राजेंद्र ठाकूरदेसाई

‘महाराष्ट्रीय कलोपासक’ने १९६३ मध्ये संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांच्या स्मरणार्थ पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सुरू केली. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू हे स्वतः उत्तम दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार होते. त्यांच्या नाटकाबद्दलच्या ठाम भूमिका होत्या आणि त्या ‘कलोपासक’मधूनच तयार झाल्या होत्या. त्यातली एक म्हणजे, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय हे नाटकाचे मूलभूत घटक आहेत. त्यामुळे याच तीन गोष्टींना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत महत्त्व आणि पारितोषिक दिलं जाईल. म्हणून या स्पर्धेत प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य या तांत्रिक गोष्टींना पारितोषिक नाही आणि परीक्षकांच्या गुणदान पत्रावर त्यासाठीचे रकानेही नसतात. अर्थात तांत्रिक गोष्टींना अजिबातच महत्त्व नाही असं नाही. मुलांनी ते शिकलं पाहिजे हाही राजाभाऊंचा आग्रह होता आणि ते स्वतः शिकवतही होते. पण तांत्रिकतेच्या आहारी जाऊ नये ही त्यांची भूमिका होती.

dr c v raman nobel prize
भारताला ९४ वर्षांमध्ये विज्ञानाचं एकही नोबेल पदक का मिळू शकलं नाही?
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
slum Dharavi, House slum dwellers Dharavi,
धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे! शासनाकडून धोरण जाहीर
uma mani the coral woman of india
उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास
nobel prize 2024
नोबेल पारितोषिक विजेत्यांची निवड कशी केली जाते? कोणत्या क्षेत्रांसाठी दिले जातात पुरस्कार?
Nitin Gadkari, Arun Bongirwar Award,
गडकरी म्हणतात, “चुकून राजकारणात आलो, नाहीतर नक्षलवादी चळवळीत जाऊन…”
important tips for getting a personal loan
वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी चार महत्त्वाचे सल्ले; त्वरित कर्ज घेताना कोणत्या चुका टाळाव्यात?
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप

तांत्रिकतेच्या बाबतीत आणखी एक मुद्दा म्हणजे, काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना लाख रुपयांचा निधी मिळतो, तर काही महाविद्यालयांतली मुले स्वतःच्या खिशातले पैसे घालून नाटक करतात. त्यामुळे स्वाभाविकपणे जास्त निधी असलेली महाविद्यालयं उत्तम काहीतरी करून आपला प्रभाव निर्माण करू शकतात आणि पैसे नसलेल्या मुलांवर अन्याय होऊ शकतो. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तांत्रिक घटकांना गुणच नसल्याने सर्व महाविद्यालयांचे संघ एका समान पातळीवर येतात. गेल्या अनेक वर्षांत एक गोष्ट सातत्याने जाणवत आहे, ती म्हणजे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी अधिकाधिक तांत्रिकतेच्या मागे लागले आहेत. त्यातच त्यांचे पैसे, ऊर्जा, शक्ती वाया जाते. या बाबत आतापर्यंत वारंवार विद्यार्थ्यांना सूचना, मार्गदर्शनही करून झालं. पण ते मुलांना कळत नाही.

यंदाच्या निकालासंदर्भात बोलायचं झालं, तर राजाभाऊंनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या नियमांमध्ये करंडक विजेती एकांकिका आणि सांघिक प्रथम एकांकिका हा फरक अधोरेखित करणारी तरतूद करून ठेवली होती. ती अशी, की पुरुषोत्तम करंडकाला पात्र ठरणारी एकांकिका नसेल तर करंडक न देता त्यासाठीचं रोख पारितोषिक द्यायचं. हा नियम पहिल्यापासून स्पर्धेत आहे. त्याच मुळे यंदा सांघिक प्रथम पारितोषिक देण्यात आलं, पण करंडक देण्यात आला नाही. कारण ती पुरुषोत्तम करंडकला अभिप्रेत एकांकिका नाही. कधीतरी कठोर निकाल लावला गेला पाहिजे, तो आजपर्यंत लावला गेला नसेल, पण तो लावण्याचं धाडस आम्ही दाखवतो, असं यंदाच्या परीक्षकांचं म्हणणं होतं. गणपतराव बोडस, केशवराव दाते अशा दिग्गजांची नावं आज मुलांना माहीतही नसतील. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांना पात्र ठरणारं काम मुलांकडून झालं नसेल तर ते पारितोषिक का द्यायचं? सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा जयराम हर्डीकर करंडक या पूर्वी अनेकदा दिला गेला नाही. कारण त्याला साजेशी एकांकिकाच झाली नाही. वेगळी, नावीन्यपूर्ण एकांकिका नसेल तर पारितोषिक का द्यायचं? इतकं कशाला, उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यासाठी परीक्षकांना कलाकार शोधावे लागतात अशी परिस्थिती आहे.

