निवृत्त कर्नल अभय पटवर्धन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च, १९७१मधे पाकिस्तानी सैन्य पूर्व पाकिस्तानवर तुटून पडले होते. २५ मार्च, १९७१ला लेफ्टनन्ट जनरल टिकाखान यांनी तिथे ‘ऑपरेशन सर्च लाईट’ सुरू करून दोन दिवसांत जवळपास तीन लाख बंगाली विद्वान, विचारवंत, खेळाडू, कलाकार, लेखक, उद्योगपती, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सैनिक इत्यादींचा बळी घेतला होता. त्यावेळी फ्रान्समधील तुलों नौदल तळावर सामरिक अभ्यास करत असलेल्या, ‘पीएनएस मांगरो’ या पाकिस्तानी पाणबुडीवरील आठ बंगाली नाविकांनी पाणबुडी सोडून बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. फ्रान्समधून पळून आलेले हे बंगाली नाविक ३१ मार्च, १९७१ला स्पेनची राजधानी माद्रिदच्या भारतीय दूतावासात दाखल झाले. दूतावास प्रमुख, भारतीय परराष्ट्र सेवाधिकारी, सरदार गुरदीप सिंग बेदी यांनी त्यांचे पासपोर्ट तपासून त्याची माहिती दिल्लीला कळवल्यावर भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ दिल्लीला पाठवण्याचे निर्देश दिले. आठही जणांना हिंदू नावे देत, ते भारतीय असल्याचे भासवून माद्रीदहून बार्सिलोनामार्गे रोमला पाठवण्यात आल, मात्र ते भारतात जात असल्याची माहिती माध्यमांना आणि रोममधील पाकिस्तानी दूतावासालाही मिळाली. पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी या नाविकांची मनधरणी करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. मात्र, या नाविकांचे नेते अब्दुल वहीद चौधरी यांनी आपण बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल. हे आठही नौसैनिक दिल्लीत पोहोचताच त्यांना ‘रॉ’च्या (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) एका सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले .

भारत सरकारने पश्चिम पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तानकडे हवाई मार्गाने जाण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे समुद्रमार्गे श्रीलंकेला वळसा घालू जाणे हा एकच पर्याय पाकिस्तानकडे होता. तोही निष्प्रभ ठरावा म्हणून रॉ, भारतीय नौसेना आणि मुक्ती वाहिनीने एप्रिल, १९७१पासूनच एका धाडसी सागरी हल्ल्याची योजना आखण्यास सुरुवात केली होती. मी स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये सेवा देत होतो. रॉ प्रमुख आर. एन. काव यांच्या अधिपत्याखाली स्पेशल फ्रंटियर फोर्स, भारतीय नौसेना व वायुसेना आणि रॉचे कमांडो पूर्व पाकिस्तानात दाखल झाले होते.

पाकिस्तानी पोलीस, ईस्ट बंगाल रायफल्स आणि पूर्व बंगालस्थित पाक वायुसेना व नौसेनेमधील बंगाली सैनिक भारतात शरण येऊ लागले होते. त्यांच्यातूनच मुक्ती वाहिनीच्या उभारणीची प्रक्रियाही सुरू झाली होती. फ्रान्समधून आलेल्या या नाविकांचे काय करायचे हा प्रश्न आर. एन. काव आणि भारतीय नौसेनेचे तत्कालीन डायरेक्टर नेव्हल इंटेलिजन्स कॅप्टन एम. के. मिकी रॉय यांना पडला होता. नाविकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ईस्ट पाकिस्तानात तैनात पाकिस्तानी युद्धनौका बुडविण्याची योजना आखली. ह होते, ‘ऑपरेशन जॅकपॉट’! आम्ही प्रशिक्षण देत असलेल्या मुक्ती वाहिनीलाही यात सहभागी करून घेण्यात आले.

