दत्तप्रसाद दाभोलकर

‘स्वामीजींच्या विचारांचं विकृतीकरण कोण करतंय?’ (१६ जुलै) या माझ्या लेखाचा रवींद्र साठे यांनी ‘स्वामीजींच्याबद्दलचे दाखले अर्धवट’ (२० जुलै) असा प्रतिवाद केला आहे. साठे यांनी माझे संदर्भ खोटे आहेत असे म्हटलेले नाही. मात्र शीर्षकातच दाखले अर्धवट असे म्हटले आहे. कोणताही दाखला अर्धवट देणे किंवा त्यातील एखादा शब्द बदलणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

मात्र माझ्या लेखात दोन पत्रांमधील दोन शब्द बदललेले आहेत. लेखातील एक वाक्य आहे, ‘२२ ऑगस्ट १८९२ रोजी लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणालेत, ‘देवा, ब्राह्मणांच्या रूपाने हिंडणाऱ्या या माणसांपासून रक्षण कर.’ विवेकानंदांचे शब्द आहेत, ‘देवा, ब्राह्मणांच्या रूपाने आज या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांच्यापासून माझ्या देशाचे रक्षण कर.’ १८९४ रोजी शशी (म्हणजे रामकृष्णानंद) यांना पाठविलेल्या पत्रातील लेखात छापलेले वाक्य आहे, ‘हा काय देश आहे की नरक? हा काय धर्म आहे की दुसरे काही’. विवेकानंदांचे पत्रातील शब्द आहेत, ‘हा काय धर्म आहे की हे आहे सैतानाचे तांडव’ म्हणजे या देशाचे नवनिर्माण करावयाचे असेल तर ब्राह्मण आणि हिंदूधर्म याबाबत आपणाला कोणती भूमिका घ्यावयास हवी हे विवेकानंदांनी असे अगदी खणखणीत शब्दात सांगितले आहे. मुद्दा वेगळा आहे. माझ्या मूळ हस्तलिखित लेखात ब्राह्मण आणि सैतानाचे तांडव हेच शब्द आहेत. मात्र संपादकीय संस्कार करताना ते शब्द बदललेले आहेत. सामाजिक दुरावा वाढू नये म्हणून त्यांना ते योग्य वाटले असणार.

साठे यांच्या मांडणीत आणखी एक गोष्ट आहे. महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा न करता एका वाक्यात ‘मया जितम्’ म्हणून ते मुद्दा निकालात काढतात. त्यांच्या लेखात एक उडते वाक्य असे आहे की ‘शीला स्मारकाच्या जागी कधी क्रॉस नव्हताच’! वैचारिक चर्चेत आपण एवढे रेटून खोटे कसे बोलू शकतो ? विवेकानंद स्मारकाचे सर्वेसर्वा एकनाथजी रानडे यांचे ‘द स्टोरी ऑफ विवेकानंद रॉक मेमोरिअल’ हे पुस्तक विवेकानंद केंद्राने प्रसिद्ध केले आहे. त्यातील प्रमुख संदर्भ असे आहेत.

१. ‘रॉक मेमोरिअल’ बनविण्याची परवानगी कन्याकुमारी मंदिराने दिली होती. शासनाच्या लक्षात आले यातून धार्मिक तेढ निर्माण होईल. कारण परिवार विवेकानंद समुद्रातून अर्धा किलोमीटर पोहत तेथे गेले म्हणून तो विवेकानंदांचा खडक आहे असे मानते. आणि ख्रिश्चन त्याला सेंट झेविअर स्मृती समजतात. त्यामुळे देवस्थानने अशी काही परवानगी देण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी घेतली पाहिजे. राज्य शासनाकडे अशी परवानगी मागण्यात आली आणि ती नाकारण्यात आली. (पृष्ठ ८).

२.परिवार त्यामुळे अस्वस्थ होता. १२ जानेवारी १९६३ म्हणजे विवेकानंदांची जन्मशताब्दी. ते मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांना भेटले. त्यांनी ठामपणे सांगितले, ‘मी या गोष्टीला परवानगी देणार नाही. मला या देशात धार्मिक ध्रुवीकरण करावयाचे नाही व तुम्ही तेथे ‘स्वामी विवेकानंद समुद्रातून पोहत या खडकावर गेले होते’ असा एक फलक लावा. ( पृष्ठ ९ ).

