा यशस्वी प्रतिकार करणे आपल्याला अशक्य होईल.