नेव्हल कमांडर एम. एन. आर. सामंत यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. भारत आणि पूर्व पाकिस्तानच्या सीमेजवळ, जिथे प्लासीचे युद्ध झाल तिथे, भागीरथी नदीच्या काठी, मुक्ती वाहिनीच्या नौदल जवानांना कमांडोंना प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्प उभारण्यात आला. काही दिवस मी सुद्धा या कॅम्पमधे कार्यरत होतो. याचे सांकेतिक नाव (कोडनेम) ‘कॅम्प टू प्लासी: सी२पी’ होते. भारतीय नौसेनेचे कमांडर डेव्हिड फेलिक्स आणि कॅप्टन मिहीर रॉय यांनी १७ नौदल आणि १३ लष्करी कमांडोंद्वारे १६० बांगलादेशी सागरी कमांडोंना छद्म युद्धाचे प्रशिक्षण दिले.

या कॅम्पमधील दिवस, बांगला देशाच्या ‘आमार शोनार बांगला’ या राष्ट्रगीतानंतर, त्यांच्या हिरव्या नारंगी रंगाच्या झेंड्याला सलामी देऊन सुरू होत असे. वीज, पाण्याची वानवा होती, रात्री कंदील लागत असे, पाणी हँडपंपवरून आणले जात असे, राहायला नऊ तंबू होते. आम्ही पहाटे पाच वाजता उठायचो. पीटीनंतर त्यांना ऊसाच्या शेतात अनवाणी धावायला न्यायचो. त्यानंतर भारतीय नौसेना कमांडो त्यांना, पाण्यात गुप्तपणे बॉम्ब कसे पेरायचे (सिक्रेट बॉम्ब प्लांटिंग इन वॉटर) शिकवायचे. भारतीय कमांडो जे निर्देश द्यायचे त्यांचा मांगरोवरून पळून आलेले बंगाली नाविक अनुवाद करत आणि मुक्ती वाहिनीच्या जवानांना सांगत. यानंतर त्यांना ‘अनआर्म्ड कॉम्बॅट’चेे प्रशिक्षण दिले जात असे. दुपारी जेवून दीड तास आराम केल्यानंतर आम्ही या लोकांना, माणूसभर उंचीच्या पुतळ्यांवर गोळ्या घालण्याच प्रशिक्षण द्यायचो. सूर्यास्तापर्यंत सर्व जण थकलेले असत तरी, रात्री त्यांना दूरपर्यंत पोहण्याचे (लॉन्ग डिस्टंट स्विमिंग) प्रशिक्षण दिले जात असे. वजन उचलून पोहण्याचा सराव व्हावा, यासाठी त्यांच्या पोटा-पाठीवर दोन-दोन विटा बांधल्या जात.

या बंगलादेशी नेव्हल कमांडोंची निवड, तेथून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांमधून करण्यात आली होती. ते अनेक दिवसांचे भुकेले होते. अनेक आठवड्यांपासून त्यांना पुरेस अन्नही मिळाले नव्हत. ते, सुरुवातीला आधाशासारखे अन्नाचे बकाणे भरत असत. यांच्या योग्य उपयोगासाठी त्यांना योग्य आहार द्यावा लागेल हे, आमच्यासारख्या भारतीय प्रशिक्षकांच्या लक्षात आले. आले तेव्हा त्यांची उपासमार झाली होती. पाकिस्तानी सेनेने त्यांचा अनन्वित छळ केला होता. त्यांनी बलात्कार होताना बघितले होते. हे खचलेले लोक लगेच थकून जात. पोहोताना चुका करत. आम्ही हे फोर्ट विलियममधील आमच्या वरिष्ठांना कळवले. त्यानंतर प्रत्येकाला रोज दोन अंडी, पाव लिटर दूध, एक लिंबू आणि दोन फळे मिळू लागली. त्यांची तब्येत सुधारू लागली.

या शूर तरुणांना, युद्धनौका उद्धवस्त करण्याचे तीन आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. ेत्यात त्यांना, लिंपेट माईन कशी कार्यान्वयीत करायची/ वापरायची आणि युद्ध नौका/ जहाजांवर हल्ला कधी करायचा, हे शिकवण्यात आले. लिंपेट माईन्स, पाण्याच्या आत स्फोट करण्यासाठी वापरतात. भारतीय नौदलात या माईन्सची संख्या नगण्य होती. फॉरेन एक्सचेंजच्या कमतरतेमुळे परदेशी खरेदी शक्य नव्हती. शिवाय; परदेशात या माईन्सची ऑर्डर दिली तर हे पाकिस्तानलाही कळले असते. त्यामुळे या लिंपेट माईन्स, भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरीतच बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माईन एक प्रकारचा टाईम बॉम्ब असतो. तिच्यावर लोह चुंबक लावलेल असत. ही माईन युद्धनौकेच्या तळाला लावल्यानंतर काही वेळानंतर तिचा स्फोट होतो. या संपूर्ण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर कंडोम्सचा पुरवठा करावा लागला. लिंपेट माईनचा फ्युज विरघळणाऱ्या प्लगसारखा असल्यामुळे तो ३० मिनिटांत विरघळत असे, मात्र दिलेले काम पूर्ण करण्यासाठी एक तास लागत असे. यावर उपाय म्हणून फ्युजवर कंडोम लावण्यात आल. मुक्ती वाहिनीच्या कमांडोंना, पाकिस्तानी युद्धनौकांवर लिंपेट माईन चिकटवण्याआधी त्यावरचे कंडोम काढून टाकात माघारी येण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

ऑपरेशनची खरी आखणी जुलै, १९७१मध्ये झाली. आमच्या वरिष्ठांनी; जवळपास दीडशे बंगाली समुद्री कमांडोंना पूर्व पाकिस्तानच्या दक्षिण भागात पाठवण्याचा निर्णय घेतला. नेव्हल इंटलिजन्स चीफ आणि या ऑपरेशनचे कमांडर सामंत यांनी ईस्ट पाकिस्तानमधील चारही बंदरांवर उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकांवर एकाच वेळी हल्ला करायचा निर्णय घेतला. समुद्र व नद्यांची भरती ओहोटी, हवामान आणि पाकिस्तानी नेव्हल व आर्मी डिप्लॉयमेंटबद्दलची माहिती मुक्ती वाहिनीच्या योद्ध्यांनी मिळवून दिली. मुक्ती वाहिनी सेक्टर एकने चितागोंग, सेक्टर दोनने चांदपूर व नारायणगंज आणि सेक्टर नऊने मोंगला जाणाऱ्या ग्रुपला सर्वंकष मदत दिली. या कमांडोंना ३ व ९ ऑगस्ट, १९७१ दरम्यान बांगलादेशातील स्थानिक सेफ हाऊसेसमधे पाठवण्यात आले. प्रत्येक कमंडोकडे एक जोडी (पेयर) फिन्स, एक लिंपेट माईन, एक स्विमिंग ट्रंक इत्यादी साहित्य दिले होते. तीन कमांडोंपैकी एकाकडे कंपास, दुसऱ्याकडे एक स्टेन गन व एक हॅण्ड ग्रेनेड आणि ग्रुप लिडरकडे ट्रांझिस्टर रेडियो होता. त्यांच्याशी वॉकी टॉकीद्वारे संपर्क करता आला असता पण, ते १०-१२ किलोमीटर क्षेत्रातच वापरता येतात. त्यामुळे; या कमांडोंना भारतीय आकाशवाणीद्वारे संकेत देण्याचा निर्णय घेतला गेला. दुसऱ्या महायुद्धातदेखील अशा प्रकारचे गुप्त संदेश पाठवण्यासाठी दोन्ही बाजूंनी रेडियोचा वापर केला गेला होता.

