श्रद्धा कुंभोजकर
पाठय़पुस्तकं नेमकं किती ज्ञान देतात हा निराळा विषय; पण जेवढं देत होती, तेवढं तरी हवं की नको?
‘‘ -हे पाहा, आपल्याला जर शूर, निडर आणि आज्ञाधारक नागरिक घडवायचे असतील, तर त्यांच्या अभ्यासामधून या मूल्यांच्या विरोधात जाणारा भाग वगळावा लागणं अपरिहार्य आहे.
– अहो, पण होमरसारख्या प्रसिद्ध कवींनीही या मूल्यांच्या विरोधात जाणाऱ्या, भीती, विद्रोहाचं चित्रण करणाऱ्या रचना केल्या आहेत आणि त्या लोकांना माहीत आहेत, त्याचं काय करायचं?
– अशा स्थितीत सत्ताधीशांनी अशा लेखकांवर वचक ठेवून त्यांना विनम्रतेनं हे सांगायला हवं, की ‘तुमच्या लिखाणामुळे पुढच्या पिढय़ांचं नुकसान होतंय. हे असलं खोटं लिखाण तुम्ही थांबवा.’
– शिवाय गरज पडली तर आपल्या मूल्यांच्या विरोधात जाणारे भाग आणि पात्रं आपण गाळून टाकायची. वाटलं तर नव्या विचारांची गाणी रचून ती शिकवायची. झालं तर मग.’’
हा संवाद प्लेटोच्या ‘पोलितिया’ (इंग्रजीत रिपब्लिक) या ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायावर आधारित आहे, हे आज अडीच हजार वर्षांनंतर सांगणं अत्यावश्यक आहे. राजसत्तेला जे आदर्श आणि मूल्यं जनमानसात रुजवायची असतात, त्यांचा विचार राज्य स्थापन होण्याच्या आधीपासून विचारवंत करत असतात हा यातला विचार अफलातून. (हे प्लेटोच्याच नावाचं अरबी रूप आहे.) पुढच्या पिढय़ांपर्यंत जे विचार, कौशल्य, मूल्यभान पोहोचावं असं आपल्याला वाटतं, ते ते आपण शिक्षण या नावानं त्यांना शिकवायचे प्रयत्न करतो. त्या त्या वयात मुलांना काय समजेल, कशाचे अनुभव ती घेऊ शकतील, याचा विचार करून मुलांना काय शिकवायचं हे शिक्षणव्यवस्थेचे नियंत्रक ठरवत असतात. समाजाला ज्या कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्यं अभ्यासक्रमात घेतली जातात.
‘पुस्तकचाकोरी’बाहेरच्या वाटा
अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना ठरावीक वाटांनी ठरावीक तपशील आणि कौशल्यं शिकवण्यासाठी पाठय़पुस्तकांचा उपयोग केला जातो. अत्यावश्यक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत खात्रीशीरपणे पोहोचाव्यात यासाठीची ती एक मळलेली वाट. तरीही अभ्यासक्रमातले घटक शिकण्यासाठी चाकोरीच्या बाहेरच्या अनेक वाटा असतातच. गुरुत्वाकर्षणासारखी संकल्पना पाठय़पुस्तकातून व्याख्या शिकून तर समजेलच; पण मनोऱ्यावरून खाली पडणाऱ्या चेंडूमुळेही ती समजू शकते. त्यामुळे शिक्षणशास्त्रीय दृष्टीनं पाहिलं तर पाठय़पुस्तक ही अनेक वाटांपैकी एक मळलेली वाट आहे इतकंच. प्रस्तुत लेखिकेनं भारतात इंटरनेट क्रांतीपूर्वी म्हणजे टीव्हीयुगात केलेल्या एका संशोधन प्रकल्पात असं आढळलं की पाठय़पुस्तकांमध्ये शिकवलेल्या मूल्यांपेक्षा समाजातून आणि विविध माध्यमांमधून शिकलेली मूल्यं विद्यार्थ्यांवर अधिक प्रभाव टाकतात.
