सुधींद्र कुलकर्णी

राहुल गांधी यांची धडाडीदार ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून सुरू होत असताना ‘विवेकानंद शिला’ स्मारकालाही राहुल यांनी भेट देणे, हा एक अर्थगर्भ योगायोग म्हणावा लागेल. साडेतीन हजार किलोमीटरचे अंतर पाच महिन्यांत पार करून काश्मीरपर्यंत जाणारी ही यात्रा आवश्यक आहे, कारण काँग्रेसला नवचैतन्य मिळणे देशाला उपकारकच ठरेल, असेच प्रस्तुत लेखकाचे मत आहे आणि राहुल हे तसे सहृदय नेते असूनही त्यांच्याबद्दल गैरसमजच फार असल्याच्या मताशीही प्रस्तुत लेखक सहमतच आहे. पण या विवेकानंद स्मारकाचा इतिहास राहुल गांधींना कुणा सहकाऱ्याने सांगितला आहे की नाही, याबद्दल मला शंका आहे. जर सांगितला असेल, तर ऐकून त्यांना कल्पना आली असेल की एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशप्रेमाचे कौतुक का करतात आणि संघ ‘फॅसिस्ट’ असल्याची टीका कुणी कितीही केली तरी लोक बधत का नाहीत. अर्थात या स्मारकाचा इतिहास ऐकून त्यांना हेही कळले असते की, राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि रा. स्व. संघाने अनेकदा एकमेकांना सहकार्य केलेले आहे.

स्वामी विवेकानंद (१८६३- १९०२) हे ब्रिटिशांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर चिरडल्यानंतर भारतीयांमध्ये राष्ट्रचेतना जागवणारे उत्तुंग आध्यात्मिक नेते होते. जवाहरलाल नेहरूंनी ‘भारताचा शोध’ या ग्रंथात स्वामी विवेकानंदांबद्दल जे लिहिले, तितकी चपखल आदरांजली क्वचितच कुणी वाहिली असेल. स्वामी विवेकानंद यांनी गतकाळात पाळेमुळे घट्ट रुजवून, भारताच्या वारशाचा अभिमान पुरेपूर जागविला खरा, परंतु जगण्यातल्या प्रश्नांबद्दलची त्यांची समज आधुनिकच होती आणि भारताला पुढे नेण्याची धगधगती, गतिमान ऊर्जा त्यांच्याकडे (विवेकानंदांकडे) होती, असे पं. नेहरूंनी म्हटले आहे.

शिकागोतील ‘वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स’मध्ये सहभागी होण्यासाठी १८९३ साली विवेकानंद अमेरिकेस गेले, त्याआधीच ते कन्याकुमारीला आले होते. २५ ते २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवसांत त्यांचा मुक्काम तीन समुद्रांच्या संगमावरील त्या खडकावर- त्या शिलेवर- होता, तेथेच त्यांनी चिंतन केले आणि तेथेच त्यांना त्यांचे जीवनध्येय गवसले- मानवजातीच्या एकात्मतेचा हिंदू धर्माने दिलेला संदेश सर्वदूर नेणे आणि गुलामीत जगणाऱ्या भारतीयांचे आध्यात्मिक आणि ऐहिक दैन्य दूर करणे. पश्चिमेतील ते धर्मसंमेलन गाजवून स्वामी विवेकानंद मायदेशी परतले तेव्हा १९९७ साली, मद्रासमधील सभेत त्यांनी ‘भारत जोडो’चा नारा दिला. ते म्हणाले : पुढली पन्नास वर्षे आपण सारे केवळ एकाच दैवताची आराधना करू – आपल्या महान भारतमातेची आराधना. बाकीचे सारे देव आपल्या मनांतून दूर जावोत, आपला पहिला देव म्हणजे या भारतातील आपले देशबांधव. हेवेदावे आणि भांडणे विसरून आपण एकमेकांशी नाते जोडू. आणि खरोखरच, ५० वर्षांनी भारत स्वतंत्र झाला.

ज्या स्मारकावर राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर रोजी प्रार्थना केली, ते उभारण्याची मूळ कल्पना रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक एकनाथजी रानडे यांची. स्मारक प्रत्यक्ष उभारण्यासाठी स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षात- १९६३ मध्ये – रानडे यांनीही एकापरीने ‘भारत जोडो’ अभियानच चालविले असे म्हणावे लागेल, कारण देशभरातून सामान्य माणसांनी एकेक रुपया या स्मारकासाठी द्यावा, असे त्यांंचे आवाहन होते. या स्मारकासाठी त्यांनी ३२३ खासदारांच्या स्वाक्षऱ्याही जमवल्या, त्यांपैकी बहुतेक खासदार हे काँग्रेसचेच होते. राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते २ सप्टेंबर १९७० रोजी या स्मारकाचे उद्घाटन झाले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ १५ लाख रुपयांची देणगीच दिली नाही तर त्या स्वत: स्मारक पाहण्यासाठी आल्या. एकनाथजी रानडे यांच्यासह फिरून त्यांनी स्मारक पाहिले. या स्मारकाच्या उभारणीची कथा स्फूर्तिदायी असल्याचे भाजप नेते आणि तत्कालीन रा. स्व. संघ स्वयंसेवक लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.

कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाचा हा इतिहास इथे त्रोटकपणे का होईना, मुद्दाम सांगावा लागला, कारण त्यातून राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांना दोन धडे मिळणार आहेत- अर्थात शिकायचे असतील तर. पहिला धडा असा की, रा. स्व. संघाच्या प्रचारक आणि स्वयंसेवकांनी भारतीय प्रबोधन आणि ऐक्य यांचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवून त्याची बूज राखण्याचे केलेले काम हे काँग्रेसजनांपेक्षा किती तरी अधिकच आहे. दुसरा धडा असा की, ‘समावेशक हिंदू अध्यात्मवाद व संस्कृती हाच भारताच्या ऐक्याचा मूलाधार आहे’ हे आज बहुतेक काँग्रेसजन अमान्य तरी करतात किंवा मान्य करण्यास खळखळ करतात.

