व्हिटेनम… ऑस्ट्रेलियातलं हे शहर दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास भरभराटीस आलं ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या ॲस्बेस्टॉसच्या खाणीमुळे. युद्धकाळात अग्निरोधक इमारती बांधण्यासाठी आणि आगीतही जळणार नाहीत, असे कपडे तयार करण्यासाठी ॲस्बेस्टॉसची मागणी वाढली. या व्यवसायातून नफा कमावण्याच्या मिषाने ‘कलोनियल शुगर कंपनी’ (सीएसआर) या साखर आणि संबंधित उद्योगांतील कंपनीने खाणकामाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. कंपनीने १९४० च्या सुमारास व्हिटेनममधली खाण खरेदी केली. आणि इथूनच या शहराच्या विकासाला आणि ऱ्हासालाही सुरुवात झाली.

व्हिटेनमचा विकास

pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
gadchiroli potholes on national highway
राष्ट्रीय महामार्गांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी

सीएसआरला खाणकाम क्षेत्राचा शून्य अनुभव होता. मात्र त्यांनी ॲस्बेस्टॉस काढण्यासाठी जय्यत तयारी केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनेही या उद्योगाला प्रोत्साहन दिलं. ॲस्बेस्टॉस हा सुवर्ण उद्योगाच्या तोडीस तोड उद्योग म्हणून पुढे आला तर उत्तमच, असे आडाखे बांधून सरकारने शक्य ते सर्व साहाय्य केलं. दुसऱ्या महायुद्धात होरपळणारे युरोपातील अनेक मजूर इथे स्वखुशीने यायला तयार होते. त्यांच्यासाठी ही खाण हा नशीब अजमावून पाहण्याचा मार्ग होता. जहाज भरून स्थलांतरित मजूर आणले गेले आणि खाणीच्या परिसरात सुमारे २० हजार लोकवस्तीचं एक भलं मोठं शहर वसवलं गेलं. ॲस्बेस्टॉसच्या उद्योगात येण्याचा सीएसआरचा निर्णय अगदी योग्य ठरला होता. कंपनीला भरभरून नफा मिळू लागला. आपलं घरदार सोडून आलेल्यांनाही आपला निर्णय योग्य ठरल्याचं स्पष्ट दिसत होतं. व्हिटेनममध्ये अवघी काही वर्षं काम केलं, तर पुढे कोणतंही काम न करता आरामात आयुष्य व्यतीत करता येईल एवढं उत्पन्न मिळत असे. भरभराट झालेल्या या शहरात सरकारी अधिकाऱ्यांची आणि पर्यटकांचीही वर्दळ वाढू लागली. सारं काही उत्तम सुरू असल्याचं दिसत होतं. पण कामगार आणि रहिवाशांच्या नकळत एक भयावह संकट व्हिटेनमवर घोंघावू लागलं होतं…

धोक्याची घंटा

धूलिकणांमुळे होणाऱ्या फुप्फुसांच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. जिम मॅकनल्टी हे व्हिटेनमजवळच्या एका रुग्णालयात रुजू झाले होते. त्या रुग्णालयाचं एक फिरतं एक्सरे पथक होतं. ५०च्या दशकाच्या मध्यावर हे पथक एकदा व्हिटेनममध्ये गेलं. त्यांनी आणलेले एक्सरे डॉ. जिम यांनी तपासले आणि व्हिटेनमच्या हवेत मोठा घोळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिथे अवघी दोन वर्षं काम केलेल्या व्यक्तींचेही एक्सरे गंभीर रुग्णाच्या एक्सरेसारखे दिसत होते. डॉ. जिम यांनी व्हिटेनमला भेट द्यायचं ठरवलं.

धुळीचे लोट…

व्हिटेनममध्ये डॉ. जिम यांना जे चित्र दिसलं, ते एक्सरेमागचं कारण पुरेसं स्पष्ट करणारं होतं. सर्व रस्त्यांवर ॲस्बेस्टॉसची धूळ पसरली होती. प्रत्येक वस्तूवर तिचे थर होते. डॉ. जिम यांची गाडी थांबली तेव्हा या धुळीचा एक मोठा लोट त्यांच्या अंगावर आला. आपल्या दातांवरही हा थर बसल्याचं त्यांना जाणवलं. याचा अर्थ फुप्फुसं निकामी होण्यासाठी खाणीत काम करणं गरजेचं नव्हतं. शहरातल्या प्रत्येकाच्या अगदी लहान मुलांच्याही फुप्फुसांत ॲस्बेस्टॉसच्या ‘खाणी’ तयार झाल्या होत्या. काही ठिकाणी हवेतल्या धूलिकणांची आणि तंतूंची घनता एवढी जास्त होती की, हे कण हातांतही पकडता येत. प्रत्यक्ष खाणीतली स्थिती तर अधिकच भयावह होती. तिथे हवा खेळती राहण्याची सोय करण्यात आली नव्हती. या खाणकामगारांचे कपडे धुणाऱ्या व्यक्तीच्या फुप्फुसांतही मोठ्या प्रमाणात घातक कण जात. खाणीतून काढलेले ॲस्बेस्टॉस गोण्यांमध्ये भरून निर्यात केले जात असे. या गोण्या सछिद्र असत. त्यामुळे त्यातून ॲस्बेस्टॉसचे कण निसटून हवेत तरंगत राहत. काही वेळा या गोण्या फुटत. अशा वेळी ट्रकमधील कामगारांची घुसमट ठरलेली होती.

