प्रा. पी. डी. गोणारकर
पक्षाचे नेतृत्व, धोरण किंवा निर्णय मान्य नसेल तर त्या पक्षापासून फारकत घेऊन वेगळे होणे यात काही नावीन्य नाही. नेत्यांमधील कुरघोडीमुळे काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, भारतीय जनता पक्षाची अनेकदा शकले झाली. इंदिरा गांधी, जयललिता, ममता बॅनर्जी, शरद पवार, उमा भारतींपासून राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी आपल्या मूळ पक्षापासून वेगळे होत नवा पक्ष स्थापन केला, मात्र आताची परिस्थिती भिन्न आहे. अलीकडे फुटीरगट अन्य पक्षांत सामील होत नाही; स्वतंत्रपक्षही स्थापन करत नाही, तर मूळ पक्षावरच दावा करतो. मोदी- शहांची जोडी केंद्रात सत्तेत आल्यापासून ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी प्रतिपक्षातील प्रभावीनेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करायचे, त्यांच्या मागे यंत्रणा लावायची आणि हळूच त्यांना पक्षप्रवेश देऊन ‘पवित्र’ करून घेण्याचा जणू उपक्रम हाती घेतला होता. हा शो हाऊस फूल झाल्यामुळे की काय त्यांचा रोख आता केवळ प्रतिपक्षातील नेत्यांकडे नसून अख्खा पक्षच त्यांच्या रडारवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर जो पक्ष धोका देतो त्यांचा हिशोब (पक्ष फोडून) चुकता करणे अधर्म नसून ती कूटनीती आहे. या कूटनीतीचेच बळी लोक जनशक्ती पक्ष आणि शिवसेना ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेस जात्यात तर जेडीयू, बीआरएस सुपात आहेत. भलेही फडणवीस व त्यांच्या चाणक्यांना ही कूटनीती वाटत असेल, पण सामान्य मतदारांत भाजपची प्रतिमा ‘सिरयल पार्टी किलर’ अशी होत चालली आहे.
‘पार्टी किलिंगचा’ पहिला प्रयोग त्यांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या रामविलास पासवानच्या कुटुंबात केला. कारण रामविलास यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणुकीत (नोव्हेंबर २०२०) भाजपशी फारकत घेत स्वबळावर मैदानात उतरले. परंतु भाजपला त्यांचा हा निर्णय काही रुचला नव्हता. पित्याचे आकस्मिक निधन व मोदीचा ‘स्वंयघोषित हनुमान’ या सहानुभूतीच्या बळावर आपल्याला यश मिळेल ही अपेक्षा चिराग पासवानला होती, मात्र निवडणुकीत लोजपचा अपेक्षाभंग झाला. दुसऱ्या बाजूला रामविलास पासवान यांनी पक्षाची धुरा आपल्या पुत्राकडे हस्तांतरित केल्यापासून त्यांचे बंधु खासदार पशुपती पारस अस्वस्थ होते. बिहारमधील पराभव, रामविलास पासवान हयात नसणे ही आयती संधी मिळताच चिराग पासवान यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. काकांच्या काट्याने पुतण्याचा काटा काढायचा निर्धार ‘महाशक्ती’ने केला होताच. काकाही ‘हीच ती वेळ’ म्हणत पाच खासदारांसह भाजपच्या आश्रयाला गेले. आपणच मूळपक्ष असल्याचा दावा केला. संसदेतील पक्ष कार्यालय आपल्याला मिळावे व गटनेता म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाकडे यांच्याकडे केली. अध्यक्षांनी विनाविलंब ही मागणी मंजूर केली. पुढे हे प्रकरण निष्पक्ष (?) निवडणूक आयोगासमोर गेले.
हेही वाचा >>>चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम कोणासाठी?
आयोगाने बंडखोरांना मूळ ‘लोक जनशक्ती पक्ष’ आणि मूळ पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांना ‘लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)’ हे नवे नाव बहाल केले. याशिवाय पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘बंगला’ हे गोठवून काकाला ‘शिलाई मशीन’ तर पुतण्याला ‘हेलिकॉप्टर’ दिले. अर्थात महाशक्तीने पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा पहिला यशस्वी प्रयोग बिहारमध्ये केला.