३. एके दिवशी सकाळी लोकांच्या लक्षात आले त्या खडकावरील क्रॉस हटविण्यात आला आहे. अस्वस्थ ख्रिश्चन समुदाय रस्त्यावर उतरला. दुसऱ्या बाजूने हिंदूगण रस्त्यावर उतरले. रस्त्यांना युद्धभूमीचे स्वरूप आले. शासनाला १४४ कलम पुकारावे लागले. त्या खडकावर जाण्यास कोणालाही बंदी घालण्यात आली आणि सशस्त्र पोलीस दलाने खडकाला वेढा दिला. (पृष्ठ ७)

या पुस्तकात आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी सामाजिक सद्भाव बिघडेल म्हणून त्या खडकाला भेट देणे नाकारले (पृष्ठ ३५). पुस्तकाला प्रस्तावना विवेकानंद केंद्राचे त्यावेळचे प्रमुख परमेश्वरन् यांची आहे. त्यांनी लिहिलंय, ‘या प्रकरणाबद्दल एकनाथजी रानडे यांनी त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री गोविंद मेनन यांना कळविले. त्यांना गोविंद मेनन यांनी एक टोकदार प्रश्न विचारला, ‘स्वामी विवेकानंदांचे विचार आणि संघाचे विचार यात आपापसात संबंध काय ?’ हे सारे मला आज नीटपणे आठवते आहे कारण मी त्यावेळी २३ वर्षांचा होतो. शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होतो तरी पत्रकारिता ही माझी आवड होती. त्यावेळी मी तेथे होतो आणि मी लिहिलेले वाक्य होते ‘हिंदूंचाच हिंदूस्थान’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन आम्ही कार्यरत आहोत असे सांगणाऱ्या संघटनेने दोन धर्मात तेढ निर्माण करणारी एक खेळी फार यशस्वीपणे पार पाडली आहे.

पुढे जाण्यापूर्वी, हे सारे मी साठे यांच्या लेखाचा प्रतिवाद करताना, इतके सविस्तर का सांगितले हे लक्षात घ्यावयास हवे, माझ्या लेखात ‘त्या खडकावर क्रॉस होता. तो काढलाय म्हणून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे म्हणून शासनाने १४४ कलम पुकारले’ असे लिहिले आहे. याचा प्रतिवाद न करता ‘तेथे क्रॉस नव्हताच’ असे ‘खोटे बोला पण रेटून बोला’ म्हणून साठे ‘मया जितम्’ म्हणून बाजूला होतात. वैचारिक चर्चा अशाप्रकारे करावयाच्या नसतात !
पण साठे यांचा सबंध लेख वैचारिक चर्चा कशी नसावी याचा वस्तुपाठ आहे. त्यांनी सुरुवातीलाच माझ्या ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ या पुस्तकाबद्दल अरिवद गोखले, डॉ. अशोक मोडक काय म्हणले ते दिले आहे. आता माझ्या लेखाच्या संदर्भात ते पुस्तक आणि परिवारातील दोघे जण काय म्हणाले, याचा आपापसात संबंध काय? पण तरीही त्यांनी हा विषय उकरून काढून माझी फार मोठी सोय केली आहे. त्या पुस्तकाच्यावेळी काय काय झाले ते सांगितले तर मी करत असलेली विवेकानंदांची मांडणी शतप्रतिशत खरी आहे हे त्यांच्या लक्षात येईल. माझ्या या २००८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावर परिवाराने विखारी हल्ले चढविले. मी त्यांना उत्तर देणार होतो. माझे ज्येष्ठ मित्र, आजन्म कटिबद्ध स्वयंसेवक मान्यवर विचारवंत आणि विवेकानंदांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक प्रा. वि.रा. करंदीकर यांनी मला त्यापासून परावृत्त केले. ते म्हणाले, ‘‘बेलूर मठाने सांगितले म्हणून मी जगभर हिंडून माहिती गोळा करून ‘विश्वमानव स्वामी विवेकानंद’ हे त्रिखंडात्मक, रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेले पुस्तक लिहिलंय. तुमच्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत माझे हे पत्र छापा.’’ आज त्या पुस्तकाची तेरावी आवृत्ती उपलब्ध आहे. त्यातही ते पत्र आहे. त्यांनी लिहिलंय ‘दाभोळकर तुमची मांडणी पूर्णपणे बरोबर आहे. विवेकानंदांचे भाऊ भूपेंद्रनाथ यांनी नेमकी हीच मांडणी केलेली आहे.’ आता भूपेंद्रनाथ कोण हे पण सांगतो. ते विवेकानंदांचे सर्वात धाकटे भाऊ. विवेकानंदांच्याहून सतरा वर्षांनी लहान असलेले. त्यांनी योगी अरिवद यांच्या भावाबरोबर क्रांतीकार्यात भाग घेतला म्हणून त्यांना सक्तमजुरी झाली होती. बाहेर आल्यावर भगिनी निवेदिता यांच्या मदतीने जर्मनीत जाऊन त्यांनी डॉक्टरेट केली. ते बंगाली भाषेतील नामवंत लेखक आहेत. ते आजन्म ब्रह्मचारी राहिलेत. आणि ‘माझा भाऊ समाजवादी होता’ असे सांगणारे लेख आणि पुस्तके त्यांनी लिहिलीत.

