ओपन एआय, ‘गूगल डीपमाइन्ड’, ‘अँथ्रोपिक’ या तीन्ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्या… सॅम अल्टमन, डेनिस हसाबिस आणि डॅरिओ ॲमोडेइ हे या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. हे तिघे, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आणखी बऱ्याच उच्चपदस्थ, अधिकारी आणि अभियंत्यांसह एकत्र आले आणि मे महिन्याच्या अखेरीस एकंदर ३५० स्वाक्षऱ्यांचे निवेदन त्यांनी तयार केले. त्यात अत्यंत खरमरीत शब्दांत इशारा दिलेला होता : “झपाट्याने वाढणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – ‘एआय’) क्षेत्र हा महासाथरोग किंवा अणुयुद्ध यांच्यासारखाच मानवी समाजाला धोका आहे, हे ओळखून पावले टाकण्याची गरज आहे”!
ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला आजचे प्रगत रूप दिले, तेच इतका गंभीर इशारा देताहेत ही निव्वळ एक विचित्र बातमी नव्हे अमेरिकेत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे नियमन करावे का, केल्यास कसे करावे याचा विचार सुरू झालेला आहे. सॅम अल्टमन, डेनिस हसाबिस आणि डॅरिओ ॲमोडेइ याच तिघांनी मे महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेऊन या धोक्यांची कल्पना दिली. त्यानंतर सिनेटच्या (अमेरिकी वरिष्ठ लोकप्रतिनिधीगृह) समितीत यावर विचार सुरू झाला.
काही स्वयंसेवी किंवा ‘ना-नफा’ संस्था आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या विरोधात उभ्या आहेत. ‘एआय सेफ्टी’ या संघटनेने ३५० उच्चपदस्थांना अलीकडेच एकत्र आणले आणि ‘महासाथ, अणुयुद्ध’ या धोक्यांशी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनियंत्रित, बेछूट वापराची बरोबरी केली. तर त्याआधी मार्च महिन्यात ‘फ्यूचर ऑफ लाइफ इन्स्टिट्यूट’ या संस्थेने एक हजार जणांच्या स्वाक्षऱ्यांचे अनावृत पत्र प्रसृत करून ‘कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचे प्रयोग पुढील सहा महिन्यांसाठी पूर्णपणे थांबवून, तेवढ्या काळात या क्षेत्राच्या योग्य नियंत्रणाचे नियम आखावेत’ अशी मागणी केली. या मागणीपत्रावर ट्विटरचे सीईओ आणि ‘टेस्ला’चे संस्थापक इलॉन मस्क यांचीही सही होती, पण याच क्षेत्रावर ज्यांचा व्यवसाय अवलंबून आहे, त्यांनीच नियंत्रणाची मागणी करण्याची वेळ गेल्या आठवड्यातच आली हे अधिक खरे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे मोठे पाऊल म्हणजे १९८६ मध्ये कृत्रिम ‘न्यूरल नेटवर्क’च्या रचनेचा आराखडा. त्याबद्दल तिघा शास्त्रज्ञांना अलीकडेच संगणकशास्त्रातले ‘नोबेल’ समाजले जाणारे ॲलन ट्युरिंग पारितोषिकही मिळाले होते. मात्र यापैकी जेफ्री हिंटन आणि योशुआ बेंगिओ हे गेल्या तीन महिन्यांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांबद्दल सावधगिरीचे इशारे जाहीरपणे देत आहेत.
या साऱ्यांना धोका वाटतो तो ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’चा. शब्द किंवा आकृती (चित्र/ व्हीडिओदेखील) काय आहे, त्याचे सार काय, त्याचे रूपांतर/ भाषांतर किती प्रकारे होईल आणि त्यापुढे वा तसे आणखी काय असेल या साऱ्या शक्यता काही क्षणांत वापरकर्त्यांना उपलब्ध करून देणाऱ्या या सुविधेच्या विकासावर ‘ओपन एआय’ सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘लाभ’ थेट लोकांपर्यंत नेणाऱ्या कंपन्यांचा डोलारा उभा आहे. पण हे तंत्रज्ञान केवळ काही सुविधांपुरतेच न राहाता भलत्या हातांत किंवा भलत्या हेतूंसाठी वापरले गेले तर समाजात हाहाकार माजू शकतो. दुसरा अधिक स्पष्ट धोका म्हणजे नोकऱ्या जाणे. अनेक मानवी कामे कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकत असल्याने काही प्रकारच्या सेवा पूर्णत: मानवरहित होऊ शकतात.
‘छायाचित्रणाच्या शोधाने चित्रकारांचे काम संपले का?’ यासारखे युक्तिवाद येथे लागू पडत नाहीत, हेही अनेकजण सांगत आहेत. ‘एआय सेफ्टी’ या संघटनेचे कार्यकारी संचालक डॅन हेन्ड्रिक्स यांनी हे युक्तिवाद खोडून काढले आहेतच. ‘प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाला धोकादायक समजणारे काहीजण असतात, तितके हे धोके साधे नाहीत. उलट जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आहेत, त्यांना तर हे धोके अधिकच जाणवत आहेत, पदोपदी जाणवत आहेत, केवळ अद्याप त्याबद्दल या क्षेत्रातले अनेकजण जाहीर वाच्यता करत नाहीत इतकेच,’ असे हेन्ड्रिक्स यांनी न्यू यॉर्क टाइम्सच्या केव्हिन रूस यांना अलीकडेच सांगितले.
“कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवे ‘उत्पादन’ विकसित करण्यापूर्वी सरकारचा परवाना घेणे आवश्यक करा’’ अशी स्पष्ट मागणी सॅम अल्टमन यांनी केलेली आहे. हे अल्टमन ‘ओपन एआय’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी. याच कंपनीच्या ‘चॅट जीपीटी’मुळे गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून अक्षरश: जगभर खळबळ उडाली होती आणि दर आठवड्याला ‘चॅट जीपीटी हेही करू शकते’ वगैरे मजकूर जगभरच्या वापरकर्त्यांकडून प्रसृत होऊ लागला होता. ‘हे तंत्रज्ञान चुकीच्या हातांत पडण्याचा धोका अधिकच आहे’ असे अल्टमन यांचे म्हणणे, त्याला इतर उच्चपदस्थांचाही पाठिंबा आहे. त्यामुळेच आम्ही आमचे निवेदन अगदी कमीत कमी, अवघ्या २२ शब्दांचे ठेवून महासाथ किंवा अणुयुद्धाच्या धोक्याइतकाच हा धोका तीव्र असल्याचे म्हटले आहे, असे ‘एआय सेफ्टी’ या संस्थेचे म्हणणे.
भारतीयांच्या – किंवा जगाच्याही- दृष्टीने महत्त्वाचे हे की, सध्या तरी या कंपन्या अमेरिकी आहेत. त्यामुळे त्यांना परवाने देणार अमेरिकी सरकारच. समजा अन्य देशांतील कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी मजल मारली, तरीही अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी या अन्यदेशीय कंपन्यांनाही अमेरिकेच्या सरकारकडून परवाना घ्यावा लागणार! अर्थात, असे नियम अनेक क्षेत्रांसाठी अमेरिकेने केले आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे धोके परवान्यांच्या कटकटीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत!