विनायक डिगे
‘गोवर होणे हे बाळासाठी चांगले असते’ असा एक समज पूर्वीपासून जनमानसात आहे. प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने यात काही अंशी तथ्य असले तरी गोवरचा संबंध मुंबईतील सात बालमृत्यूंशी जोडला गेल्याच्या ताज्या बातम्या, हा रोग घातकही ठरू शकतो हेच सांगणाऱ्या आहेत. एखाद्या कुपोषित, अनारोग्यपूर्ण वातावरणात राहणाऱ्या किंवा लस न मिळालेल्या बाळाला गोवर झाल्यास त्याचा मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गोवरशी सामना करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, यावर तज्ज्ञांचे एकमत दिसून येते.
गोवर झाल्यानंतर बाळांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. ही प्रतिकारशक्ती बाळाला पुढील आयुष्यासाठी उपयोगी पडते. असे असले तरी ‘गोवर येऊन जाणे चांगले’ असे म्हणणे चुकीचेच आहे. आपल्या देशात सार्वजनिक लशीकरणाचा भाग म्हणून गोवरच्या लशीचा समावेश १९ नोव्हेंबर १९८५ रोजी करण्यात आला. परंतु गोवरच्या सार्वत्रिक लसीकरणाला ३७ वर्षे पूर्ण होत असतानाही गोवर जीवघेणा ठरू शकतो आहे. असे का, याविषयी काही तज्ज्ञांशी संवाद साधला तेव्हा ज्या मुलांना चांगला आहार मिळतो, उत्तम वातावरणात वाढतात, अशा मुलांना गोवर झाल्यानंतर त्यांना फारसा त्रास होत नाही हेदेखील बहुतेकांनी नमूद केले. अशा बाळांमध्ये नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होते. नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी ही प्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत बालकांच्या शरीरात टिकून राहाते.
मात्र जी मुले कुपोषित असतात किंवा ज्यांना पुरेसा पोषक आहार मिळत नाही, अशा बालकांना गोवर होणे हे धोकादायकच नसून, त्यांच्या जिवावर बेतणारे ठरू शकते. कारण गोवरच्या काळात अशा मुलांची प्रतिकारशक्ती आणखीच कमी होते. त्यांना भूक लागत नाही, त्यांचे वजन कमी होते, ताप, जुलाब, कानात पू होणे अशा समस्या गोवर झालेल्या बालकांमध्ये निर्माण होतात. तर काही मुलांच्या मेंदूपर्यंत लागण होऊन त्यांचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे जी मुले कुपोषित असतात किंवा ज्यांना पोषक आहार मिळत नाही, अशा बालकांसह सुदृढ बालकांसाठीसुद्धा लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, असे आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक आणि पुण्यातील ‘जन आरोग्य अभियान’चे संस्थापक डॉ. अनंत फडके यांनी सांगितले. गोवरचे ‘समूळ उच्चाटन’ करण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारी ही लस जरी पुरेशी नसली तरी, ती ९५ टक्के मुलांना संरक्षण देते, असा मुद्दाही डॉ. फडके यांनी मांडला.
तर, युरोपमध्ये २००० पासून गोवरचे संपूर्णत: उच्चाटन झाले आहे… बाहेरच्या देशातून कोणी बाधित रुग्ण त्या देशांमध्ये आल्यासच क्वचित काही बाळांना गोवरची लागण झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आपल्याकडेही पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घेण्यावर भर दिला पाहिजे, यावर बालरोगतज्ज्ञ आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी भर दिला. त्या म्हणाल्या : बाळांना गोवर होणे हे अजिबात चांगले नाही. गोवर झाल्यानंतर बाळासाठी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. एकदा गोवर झालेल्या व्यक्तीला पुन्हा ६० ते ७० वर्षांनतर पुन्हा गोवर आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते… पण गोवर झालेल्या रुग्णाला सात ते आठ वर्षांनंतर एसएसव्ही या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. मात्र हे प्रमाण लाखामध्ये एक रुग्ण असे आहे. यावर पूर्वी कोणतेही औषध नसल्याने एसएसव्ही आजारामुळे बालकांचा मृत्यू होत असे. मात्र आता त्यावर काही औषधे शोधण्यात आली असली तरी त्यांची परिणामकारकता कमी आहे. त्यामुळे गोवरला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.
आपल्याकडे गोवरसंदर्भात नागरिकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. पण ज्या मुलांना गोवरच्या लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशा मुलांना गोवरची लागण होण्याचे प्रमाण शून्य टक्के इतके आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असेही डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या.
युरोपमध्ये गोवरविरोधात करण्यात आलेल्या यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे गोवरचे समूळ उच्चाटन झाले आहे, हे खरे, परंतु तेथे पोषण आणि स्वच्छता यांची स्थितीही चांगली आहे, याकडे डॉ. अनंत फडके यांनी लक्ष वेधले. सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम ग्रामीण भागात अनेकदा सुसूत्रपणे चालवला जातो, कारण तेथे सार्वजनिक आरोग्याची यंत्रणा व तिच्यासाठी अपेक्षित असलेली उतरंड अपुऱ्या संख्येने का होईना पण काम करते आहे… याउलट शहरी गरीब वस्त्यांमध्ये लसीकरण कार्यक्रम तितक्या प्रभावीपणे राबवला जातोच असे नाही, हेही डॉ. फडके यांनी नमूद केले.
सध्या मुंबईमधील, गरीब वस्तीच्याच काही भागांमध्ये गोवर साथीचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. यातून मुंबई महापालिकेच्या ज्या आठ प्रभागांमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, त्या प्रभागांमध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली आहे. परंतु राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या लसीकरणांतर्गत देण्यात येणारी एमएमआर लस ही बाळांना ९९ टक्के संरक्षण देते. ज्या मुलांना गोवर होतो, त्यांना लस मिळालेली नसते किंवा त्यांना यापूर्वी गोवरची लागण झालेली नसते. गोवर झाल्याने नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढत असली तरी त्यामुळे नैसर्गिक संसर्ग होऊन मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक सुभाष साळुंके यांनी दिली.
गोवर लसीकरण हा वादाचा मुद्दा ठरू नये, उलट गोवर होण्याची शक्यता लशीमुळेच ९५ ते ९९ टक्के बालकांमध्ये कमी होते, याकडे अन्य बालरोगतज्ज्ञही लक्ष वेधतात. लसीकरण पुरेसे न होणे आणि अनारोग्यकारक परिस्थिती अथवा कुपोषण ही कारणे मात्र गोवरमुळे होणाऱ्या बालमृत्यूंमागे असू शकतात.
vinayak.dige@expressindia.com