ज्युलिओ रिबेरो
भाजपला अनुराग ठाकूर यांचे कौतुकच वाटत असल्यास नवल नाही. हे ठाकूर यापूर्वी केंद्रीय अर्थखात्यात राज्यमंत्री पदावर होते आणि तेव्हा ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्या’च्या विरोधातील आंदोलकांबाबत ‘गोली मारो’ असे आवाहन आपल्या पाठीराख्यांना करत होते. दिल्ली उच्च न्यायालयातील, न्यायाची चाड असलेल्या कुणा न्यायाधीशांनी अनुराग ठाकूर आणि अन्य दोघा भाजप नेत्यांवर, ईशान्य दिल्लीत हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले होते. संबंधित न्यायाधीशांनी ही तक्रार दाखल होण्यासाठी कालमर्यादा नेमून दिली होती, ती मुदत संपण्याच्या एक तास आधी त्या न्यायाधीशांचीच बदली रातोरात पंजाब उच्च न्यायालयात करण्यात आली. न्यायाधीश गेले चंडीगडला. ठाकूर दिल्लीत तर राहिलेच, वर त्यांना पुढल्या वेळी बढतीदेखील देण्यात आली. आता ठाकूर हे राज्यमंत्रीच असले, तरी त्यांच्याकडे क्रीडा खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलेला आहे.
ठाकूर यांच्या गुणांबद्दल किंवा क्षमतांबद्दल शंका घेण्याचे काहीही कारण नाही. परंतु पक्ष आणि शीर्षस्थ नेते याबद्दलची निष्ठा सिद्ध करण्यास ते फार आतुर दिसतात. आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महिला कुस्तीपटू आणि इतर काही महिला कुस्तीपटूंनी (सात जणी) भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर अनुराग ठाकूर यांना निष्ठा व्यक्त करण्याची जणू आणखी एक संधीच मिळाली.
या महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींमधून खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वागण्याची एक पद्धत दिसून आली. ती म्हणजे महिला कुस्तीगिरांना विनंती न करताच त्यांनी अंगात घातलेले टी-शर्ट वर करणे, आधी त्यांच्या उघडय़ा पोटावर हात ठेवणे आणि नंतर ते त्यांच्या स्तनांकडे सरकवणे! ते नेहमी असेच करत असल्यामुळे या मुली काही ना काही कारण सांगून त्यांना टाळत आणि आपली सुटका करून घेत. पण मग त्यांनी या मुलींना आपल्या कार्यालयात बोलवायला सुरुवात केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काही मुलींना सांगितले की लैंगिक सुखाच्या बदल्यात ते त्या मुलींना खेळाडूंना घ्यावी लागतात ती सप्लीमेंट्स त्यांच्या स्वत:च्या खर्चाने देतील. याचा अर्थातच त्या मुलींना धक्काच बसला.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी गाठ पडू नये म्हणून या मुलींनी सगळय़ांसाठी जिथे जेवणाची व्यवस्था असते, त्या हॉलमध्ये मुलींपैकी कुणीही एकटीने जायचे नाही, असा निर्णय घेतला. आपली क्रीडा कारकीर्द ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या हातात आहे याची त्यांना जाणीव होती. पदकविजेती कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी हा प्रश्न धसास लावायचा असे ठरवून हातात घेतला आणि विनेशचा मेहुणा पदकविजेता बजरंग पुनियादेखील त्यांना सामील झाला तेव्हा कुठे खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे खरे रूप समाजापुढे आले.
ब्रिजभूषण सिंह यांनी नवीन कुस्तीपटू मुलींना संध्याकाळनंतर उशिरा ‘ओळख करून घेण्यासाठी’ आपल्या घरी बोलावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. या घटनेची चौकशी करण्यात आली नाही कारण सिंह यांना फक्त त्या एकाच मुद्दय़ावर फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले गेले असते. दखलपात्र गुन्ह्यातील आरोपी असलेल्या महिलांना संध्याकाळनंतर ठाण्यात बोलावण्याची परवानगी पोलिसांनाही नाही आणि इथे तर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तरुण मुलींना त्यांच्या झोपेच्या वेळी आपल्या घरी बोलावत होते.
क्रीडामंत्र्यांनी सुरुवातीला आपल्या पक्षातील या सहकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही. राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पदकविजेती महिला बॉक्सर मेरी कोम आणि भारतीय ऑिलपिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा या भाजपच्या ऋणात आहेत, हे समजण्यासारखे आहे. साहजिकच त्यांनी त्या स्वत: क्रीडा क्षेत्रातील असूनही या क्रीडापटू महिलांबाबत गुळमुळीत भूमिका घेतली. त्याच कशाला, अगदी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीदेखील १९८३ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंनी महिला कुस्तीपटूंना दिल्या गेलेल्या वागणुकीचा निषेध केला तेव्हा, आपला पाठिंबा दिला नाही.