आकाशवाणीच्या कलकत्ता बी केंद्रावरून सकाळी सहा वाजता, आरती मुखर्जी यांनी गायलेले गाणे वाजवले गेले की, ४८ तासांच्या आत हल्ला करायचा हे मुक्ती वाहिनी समुद्री कमांडोंच्या मनावर बिंबवण्यात आले होत. त्यानंतर याच केंद्रावरून; हेमंत कुमार यांचे गाणे वाजवण्यात आले की त्याच रात्री, चितागोंगसहित चारही बंदरांतील युद्धनौका आणि जहाजांवर लिंपेट माईन्स लावून हल्ला करायचा होता. ठरल्यानुसार; मुक्ती वाहिनीचे हे कमांडो विविध मार्गांनी, विविध वेषांत, चारही शहरांत दाखल झाले. त्यांनी आरती मुखर्जींचे “अमार पुतुल आजके प्रोथम जाबे शोशुर बारी” हे गाणे १३ ऑगस्टला आणि हेमंत कुमारनी गायलेल “आमी तोमार जोतो शुनिये चिलेम गान” हे गाणे १४ ऑगस्टला ऐकले. हा अंतिम संदेश (फायनल कॉल) होता.
त्याकाळी पूर्व पाकिस्तानमधे शेकडो बस आणि तीन चाकी ऑटो असत, मात्र खासगी कारची संख्या नगण्य होती. कारमधून कोणाच्या लक्षात न येता, या शहरांमधे आरामात फिरता येऊ शकेल अशी स्थिती नव्हती. त्यामुळे कमांडोंंसाठी ‘वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट ऑथोरिटी’चे ‘पिकअप’ ट्रक्स मिळविले गेले. त्यात लिंपेट माईन्स ठेवून त्या शेवग्याच्या शेंगा व पानांखाली दडवल्या गेल्या. हे सर्व ट्रक्स आपल्या लक्ष्यांच्या जवळच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथील या लिंपेट माईन्समधे डिटोनेटर्स बसवून त्यांच्या विरघळणाऱ्या (सोल्युबल) प्लग्जवर कंडोम लावण्यात आले. १४ ऑगस्ट, १९७१च्या मध्यरात्री संपूर्ण ईस्ट पाकिस्तानमधे या, १६० प्रशिक्षित बंगाली हल्लेखोरांनी आणि त्यांचे प्रशिक्षक असलेल्या भारतीय नौसैनिकांनी आपापल्या लुंग्या- बनियान काढून स्विमिंग ट्रंक्स आणि पायात रबराचे फिन्स घातले. प्रत्येकाने; विविधरंगी गमछ्याच्या सहाय्याने (वेल सिक्युर्ड) लिपेंट माईन आपल्या छातीला बांधल्या.

१६० नेव्हल/ मुक्ती वाहिनी कमांडोंना चार गटांत विभागून, पूर्व पाकिस्तानला पाठविण्यात आले होते. मेजर रफिकुल इस्लाम हा सेक्टर कमांडर होता. सबमरिनर अब्दुल वहाब चौधरी, बीर उत्तम हा चितागोंग हल्ल्याचा कमांडर होता. त्याच्या सोबत ६० भारतीय/ बंगाली नेव्हल कमांडो होते. त्यांनी एमव्ही हरमुज (१० हजार टन कार्गो) आणि एमव्ही आल अब्बास (११ हजार टन कार्गो)सह नऊ जहाजे आणि १२ बार्जेस उद्ध्वस्त केले. सबमरिनर अहासानुल्ला, बीर प्रतीक हे ४८ कमांडोंसह मोंगला बंदरावरील हल्ल्यात सामील होते. त्यांनी सहा जहाजे नष्ट केली. चांदपूर रिव्हर पोर्टवर बदिउल आलमच्या २० कमांडोंनी हल्ला केला होता. त्यांनी चार जहाजांचा विनाश केला. सबमरिनर अब्दुल रहमान, बीर बिक्रम आणि शहाजहान सिद्दिकीच्या नेतृत्वाखाली २० कमांडोंनी नारायणगंज आणि दौडकांडी बंदरांवर हल्ला करून १२ बोटी व जहाजे उडवून लावली. हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी सोपा मार्ग अवलंबला होता.

त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास, चितागोंगमधे मुक्ती वाहिनीचा शाह आलम पाण्यात उडी घेत, सावकाश पोहत एक किलोमीटर लांब उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकेकडे गेला. त्याच्या मागोमाग, सहा जणांनी नदीत उडी घेतली. फ्रान्समधल्या पीएनएस मांगरोवरून दांडी मारून आलेला (डेझर्टर) लिडींग सी मन अब्दुल वाहेद चौधरी हा या ऑपरेशनचा कंट्रोलर होता. वर उल्लेख केल्यानुसार; नदीच्या प्रवाहासह, दूर उभ्या असलेल्या युद्धनौकांकडे पोहत जाऊन, त्या युद्धनौकांच्या तळाला लागलेले शेवाळ चाकूने साफ केल्यावर, त्याला लिंपेट माईन चिकटवून पुन्हा पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर पोहत जाण्याचे प्रशिक्षण या सर्व कमांडोंना देण्यात आले होत. मध्यरात्रीची वेळ यासाठी निवडली होती कारण, एकतर यावेळी नदीत भरती असते आणि दुसरे म्हणजे यावेळी युद्धनौका/ जहाजावरची शिफ्ट बदलते. मोठ्या लाटा असल्याने शाह आलम व त्याचे सहकारी, केवळ दहा मिनिटांत युद्धनौकांजवळ पोचले.

