जतिन देसाई
अली वजीर… हा पाकिस्तानच्या अशांत खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील सर्वांत असुरक्षित अशा दक्षिण वजिरिस्तानचा खासदार. पश्तुन (पठाण) समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या पश्तुन तहफ्फूज मूव्हमेन्ट (पीटीएम) या संघटनेचा तो नेता आहे. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अली वजीर आणि नॉर्थ वजिरिस्तानातून मोहसीन दावर संसदेत निवडून गेले. पीटीएम पक्ष नसल्याने दोघांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातून विजय मिळवला. पश्तुन समाजात पीटीएमच्या वाढत्या प्रभावाने पंतप्रधान शाहबाज शरीफ, इम्रान खान आणि लष्कर अस्वस्थ आहे. १६ डिसेंबर २०२० ला वजीर यांना कराचीत राष्ट्रद्रोहाच्या दोन खटल्यांत अटक करण्यात आली होती. तब्बल २६ महिन्यांनंतर १४ फेब्रुवारीला त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली.
पाकिस्तानात पश्तुन आणि बलोच समाजात आपल्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची भावना आहे आणि त्यात तथ्यही आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बोलणारी तरुण मुले अचानक बेपत्ता होतात आणि नंतर त्यांचा मृतदेह आढळतो. बनावट चकमकीतही तरुणाची हत्या केली जाते. दोन्ही वजिरिस्तान, बजौर, मोहमेन्ड, ओरकझाई, कुर्राम आणि खैबर आधी ‘फेडरली ॲडमिनिस्टर्ड ट्रायबल एजन्सी’चे (‘फाटा’) भाग होते. या सात एजन्सीत राहणाऱ्या पश्तुन समाजाची तर अतिशय वाईट अवस्था आहे. २००४ नंतर लष्कराच्या भीतीमुळे आणि अतिरेक्यांच्या दहशतीमुळे ‘फाटा’ येथील आणि त्यातही दोन्ही वजिरिस्तानांतील जवळपास २० लाख रहिवाशांनी आपले घर सोडून सरकारी छावण्यांत किंवा शहरात राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांचा आश्रय घेतला. २००१ च्या शेवटी अमेरिकेने ९/११ चा बदला घेण्यासाठी आणि तालिबानला सत्तेतून हटवण्यासाठी अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर तालिबान, अल कायदा, हक्कानी नेटवर्कसारख्या अतिरेकी संघटनांचे दहशतवादी फाटा येथे मोठ्या प्रमाणात आले आणि त्यांनी रहिवाशांमध्ये भीती निर्माण केली. अफगाणिस्तानातून आलेल्या हक्कानी नेटवर्कला तर पाकिस्तान सरकार, लष्कर व आयएसआय सर्व प्रकारे मदत करत होते. ‘फाटा’तील पश्तुनांची अवस्था वाईट आहे. शहरात राहणाऱ्यांची स्थितीही काही चांगली नाही. काही वर्षांपूर्वी फाटाच्या सातही एजन्सी खैबर-पख्तुनख्वा प्रांतात विलीन करण्यात आल्या. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा डुरान्ड लाइन म्हणून ओळखली जाते. परंतु आतापर्यंतच्या कुठल्याही अफगाण सरकारने डुरान्ड लाइनला मान्यता दिलेली नाही.
पश्तुन समाजात शस्त्र बाळगण्याची जुनी परंपरा आहे. सोव्हिएत रशियाच्या सैन्याने १९८८-८९ मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतली तेव्हा पश्तुन लोकांकडे सोव्हिएत रशियाच्या बंदुका, मशीनगन मोठ्या प्रमाणात आल्या. पाकिस्तान अस्तित्वात येण्यापूर्वी आजचा खैबर-पख्तुनख्वा, नॉर्थ-वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणून ओळखला जात असे. खान अब्दुल गफार खान म्हणजेच सरहद गांधी यांनी खुदाई खिदमतगारमार्फत पश्तुन समाजाला अहिंसेच्या दिशेने नेले होते. त्यांना अटक झाल्यानंतर २३ एप्रिल १९३० ला पेशावरजवळील किस्सा ख्वानी येथे एकत्र झालेल्या लोकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात जवळपास ४०० लोक मारले गेले. तरीदेखील आंदोलन अहिंसक राहिले होते. फाजील जमिली नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने त्यावर लिहिलेली कविता, ‘एक सफ ए मातम बिछी है, कूचो व बाजार में. नोहा ख्वानी हो रही है, किस्सा ख्वानी की जगह.’ (गल्ली आणि बाजारात शोक व्यक्त करण्यासाठी लोक रांगेत बसले आहेत, ज्या ठिकाणी गोष्टींची मैफिल रंगत होती, त्या ठिकाणी आता शोकसभा होत आहेत.)