कसदारपणाचा अभाव

२००० सालापासून विद्यार्थी लेखक वाढत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांचं लेखन किती कसदार आहे, हा प्रश्न आहे. एखादा विषय घेऊन, त्याची इकडून तिकडून माहिती जमवून एकांकिका लिहिली जाते. लिहिलेली एकांकिका एखाद्या लेखकाला, जाणकाराला दाखवून त्याचे गुण-दोष समजून घेतले पाहिजेत. ते न करता सिनेमा, मालिका, स्किटच्या प्रभावाखाली लेखन केलं जातं. ते करायलाही हरकत नाही, पण नाटक हे वेगळं माध्यम आहे, नाटकाचं वेगळं बलस्थान आहे, हे मुलं समजून घेत नाहीत. एकांकिकेत १०-१५ वेळा अंधार (ब्लॅक आऊट) केला जातो. त्यामुळे सादरीकरणाचा वेळ कमी होतो, हे त्यांना कळत नाही. जास्तीत जास्त सादरीकरण करायला हवं. लेखन कसदार नसतं, स्वच्छ मराठी बोलता येत नाही. पूर्वीच्या काळी त्या वेळचे प्रसिद्ध लेखक, नाटककार एकांकिका लिहित असत. रत्नाकर मतकरी, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, विजय तेंडुलकर अशा लेखकांच्या एकांकिका ‘पुरुषोत्तम’मध्ये सादर होत होत्या. आज प्रश्न असा आहे, किती लेखक एकांकिका लिहित आहेत? मुलांना स्वतः कसदार लिहिता येत नाही, ते आपलं लेखन घेऊन जाणकारांकडे जात नाहीत हा भाग आहेच, पण त्यांना इतर लेखकांचं नवं कसदार लेखनही मिळत नाही. पूर्वी महाविद्यालयांतील नाट्य मंडळाची जबाबदारी असणारे प्राध्यापक होते, आज असे प्राध्यापक आहेत का? या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुलं त्यांना वाटतं ते, जमतं ते करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रयोगावर होतो. मुलांना स्वच्छ बोलता येत नाहीत, खणखणीत आवाजात संवाद म्हणता येत नाहीत. विगेत उभं राहूनही कलाकारांचे संवाद ऐकू येत नाहीत. हे सगळं परीक्षकांना बराच काळ जाणवत आहे.