सरकार आणि अनुराग ठाकूर यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय जनतेला हे माहीत आहे की या कुस्तीपटू मुलींनी जे काही केले ते त्यांना भाजपला विरोध करायचा होता, म्हणून केलेले नाही. आणि त्यांनी जे सत्य मांडले ते मांडण्यासाठी खरोखरच मोठय़ा धैर्याची गरज होती. ब्रिजभूषण सिंह हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्यांचे संरक्षण केले जात आहे, ते विरोधी पक्षाचे खासदार असते तर ते एव्हाना तिहार तुरुंगात असते, ही गोष्ट २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या महिला मतदारांना समजली तर त्या २०२४ मध्ये वेगळय़ा कुणाला तरी मतदान करू शकतात.
आता थोडा दिल्ली पोलिसांचा विचार करू. पोलिसांवर टीका करायला आपल्याकडे सगळय़ांनाच आवडते. पण सत्ताधारी पक्षाचे आमदार – खासदार आणि सरकार समर्थक यांच्या बाबतीत मवाळ भूमिका घेणारे पोलीस विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील चुकार टीकाकारांवर हात उगारायला इतके का उत्सुक असतात, याचे विश्लेषण टीकाकारांनी केले आहे का? आजचा काळ असो किंवा मी काम करत होतो तो काळ असो, सत्तेत असलेला पक्ष मग तो भाजप असो किंवा काँग्रेस, सरकारी अधिकाऱ्यांवर सत्ता गाजवू पाहतो. केवळ बदल्या आणि नेमणुका एवढय़ाच गोष्टी राजकीय लोकांच्या हातात असतात असे नाही. त्याव्यतिरिक्तही गुणवत्ता हा मुद्दा बाजूला ठेवून ते एखाद्या अधिकाऱ्याला भराभर वर उचलू शकतात आणि एखाद्या अधिकाऱ्याला विजनवासात पाठवू शकतात.
आज, अगदी चांगले अधिकारीदेखील जोखमीच्या कामगिऱ्यांपासून स्वत:ला नामानिराळेच ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अशी कामे स्वीकारण्यास भाग पाडले तर त्यांना अस्तित्वासाठी तडजोड करावी लागण्याची शक्यताच अधिक! एखाद्याच्या राजकीय वरदहस्ताने काम करणारे पोलीस संबंधिताच्या इशाऱ्यामुळे आपल्याला एखाद्या अगदी स्वच्छ प्रकरणातही अडकवायला कमी करणार नाहीत, हे ज्यांना माहीत आहे, त्यांच्या मनात याबाबत कसलीच शंका नाही.
एका अतिशय फालतू विनोदासाठी राहुल गांधींना कोर्टात खेचण्यात आले. ‘आप’चे दोन मंत्री तर तुरुंगात गेले. आणि भाजपचे म्हणणे आहे की कुणीही, अगदी कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा तेवढा अपवाद! पण एखाद्या पदाच्या आमिषाने एवढे दिवस गप्प बसलेल्या नामवंत क्रिकेटपटू, मुष्टियोद्धे, महिला आणि पुरुष खेळाडूंनी आता कारवाईच्या मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे. भाजपमध्ये खासदार असलेले एक जोडपेदेखील त्यांच्यात सहभागी झाले आहे. या सगळय़ांपेक्षा प्रबळ आहे ते सामान्य नागरिकांचे, विशेषत: महिला मतदारांचे सार्वत्रिक मत! ‘लडके तो लडके होते है, गलती हो जाती है’ असे म्हणणाऱ्या मुलायमसिंह यांचे कट्टर चाहतेच तेवढे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना माफ करतील.
एके काळी स्थानिक पोलिसांनी ज्याच्यावर ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ असल्याचा ठपका ठेवला होता आणि टाडाअंतर्गत कारवाई केली होती, अशा ब्रिजभूषण सिंह यांच्यासारख्या गंभीर आरोप असलेल्या खासदाराविरुद्ध कारवाई केली जाण्याचे संकेत अनुराग ठाकूर यांनी अलीकडेच दिले आहेत. आधी महिला कुस्तीगिरांबाबत कठोर भूमिका घेणारे क्रीडामंत्री आता सामोपचाराच्या भूमिकेत दिसत आहेत.
क्रीडा मंत्रालय आणि पोलिसांकडून चौकशीला बराच उशीर झाला आहे. तक्रारकर्त्यांपैकी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले निवेदन मागे घेतले आहे! आणखी उशीर झाला, तर आणखी तक्रारदार मागे फिरतील. कदाचित हादेखील ‘नीती’चाच भाग असू शकतो. ब्रिजभूषण सिंह यांच्यासाठी गुन्हेगारी जगत हे काही नवीन नाही. त्यांच्या कारकीर्दीत याआधी ते अनेक खटल्यांतून सहीसलामत सुटले आहेत. पण महिला कुस्तीपटूदेखील ज्यांच्याकडे सहज दुर्लक्ष केले तरी चालेल, अशा कुणी लिंबूटिंबू नाहीत.
लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असून पंजाबातील दहशतवादाशी लढण्यासाठी त्यांनी विशेष नियुक्तीवर काम केलेले आहे.