“उत्क्रांतीच्या ‘सांस्कृतिक राजकारणा’ची गरज, (लोकसत्ता- फेब्रुवारी १२) या लेखात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना स्पर्श केला आहे. त्या प्रत्येक प्रश्नावर स्वतंत्रपणे चर्चा होणे गरजेचे आहे. त्यापैकी वरचेवर उपस्थित होणारा एक प्रश्न आहे, ईश्वर आहे की नाही. त्यावरील चर्चेत विवेकवादी नेहमी, विज्ञानाला आपल्याबरोबर ओढतात. आणि विज्ञानवादीही विनाकारण, स्वतःला खोड्यात अडकवून घेतात. वस्तुतः ईश्वर असण्या-नसण्याशी विज्ञानाचा काहीही संबंध नाही. विज्ञान या प्रश्नावर पूर्णपणे उदासीन आहे. याबाबतीत लाप्लासचा किस्सा बोलका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाप्लास हा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ नेपोलियनचा वैज्ञानिक सल्लागार होता. त्याने ग्रहगोलांच्या गतीवर एक पुस्तक लिहिले आणि नेपोलियनला भेट दिले. नेपोलियनची ईश्वरावर दृढ श्रद्धा होती. त्याने आपल्या धर्मग्रंथात वाचले होत की, ईश्वराने सहा दिवसांत हे विश्व निर्माण केले. पुस्तक वाचून झाल्यावर त्याने लाप्लासला विचारले, “तुझ्या पुस्तकात तू बाकी सगळं व्यवस्थित मांडलंस. पण ग्रहगोलांचे सिद्धांत मांडताना परमेश्वराचा साधा उल्लेखही तू केला नाहीस. हे कसं काय?” या प्रश्नाला जे लाप्लासने उत्तर दिले ते सर्व विज्ञानवाद्यांनी मनन करण्यासारखे आहे. लाप्लास म्हणाला, “महाराज, माझे विचार मांडताना त्या गृहीतकाची मला गरज भासली नाही.”

‘गृहीतक’ दोन्हीकडे आहेच…

कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळविण्याची सुरुवात गृहीतकानेच होते. गृहीतक म्हणजे असे विधान की, जे कधीही, विधान कारणाऱ्याने, सिद्ध केलेले नसते आणि ज्यात वापरलेल्या शब्दांची धड व्याख्याही दिलेली नसते. हे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्याच्या निष्काळजीपणातून घडत नसून तर्कशास्त्रीय मर्यादेमुळे घडते. गृहीतक टाळता येत नाही. ती मानवी ज्ञानाची मर्यादा आहे. मग संबंधित ज्ञान अध्यात्मिक असो अथवा वैज्ञानिक. ते ज्ञान सांगणारा विवेकवादी असो अथवा धर्मगुरू. त्या गृहीतकावरून मिळवलेले ज्ञान सुसंगत आहे ना एवढेच पाहणे माणसाच्या हातात आहे. ते सुसंगत वाटले तर व्यक्ती त्याला सत्य मानते. सत्य त्रिकालाबाधित नसते. ते वस्तुनिष्ठही नसते. ज्याला आपण व्यवहारात वस्तुनिष्ठ सत्य म्हणतो, ते बहुमताने स्वीकारलेले व्यक्तिनिष्ठ सत्य असते. आणि बहुमत बदलू शकते. यासाठी वैज्ञानिक गृहीतकातून येणारे निष्कर्ष आणि प्रत्यक्षात येणारे अनुभव यात विसंगती नाही ना, हे वरचेवर तपासून पाहात असतो. दोन्हीत विसंगती आढळली तर आपल्या गृहीतकात काही दोष नाहीत ना हे तो तपासतो, असतील तर आपल्या गृहीतकात जरूर त्या सुधारणा करतो आणि सुधारणा शक्य नसेल तर तो त्या गृहीतकाचा त्याग करतो. सश्रद्ध व्यक्तीला विसंगती सहसा आढळत नाहीत. तिला अपेक्षित फळ मिळाले तर तिचा आपल्या गृहीतकावरील विश्वास दृढ होतो. फळ मिळाले नाही तर आपली श्रद्धा कमी पडली असे तिला वाटते आणि ती अधिक दृढतेने आपल्या गृहितकावर विश्वास ठेवते. त्यामुळे तिचे गृहीतक सुसंगत निष्कर्ष देवो अथवा न देवो तिची त्यावरील श्रद्धा दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत जाते. वैज्ञानिकांचे गृहीतक हे ‘वर्किंग हायपोथेसिस’ असते. धार्मिक माणसाचे गृहीतक ही श्रद्धा असते. श्रद्धेला आव्हान देता येत नाही. त्यामुळे, वैज्ञानिक ज्ञानात सुधारणा होत जाते, भर पडते. अध्यात्मिक ज्ञान आहे तेथेच थांबते.

परंतु वैज्ञानिकांनाही आपल्या ज्ञानातील विसंगती लगेच कळतातच असे नाही. टॉलेमीचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत हजारो वर्षे ‘करेक्ट रिझल्ट’ देत होता. त्यातील चुका लक्षात येण्यास सतरावे शतक उजाडावे लागले. जेव्हा दुर्बिणीचा शोध लागला तेव्हाच गॅलिलिओला शुक्राच्या कला दिसल्या. शुक्राच्या कलांचे स्पष्टीकरण टॉलेमीच्या सिद्धांतात मिळत नव्हते. दुर्बिणीचा शोध लागला नसता तर टोलेमीला चुकीचे ठरवता आले नसते. कारण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारे, कुणीही ताडून पाहावे असे सत्य होते. न्यूटन ‘टाईम इज अबसोल्यूट’ असे म्हणत होता. हा सिद्धांत चुकीचा आहे हे कळायला तीनशे वर्षे जावी लागली.

