योगेन्द्र यादव
परवापासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३५०० किलोमीटरची ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू झाली, तोवर अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली होती. माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून विचारले जाणारे प्रश्न नेहमीच तिखट आणि टोकदार असतात. या ‘भारत जोडो’ यात्रेची घोषणा काँग्रेसने केली होती, पण आता देशभरच्या जनआंदोलनांमध्ये काम करणारे अनेक जण तसेच बुद्धिजीवी यांनी या यात्रेला पाठिंबा दिला आहे, तिचे स्वागत केले आहे. काही जनसंघटनांनी तर केवळ पाठिंबाच न देता या ‘भारत जोडो’ला समांतर अशी ‘नफरत छोडो, भारत जोडो’ यात्रासुद्धा काढण्याची घोषणा केली. निरनिराळ्या दिशांनी, वेगवेगळ्या सुरांमध्ये आणि भिन्न वैचारिक भूमिकांमधून केल्या जाणाऱ्या या आवाहनांमध्ये ‘भारत जोडो’ हा मात्र समान धागा आहे, हा काही निव्वळ योगायोग नव्हे. पण प्रश्नकर्त्यांनी याचे अनेक अर्थ काढले आहेत.
हे प्रश्नकर्ते नेहमी टीकाच करत असतात असेही नाही. उदाहरणार्थ, ‘हिंदू-मुस्लीम एकतेसाठीच ना ही तुमची यात्रा? आहे, फार गरज आहे अशा यात्रेची’ – असे एक ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते म्हणाले. त्यावर त्यांना म्हणालो, ‘नाही- म्हणजे तुम्ही म्हणता ते होईलच, पण आपला भर त्यावर नाही!’ हिंदू आणि मुसलमान यांनी एकमेकांना समजून घेण्याची आणि आक्रस्ताळी राडेबाजी टाळण्याची गरज तर या यात्रेशिवायसुद्धा आज लोकांना पटतेच आहे… कदाचित फाळणीच्या काळानंतर इतके कलुषित वातावरण हल्लीच पुन्हा दिसू लागले आहे. देशातील या दोन मोठ्या समुदायांना एकमेकांच्या विरुद्ध भडकावणे हा देशद्रोहच मानला पाहिजे आणि या समुदायांना जोडणे हे देशभक्ती-धर्माचे आद्यकर्तव्यच आहे.
पण तरीसुद्धा, हिंदू-मुस्लीम ऐक्य हे काही आजचे पहिले आव्हान नाही. त्याही आधीचे आव्हान आहे ते, हिंदूंना हिंदू धर्माच्या आत्म्याशी आणि मुसलमानांना खऱ्या इस्लामशी जोडण्याचे. स्वामी विवेकानंद म्हणत की, आपला धर्म दुसऱ्यांच्या धर्मांपेक्षा वरचढ असल्याची कल्पना हिंदू धर्मात नाही, उलट हा धर्म जगभरातील सर्वच धर्मांमधील सत्याचा स्वीकार करतो, यामुळे तो श्रेष्ठ धर्म ठरतो. इस्लामच्या कुराण-शरीफचे पावित्र्य काफिरांना मारा, ‘सर तन से जुदा’ करा, यांसारख्या संदेशांमध्ये नसून माणसाचे मन जोडण्यामध्ये आहे. कोणत्याही धर्माचे अनुयायी हे त्या-त्या धर्माच्या ठेकेदारांच्या तसेच धर्माच्या नावाखाली द्वेष पसरविणाऱ्यांच्या क्लृप्त्यांमुळे कमीअधिक प्रमाणात कलुषित झालेले आढळतातच. पण त्यांना आपापल्या धर्माचे मर्म कळले, तर ते असे वागणार नाहीत. धर्माला त्याच्या मर्माशी जोडणे, हे ‘भारत जोडो’चे पहिले तत्त्व.
जातीपातींचे, प्रादेशिक तसेच भाषांचे भेदभाव मिटवण्यासाठीदेखील हेच तत्त्व लागू होते. ‘भारत जोडो’चा अर्थ ‘प्रादेशिक आणि भाषिक दरी बुजवू या’ असा जरूर होईल, पण त्यासाठी आपल्या भाषेला किंवा आपल्या संस्कृतीला सोडून देण्याची अजिबात गरज नाही. विशेषत: उत्तर भारतातले लोक हिंदीसाठी बाकीच्यांनी आपापल्या भाषा बाजूला ठेवाव्यात असा शहाजोग सल्ला देताहेत, अशा काळात तर हे आपापल्या भाषांचे, प्रादेशिक वैशिष्ट्यांचे वेगळेपण टिकवण्याची गरज खासच पटते आणि ‘या देशाचे तुम्ही मालक आणि आम्ही भाडेकरू असे कशाला समजता?’ असाच प्रश्न करावासा वाटतो, हे खरेच. कारण भाषाभेद वा प्रादेशिक भेद ही अखेर अस्मितांची बाब असते आणि या अस्मिता किती प्रमाणात राखायच्या हे प्रत्येकानेच ठरवावे लागते. त्या संदर्भात हे नमूद करावेसे वाटते की, कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवात तमिळ भाषेला वंदन करून झाली, हा एक सुंदर योग होता.
