विजय देवधर
कृष्णा नदीवरील अलमट्टीची धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारतर्फे निविदा प्रक्रिया तीन आठवड्यांपूर्वी सुरू झाली. त्यावर, ‘पूरपातळीचा अभ्यास केल्याशिवाय धरणाच्या उंचीत कोणताही बदल करू नये’ अशी विनंती महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनाअखेर दिली. त्याहीआधी ऑक्टोबर २०२२ मध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार असल्याची कुणकुण लागल्यामुळेच सांगली परिसरात ‘बंद’देखील पाळला गेला होता. अर्थात हा राजकारणाचा विषय नसून तांत्रिकही आहे. उंची वाढविण्याने अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे धरणाची उंची वाढवणे हाच एकमेव उपाय आहे काय, हा विचार प्राधान्याने व्हावयास हवा. उंचीऐवजी खोली वाढवणे, हाच जलाशयांबाबत योग्य उपाय ठरू शकतो.
पाण्यातून वाहून येणारा गाळ धरणाच्या भिंतीजवळ साठतो, कारण प्रवाह तिथे थांबतो. या गाळामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता कमी होते. अशाच कारणांमुळे काही धरणांची क्षमता ४० टक्क्यांनी घटली आहे. पण यावर उपाय म्हणून धरणाची उंची वाढविणे म्हणजे आपल्याच रयतेला जलसमाधी देणे! अलमट्टी आणि सरदार सरोवर यांची उंची यापूर्वी वाढविल्याने जनतेला कोणत्या प्रसंगास तोंड द्यावे लागले आहे हे सर्वज्ञातच आहे. यंदा पावसाळ्यात – जुलै आणि पुन्हा ऑगस्टमध्ये – सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या भागांत पुराने थैमान घातले, यामागचे कारण अलमट्टीचे वाढीव पाणी हेच आहे.
यावर ‘उपाय’ म्हणून धरणाची उंची वाढविल्याने साठलेल्या पाण्याची पातळी उंचीइतकीच सर्वदूर राहाते, त्यामुळे धरणाच्या पाणीफुगवट्याजवळील वाड्या, वस्त्या आणि उपजाऊ जमीन पाण्याखाली जाते. याउलट धरणाची खोली वाढविल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल, त्याचबरोबर पाण्याची पातळी पहिल्याइतकीच राहिल्यामुळे, नव्याने विस्थापन होणार नाही. जाणकारांकडून या सूचनेची व्यवहार्यता तपासता येईल. खोली वाढविण्यास इतर राज्यांची हरकत वा आडकाठी असण्याचे खरे तर कोणतेच कारण नाही कारण त्याची झळ त्यांना बसणार नाही. आता आपल्याकडे बांधकाम तंत्र खूपच विकसित झाले आहे. नवनवीन साधने सहज उपलब्ध आहेत. या साधनांच्या मदतीने यापुढे धरणाची उंची वाढविण्याचे प्रस्ताव न देता धरणाची खोली कशी वाढविता येईल यावरच लक्ष केंद्रित करावे. वाहते पाणी हे धरणाच्या भिंतीजवळ अडविले जात असल्याने पाण्याबरोबर वाहून आलेला अधिकाधिक गाळ हा भिंतीजवळ जमा होतो. धरणात साठणारा हा गाळ नियमितपणे काढणे हा एक प्रभावी उपाय आहे.
उंची वाढविण्याचा प्रधान हेतू धरणातील पाणी साठविण्याच्या क्षमतेत वाढ करणे हाच आहे, तर तो हेतू धरणाची खोली वाढविल्याने साध्य होतो. सातत्याने धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविल्यास धरणातील खोलीत समानता आणता येईल आणि धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. पाण्याच्या वाढत्या मागणीस हे गाळाने भरलेले जलाशय पुरेसे पडणार नाहीत हे वास्तव आहे. यासाठी योग्य कार्यपद्धती म्हणजे दरवर्षी जानेवारीपासून मेअखेरीपर्यंत जलाशयातील गाळ काढणे. गाळ काढण्याचे अनेक फायदे आहेत. गाळाचा उपयोग जमिनीचा पोत सुधारण्यास होईल, गाळ उकरल्याने जलपर्णीची मुळे निघाल्याने त्याची पुन्हा वाढ होणार नाही. पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ न होता साठवण क्षमता वाढेल.
गाळ काढण्याचा आणखी एक लाभ आहे. नद्या वा तलावांत वाढलेली जलपर्णी (वॉटर हायसिंथ) ही बहुतेकदा वरवरच काढली जाते. मुळासकट काढली जात नाही, त्यामुळे ती परत वाढते. जर प्रवाहातील वा जलाशयातील गाळ काढला तर जलपर्णी मुळासकट निघेल. त्यासाठी गाळ काढणे हा एकच खात्रीशीर उपाय आहे .
महाराष्ट्रात २०१८ पर्यंत ओढे व नदीपात्रांच्या रुंदीकरणाची मोहीमच हाती घेण्यात आली होती. अनेक ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांना शासकीय पुढाकाराने सुरुवात झाली होती. यासाठी सटाळे ग्रामस्थांनी राबवलेल्या उपक्रमाचे गावोगावी अनुकरण झाल्यास पाणीटंचाईवर कायमची मात करता येईल. नांदगाव तालुक्यातील सटाळे येथील १९७२ च्या भीषण दुष्काळात बांधलेला पाझर तलाव गेली ४२ वर्षे दुर्लक्षित होता. तो गाळाने पूर्णपणे भरला होता. अंकाई डोंगराच्या उतारावरून येणारे आणि आडकाठी नसल्याने वाहून जाणारे पाणी अडवून वाड्यावस्त्यांना दुष्काळाच्या तावडीतून मुक्त करण्याचा गावाने एकमुखी निर्णय घेतला, त्याची महसूल खात्याला कल्पना दिली. काम मोठे असल्याने महसूल खात्याने यंत्रसामग्रीची जोड मिळवून दिली. या तलावातील एक लाख ३५ हजार ब्रास म्हणजेच तीन लाख २६ हजार ७०० घनमीटर क्षेत्रावरील गाळ उपसण्यात आला आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने जवळपास ४६५ एकर जमीन सुपीक झाली. पावसाळ्यात पाण्याचा थेंब अन् थेंब अडविला गेला. गाळ काढल्याने तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली तीही पाण्याची पातळी न वाढता. पुण्याजवळील खडकवासला धरणातील गाळ काढण्यास एका पर्यावरणनिष्ठ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळांनी पुढाकार घेतला असून दरवर्षी हे काम होत राहावे, अशी अपेक्षा आहे. मोठ्या धरणांतील गाळामुळे पाणी साठवण क्षमता जवळपास दहा टक्क्यांनी कमी होते, असे मोजमाप झालेले आहे.
हे सारेच प्रयोग अलमट्टीसारख्या मोठ्या धरणाच्या तुलनेत कमी प्रमाणावरचे असले, तरी गाळ काढून जलाशयांची खोली वाढवणे हाच योग्य उपाय असल्याचे त्यातून सिद्ध झालेले आहे. केंद्र सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेऊन यापुढे धरणाची उंची वाढविण्यास बंदी घालावी, ही मागणी लावून धरण्यासाठी आता महाराष्ट्रानेच पुढाकार घेतला पाहिजे.
deodharvg43@gmail.com