-उज्ज्वला देशपांडे
राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये वर्णनात्मक लिखाणाऐवजी, बहुपर्यायी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न ही पद्धत असावी अशी मागणी केली जात आहे. वर्णनात्मक लिखाण विद्यार्थ्यांना वेळ आणि ऊर्जा खर्च करण्यास भाग पाडते, तसेच ते मूल्यमापनात जास्त वेळ घेते, असे काही विद्यार्थी आणि अभ्यासकांचे मत आहे. पण असे वाटणे का चुकीचे आहे हा मुद्दा समजून घेण्यासाठी एका काल्पनिक परिस्थितीकडे पाहू.
समजा की सरकारी धोरणाचा मसुदा तयार करताना धोरण मांडणीची सखोल गरज असताना, नव्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांना “विकास धोरणाचा उद्देश काय?” हा प्रश्न विचारला गेला. त्यांना उत्तरादाखल
१- गरिबी निर्मूलन,
२- रोजगार निर्मिती,
३- शिक्षणासाठी सहाय्य,
४- वरील सर्व
असे पर्याय दिले. वरिष्ठांकडून असे का केले ही विचारणा झाल्यावर, संबंधित महाशय म्हणतात “वर्णनात्मक लिखाण येत नाही, एमसीक्यू फॉर्मेटच जमतो! आता या काल्पनिक परिस्थितीतील अतिशयोक्ती सोडून दिली तरी ‘राज्य स्तरावर स्पर्धा परीक्षेत वर्णनात्मक लिखाण नको’ ही मागणी अवास्तव आहे हे नक्की. वर्णनात्मक लिहीता येत नाही, कुणी कधी शिकवलेच नाही, इ. समस्या असतील तर त्यावर १००% उपाय आहेत. परंतु आम्हाला येतच नाही, तर तुम्ही तशी परीक्षाच ठेऊ नका ही मागणी अशैक्षणिक आणि वरील काल्पनिक उदाहरण लक्षात घेतल्यास, अव्यवहार्यही आहे.
मी असे का म्हणते आहे?
स्पर्धा परीक्षा हा आजच्या युगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, विचारांची खोली आणि विश्लेषण क्षमता तपासतो. या परीक्षांमध्ये वर्णनात्मक (Descriptive) उत्तरांचे महत्त्व मोठे आहे, कारण ही उत्तरे केवळ गुण देण्यापुरती मर्यादित नसतात, तर त्या उत्तरांमधून परीक्षार्थीची तर्कशक्ती, सखोल विचारसरणी आणि सुसंगत मांडणी तपासता येते.
वर्णनात्मक उत्तरांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती आणि गाभा मांडता येतो. एखाद्या प्रश्नावर विस्ताराने आणि व्यवस्थित उत्तर देताना विद्यार्थ्याची विश्लेषणात्मक क्षमता, मतप्रदर्शनाची पद्धत आणि आकलनशक्ती कळून येते. हे केवळ पाठांतर न करता, विषयाचा सखोल अभ्यास करूनच शक्य होत असते. उत्तरांची मांडणी सुसंगत, सुस्पष्ट आणि मुद्देसूद असल्यास लेखनशैली सुधारण्यासही मदत होते, जी विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत उपयुक्त ठरते.
वर्णनात्मक उत्तरे ही परीक्षार्थीच्या वैचारिक स्पष्टतेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते. प्रश्नावर दिलेले उत्तर केवळ पुस्तकातील माहितीवर आधारित न राहता, त्या विषयाविषयी परीक्षार्थीच्या दृष्टीकोनातून सखोल विचार मांडणे आवश्यक असते. वर्णनात्मक लिखाण कौशल्यात वाचन महत्त्वपूर्ण आहे. विषयाची सखोल समज, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि मांडणीची शैली तयार होण्यासाठी वाचनाची सवय अत्यावश्यक ठरते. पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि संशोधन लेख वाचल्याने इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांची व्यापक माहिती मिळते. ही माहिती परीक्षांमध्ये विविध प्रश्नांची समर्पक आणि तर्कसंगत उत्तरे देण्यास मदत करते.
