– संतोष देशपांडे
अमली पदार्थ, त्यांचे सेवन, खरेदी विक्रीची साखळी, या घटकांच्या सेवनाचे दुष्परिणाम, त्याचा तरुणाईवर होणारा परिणाम या सगळ्या मुद्द्यांवर सध्या आपल्याकडे प्रचंड चर्चा सुरू आहे. खरेतर ती नेहमीच होत असते, पण एखादी रेव्ह पार्टी पकडली गेली, फर्गसन रोडवरच्या हॉटेलसारखा प्रसंग उद्भवला की आणखी तीव्रतेने होते. या अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांवर होणारा परिणाम, त्यापोटी वाटणारी काळजी यातून ही चर्चा होत असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच अमली पदार्थ चाकलेट गोळ्या विकतात तसे दुकान मांडून विकले जात असतील असे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवाल का?
मी आधी ठेवला नसता, पण प्रागमध्ये मी अशा दुकानाला भेट दिली. अमली पदार्थांबाबतची आपल्याकडची चर्चा आणि असे बाजारात हे पदार्थ थेट विकणारे दुकान यांचा मला खरेतर काही ताळमेळच घालता येत नव्हता. तो सगळा अनुभव सविस्तरच सांगायला हवा…
हेही वाचा – महाराष्ट्रातल्या स्विगी, झोमॅटो, ऊबर कामगारांनी कर्नाटककडे पाहावं…
प्राग (झेक प्रजासत्ताक) हे अतिशय सुंदर असे शहर. तेथील देखण्या वास्तू, राजवाडे, चर्चेस, म्युझियम, लोक…सारे काही अतिशय लोभस. एक आगळी प्रसन्नता येथील वातारणात कायमच दरवळत असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही अत्यंत शिस्तीत आणि सुरळीत. लोकही शिस्त आणि स्वच्छता यांना प्राधान्य देणारे. जगभरातील पर्यटक येथे येतात आणि हरखून जातात. टोलेजंग देखण्या वास्तूंनी डोळे दिपले जातात तसे येथील पब कल्चर तरुणाईला आकर्षित करते. असे असले तरी कुठेही कशाचा अतिरेक पाहायला मिळत नाही. इथल्या सिटी सेंटरमधील गल्ल्याही प्रशस्त आणि तितक्याच गजबलेल्या. येथील प्रसिद्ध चार्ल्स ब्रीज ओलांडून पॅलेसकडे जातेवेळी काही वेगळ्या दुकानांनी माझे लक्ष वेधले.
काही सुपरमार्केटस्, टोप्या, भेटवस्तूंची दुकानं आजूबाजूला होती. तिथे अनेक पर्यटक भेटही देत होते. मात्र, या वेगळ्या दुकानांनी लक्ष वेधले कारण ती दुकानं होती चक्क अंमली पदार्थांची. कॅनबिस, वीडस् ( ज्याला आपण गांजा, भांग, चरस, हशीश वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या नावांनी ओळखतो) अशा पदार्थांची, त्यापासून बनलेल्या उत्पादनांची तिथे विक्री होते. होय… या देशात अशा पदार्थांचे सेवन किंवा विक्रीला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. म्हटलं आत जाऊन तर पाहू काय असतं ते…आत प्रवेश करताच एकदम चकाचक असं ते जणू चॉकलेटचं दुकानच भासलं. एक मुलगी ते दुकान चालवत होती. तिच्या काऊंटरवर अनेक बरण्या होत्या. त्यांवर त्या-त्या पदार्थाचे नाव लिहिले होते. मग, तिला त्याबाबत माहिती विचारली. ती सांगू लागली. तेव्हा तिला विचारले, की हे सांगतानाचा व्हिडीओ घेऊ का… हो, घ्या की असे सांगून ती उत्साहाने माहिती देऊ लागली.