या दुसऱ्या मुद्द्याविषयी थोडे स्पष्टीकरण आवश्यक आहे. ‘सर्व धर्मांचा समान आदर राखणारा सेक्युलॅरिझम हा भारताच्या ऐक्याची हमी देतो’ असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे असते, ते योग्यच आहे. मात्र स्वामी विवेकानंद किंवा महात्मा गांधी यांनी हिंदू धर्माचा आधार घेण्याचे कारणच, भारतीय सेक्युलॅरिझमचा आत्मा त्यांना या धर्मात दिसला हे आहे, याकडे काँग्रेसजन काणाडोळा करतात. वास्तविक, हे सत्य एकदा तरी काँग्रेसने रीतसर मान्य केलेले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या १६ जानेवारी १९९९ रोजी पार पडलेल्या बैठकीत, ‘हिंदू धर्म हा भारतातील सेक्युलॅरिझमची हमी देण्यास अत्यंत कार्यक्षम आहे’ असा ठराव एकमताने संमत झालेला होता. तरीदेखील काँग्रेसने ना कधी हा दृष्टिकोन पुन्हा व्यक्त केला, ना तो वाजवीपणे व्यक्त करणाऱ्या हिंदूंना कधी पाठिंबा दिला. मुस्लिमांच्या एका गटाकडून धर्मनिरपेक्षताविरोधी, वर्चस्ववादी आणि फुटीर असे जे इस्लामचे रूप पुढे आणले जाते, त्यालाही काँग्रेसने कधी विरोध केल्याचे दिसले नाही. याच धर्मांधमुळे १९४७ मध्ये ‘भारत तोडो’ घडले, तेव्हाही नाही. त्यामुळेच, संघाची ‘हिंदू राष्ट्रा’ची कल्पना जरी बहुसंख्याकवादी आणि सदोष असली, तरी प्रचंड संख्येने हिंदू त्या कल्पनेकडे झुकले आणि हे सारे लोक काँग्रेसच्या विविधतेत एकतेच्या मूळ कल्पनेपुढे प्रश्न निर्माण करू लागले. काँग्रेसच्या या जुनाट रोगामुळेच रा. स्व. संघाचा पाठिंबा असलेल्या भाजपला प्रचंड यश मिळू लागले.

तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वैचारिक हल्ले करण्यात राहुल गांधी यांनी आपली शक्ती वाया दवडू नये. त्यापेक्षा त्यांनी हे समजून घ्यावे की, हिंदू धर्म हा रा. स्व. संघापेक्षाही मोठा आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ अथवा हिमंत बिस्व शर्मांच्याही नंतर तो टिकून राहणार आहे. जर काँग्रेस आणि अन्य भाजपेतर पक्षांनी राष्ट्रवाद आणि विकासाचे धर्मभेदरहित कथानक मांडले, तर ते हिंदूंची हृदये व मने जिंकतीलही. पण त्यासाठी त्यांना आधी मुस्लिमांना सांगावे लागेल की त्या धर्मीयांनी सुधारणावादी, समावेशक आणि पुरोगामी व्हावे. मग, आज सहिष्णुतावादापुढे आणि सामाजिक समरसतेला जी आव्हाने आहेत त्यांवर मात करता येईल.

खरे तर आज भारतापुढे खरे आव्हान आहे ते भारताच्या ऐक्याला नव्हे तर या देशाच्या लोकशाही ढाचापुढे ते आव्हान आहे. भारतीय राज्यघटनेतील मूल्यांपुढे तसेच घटनात्मक संस्थांपुढे हे आव्हान आहे कारण आपण आज एकचालकानुवर्ती, अनियंत्रित राजवटीकडे झुकतो आहोत. अशा वेळी ‘समानता’ हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेपासूनच आपल्या देशाचा सांविधानिक मूलाधार ठरलेले मूल्य आज धोक्यात आहे. भारतीय समाज आज कधी नव्हे इतक्या विषमतेच्या गर्तेत आहे. या साऱ्यांमुळे अगदी रा. स्व. संघ आणि भाजपच्याही काही कप्प्यांमध्ये अस्वस्थता आहे. अखेर, १९७७ पर्यंतची आणीबाणीतील अनियंत्रित राजवट संपवण्यात वाटा असलेले अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे संघ परिवाराचाच भाग होते.

त्यामुळे काँग्रेसने प्रांजळ आत्मपरीक्षण करून जुन्या चुकांची जाहीर कबुली द्यावी आणि ताठरपणा, उर्मटपणा यांना तिलांजली द्यावी. मग त्या पक्षाला अनेकपरींच्या विचारधारांशी आणि धुरीणांशी विधायक संवाद साधता येईल. अगदी रा. स्व. संघाशीसुद्धा काँग्रेसला संवाद साधता येईल- स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी साधला होता तसा. भारत साऱ्यांचाच आहे आणि काेणीही या देशाला ‘काँग्रेस-मुक्त’, ‘रा. स्व. संघ-मुक्त’ किंवा ‘मुस्लीम-मुक्त’ करू शकणार नाही. मात्र लोकशाही, विकास, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय बंधुता यांमधील फटी बुजवणाऱ्या खरोखरच्या ‘भारत जोडो’साठी सर्वांनीच आपापल्या त्रुटी सुधारून एकत्र काम करण्याची गरज आहे.

लेखक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सहायक होते.

Story img Loader