ते असो ! याहूनही महत्त्वाचे म्हणजे साठे यांच्या उत्तरात गोंधळ आहे. वैचारिक चर्चेची चौकट त्यांनी पाळलेली नाही. माझ्या लेखात तीन मुद्दे आहेत. त्यावर त्यांनी विस्कळीतपणे लेखात वेगवेगळय़ा ठिकाणी टिप्पणी केली आहे. आपण ते सुसूत्रपणे तपासूया. माझा पहिला मुद्दा होता, ‘विवेकानंदांनी हिंदूू धर्मावर कायम घणाघाती हल्ले चढविले आहेत.’ मी दिलेल्या एकाही संदर्भावर त्यांनी आक्षेप घेतलेला नाही आणि त्यांना हवे असतील तर ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या पुस्तकात त्यांना अधिक दाहक संदर्भ मिळतील. मात्र त्यांनी या मुद्दय़ाला बगल मारून विवेकानंदांनी बौद्ध धर्माबद्दल काय सांगितले आहे यावर टिप्पणी केलेली आहे. मात्र विवेकानंद आणि बौद्ध धर्म आणि बुद्धदेव यातील अनुबंध समजावून घ्यावयाचे असतील तर आपल्याला खालील तीन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. १) विवेकानंदांनी १८९५ मध्ये (या पत्रावर तारीख व महिना नाही) श्री रामकृष्णानंद यांना पत्र पाठविले आहे. (रामकृष्णानंद म्हणजे वराहमठातील त्यांचा मित्र शशी. पण तो श्री रामकृष्णांचा सर्वात आवडता म्हणून त्याला रामकृष्णानंद म्हणतात) पत्रात त्यांनी लिहिले आहे. ‘मी बुद्धदेवांना सर्वाधिक मानतो. कारण जाती हे या देशाच्या अवनतीचे एकमेव कारण आहे.’ हे त्यांनी सर्वप्रथम सांगितले. पण जाती म्हणजे केवळ जन्मगत नव्हे. ज्ञानगत, गत आणि घनता सर्व जाती, सर्वप्रकारचे जातीभेद हे दु:खाचे कारण आहे. आत्म्याच्या ठिकाणी लिंग, वर्ण, आश्रम धर्म असे भेद असूच शकत नाहीत. २) सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी बौद्ध धर्मावर दिलेले भाषण सर्वात महत्त्वाचे आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी सुरू झालेली सर्वधर्म परिषद २८ सप्टेंबपर्यंत म्हणजे सतरा दिवस होती. २६ सप्टेंबरचा विषय बौद्ध धर्म हा होता. धर्मपाल यांचे भाषण फार प्रभावी झाले. बौद्धधर्म भारतात जन्म घेऊन सहजपणे अनेक देशात पसरला. मात्र भारतातून तो नाहीसा झाला हा उल्लेख सर्व वक्त्यांच्या भाषणात होता. रोख अर्थातच हिंदूू धर्मावर होता. सभेचे अध्यक्ष आल्फ्रेड मॉमेरी यांनी सर्वाची भाषणे संपलीत, आता तुम्ही बोला. अशी विवेकानंदांना विनंती केली. विवेकानंद म्हणाले, ‘खरेतर मी वक्ता म्हणून बोलावयास हवे होते. कारण मी स्वत:ला बौद्ध समजतो ! येशू ख्रिस्त आणि भगवान बुद्ध यांनी नक्की काय केले हे आपण लक्षात घ्यावयास हवे. ख्रिस्तांना यहुदी लोकांच्या धर्ममताची ‘ओल्ड टेस्टोमेंट’ मधील अपूर्णता दूर करावयाची होती. त्याचप्रमाणे बुद्धदेवही हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी आले नव्हते. हिंदू धर्मातील कालबाह्य़ तत्त्वे, रूढी आणि जातीव्यवस्था त्यांना नाहीशी करावयाची होती. जातीव्यवस्था म्हणजे काही जणांना विशेषाधिकार देणे आणि सर्वप्रकारचे विशेषाधिकार नाहीसे करणे हे नीतीचे म्हणजे सर्व धर्माचे खरे काम आहे’. अर्थात त्यानंतर झालेल्या चर्चेत, जगभर परसलेला हा बौद्ध धर्म भारतातून सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेने कसा नाहीसा केला असेल यावरही चर्चा झाली. ३) विवेकानंदांनी अमेरिकेत पत्रे, भाषणे आणि मुलाखती यातून जे सांगितले त्याचा सारांश असा आहे. आज जगातील सारे धर्म व्यंगचित्राच्या स्वरूपात उभे आहेत. मानवजातीचे सर्वाधिक नुकसान आज धर्म करताहेत. सर्व धर्मातील गाळ काढून ते शुद्ध स्वरूपात लोकांच्यापुढे ठेवणे हे माझे जीवितकार्य आहे. एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. त्याचवेळी कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे आपल्या भोवताली असतात हे ओळखावे लागेल. उद्याचा धर्म हा सर्व धर्माच्यावर आधारित असेल आणि विज्ञान हा त्याचा पाया असल्याने तो स्थितींशिवास नसेल तर गतीशील असेल. या सर्व विधानांचे संदर्भ हे माझ्या पुस्तकात आहेत. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे विवेकानंदांनी फक्त हिंदू धर्मावर घणाघाती आघात केलेले नाहीत तर जगातील सर्व धर्म आज अधार्मिक झालेत म्हणून सांगितले ! मात्र त्याचवेळी १८९७ मध्ये विदेशातून भारतात परत आल्यावर विवेकानंदांनी प्रथम जी भाषणे दिली त्यात सांगितले, ‘पुरीचे जगन्नाथ मंदिर हा बौद्धविहार होता. असे अनेक बौद्धविहार उद्ध्वस्त करून या देशातील हिंदू मंदिरे उभारलेली आहेत.’ (विवेकानंद ग्रंथावली खंड ५, पृष्ठ १४०(५))