आपण चॉकलेट, किंवा चहा-कॉफीची माहिती देतो, इतक्या सहजतेने ती सांगत होती. तिथले पदार्थ, त्यांचे उगमस्थान, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची किंमत, कोणता पदार्थ स्मोक केल्यानंतर किती वेळाने आणि काय परिणाम जाणवू लागतो…आदी सारी इत्थंभूत माहिती तिने दिली. ती सारी व्हिडीओमध्ये कैद केली. मी तिच्याशी बोलत असतानाच एका पाश्चात्य व्यक्तीने त्याची खरेदी सुरू केली होती, ती संधी साधत मी तिथून काढता पाय घेऊ शकलो, अन्यथा तिच्यासाठी मी देखील ग्राहक असल्याने व्हिडीओच्या बदल्यात फेव्हर म्हणून काही खरेदी करेल, अशी तिची अपेक्षा होती.
अर्थात, जगात अनेक ठिकाणी हे सौम्य अमली पदार्थ – रिक्रिएशनल ड्रग्ज- कायदेशीरपणे उपलब्ध असतात. अमेरिकेच्या ५० पैकी २४ राज्यांत अशी कायदेशीर मुभा आहे. जर्मनीतही याच वर्षी एक एप्रिलपासून सौम्य अमली पदार्थ कमी प्रमाणात (२५ ग्रॅम) बाळगण्याची परवानगी देणारा कायदा लागू झाला आहे. युरोपातील बहुतेक देशांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात अंमली पदार्थ बाळगणे हा गुन्हा नाही, पण अंमली पदार्थांच्या जाहीरपणे सेवनावर मात्र निर्बंध आहेत.
युरोपातील काही देश मात्र या बाबतीत अगदी खुले… प्राग, ॲमस्टरडॅम अशा अनेक शहरांत असे अनेक वीडस् किंवा कॅनबिस शॉप्स आहेत. अनेक सुपरमार्केटमधूनही त्यांची सर्रास विक्री होते, हे देखील चित्र मला पाहायला मिळाले. अगदी चॉकलेट-गोळ्यांपासून मद्यापर्यंत त्यांचे मिश्रण केलेले पदार्थ तिथे मिळतात. मात्र, त्यास सर्वसामान्य ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद अगदीच तुरळक जाणवला. अर्थात, ॲमस्टरडॅम येथे अनेक स्मोकी बार्सही आहेत. मात्र, तिथेही अगदी शिस्तीत व्यवहार सुरू असलेले दिसले.
हेही वाचा – अर्थसंकल्प नव्हे गाजराची पुंगी!
इथे मला, एक मूलभूत फरक जाणवला तो म्हणजे, भारतासारख्या देशात जिथे अशा अंमली पदार्थांच्या सेवन अथवा विक्रीवर (अपवाद वगळता) बंदी आहे, किंवा त्यास सामाजिक मान्यता नाही, तिथे ड्रग कल्चर मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. मोठ्या शहरांतील तरुणाई अलगद त्याच्या विळख्यात अकडते आहे. पुण्यातील उघडकीस आलेले प्रकार आपल्याला तेच सांगतात. व दुसरीकडे, जिथे त्यास मान्यता आहे, तेथील लोकांमध्ये त्याच्या आहारी गेल्याचे किंवा त्यातून फार मोठे कांड घडल्याचे प्रकर्षाने जाणवत नाही, दिसत नाही. त्यास अपवाद असू शकतो. मात्र, जे कोणी घटक या व्यवसायाशी संबंधित आहेत, ते त्याकडे शुद्ध व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहतात. व्यवहार पारदर्शी ठेवतात आणि त्याचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी किंवा कोणतेही अप्रिय प्रकार करताना दिसत नाही. इतकेच काय या व्यवसायाची मोठी जाहिरातबाजीही पाहायला मिळत नाही. याचे कारण काय असावे, हा प्रश्न पडतो आणि त्याचे आपल्याला सुचणारे उत्तर अनेक मूलभूत प्रश्नांनाही जन्म घालतो.
याच प्राग शहरात इंडियन रेस्टाॅरंटही अनेक आहेत. त्यातही एक शुद्ध शाकाहारी होते, बिस व्हेजिटेरियन धाबा. तेथील वैशिष्ट्य म्हणजे तेथे बुफे पद्धतीने मांडलेल्या पदार्थांतून तुम्ही थाळी भरायची. काउंटरवर त्या थाळीचे वजन होते आणि त्या वजनानुसार त्या थाळीचे पैसे भरायचे. यामागचे आर्थिक गणित काय असावे या विचारापेक्षा त्या रुचकर भोजनाचा आस्वाद अधिक आनंददायी होता.