साठोत्तरीत आपल्या मराठी साहित्यात जसा नवकथेला छेद देणारा (पण शून्य उत्पादक) ‘क्ष-किरणी’ उत्साह उतू जात होता, नेमका तेव्हाच अमेरिकी पत्रकारितेत ‘न्यू जर्नलिझम’चा (अतिउत्पादक) लेखनकंडू जागा झाला होता. ‘प्ले-बॉय’च्या अर्धअनावृत ललनाफौजांशेजारी कथात्मक आणि अकथनात्मक साहित्यातील हिरेदेखील चमकून उठत होते. त्याच काळात ‘एस्क्वायर’, ‘न्यू यॉर्कर’ लेखांचे विषय मांडण्याचे कौशल्य वाखाणले जात होते, कारण अत्यंत चौकटीबाहेरच्याच कल्पनांना प्राधान्य देणारे तरुण संपादक पुुुढे येत होते. गे तलीस (तलीझ) नावाचा एक पत्रकार या काळात सिनेकलाकाराहून अधिक लोकप्रिय झाला तो ‘फ्रॅन्क सिनात्रा हॅज कोल्ड’ या त्याच्या ‘एस्क्वायर’ मासिकातील गाजलेल्या भल्या मोठ्या रिपोर्ताजमुळे. जो गेल्या शतकातील सर्वात महत्त्वाचा, पत्रकारांपासून सामान्यांकडून सर्वाधिक वाचला गेलेला लेख मानला जातो. त्यामुळेच ‘एस्क्वायर’च्या संकेतस्थळावर आजही मोफत वाचायला मिळतो.
इटलीतून स्थलांतरित शिंप्याच्या घरी जन्मलेल्या तलीस यांना लहानपणी त्यांच्या पालकांच्या दुकानात ‘माणसे वाचायचा’ जोरदार छंद जडला. परिणामी हायस्कूल मॅगेझीन, कॉलेज रिपोर्टर म्हणून या पायऱ्या चढत स्वारी थेट ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये क्रीडा पत्रकार म्हणून रुजू झाली. तिथे क्रीडावृत्तही असाधारण रंगवून दाखवत उमेदवारी केली. म्हणजे रेसकोर्सवरील घोड्यांच्या जॉकींपैकी विलक्षण वाटणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसाची कहाणी शोधून काढ, बॉक्सिंग सामन्यांचे रिपोर्ट लिहिता लिहिता मुुष्टियोद्ध्यांसाठी कवळ्या बनविणाऱ्या दंतवैद्याची मुलाखत घेऊन त्यावर फर्मास लेख लिही… या लेखांना वाचकांची पसंती मिळाली तेव्हा आपल्या लेखनाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसाठी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ पुरेसे नाही हे ओळखून तलीस यांनी ‘एस्क्वायर’ मासिकाची वाट धरली. फ्रॅन्क सिनात्रा या तत्कालीन हॉलीवूड स्टारची मुलाखत घेण्याचे ‘दिव्य’ त्यांनी स्वीकारले. ‘दिव्य’ यासाठी की सिनात्राने त्याच्या लहरी स्वभावानुसार मुलाखत देण्याचे नाकारले. त्या दिवसांत वर्षभर भल्याभल्या म्हटल्या जाणाऱ्या अनेकांनी प्रयत्न करून त्याची मुलाखत घेण्याची मारलेली फुशारकी फोल ठरली होती. सर्दी-खोकल्यापासून वाटेल त्या कारणांची मालिका सांगत सिनात्राच्या निकटवर्तीयांनीच सिनेपत्रकार आणि उत्साही चहाटळवीरांना वाटेला लावले. पण सलग तीन महिने ‘एस्क्वायर’ मासिकाच्या खर्चाने सिनात्रा जाईल तिथे त्याचा माग काढत मुलाखतहौस अपूर्ण राहिलेल्या तलीस यांनी या सर्व वाटांवर त्याच्याशी संवाद-संपर्कात आलेल्या पंच्याहत्तरएक जणांच्या मुलाखती घेतल्या. आपल्या ‘डेडलाइनी’च्या वेळेत ‘फ्रॅन्क सिनात्रा हॅज कोल्ड’ हा खरोखरीच सिनात्राची मुलाखतवजा असलेला १५,००० शब्दांचा लेख धाडून दिला. एप्रिल १९६६ मध्ये छापून आलेल्या या लेखापासून अमेरिकी ‘न्यू जर्नलिझम’ला सुरुवात झाल्याचे मानले जाते. राजकारणावर अशा प्रकारच्या खळबळजनक लेखनउचापती जॉन डिडिअन, टॉम वुल्फ आणि हंटर थॉम्पसन यांनी केल्या. मग पुढल्या पिढीत नोरा एफ्रॉनपासून एलिझाबेथ गिल्बर्ट आणि सुझन ऑरलीनपासून ते डेव्हिड ग्रानपर्यंत कित्येक नावे सांगता येतील ज्यांनी सुरचित रिपोर्ताजांमधून पत्रकारिता मजबूत केली. तलीस यांच्या मुलाखती, त्यांची कात्रणे, वाचन यांच्याबाबतचे व्हीडिओ आणि लेख ढिगांनी सापडतील. पत्रकारितेत केलेल्या प्रत्येक लेखासाठी केलेली तयारी-काढलेल्या नोंदी-बातम्यांची कात्रणे-इतर संदर्भ तपशील यांच्या फायली त्यांनी राखून ठेवल्यात. त्याचाही तपशील असलेला दृक्-श्राव्य भाग इंटरनेटवर मिळतो. आजच्या लिखाणाचे प्रयोजन गेल्या आठवड्यात आलेले त्यांचे ताजे पुस्तक.