आता तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रोज बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले करून खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतातील रहिवाशांना हैराण केले आहे. ३० जानेवारीला खैबर-पख्तुनख्वाची राजधानी पेशावर येथील एका मशिदीत टीटीपीने केलेल्या बॉम्बस्फोटात १०० हून अधिक जण मृत्युमुखी पडले. पाकिस्तान सरकारशी झालेला शस्त्रविराम टीटीपीने नोव्हेंबरच्या शेवटी धुडकावून लावला. हक्कानी नेटवर्क आणि टीटीपीच्या भागातून निवडून येणे अली वजीर आणि मोहसीन दावरसाठी सोपे नव्हते. अतिरेक्यांचा अप्रत्यक्षरीत्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाला पाठिंबा असतो. पण पीटीएमला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे वजीर आणि दावर यांचा विजय झाला.
वजीर यांना ३१ डिसेंबर २०२० ला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे एकूण चार खटले आहेत. एका खटल्यातून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे आणि तीन खटल्यांत जामीन मिळाला आहे. त्यांच्याविरोधात एकूण १४ खटले आहेत. त्यापैकी ११ प्रकरणांत त्यांना अटक करण्यात येऊ नये, असे आदेश पेशावर उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
पीटीएमचा इतिहास खूप जुना नाही. त्याची सुरुवात २०१४ च्या मे महिन्यात डेरा इस्माईल खान येथील गोमाल विद्यापीठात दक्षिण वजिरिस्तानचे मन्झुर पस्तीन यांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत केली. तेव्हा त्याचे नाव मेहसुद तहफ्फुज मूव्हमेन्ट (एमटीएम) होते. वजिरिस्तानात मेहसुद समाज राहत असलेल्या भागात जमिनीत पेरून ठेवलेले सुरुंग हटविण्यात यावेत, अशी त्यांची मागणी होती. मेहसुद ही पश्तुन समाजाची एक जमात आहे. परंतु नकीबुल्ला मेहसुद नावाच्या एका पश्तुन तरुणाचा कराचीत २०१८ च्या जानेवारीत बनावट चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर एमटीएम या संघटनेचे नाव बदलून पश्तुन तहफ्फुज मूव्हमेन्ट करण्यात आले. नकीबुल्ला दक्षिण वजिरिस्तानचा होता. दहशतवादाला कंटाळून तो आणि त्याचे कुटुंब कराचीत आले होते. राव अन्वर नावाचा पोलीस अधिकारी या बनावटी चकमकीच्या मागे होता. अन्वर यांनी २०० चकमकींत जवळपास ४५० जणांना ठार मारले. अलीकडे अन्वर याला नकीबुल्लाच्या हत्येच्या खटल्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
पीटीएमची लोकप्रियता वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत गेली. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पीटीएमच्या नेतृत्वाला भ्रष्ट करण्यात, अजून तरी राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. पश्तुन समाजाच्या अधिकार आणि गौरवासाठी असणाऱ्या या संघर्षात तरुण नेतृत्वाने तडजोडीची भूमिका घेतलेली नाही. नकीबुल्ला यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली, पण पश्तुन तरुणांच्या हत्या थांबल्या नाहीत. २६ मे २०१९ ला उत्तर वजिरिस्तानात ताब्यात घेण्यात घेतलेल्या पीटीएमच्या कार्यकर्त्यांवर लष्कराने केलेल्या गोळीबारात १५ जण मृत्युमुखी पडलेले. वजीर आणि दावर यांना अटक करण्यात आली. बनावटी चकमक आणि हत्या ही या भागात सामान्य गोष्ट आहे. ७ डिसेंबर २०२१ ला अर्सलान मेहसुद नावाच्या तरुणाला कराचीत बनावट चकमकीत ठार मारण्यात आले. १६ डिसेंबर २०२० ला वजीर यांना कराचीत राष्ट्रद्रोहाच्या दोन खटल्यांत अटक करण्यात आली.
पाकिस्तानच्या अन्य मोठ्या राजकीय पक्षांनी पश्तुन समुदायाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पीटीएमला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानची सत्ता खऱ्या अर्थाने पंजाब आणि पंजाबी लोकांकडे आहे. यापूर्वी पश्तुन समाजाचे प्रतिनिधित्व अवामी नॅशनल पार्टी (एएनपी) आणि पश्तुनख्वा मिल्ली अवामी पार्टी करत असे. आता मोठ्या प्रमाणात पश्तुन पीटीएमसोबत आहेत. पीटीएमने आता इम्रान खान यांच्या पक्षाला आव्हान दिले आहे.
पीटीएमचा आतापर्यंतचा प्रवास होता आणि पुढेही तसाच राहणार आहे. पीटीएमच्या नेत्यांसाठी पत्रकार परिषद आयोजित करणेही मोठे आव्हान आहे. अनेकदा आयोजनास परवानगी नाकारली जाते. लष्करातील अधिकारी त्यात अडथळे आणतात. मन्झुर पस्तीन आणि अन्य नेत्यांच्या बातम्यादेखील दाखवल्या जात नाहीत. ते प्रचारासाठी प्रामुख्याने समाजमाध्यमांचा उपयोग करतात. पीटीएमने पश्तुन समाजात एक नवीन आशा निर्माण केली आहे.
लेखक ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते आहेत.
jatindesai123@gmail.com