पांघरूण घालण्याचा प्रयत्न

प्रत्यक्ष खाणीतील परिस्थिती तर अधिकच दयनीय होती. धुळीचे कोणत्याही प्रकारे नियमन करण्यात येत नव्हते. कंपनी केवळ दुर्घटना होणार नाही, अपघात होणार नाहीत, याची काळजी घेत असे. मात्र क्षणोक्षणी श्वासावाटे फुप्फुसांत जाणाऱ्या घातक हवेविषयी कंपनीला काहीही सोयरसुतक नव्हते. डॉ. जिम का भेट देत आहेत, हे सीएसआर कंपनी जाणून होती. त्यामुळे त्यांच्या भेटीच्या वेळी परिस्थिती प्रत्यक्षात आहे तेवढी भयानक दिसणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र वास्तव लपून राहणं शक्य नव्हतं.

डॉ. जिम यांनी १९५७ ते १९६२ दरम्यान कंपनीच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांनी जिम यांच्यावर दबाव आणून त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. १९५९ साली तेथील सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या अहवालात व्हिटेनममध्ये फुप्फुसांच्या आजारांत झालेली लक्षणीय वाढ अधोरेखित करत चिंता व्यक्त केली. या संदर्भातील न्यायालयीन लढा सुरू झाला.

लढ्याला यश

१९६६ मध्ये वृत्तपत्रांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर खाणकाम बंद करण्यात आलं. न्यायालयीन लढाईला पहिलं यश आलं १९८८ साली. तेव्हापासून आजवर कंपनीला कामगारांच्या आरोग्याच्या हानीबद्दल भरपाईपोटी शेकडो कोटी रुपये द्यावे लागले आहेत. काही कामगारांचा आणि रहिवाशांचा मात्र भरपाई मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. कामगार, रहिवासी आणि अधूनमधून व्हिटेनममध्ये येणाऱ्या व्यक्ती मिळून आजवर तब्बल दोन हजार व्यक्तींनी इथल्या प्रदूषणामुळे जीव गमावला आहे.

शहर बंद

२००६ मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने शहरातील वीज, दूरध्वनी आणि सर्व सरकारी सेवा बंद केल्या. शहराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे दिशादर्शक फलकही हटविण्यात आले. ही जागा यापुढे कधीही मानवी वस्तीसाठी योग्य होणार नाही, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. हा दक्षिण गोलार्धातील सर्वाधिक प्रदूषित परिसर असल्याचंही सांगितलं जातं. ३० लाख घन मीटर ॲस्बेस्टॉस डस्ट आजही व्हिटेनममध्ये पडून आहे. काही वेळा तिची धूप होऊन ती जवळपासच्या गावांत वाहत जाते. आरोग्याला धोका असूनही गेल्या काही महिन्यांपर्यंत काही जिज्ञासू पर्यटक हे शहर पाहायला येत होते. काही लोक तिथे राहतही होते.

शहर सोडताना…

ज्यांची हयात इथे गेली, ज्यांना इथे आल्यामुळे बरे दिवस पाहता आले, अशा पिढीचं मन आजही या ‘घोस्ट टाऊन’मध्ये रेंगाळलं आहे. त्यातील अनेकांनी आरोग्याला असलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करत इथेच राहण्याचा हट्ट बराच काळ लावून धरला होता. सरकारी दट्ट्यामुळे अनेकांनी शहर सोडलं. तरीही लॉरेन थॉमस या ८० वर्षांच्या आजी तिथेच राहिल्या होत्या. अखेर सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनाही तिथून बाहेर काढण्यात आलं.

केवळ आर्थिक नफा हे एकमेव लक्ष्य ठेवून करण्यात आलेल्या अनिर्बंध आणि नियोजनशून्य खाणकामाची ही शोकांतिका. एके काळी समृद्धीचं प्रतीक असलेल्या, गजबजलेल्या व्हिटेनममध्ये आज केवळ निळ्या धुळीचे ढीग उरले आहेत. ऑस्ट्रेलियातील सरकारने हे शहर नकाशावरून पुसून टाकण्याची तयारी केली आहे, मात्र ज्यांनी त्याचा उदयास्त पाहिला, तिथल्या निळ्या धुळीत श्वास घेतला आणि ज्यांच्या प्रियजनांनी तिथल्या हवेमुळे जीव गमावला, त्यांच्या मनातून हे शहर पुसलं जाईल का? जिथे अशाच स्वरूपाचं अनिर्बंध खाणकाम सुरू आहे, त्यांनी यातून धडा घेतला, तरी पुरेसं आहे…

Story img Loader