लोजप व भाजप यांचे सख्य तसे सत्तेपुरते सीमित होते. कारण या दोन्ही पक्षांच्या विचारधारेत कोणतेही साम्य नव्हते. रामविलास पासवान तसे चालत्या गाडीत बसणारे गृहस्थ. त्यामुळे सत्तेत कोणीही असो त्यांना मंत्रिमंडळातील आपली सीट महत्वाची होती. भाजप व शिवसेनेचे मात्र तसे नव्हते. यांच्यातील वैचारिक समानतेच्या धाग्यामुळे यांची नैसर्गिक युती मानली जात होती. मुंडे- महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा धागा २५ वर्षे तुटू दिला नव्हता. २०१४ ला केंद्रात मोदी लाट आली आणि भाजप नेतृत्वाला ‘सह्याद्री’ स्वबळावर काबीज करण्याचे स्वप्ने पडू लागली. महाराष्ट्र विधानसभ निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने २६० तर शिवसेनेने २८२ जागा स्वबळावर लढविल्या. भाजपची इच्छापूर्ती झाली नाही. कारण मॅजिक फिगर गाठण्यासाठी अवघ्या २३ जागा कमी पडल्या. दोन जुने मित्र एकत्र येण्यापूर्वीच शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन नवा ट्विस्ट आणला. त्यामुळे अल्पकाळासाठी का असेना भाजप सत्तेत तर शिवसेना विरोधी बाकांवर बसली. भाजप जर राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करू शकतो तर आपण का नाही, हा प्रश्न शिवसेनेला पडला. अर्थात काळ आला होता मात्र ही ती वेळ नव्हती.
हेही वाचा >>>सोनोग्राफीबद्दल गैरसमज नको… गर्भपाताबद्दल तर नकोच नको!
२०१९ च्या विधानसभा निकालाने अनेकांना आपले जुने हिशेब चुकते करण्याची संधी मिळाली. यावेळेस कोणीही कोणाला वर्ज्य नव्हते. पडद्यामागे सत्तेसाठी खुनशी स्पर्धा सुरू झाली. महाविकास आघाडीच्या निर्मितीच्या वाटाघाटी सफल होण्यापूर्वीच फडणवीस- अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकून घेऊन सर्वांना पहिला धक्का दिला, मात्र शरद पवार यांनी केलेल्या ‘डॅमेज कंट्रोल’मुळे हा संसार काही तासांत मोडला. पवारांच्या भूमिकेने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अडचणीत आणले. ती जखम भळभळत होतीच पण अजित पवारांसोबत गेलेले आमदारही काही खुश नव्हते. दुसरीकडे पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या एकनाथ शिंदे आणि ज्यांना सत्तेत सहभाग मिळाला नाही ते शिवसेनेचे आमदार नाराज झाले. या सर्व ‘नाराजमंडळाच्या’ मनात आपली खुर्ची हुकल्याचा सल होता. शिवाय चौकशीच्या फेऱ्यामुळेही ते हैराण होते.
पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली २० जून २०२२ आणि त्यापुढील काही दिवस काय घडले, हे सर्वज्ञात आहे. आपण फुटीर नसून मूळ पक्षच असल्याचा दावा पशुपती पारसप्रमाणेच एकनाथ शिंदेंनीही केला. शिंदेंनी आपल्या पाठीशी असलेल्या ‘महाशक्ती’च्या आशीर्वादाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविले आणि त्यांच्या साहाय्याने ‘महाशक्तीने’ आपला हिशेब चुकता केला.
हेही वाचा >>>राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड
एकनाथ शिंदेच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री दिल्यानंतर मुंबई परिसरातील महानगरपालिकेत, मराठा चेहऱ्यामुळे राज्यातील लोकसभा- विधानसभेत याचा लाभ होईल असे मतांचे गणित होते. मात्र प्रत्यक्षात लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंनाच अधिक असल्याचे आणि महाविकास आघाडी पहिल्यापेक्षा अधिक बळकट होत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे सिरयिल किलरांची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळली. राष्ट्रवादीतही सारे काही आलबेल नव्हते. शरद पवारांनी भाकरी फिरविण्याचे दिलेले संकेत हे त्याचेच द्योतक होते. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनाम स्वीकारलाच पाहिजे ही अजित पवारांची आग्रही भूमिका! पवारांनी आपला वारसदार म्हणून सुप्रिया सुळेंची केलेली निवड; हे सारे भाकरी फिरविण्यापूर्वीच करपल्याचे लक्षण होते.
पक्ष आणि सत्ता दोन्ही काकांमुळेच हातून निसटत असल्याचे लक्षात आल्यावर आपली गाडी उपमुख्यमंत्रीच्या पुढे जातच नसल्याची खंत पुतण्याने बोलूनही दाखवली. मासा पाण्याशिवाय जगू शकेल मात्र राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, याची पुरेपूर जाणीव देवेंद्र फडणवीस यांना होती. ही अचूक वेळ साधत भाजपने अजित पवार गटाला सोबत घेत एकाच दगडात तीन पक्षी मारले. एक शिंदे गटाची अनुपयुक्तता लक्षात घेऊन त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ संपुष्टता आणली. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांचाही हिशोब चुकता केला. महाविकास आघाडीच्या मजबूत किल्ल्याला खिंडार पाडले. विशेष म्हणजे लोजपा, शिवसेनेच्या फुटीच्या वेळी जी मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती, तीच हुबेहूब पद्धत राष्ट्रवादीसाठीही वापरली जात आहे. यथावकाश राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवारांना मिळाले तरी काहीही आश्चर्य नाही, कारण या सर्व नाट्यांची पटकथा एकाच लेखकाने लिहिली आहे.
लेखक राजकीय विश्लेषक आहेत. pgonarkar@gmail.com