९२ व्या वर्षातदेखील हा पत्रकार त्याच्यातील ‘कुतूहलसत्त्व’ टिकून असल्याने ठणठणीत आहे. ‘ए टाऊन विदाउट टाइम : गे तलीस’स न्यू यॉर्क’ नावाचा हा ग्रंथ. गेल्या आठेक दशकांतील शहराचे स्थित्यंतर अनुभवणारा हा पत्रकार. वेगवेगळ्या पुस्तकांमधून न्यू यॉर्क शहरावर ग्रथित झालेल्या जुन्या-नव्या लेखांचे एकत्रीकरण असे याचे स्वरूप. शहरावरची सूक्ष्मलक्ष्यी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारिता कशी असते, याच्या उदाहरणांसाठी यातल्या लेखांचे वाचन अनिवार्य ठरावे.
अॅलेक्स वडूकुळ (भारतीय वंशाच्या, अमेरिकी जन्म- कर्माच्या) या ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या ‘स्टाइल’ विभागात न्यू यॉर्क शहरावर प्रामुख्याने लिहिणाऱ्या संपादकाची या ग्रंथाला प्रस्तावना आहे. त्यांनी म्हटले आहे की तलीस यांच्या कोणत्याही रिपोर्ताजमध्ये हे शहर प्रामुख्याने एखाद्या व्यक्तिरेखेसारखे वावरते. त्यांच्या सर्व पुस्तकांमधून उलगडणारी या शहराची व्यक्तिरेखा एकत्रितरीत्या या ग्रंथात पहिल्यांदाच वाचायला मिळणार आहे.
शहरांवरच्या लेखांची चार गटांत विभागणी केली आहे. त्यातला पहिला भाग शहरातील दुर्लक्षित घटकांवरचा. त्यातील पहिलाच लेख आहे तो ‘न्यू यॉर्क इज ए सिटी ऑफ थिंग्ज अननोटिस्ड’ हा. १९६१ साली ‘न्यू यॉर्क’ मासिकात हा लेख छापून आला होता. ‘सेरेण्डिपिटीअर्स जर्नी’ नावाने. यातल्या शहराचे वर्णन तिथल्या माणसांच्या खोल निरीक्षण तपशिलांसह आणि त्याच्या विविध संस्थांमध्ये झालेल्या अधिकृत नोंदींसह लेखात वाचायला मिळतात. काही मासले इथे आवर्जून नमूद करणे आवश्यक. ‘सर्वसामान्य न्यू यॉर्कर एका मिनिटात २८ वेळा डोळ्यांची उघडझाप करतात आणि तणावात हा आकडा ४० वर जातो’. ‘ब्राँक्स प्राणिसंग्रहालयातील कचरावेचकांना सर्वाधिक सापडणाऱ्या ऐवजात नाणी, पेपर क्लिपा, बॉल पेन आणि लहान मुलींसाठीच्या पॉकेटबुक्सचा भरणा अधिक असतो’. ‘न्यू यॉर्कमधील प्यालेबाजांची मजल एकुणात चार लाख साठ हजार गॅलन बीअर इतकी असते. पस्तीस लाख पाऊंड इतके मांस ते फस्त करतात. दातातल्या फटी साफ करण्यासाठी २१ मैल भरेल इतका ‘दंतदोरा’ वापरतात’. ‘न्यू यॉर्कबद्दल इत्थंभूत माहितीने परिपूर्ण माणूस हा कुणी अभ्यासक नसून, तर इमारतींमध्ये उद्वाहन चालक असतो. कारण ते बोलत नाहीत, पण सर्व स्तरांच्या माणसांची संभाषणे ऐकत असतात. ब्रॉडवेनजीक २३४ वेस्ट या ४४ व्या रस्त्यावर असलेल्या ‘सार्डीज’ रेस्तराँमधील लिफ्टचालकाचा कान तिथे येणाऱ्या माणसांच्या चर्चांनी इतका लालतिखट झालेला असतो की ‘ब्रॉडवे’वर लागणारे कुठले नाटक चालणार आणि कुठले आदळणार याची चर्चा तो अभ्यासकाच्या आवेशात करू शकतो’. ‘रहदारी संपत येते तेव्हा इथल्या रस्त्यांचा ताबा भटक्या मांजरींनी घेतलेला असतो.’