पण जातिभेदाची दरी बुजवण्याचे आव्हान याहून मोठे आहे. जातींकडे काणाडोळा करून भागणार नाही. स्वत:च्या नावातील जातिसूचक शब्द काढण्यापासून अनेकांना सुरुवात करावी लागेल. दुसरे असे की, ‘आम्ही काही जातपात मानत नाही’ असे म्हणण्याचा अधिकार आपल्या देशात शहरी, उच्च मध्यमवर्गीय लोकांनाच दिसतो. अर्थात, जातिसूचक नावे सोडूनही काही फरक पडेल असे नव्हे, कारण जातीच्या आधारे होणारा अटकाव आणि जातीआधारित वंचना हे संपण्याची गरज अधिक आहे. त्यासाठी संपवावा लागेल तो जातींचा समाजदत्त विशेषाधिकार. त्या विशेषाधिकाराचे सारेच अवशेष नष्ट केल्याखेरीज जातिव्यवस्थेतील उच्च-नीच भाव जाणार नाही. भारत जोडण्यासाठी जातपात तोडण्याचे तत्त्व अंगीकारावे लागेल.
इथवरच्या चर्चेमुळे असे वाटेल की ‘भारत जोडो’ यात्रेचा उद्देश केवळ धर्म, जातपात, भाषा, प्रदेश यांच्यातील दऱ्या मिटवण्यासाठी म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिकच आहे. तो तसा आहेच, पण अखेर समाज आणि संस्कृतीचा विकास आर्थिक पायावरच होत असतो. देशातील अंतिम व्यक्तीपर्यंत जोवर आर्थिक न्याय पोहोचत नाही, जोवर त्या अखेरच्या व्यक्तीचे कल्याण होत नाही तोवर ‘भारत जोडो’चे स्वप्न अपूर्णच राहील. हे स्वप्न जर साकार करायचे तर त्यासाठी आधी जागे होऊन आजच्या वास्तवाकडे नीट पाहावे लागेल. गेल्या दोन वर्षांत अंबानींची संपत्ती तिपटीने आणि अदानींची १४ पटीने वाढत असताना, आपल्या देशातील ९७ टक्के व्यक्तींच्या उत्पन्नात घट झालेली आहे. आजच्या सत्ताधीशांनी ‘हम दो हमारे दो’ला कोणता नवा अर्थ दिला, हे राजकीय-आर्थिक धोरणांकडे पाहणाऱ्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यातच धनाढ्य वर्गाने जणू ‘भारत छोडो’ मोहीम आरंभली असल्याचे, गेल्या तीन वर्षांत देश सोडून गेलेल्यांची (नागरिकत्वही सोडलेल्यांची) आकडेवारी सांगते. याहून मोठी आकडेवारी, देशाबाहेर गुंतवणूक करणाऱ्या धनिक भारतीयांची आहे. सामान्य भारतीय मात्र अभूतपूर्व बेरोजगारी आणि वाढती महागाई यांच्या काचामुळे हतबल होत आहेत. देशवासीयांना हतबल करणाऱ्या आर्थिक धोरणांची सद्दी संपवायची असेल, तर लुटारूंऐवजी कामगारांना केंद्रस्थानी ठेवणारे धोरणकर्ते हवे. श्रमप्रतिष्ठा ओळखून तिला धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवणे हे ‘भारत जोडो’चे तात्त्विक अधिष्ठान असायला हवेच.
इथे राजकारणही आहेच. ते कोणते राजकारण? ते एखाद्याच पक्षापुरते नाही, उलट राजकीय पक्ष आणि या पक्षांपासून आजवर दूरच राहिलेल्या जनसंघटना – जनआंदोलने यांना जोडणारे राजकारण आहे. ते सार्थ ठरण्यासाठी ‘प्रजासत्ताका’च्या व्याख्येकडे पुन्हा पाहावे लागेल. आजपर्यंत ‘प्रजे’पेक्षा ‘सत्ते’चाच दबदबा राहिला आणि या सत्ताकारणात सारेच पक्ष सत्ताकेंद्री झाले. हे बदलण्याची सुरुवात आज सत्तेने जे रूप घेतले आहे, ते बदलण्यापासूनच केली पाहिजे. आज राजकीय विरोधकांना आपल्या गोटात आणण्यासाठी केवळ पोलिसांचा नव्हे तर ईडी/ सीबीआयचा आणि आयकर खात्याचाही उपयोग होतो. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही काही महत्त्वच उरलेले नाही, तर सामान्य माणसाला विचारतो कोण? आणि कसे उरणार महत्त्व मुख्यमंत्र्यांना तरी? कोणी कुठल्या राज्यात कुठे बसायचे हे दिल्ली दरबारात ठरते. मूलभूत हक्कांसाठी न्यायालयाचे दरवाजे कितीदा ठोठावावे लागतील याला काही सुमारच उरलेला नाही. त्यामुळे आपले प्रजासत्ताक, आपली लोकशाही यांची लोककेंद्री पुनर्स्थापना करणे हा ‘भारत जोडो’मागचा महत्त्वाचा राजकीय तत्त्वाधार आहे.
‘ते तोडतात, आम्ही भारत जोडतो’ अशी घोषणा देत भारत जोडो पदयात्रा निघालेली आहे. तिच्यामागे विचार आहेच, तो तुमच्या विचाराने अधिक सशक्त होणार आहे!
लेखक ‘स्वराज अभियान’चे संस्थापक आहेत.
yyopinion@gmail.com