नियंत्रणाची सवय जुनीच
तरीही पाठय़पुस्तकांमध्ये काय असावं, काय वगळावं यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा राज्यकर्त्यांमध्ये (अडीच हजार वर्षांपासून तरी) राहतेच. पाठय़पुस्तकांचा वापर कसा केला जातो याविषयी अनेक अभ्यास झाले आहेत. तथ्यविरोधी कथनांवर वाचकांचा विश्वास बसावा यासाठी पाठय़पुस्तकं जाणीवपूर्वक फसवणूक करतात, हे जेम्स लोएवीन यांनी ‘लाइज् माय टीचर टोल्ड मी : एव्हरीिथग युअर अमेरिकन टेक्स्टबुक गॉट राँग’ (१९९५) या ग्रंथात मांडलं आहे. ‘सर्वसाधारण समज’ (कॉमन सेन्स) घडवण्यामध्ये इतिहासाच्या पाठय़पुस्तकांची भूमिका कोणती असते, याविषयी कृष्ण कुमार यांनी विस्तृत लेखन केलं आहे. त्यांच्या ‘प्रेज्युडिस अँड प्राइड’ (२००१) या ग्रंथात भारत व पाकिस्तान यांच्या पाठय़पुस्तकांची तुलना आहे. ‘शाळांमधून व सरकारी माध्यमांमधून पसरवण्यात आलेली भूतकाळाविषयीची मांडणी मानसिक नकाशांसारखी काम करते, आणि वर्तमानकाळातील परिस्थितीला प्रतिसाद देताना बहुसंख्य लोकांना या नकाशांद्वारे मार्गदर्शन होत असतं,’ असं कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
वर्तमान परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यावा याचं मार्गदर्शन अभ्यासक्रमातून घडणाऱ्या जाणीव-नेणिवा करत असतात. भावी नागरिकांची भविष्यातली वागणूक निश्चित करायला पाठय़पुस्तकं हा खासा उपाय ठरतो. त्यामुळे शासनकर्त्यांची ध्येयधोरणं जसजशी सुनिश्चित होतात, तसतसे पाठय़पुस्तकांमध्ये आणि त्यामागच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल होणं यात काहीही नवं नाही. किंबहुना हीच प्रक्रिया पालटून पाठय़पुस्तकांमधल्या बदलांनुसार अभ्यासक्रमातले व सरकारी ध्येयधोरणांमधले बदल समजून घेणं शक्य असतं.
विज्ञानाचेही धडे वगळले
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला (एनसीईआरटी) अभ्यासक्रमांची त्यांच्याच शब्दांत रॅशनलाइझेशन म्हणजे तर्कसुसंगत पुनर्रचना करावीशी वाटण्यामागे काय धोरण असेल याचा विचार करायला गेलं तर काय दिसतं? सुदैवानं संस्थेच्या वेबसाइटवर सहावी ते बारावीच्या पुस्तकातून काय काय वगळलंय याच्या याद्याच दिलेल्या आहेत. फसफसत्या पेयांच्या बाटल्यांवर जसं यात कोणत्याही फळाचा गर अथवा रस नाही हे आधीच सांगितलेलं असतं, तशीच ही पारदर्शकता! केवळ बारावीच्या पुस्तकांपुरतं पाहिलं तरी जीवशास्त्राच्या पुस्तकातून सजीवांच्या पुनरुत्पादनाचा धडा वगळला आहे. रसायनशास्त्रात दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र हा धडा वगळला आहे. भूगोलाच्या पुस्तकातून क्षेत्रीय सर्वेक्षण आणि नकाशे बनवायला संगणकाचा वापर हे दोनही धडे अनावश्यक ठरलेत. भारताचे लोक आणि अर्थव्यवस्था यातून स्थलांतर, मानवी विकास आणि वस्तू उत्पादनाचे कारखाने वगळले आहेत. मानवी भूगोलातून लोकसंख्येचे घटक वगळलेत. ना-नफा तत्त्वावरील संस्थांसाठी जमाखर्च या नावाच्या विषयातून त्याच नावाचा धडा जमेत घेऊ नये असं ठरलं आहे. संगणकीय जमाखर्चाच्या विषयातून डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे मूळ आकडेवारी कशी जतन करायची हा घटक गायब होणार आहे. बिझिनेस स्टडीज्मधून शासकीय धोरणांचे व्यवसायांवरील परिणाम, चांगल्या नेत्याची गुणवैशिष्टय़े आणि वित्तीय बाजार यांच्या अभ्यासाचं ओझं आता विद्यार्थ्यांवर पडणार नाही. विसाव्या शतकाच्या राजकारणातून शीतयुद्ध, अमेरिकेची एकाधिकारशाही आणि स्वतंत्र भारतातल्या लोकचळवळी अदृश्य होणार आहेत. आणि इतिहास या विषयातून मुघलांना, आणि भारताच्या फाळणीला रजा दिलेली आहे. याखेरीज एनसीईआरटी अध्यक्षांच्या मते नजरचुकीनं ज्यांची नोंद करायची राहिली, असे वगळलेले गांधीहत्येसारखे तपशील तर वेगळेच.