त्यांनी; छातीला बांधलेले लिंपेट माईन काढले, गुंडाळलेल कापड आणि कंडोम दोन्ही, प्रवाहात दूर फेकले. माईन चुंबक युद्धनौकेला चिकटताच ते लोक, पुन्हा पोहत, पल्याड किनाऱ्याकडे गेले. तिथे पोहोचताच त्यांनी आपापले फिन्स, चाकू आणि स्विमिंग ट्रंक्स काढून, चिखलात लपवले, कमरेला लगेच लुंगी गुंडाळून ते आपल्या गावांकडे चालते झाले. बरोबर अर्ध्या तासाने, मध्यरात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी चितागोंग बंदरात पाण्याखाली स्फोट सुरू झाले. पाकिस्तानी युद्धनौका अल अब्बासखाली पहिला स्फोट झाला आणि काही मिनिटांतच ती बुडू लागली. बंदरावर एकच धावपळ सुरू झाली. तिथे तैनात पाकिस्तानी सैनिकांनी पाण्यात फायरिंग सुरू केली. एकामागून स्फोट होत गेले. लिंपेट माईनमुळे झालेल्या भोक/ भगदाडांतून हळू हळू; अल अब्बास, ओरियंट बार्ज नंबर ६ आणि ओरमाज्द या युद्ध नौका व जहाजांमध्ये पाणी शिरू लागले आणि बघता बघता त्यांना जलसमाधी मिळाली. उर्वरित तीनही ठिकाणी थोड्याफार फरकाने याचीच पुनपावृत्ती झाली होती. नारायणगंज, चांदपूर, चालना आणि मौंगलामध्येही अनेक मोठे स्फोट झाले. या संपूर्ण मोहिमेत पाकिस्तानच्या नौदलाच्या एकूण ६५ हजार ५०० टन वजनाची जहाजे/ युद्धनौकांना जलसमाधी मिळाली आणि २४ हजार टन वजनी जहाज/ युद्धनौका उद्ध्वस्त झाल्या.

चवताळलेल्या पाकिस्तानी सेनेने या भागात नृशंस हत्याकांड करत असंख्य गावे जमीनदोस्त केली. हे हल्ले होण्याआधीच, पश्चिम पाकिस्तानच्या तीन डिविजन्स (८० हजार सैनिक) पूर्व पाकिस्तानात सर्वदूर तैनात झाल्या होत्या आणि त्यांनी मुक्तीवाहिनीच्या हल्लेखोरांना भारतीय सीमेपर्यंत मागे ढकलले होते. या स्फोटांनंतर, लेफ्टनंट जनरल नियाजींना आपले सैनिक सीमेवरून परत बोलवावे लागले आणि मुक्ती वाहिनी सदस्यांवरचा सामरिक दबाव अचानक कमी होऊन, स्वातंत्र्य मिळविण्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. ‘ऑपरेशन जॅक पॉट’मुळे पाक लष्कराच्या दळणवळण प्रणालीला फार मोठा हादरा बसला. पूर्व बंगालच्या जनतेला पाक सैन्याच्या ‘ऑपरेशन सर्च लाईट’मधील नरसंहाराचा पुरेपूर बदला घ्यायचा आहे, हे या ऑपेरेशनमधून स्पष्ट झाले. जसजसे दिवस जात होते तसतसे पाक लष्करात अराजक निर्माण (पॅनिक) होऊ लागले. नागरी क्षेत्रावरील ताबा ढासळू लागला, मानसिक व सामरिक खच्चीकरण होऊ लागले.

१६ डिसेंबरला पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. या नौसेना दिनानिमित्ताने बांगला देशातील पहिल्या नौदलीय कमांडो ऑपरेशनमधे सहभागी झालेल्या त्या सर्व वीर बांगला देशी व भारतीय नौसैनिकांना मानाचा मुजरा.

(समाप्त)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The thrilling experience described by an eyewitness of operation jackpot which played a significant role in independence of bangladesh asj