माझ्या लेखातील दुसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. हिंदू-मुसलमान सहकार्याने, समन्वयाची एक प्रक्रिया या देशात सुरू झाली आहे आणि या देशातील धर्मातरे तलवारीच्या जोरावर झालेली नाहीत तर पुरोहितांनी आणि उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत असं विवेकानंदांनी सांगितलंय हे समजावून देण्यासाठी मी विवेकानंदांची दोन पत्रे दिलेली आहेत. रवींद्र साठे यांचे म्हणणे असे की पहिल्या पत्रातील काही मजकूर मी गाळला आहे. आणि दुसरे पत्र देताना मी तारखेचा संदर्भ दिलेला नाही. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ दाभोलकर खोटे विचार विवेकानंदांच्या नावावर सांगतात असा होतो. याबाबतची वस्तुस्थिती आपण समजावून घेऊया. १० जून १८९८ रोजी विवेकानंदांनी सर्फराज मोहमद हुसेन यांना पाठविलेल्या पत्रात ‘आम्ही मुसलमानांच्याकडून व्यवहारातील समता शिकतोय हे मी दिलेले आहे. मात्र त्या पत्रातील पुढील भाग ‘या देशात या दोन धर्मातील समन्वयाची एक प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदू धर्मातही काही चांगल्या गोष्टी आहेत हे गाळलेले आहे. मी हे गाळले कारण हा विचार यापेक्षा अधिक नेमक्या आणि भेदक शब्दात बोस्टन येथे ‘ट्रेटिस सेंच्युरी हॉल’मध्ये मुलाखत देताना सांगितलाय आणि भगिनी निवेदितांच्या पुस्तकातही तो येतो हे सांगितले आहे. मी विचार लपविलेला नाही. लेखाला असलेली शब्दमर्यादा पाळून तो अधिक प्रभावीपणे पुढे येईल असा पर्याय निवडला आहे.