हे वर्णन १९६१ च्या न्यू यॉर्क शहराच्या चोवीस तासांच्या परिघातील साऱ्याच गोष्टींची ज्यांची दखल घेण्याची तोशीस कुणी करणार नाही त्याची. शहराला मद्यापुरवठा करणाऱ्या कंपन्या, खाटिकखाने, प्राणिसंग्रहालये येथून गोळा केलेली किंवा वेगवेगळ्या संस्थांनी, हौशी अभ्यासकांनी केलेल्या नोंदीतून आलेली. पण तलीस त्यांना एखाद्या मन किंवा चित्तपकडू कथेसारखे आपल्या लेखांतून सादर करतात. रस्त्यावरच्या मांजरींची त्यांनी तीन गटांत विभागणी केलेली दिसते. पाणथळ जागांवर, गटारांजवळ अन्नासाठी भटकणाऱ्या उग्र नजरेने माणसांकडे पाहणाऱ्या ‘वाइल्ड कॅट्स’, दुसरा गट संवेदनशील आणि भावुकभोळ्या (विशेषत: स्त्रिया) लोकांकडूून दैनंदिन जेवणावळ मिळणाऱ्या ‘बोहेमियन कॅट्स’ (जेवणासह एंजल्स, डार्लिंग्ज, लिटिल पीपल आदी मानवी शब्दांची या मांजरींशी अधिक ओळख) या मांजरींचा वावर सेव्हन्थ स्ट्रीट, ब्रॉडवेजवळील इमारतींजवळ. भावुकभोळ्यांच्या दुष्काळवेळेत लिफ्टमन त्यांना भरवतात. सोमवार ते शुक्रवार हाच या मांजरींचा वावर. शनिवार-रविवार तेथे न येता त्या हक्काची रजा घेतात. तिसरा मांजरींचा गट म्हणजे वाणसामान दुकाने किंवा रेस्तराँभोवती घुटमळणाऱ्या ‘ग्रोसरी कॅट्स’- या मांजरी पौष्टिक अन्न अथवा थेट कॅटफूड खाऊन उंदीरआहारापासून स्वत:ला लांब ठेवणाऱ्या. न्यू यॉर्क शहराच्या मांजरींवर तलीस यांचा स्वतंत्र लेखही या पुस्तकात वाचायला मिळतो. पण या लेखात पहाटे पाच वाजता मॅनहटनच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या, क्लबांत रात्रभर वाजवून थकलेल्या, आळसावलेल्या ट्रम्पेट प्लेअर आणि इतर वादकांच्या ताफ्याचा उल्लेख येतो. सहा वाजता गजबजलेल्या मासळी बाजाराच्या वासापासून ते सात वाजता रहदारी सुरू झाल्याचा तपशीलही चित्रासारखा रंगवलेला दिसू लागतो. न्यू यॉर्क आणि ब्रुकलीन शहरांना जोडणारा एक पूल तयार करण्यात आला. त्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीतून ‘द ब्रिज’ नावाचे एक पुस्तक तलीस यांनी लिहिले होते. त्याचा एक तुकडा नव्या पुस्तकातही वाचायला मिळतो. माणसे मरायला टेकलेली असताना ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या ओबिच्युअरी विभागाचा प्रमुख त्यांचे ‘आगाऊ मृत्युलेख’ कसे लिहून ठेवतो, व्होग मॅगझीनचे काम कसे चालते आणि शहराचे संदर्भ असलेल्या सर्वोत्तम लेखांची जोडणी या पुस्तकात आहे. ‘लेडी गागा’च्या रेकॉर्डिंग सेशनचे शब्दचित्र असलेला लेख या पिढीतील तारांकितेशी जोडणारा. पत्रकार हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आपल्या बातमी-लेखांतून शहराची जडण-घडण सर्वाधिक मांडत असतात. पण तलीस यांचे लेखन जाणीवपूर्वक शहराला व्यक्तिरेखेत बदलून टाकणारे. ‘पत्रकारी गट’,‘पत्रकारी क्लब’ या धर्तीवरच्या संस्था जगभर अमेरिकी अनुकरणातूनच निघाल्या. पण आपल्याकडे त्यांचे स्वरूप खान-पान आणि विविध ‘सोयीं’च्या पूर्तीसाठी राहिले. पत्रकारितेच्या, त्यातील मेहनतीच्या आणि इतिहास-भूगोलाच्या नोंदींचे अभ्यासअनुकरण त्यांच्यासाठी अनेक प्रकाशवर्षे दूरच राहिले. सूक्ष्म आणि अभ्यासू पत्रकारितेचे नमुने पाहायचे असतील, तर तलीस यांच्या इतर पुस्तकांसह हे शहराची सखोलात दखल घेणारे पुस्तक उपयोगी ठरावे. तलीस यांच्या लेखनजगाशी परिचित नसल्यास ताजे पुस्तक उत्तम संधी आहे.
(पुस्तकाची केवळ ‘किंडल आवृत्ती’च सध्या भारतात उपलब्ध आहे.)
(थोडक्यात तलीस यांची पत्रकारिता जाणून घेण्यासाठी rb.gy/jlazbo)
( तलीस यांची एक छोटी मुलाखत पाहण्यासाठी surl. li/efgtkt)