प्लेटोला जसं शूर, निडर आणि आज्ञाधारक नागरिक घडवायचे होते, तसं या अभ्यासक्रमातून कसे नागरिक घडतील? आधुनिक नकाशे न कळणारे भूगोलतज्ज्ञ, कारखान्याबद्दल आणि स्थलांतराबद्दल माहिती नसणारे अर्थशास्त्रज्ञ, चांगल्या नेत्यामध्ये काय गुण असावेत याचं प्रारूप न अभ्यासलेले व्यावसायिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह दख्खनच्या प्रादेशिक ओळखीसाठी लढणाऱ्या असंख्य मावळय़ांनी नक्की कोणाविरुद्ध लढा दिला याची थोरवी न समजणारे इतिहासकार.
‘स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश:’
कोविडकाळापुरतं मुलांच्या मनावरचं ओझं कमी करण्याचा हेतू एनसीईआरटीने धोरण म्हणून जाहीर केला आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि त्या त्या विषयतज्ज्ञांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीनं ही पाठय़पुस्तकं तयार होत असतात. त्यामागचे कष्ट लक्षात न घेता आता २०२३ मध्ये ठरावीक घटक वगळण्याचं कारण वेबसाइटवरच्या धोरणातून पुरेसं स्पष्ट होत नाही. पण इतिहासापुरतं बोलायचं तर ‘स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश:’ हे गीतावचन लक्षात घ्यायला हवं. फाळणी असो वा मुघल शासकांच्या उत्तर भारतातल्या सत्तेचा इतिहास – त्यांची स्मृती अचानक पुसल्यामुळे एकूणच फाळणीचं आव्हान आणि त्यानंतरही टिकून बहरलेल्या भारतीय लोकशाहीचं महत्त्व किंवा मुघल सत्ता आणि भारतातल्या संमिश्र संस्कृतीचा सहसंबंध या गोष्टी विद्यार्थ्यांना कळणार नाहीत. प्लेटोच्याच आगेमागे लिहिणाऱ्या कौटिल्यानं म्हटलं आहे, की ‘‘ज्या सत्ताधीशांचं शास्त्राचं ज्ञान डळमळीत असतं, ते आपल्या हट्टीपणापायी राज्याचा आणि स्वत:चाही नाश ओढवून आणतात.’’ (८.२.१२) अर्धवट आणि विखंडित स्वरूपातलं शिक्षण घेणारी ही पिढी जेव्हा समाजाची सूत्रं हाती घेईल तेव्हा हा विचार करायला वेळ राहिलेला नसेल.
कोविडनंतरच्या भारतात बेरोजगारीच्या समस्येचा कधीही कडेलोट होईल ही स्थिती असताना तरुणांना असं अज्ञानी ठेवल्यामुळे काय होईल? तर बारावी शिकलेल्या विद्यार्थिनीला ज्या दहा गोष्टी माहीत असायला हव्यात त्या आल्या नाहीत, की ती बारावीनंतर खासगी संस्थांमध्ये तिला ‘रोजगारक्षम करणारी कौशल्यं’ शिकवणारे लहान अभ्यासक्रम पूर्ण करण्यात वेळ आणि पैसे खर्च करेल. तोवर कडेलोटाची घटका थोडी पुढे ढकलली जाईल. शिवाय ही कौशल्यं शिकवून देशाची सेवा करणाऱ्या खासगी संस्थांना सरकारी साहाय्य देऊन सार्वजनिक-खासगी-सहभागाचा नवा अध्याय रचला जातो ते वेगळंच.
शिक्षण ही दिवसेंदिवस महागडी गोष्ट होत चाललेली असताना निव्वळ ग्राहक म्हणून विचार केला तरीही आपण भरलेली फी कमी न होता, त्या फीतून आजवर मुलांना दहा गोष्टी शिकवल्या जात असत, आता आठच शिकवल्या जाणार यात नुकसान कुणाचं आहे हे स्पष्ट आहे. समाजाला मुक्तिदायी दिशा देणारी अनन्य गोष्ट म्हणजे शिक्षण असा विचार मांडणाऱ्या जोतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मदिवस आपण साजरे करत आहोत. या दोघांनी शिक्षणाच्या वाटा बंद करणाऱ्या प्रत्येक घटकाविरुद्ध लढा दिला. आज भावी नागरिकांच्या वाटणीचं, हक्काचं शिक्षण देताना मापात पाप केलं जातंय. त्याची टोचणी जरी कुणाला जाणवली तरी खूप झालं.
लेखिका उच्चशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
shraddhakumbhojkar@gmail.com