गृहीतकात विसंगती आहे हे, अशा प्रकारे कळायला, कधी कधी शेकडो वर्षेही लोटतात, तर गोडेल हा गणितज्ज्ञ सिद्ध करतो की, गणिताच्या मर्यादित गृहीतकाच्या सिद्धांतात विसंगती नाही हे सिद्ध करता येत नाही. विसंगती दिसली की ती दूर करणे एवढेच माणसाच्या हातात आहे. विज्ञानातही असेच होते. त्यामुळे एखादे गृहीतक मानले आणि नंतर लक्षात आले की, याची काही आवश्यकता नाही किंवा त्याला जर त्यात सुधारणा करावीशी वाटली तर त्यांची ना नसते. ही एकवेळ होणारी घटना नसते. ही सतत चालणारी प्रक्रिया असते. याला वैचारिक डार्विनिझमही म्हणता येईल.

यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणजे वैज्ञानिक आपली गृहीतके कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण गृहीतके जितकी कमी तितकी त्यांच्यात विसंगती आढळण्याची शक्यता कमी. याच दृष्टीने ‘परमेश्वराचे गृहीतक आवश्यक नसेल तर मानायचे कशाला?’ हा लाप्लासचा सवाल महत्त्वाचा ठरतो.

परंतु, परमेश्वराचे गृहीतक न मानणे आणि ‘परमेश्वर नाही’ असे मानणे या तार्किकदृष्ट्या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत, इकडे विवेकवाद्यांचे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. ‘परमेश्वर नाही’ हे ‘परमेश्वर आहे’ अशा सारखेच एक गृहितक आहे. परमेश्वर आहे हे सिद्ध करता येत नाही, तसेच परमेश्वर नाही हेही सिद्ध करता येत नाही. पुराव्याचा अभाव हा अभावाचा पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे ‘परमेश्वर आहे’ या गृहीतकाप्रमाणे ‘परमेश्वर नाही’ हे गृहीतक मानण्याचेही वैज्ञानिकांना काहीच कारण नाही.

आणि परमेश्वर नाही हे सिद्ध करण्याची विज्ञानाला तशीही गरजही नाही. विज्ञानाचे कार्यक्षेत्र जसे वाढेल तसे देवाचे कार्यक्षेत्र कमी होत जाते. ४० हजार वर्षांपूर्वीपर्यंत सेपियनला त्याच्या विश्वात घडणाऱ्या घटनांच्या मागचा कार्यकारणभाव समजत नव्हता. आकलन-क्रांतीनंतर (Cognitive Revolution) कोणतीही घटना घडण्यासाठी काहीतरी कारण हवे असे त्याला वाटले आणि त्याने त्याला देव असे नाव दिले. देव त्याला पडणाऱ्या प्रश्नांची, त्याला पटतील अशी, उत्तरे देत होता. विज्ञान जेव्हा अधिक समर्पक उत्तरे देऊ लागले तेव्हा देवाचा प्रभाव कमी होत गेला. तेराव्या शतकात युरोपात प्लेग आला तेव्हा देवाने आपले रक्षण करावे यासाठी लोक चर्चमध्ये जमत. आज कोविड १९ची साथ आल्यावर जगभरच्या धर्मस्थळाना कुलपे ठोकली गेली. पूर्वी ‘स्मॉल पॉक्स’ देवीच्या कोपाने होत होता. आज ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळावा’ असे जनतेला आवाहन आणि देवीला आव्हान केले जाते. पूर्वी साप चावलेल्याला देवळात नेत. आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेतात. चार हजार वर्षांपूर्वी हमुरब्बीला कायदे अनु आणि बेल या देवांनी दिले होते. आपली राज्यघटना आपणच आपल्याला अर्पण केली आहे. विज्ञान जेव्हा अधिक प्रभावी पर्याय उपलब्ध करून देते तेव्हा देवाचा प्रभाव कमी होत जातो. आज विज्ञान हे काम शांतपणे करत आहे.

प्रसिद्ध दिवंगत खगोल शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग चांगल्या गृहीतकाची कसोटी सांगतो. तो म्हणतो, चांगले गृहीतक भूतकाळात घडलेल्या घटनांच्या कारणांचे स्पष्टीकरण देते आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांची सूचना देते. विज्ञानाची गृहीतके ही दोन्ही कामे करतात. देवाचे गृहीतक भूतकाळातल्या घटनांचे स्पष्टीकरण देते. पण भविष्यकाळात काय घडणार हे सांगू शकत नाही. एखादी घटना घडून गेली की श्रद्धावंत म्हणतो देवाची इच्छा! पण त्याच्या परिणामस्वरूप भविष्यकाळात काय घडणार आहे हे देवाच्या गृहीतकातून निष्पन्न होत नाही. यासाठी हॉकिंग देवाच्या गृहीतकाला चांगले मानत नाही. ‘हे देवाने केले’ असे म्हटले काय अथवा ‘याचे कारण ठाऊक नाही’ असे म्हटले काय, दोन्हीचे अर्थ आणि परिणाम सारखेच होतात. त्यामुळे, आज वैज्ञानिक देवाच्या गृहीतकाचा उल्लेख करत नाहीत. त्यापेक्षा विज्ञानाला आज याचे उत्तर ठाऊक नाही, उद्या कदाचित ठाऊक होईलही अशी वैज्ञानिकांची भूमिका असते. विज्ञानाने परमेश्वराला ‘बायपास’ केले आहे.

थोडक्यात, विवेकवाद्यांनी देव आहे की नाही यावर जरूर चर्चा करावी. विज्ञानाला त्या ‘सांस्कृतिक राजकारणा’त रस घेण्याची गरज नाही.

hvk_maths@yahoo.co.in