वाचनामुळे केवळ पाठ्यपुस्तकांतील माहिती मिळते असे नाही, तर विविध संदर्भ आणि दृष्टिकोनांमधून एखाद्या विषयाचे अनेक पैलू समजतात. उदाहरणार्थ, एखाद्या सामाजिक समस्येवर उत्तर देताना इतिहास, वर्तमान घटनाक्रम आणि जागतिक संदर्भ जोडल्यास उत्तर अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरते. नियमित वाचनामुळे व्यक्तीची विश्लेषण क्षमता आणि तर्कशक्ती वाढते. विविध दृष्टिकोन, लेखकांची मते आणि सामाजिक मुद्द्यांची सखोल चिकित्सा वाचनाद्वारे समजते. या ज्ञानाचा वापर करून परीक्षार्थी प्रश्नांची मांडणी प्रभावीपणे करू शकतो. वाचनाची सवय असलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न वाचून त्याचा गाभा पटकन समजतो आणि अपेक्षित उत्तराची दिशा ठरवता येते. यामुळे वेळेचे योग्य नियोजन होते आणि परीक्षेत अधिक गुण मिळवणे शक्य होते.
स्पर्धा परीक्षांमध्ये एमसीक्यू पद्धतीची मागणी आणि कोचिंग क्लासेस व मार्गदर्शक प्रकाशन व्यावसायिकांचे हेतू काय आहेत?
परीक्षार्थींच्या यशासाठी विशिष्ट तंत्र, ट्रिक्स आणि शॉर्टकट् शिकवणाऱ्या कोचिंग क्लासेसची मागणी वाढली आहे. अशा कोचिंग क्लासेसकडे वर्णनात्मक लिखाण कसे करायचे याचे मार्गदर्शन करणारे तज्ञ असतीलच याची काय खात्री? तसे असल्यास ‘वर्णनात्मक पध्दत चुकीची हे पसरविले जाते’ हे एका परिचयातील शिक्षकांचे मत!
मार्गदर्शक प्रकाशन गृहांचे हेतू?
एमसीक्यू पद्धतीच्या परीक्षांसाठी प्रकाशन गृह विविध मार्गदर्शक पुस्तके आणि प्रश्नसंच प्रकाशित करतात. परीक्षेच्या स्वरूपात किरकोळ बदल झाले तरी प्रकाशन गृह नवीन आवृत्त्या प्रकाशित करतात. परीक्षार्थींनी या व्यावसायिक हेतूंना ओळखून स्वतःच्या अभ्यासपद्धतीत समतोल साधावा आणि स्वयं अध्ययनावर भर द्यावा.
सरकारी सेवांमध्ये वर्णनात्मक लेखन का उपयुक्त आहे?
सरकारी सेवांमध्ये काम करताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध प्रकारच्या अहवाल लेखन, नोंदी ठेवणे, धोरणात्मक दस्तऐवज तयार करणे आणि जनतेला समजावून सांगण्याची जबाबदारी असते. या सर्व कार्यांसाठी वर्णनात्मक लेखन कौशल्ये (Descriptive Writing Skills) अत्यंत महत्त्वाची ठरतात. हे कौशल्य केवळ परीक्षांसाठीच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजासाठीही आवश्यक आहे.
सखोल अभ्यास करूनच, चांगला समाज घडविण्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल वर्णनात्मक लेखन येणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सामान्य नागरिक म्हणून आम्हांलाही असेच अधिकारी हवे आहेत. ज्यांना खूप अभ्यास करायचा नसेल, फक्त लाल दिव्याच्या गाडीचेच आकर्षण वाटेल त्यांना शॉर्टकट वापरून पुढे जायला काही लोकप्रिय क्षेत्रात’ मागणी असतेच.
Ujjwala.de@gmail.com