ही आजाराची लक्षणं…

२००९-१०मध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धा राज्यातील अन्य केंद्रांवर घेऊन महाअंतिम फेरी पुण्यात घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी राज्यातल्या अन्य केंद्रावर गेल्यावर किती भीषण परिस्थिती आहे, हे आम्ही पाहिलं. नाटक करण्यासाठी चांगल्या जागाच उपलब्ध नाहीत. पुरुषोत्तमचा मंच उपलब्ध झाल्यावर अन्य केंद्रांवरील मुलांना सुरुवातीला नाटक करणं जड गेलं. पण वर्षातून एक संधी मिळणार हे लक्षात घेऊन त्यांची वाटचाल सुरू झाली. दोन-तीन वर्षांत त्या केंद्रावरून चांगल्या एकांकिका येऊ लागल्या. अर्थात सर्वच एकांकिका चांगल्या असतात, असा दावा नाही. पण प्रत्येक केंद्रावरून पुण्यातल्या एकांकिकांशी स्पर्धा करू शकणाऱ्या एकांकिका येऊ लागल्या. पुरुषोत्तमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी, महाअंतिम फेरीची सर्व बक्षिसं पुण्याबाहेरच्या संघांनी मिळवली. त्यावेळी पहिल्यांदा अधोरेखित झालं, की पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला अभिप्रेत असलेलं लेखन, दिग्दर्शन, अभिनय अन्य केंद्रांवरील मुलं करत आहेत. महाअंतिम फेरीला रिमा लागू, योगेश सोमण आणि धीरेश जोशी हे परीक्षक होते. त्यावेळी तुम्ही करत असलेल्या एकांकिका पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला अभिप्रेत नाही, तुम्ही स्पर्धेपासून लांब जात आहात, हे सांगून पुण्यातील मुलांसाठी धोक्याची घंटा जाहीरपणे वाजवली गेली होती. त्यानंतरच्या सात-आठ वर्षांतही अपेक्षित सुधारणा झाली नाही. २०१७, २०१८ आणि २०१९ अशी सलग तीन वर्षं नगरच्या मुलांनी पुरुषोत्तम करंडक मिळवला. त्यांनी कोणत्याही तंत्राच्या आहारी न जाता प्रभावी एकांकिका सादर केल्या होत्या.

चांगलं कसदार लिहिण्यासाठी चांगलं वाचन, पाहणंही महत्त्वाचं आहे. त्याशिवाय स्पर्धेसाठीचं लेखन एप्रिल-मेमध्ये सुरू करून स्पर्धा होईपर्यंत पूर्ण होत नसेल, तर ऑगस्टमध्ये चांगला प्रयोग कसा काय सादर होईल? या वर्षी तर काही एकांकिकांचा प्राथमिक फेरीत सादर झालेला प्रयोग आणि सेन्सॉर संमत संहिता याचा काहीही संबंध नव्हता. असं तीन-चार एकांकिकांच्या बाबतीत झालं. कथा तीच, पात्र तीच, पण सादर होणारी आणि सेन्सॉर संमत संहिता यात कमालीचा फरक. या विषयी मुलांना विचारल्यावर त्यांचं म्हणणं होतं, की आमचं लिहून झालं नव्हतं. मग सेन्सॉर संमत संहितेला अर्थ काय? दिग्दर्शकानं थोडंफार स्वातंत्र्य घेणं मान्य आहे, पण त्यालाही मर्यादा आहे. प्राचार्यांची मान्यता, सेन्सॉर संमती, पोलिसांची परवानगी मिळालेली कुठलीही संहिता सादर करायला पुरुषोत्तममध्ये हरकत घेतली जात नाही. एखादा विषय प्रक्षोभक, अश्लील असेल आणि त्या संहितेला या तिन्ही मान्यता असतील, तर आक्षेप घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. अनेकदा अंतिम फेरीत गेलेल्या एकांकिका प्राथमिक फेरीत वेगळ्या आणि अंतिम फेरीत वेगळ्या वाटतात इतके बदल केले जातात हेही निदर्शनास आलं आहे.

एकांकिकांमध्ये गेली काही वर्षं आजाराची लक्षणं दिसत होती. पण पुरुषोत्तम करंडक आणि अन्य स्पर्धा यात फरक आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत विशिष्ट प्रकारची, म्हणजे ज्यात लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन यावर भर दिलेला आहे, अशी एकांकिका सादर होणं अपेक्षित आहे. अभिप्रेत असलेली एकांकिका सादर होण्याचा आग्रह धरण्यात वावगं नाही. यंदाचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक वाटला, तरी गेल्या काही वर्षांतील परिस्थिती पाहता ही वेळ कधी ना कधी येणारच होती. ती यंदा आली इतकंच… यंदाच्या निकालातून बोध घेऊन पुढील वर्षांत त्यात सुधारणा होईल ही अपेक्षा!

लेखक पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजक ‘महाराष्ट्रीय कलोपासक संस्थे’चे चिटणीस आहेत.