देशात गेले महिनाभर लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या ४८ जागांसाठीचे मतदान आता इव्हीएमबंद झाले आहे. उर्वरित दोन टप्प्यांमध्ये देशातील उर्वरित शंभरेक जागांसाठी मतदान होईल आणि मग ४ जूनसाठी सगळ्यांचेच श्वास रोखले जातील. त्यातही गेल्या दीड वर्षभरातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने गेल्या दीड वर्षात अभूतपूर्व कोलांटउड्या बघितल्या. त्यानंतरही राज्यात जे काही सुरू आहे, ते पाहता संतांनी बौद्धिक मशागत केलेले हे राज्य पुरेगामी ही आपली प्रतिमा आपणच पुसून टाकते की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.
या भीतीला आधार आहे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीचा आणि तिच्याशी संबंधित घडामोडींचा. देशभर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील निवडणुका हा एक पोरखेळ होऊन बसला आहे. आपल्या आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोमाने प्रचार केला खरा, पण त्यात शिक्षण, रोजगार या महत्त्वाच्या मुद्यांवर भर न देता धर्म, आरक्षण यावरच जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. तेही एक वेळ समजण्यासारखे आहे. पण प्रचार करताना नेते, कार्यकर्ते यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी सत्ता वाचवण्यासाठी आणि विरोधकांनी सत्तेत येण्यासाठी जोमाने प्रचार करणे, त्यासाठी सर्व हातखंडे वापरणे हे लोकशाहीत अध्याहृत आहे. पण ते करताना पातळी ओलांडणे अजिबातच क्षम्य नाही.
हेही वाचा : बलाढ्य पराभवाच्या दिशेने…
समाज माध्यमांमधील प्रचारात कोणी काय केलं यापेक्षा आमचा नेता, आमचा पक्ष किती श्रेष्ठ, किती चांगला, तुमचा पक्ष, तुमचा नेता किती वाईट आहे हेच जास्त सांगितलं गेलं. त्यात वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक राग देखील काढला गेला. यासाठी प्रत्येक पक्षाने आपल्या आयटी सेलच्या टीमदेखील बसवल्या. त्यांच्यामार्फत अतिशय टोकाची टीका केली आहे. परिणामी प्रत्युत्तर देखील त्याहूनही जहाल भाषेत दिलं गेलं. विद्यमान सरकारच्या पक्षातील आयटी सेलना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना तर कशाचेच भान राहिले नाही. सरकार आपलेच आहे आपण काहीही बोललो तर आपल्याला काही होणार नाही याची त्यांना जणू पक्की खात्रीच आहे. त्यामुळे त्यांची गाडी सुसाट सुटली आहे. त्यात विरोधी पक्षातील लोकंही काही कमी नाहीत. ते देखील त्याचप्रकारच्या पोस्ट करत आहेत. पण आपल्या नेत्यावर किंवा आपल्या पक्षावर टीका केली म्हणून सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते अक्षरश: समोरच्यावर तुटून पडतात. काहीवेळा तर विरोधकांवर अप्रत्यक्षरीत्या अपमानास्पद टीकात्मक पोस्ट करून यावर कोणी त्याचप्रकारे प्रत्युत्तर द्यायला लागलं तर समोरचा कसा वाईट बोलेल व त्याला कसं कायद्याच्या कचाट्यात अडकवता येईल याकडे पोस्टकर्त्याचा जास्त कल असतो. एकमेकांना अपमानास्पद बोलताना आई- वडील- बहिणीचा अश्लील भाषेत शाब्दिक समाचार घ्यायाला देखील मागेपुढे पाहत नाही. यात स्त्रीपुरूष असा काहीच भेद नाही. त्याशिवाय धार्मिक – जातीय तेढ वाढेल अशाही पोस्ट सातत्याने केल्या गेल्या आहेत. कोण कुठे काय खात आहे, मग या दिवशी हे कसं काय खातो, यांच्या नेत्याने असंच का केलं, तसंच का केलं, त्यांनी असं केलं म्हणजे ते अमूक अमूक धर्माच्या- जातीच्या विरोधात आहेत. कोणी कोणता झेंडा हातात घेतला किंवा कोणाच्या प्रचार सभेत कोणत्या रंगाचे झेंडे जास्त होते, मग ते झेंडे जास्त असण्याचं कारणच काय अशा पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याची कामं सुरू होती. तर काही वेळा विरोधातील नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी समाज माध्यमात रंगवल्या गेल्या. किंवा वैयक्तिक आयुष्यावरून असभ्य भाषेत टीका केली गेली. आम्हीच किती प्रामाणिक, आम्हीच कसे खरे देशभक्त हे भासवण्याच्या नादात राजकारणाचा स्तर घसरल्याचे दिसून येते.
हेही वाचा : सुनील छेत्री आम्हाला समजलाच नाही…
यामध्ये पक्षातर्फे काम करणाऱ्यांना किवा नेत्यांना तर काही फरक पडला नाही. मात्र सामान्य माणूस नाहक भरडला गेला. कारण माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही, मला राजकारणाशी काहीही देणंघेणं नाही असं कोणीही, कितीही बोललं तरीही प्रत्यक्षात तसे असत नाही. भले तो कार्यकर्ता नसेल पण समर्थक तरी नक्कीच असतो. त्यामुळे त्यांच्या नेत्याला कोणी काही बोललं तर राग येणं आणि व्यक्त होणं साहजिकच आहे. मग ते आपल्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ काही ना काही ट्वीट करतात किंवा कोणी विरोधात केलं तर त्याला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तरही देतात. त्या वरून वादावादी होऊन प्रकरण एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत प्रकरणं गेली आहेत. प्रकरणं जास्तच डोक्यावरून जात असेल तर त्याच्या कमेंट, पोस्टचे स्क्रीन शॉट घेऊन कायदेशीर कारवाईची धमक्या दिल्या गेल्या आहेत.
एकंदरीतच आपल्या राज्यातील सुसंस्कृत राजकारणाला तडा जाऊन असंस्कृतपणा वाढीला लागल्याचे चित्र आहे. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी अशीच सध्या राज्याची स्थिती आहे.
rohitpatil4uonly@gmail.com
(((समाप्त)))