साठेंचा दुसरा मुद्दा ‘धर्मातरे तलवारीच्या जोरावर झाली असे समजणे हे ‘महामूर्खपणाचे’ आहे’ हे विवेकानंदांच्या पत्राचा संदर्भ दिला नाही असा आहे. ‘लोकसत्ता’ने हे पत्र १८९४ मध्ये लिहिलेले आहे एवढेच छापले आहे. मात्र मी माझ्या हस्तलिखितात नोव्हेंबर १८९४ असे लिहिलेले होते. कारण विवेकानंदांच्या या पत्रावर कोणतीही तारीख नाही, पण फक्त महिना आहे. मात्र अशाच स्वरूपाचा मजकूर अधिक धारदार शब्दात लिहिणारे आणि तारीख असलेले एक पत्र आहे. पत्राची तारीख आहे २० सप्टेंबर १८९२ (म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या एक वर्ष आधी.) त्या पत्रात विवेकानंद सांगताहेत. ‘या त्रावणकोर कोचिन प्रांतात पुरोहितांचा अत्याचार या देशात सर्वाधिक आहे. आता या प्रांतातील ३३ टक्के हिंदू ख्रिश्चन होणार नाहीत तर आणखी काय करणार?’

मात्र माझ्या मांडणीचा प्रतिवाद करताना, माझ्या मांडणीला छेद देणारे दोन संदर्भ साठे यांनी दिले आहेत. त्यातील पहिला संदर्भ १८८१ मध्ये ‘प्रबुद्ध भारत’ या मासिकात आलेल्या मुलाखतीचा आहे. कदाचित मुद्राराक्षसाचा दोष असेल; वर्ष १८८१ नाही तर एप्रिल १८९९ मध्ये घेतलेली ही मुलाखत आहे. मुलाखत विवेकानंद ग्रंथावलीच्या सातव्या खंडात पृष्ठ ४७ वर आहे. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे, ‘स्वामी विवेकानंदांची ओळख’ या माझ्या पुस्तकात पृष्ठ १५२ वर ही मुलाखत देऊन पूर्णपणे चर्चा केली आहे. म्हणजे ही मुलाखत व साठे यांनी दिलेला भला मोठा उतारा अशा परस्परविरोधी गोष्टींचे काय करावयाचे याची सविस्तर चर्चा केली आहे. माझी मांडणी अशी आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘मी परस्पर विरोधी मते मांडलेली असतील तर मी सर्वात शेवटी केलेले विधान माझे माना’ आता आपण विवेकानंदांना ही सवलत देऊ शकत नाही. कारण त्यांचे सबंध आयुष्यच फक्त ३९ वर्षांचे आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, ती आजन्म, अथक एकाकी धडपड आहे. विवेकानंद जे सांगताहेत ते समजावून घेणे राहूदेत ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेला समाज, शिष्य आणि गुरुबंधू भोवताली आहेत. तरीही विवेकानंदांनी एक रणनीती ठरविली आहे. शिष्यांचे प्रबोधन आणि गुरुबंधूंशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार तसूभरही बदललेले नाहीत. मात्र समाजातील ढुढ्ढाचार्याशी बोलताना आपण काय करावे हे त्यांनी गुरुबंधूंना पत्रातून सांगितले आहे, त्यांनी लिहिलंय, ‘या ढुढ्ढाचार्याशी वाद करण्यायेवढे आपण अजून मोठे नाही. आपण त्यांना हां जी, हां जी म्हणावे. आपण मात्र आपल्या मनाशी ठाम असावे’ विवेकानंदांनी आपणच आखलेली एक लक्ष्मणरेषा स्वत:समोर ठेवली आहे ‘परदेशात बोलताना माझ्या देशाला कमीपणा येईल असे मी काही बोलणार नाही.’ त्यामुळे होणारे मजेशीर किंवा – भयंकर घोटाळे आपण लक्षात घ्यावयास हवेत. विवेकानंदांनी सप्टेंबर १८९५ मध्ये (पुन्हा तारीख नसलेले पत्र!) ब्रह्मानंदांना पाठवलंय. त्यात ते लिहितात, ‘आज या देशात आठ वर्षांच्या कोवळय़ा मुलीचा तीस वर्षांच्या प्रौढ माणसाशी विवाह होतोय त्या विवाहाबद्दल आईवडिलांना आनंद होतोय. आम्ही त्याला विरोध केला तर, ‘तुम्ही आमचा धर्म बुडवलाय’ असे सांगताहेत. अरे! मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? काहीजण सांगतात, ‘आमच्या धर्मात हे बालविवाह नव्हतेच. मुसलमान आक्रमणांपासून मुलींचे रक्षण करण्यासाठी आम्ही बालविवाह सुरू केले.’ अरे, आपण किती खोटे बोलणार आहोत? मी सारी गृहसूत्रे वाचलीत, सारे ब्राह्मण ग्रंथ वाचलेत. त्यात मुलीच्या लग्नाचे वय येवढे कमी असावे असे लिहिलंय. आपल्या – मूर्खपणाला मुसलमानांना जबाबदार धरणे आपण थांबवले पाहिजे. २३ डिसेंबर १८९५ रोजी सारदानंदांना लिहिलेल्या पत्रात विवेकानंद आणखी पुढे गेलेत. ते लिहितात ‘एखाद्या कोवळय़ा मुलीचा प्रौढ माणसाशी विवाह करणाऱ्याचा मी खून करू शकेन.’ आणि त्याच वेळी अमेरिकेत मुलाखत देताना विवेकानंद सांगताहेत, समाजातील सतीत्वाचा दर्जा उच्च राहावा म्हणून माझ्या हिंदू धर्माने बालविवाह सुरू केले.

माझ्या लेखातील शेवटचा मुद्दा हिंदू धर्माने म्हणजे सनातन, ब्राह्मणी व्यवस्थेने विवेकानंदांना मरणप्राय यातना दिल्यात. मी दिलेल्या एकाही संदर्भाचा साठे यांनी प्रतिवाद केलेला नाही. मात्र त्यांनी स्वामीजींच्या मृत्यूनंतर केसरीने म्हणजे टिळकांनी काय लिहिले हे दिलेले आहे. ‘मरणान्ती वैराणी’ हे तर खरेच प्रश्न येवढाच की, हिंदू धर्म विवेकानंदांना या मरणप्राय यातना देत असताना केसरी, मराठा किंवा अगदी बंगालमधील एकाही वृत्तपत्राने वा साप्ताहिकाने त्याविरुद्ध एक शब्दसुद्धा का लिहिला नाही?

असो! माझी विवेकानंदांच्या वरील तीन पुस्तके, शेकडो भाषणे, हे दोन लेख यांचे कारण समजावून घ्यावयास हवे. ‘खोटे बोला पण रेटून बोला’ हा एककलमी कार्यक्रम बरोबर घेऊन हिंडणारा परिवार पंडित नेहरूंना बदनाम करीत आणि महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र, लोहपुरुष पटेल आणि स्वामी विवेकानंद आमचेच म्हणत हिंडताहेत. त्यांनी तूर्तास किमान विवेकानंदांबद्दल तरी हे करू नये!
(या लेखाबरोबरच या विषयावरील चर्चा थांबवण्यात येत आहे.)