डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक
३५० व्या शिवराज्याभिषेकदिनी प्रकाशित होणाऱ्या ‘शिवराज्याभिषेक’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा संकलित-संपादित भाग; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल टिळकांच्या ‘धर्मनिरपेक्ष’ विचारांचा ऊहापोह करणारा आणि टिळकांनी हे विचार कोणत्या संदर्भात मांडले असतील याचाही वेध घेणारा..
४ एप्रिल, १९२० रोजी पुणे येथील खुन्या मुरलीधराच्या मंदिरात ल. ब. भोपटकर यांच्या भाषणावर केलेले अध्यक्षीय भाषण हे टिळकांचे महाराजांच्यावरील अखेरचे भाषण असावे, त्यामुळे या भाषणातील त्यांचे प्रतिपादन शिवरायांसंबंधीच्या त्यांच्या विचारांच्या निष्कर्षांवरून अखेरचा शब्द मानायला हरकत नसावी. या भाषणात टिळक म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी एकटय़ा ब्राह्मणांकरिता किंवा मराठय़ांकरिता राज्य स्थापन केले नाही. महाराष्ट्रातील रहिवासी ते मराठे या दृष्टीने महाराजांनी येथे राज्य स्थापन केले. महाराष्ट्रात राहणारा, मग तो तेली असो, तांबोळी असो, जैन असो, लिंगायत असो किंबहुना, तो मुसलमान असला तरी तो मराठा आहे असे समजून त्यांच्या हिताकरिता रात्रंदिवस झटलात, तर स्वराज्य प्राप्त करून घेण्याचे उत्सवाचे अंतिम साध्य होईल, अशी मला खात्री वाटत आहे.’
याच प्रकारचे विधान टिळकांनी १९०५ सालच्या अमरावतीतील उत्सवात केले होते, ‘छत्रपती शिवाजी मोठा राजा होता. तो क्षत्रिय होता किंवा त्याने अफझलखानाचा वध केला म्हणून त्याचे उत्सव आम्ही करतो असे नाही. त्या वेळची आमच्या लोकांची स्थिती ओळखून तत्कालीन संकटातून आम्हास सोडवून आम्हास प्रगतीच्या मार्गास त्याने लावले म्हणून त्याचा आम्ही उत्सव करतो. छत्रपती शिवाजीच्या ठिकाणी एखादा मुसलमान जरी असता तरी त्याचा आम्ही गौरव केला असता.’ त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ‘उद्देश अफझलखानास मारण्याचा नव्हता, तर तत्कालीन प्रगतीच्या मार्गाच्या आड येणाऱ्या विघ्नाचे निवारण त्यांना करावयाचे होते. केवळ मुसलमान म्हणून त्याला मारण्याचा जर हेतू असता, तर छत्रपती शिवाजीने खानाच्या बायकोला दागिने वगैरे देऊन विजापुरास परत पाठवले नसते.’
हेही वाचा >>>पवार फिरले… निकालही फिरला!
१९०६ च्या कलकत्ता येथील भाषणात टिळक म्हणाले, ‘शिवाजी मुसलमान धर्माचा शत्रू नव्हता. त्यांच्या धर्मभावना न दुखवता तो मुगलांशी लढला. हा धर्माधर्मामधील लढा नव्हता. जुलूम आणि स्वातंत्र्य यांच्यातला हा झगडा होता. शिवाजीच्या चारित्र्याचे हे रहस्य आकलन केल्यास आजच्या स्थितीत मुसलमानांनादेखील या उत्सवात भाग घेण्यास दिक्कत वाटणार नाही’ आणि उत्कर्ष बिंदू म्हणजे ‘न जाणो एखादा शिवाजीसारखाच लोकाग्रणी इतर प्रांतांत जन्माला येईल. कदाचित, तो धर्माने मुसलमानही असेल.’
२ मे, १९०८ या दिवशी अकोला शहरात दिलेल्या व्याख्यानात ते म्हणतात, ‘रामचंद्रापेक्षा किंवा कृष्णापेक्षा शिवाजीची योग्यता अधिक किंवा तितकीच आहे काय? असा जर प्रश्न कराल तर मी त्याचे उत्तर ‘होय’ असेच देणार. रामचंद्राचे वर्णन प्राचीन असल्याने त्याच्या वर्णनाची योग्यता शिवाजीच्या वर्णनाइतकी असली तरी मनावर संस्कार करण्याच्या कामी त्याची योग्यता कमी आहे.’
लोकमान्य टिळक शिवछत्रपतींच्या उत्सवात किती गुंतले होते, हे स्पष्ट करणारा एक प्रसंग आहे. १९०६ च्या उत्सवासाठी रायगडला जाण्याकरिता ते बोटीने मुंबईहून बाणकोटला व तेथून महाडला पोहोचले. तेथे त्यांना त्यांचे खासगी कारभारी बाबा विद्वांस यांनी पाठवलेली तार मिळाली, ‘चिरंजीव तापाने अत्यवस्थ आहे. ताबडतोब परतावे.’ टिळक परतले तर नाहीच, त्यांना उलट तारेने उत्तर दिले, ‘उत्सव संपल्यानंतर त्वरेने परतू. तोपर्यंत पुण्याची खबर पाठवू नये.’ यातील गर्भीत अर्थ उलगडून सांगायची गरज नाही.
हेही वाचा >>>संविधान बदलाच्या चर्चेचा भाजपला फटका
शिवकालीन समाजाने .. शिवरायांच्या कार्याकडे धर्मरक्षणाचे कार्य म्हणून पाहण्यात अस्वाभाविक असे काही नव्हते. आधुनिक काळात विशेषत: सेक्युलॅरिझम या विचारप्रणालीच्या उदयानंतर धर्माला मानवी जीवनाच्या इतर अंगांपासून बाजूला ठेवून, त्याच्याकडे पाहणे व वागणे शक्य झाले आहे. शिवकाळात ते शक्य नव्हते. धर्म हा घटक जीवनाच्या इतर घटकांशी नुसताच संलग्न नव्हता, तर त्याच्यावर प्रभाव पाडणारा व प्रसंगी त्यांचे निमंत्रण करणाराही होता आणि ही बाब इस्लामच्या संदर्भात अधिक स्पष्टपणे सिद्ध होत होती, त्यामुळे प्रश्न फक्त धर्मातर किंवा बाटवाबाटवी यापुरता मर्यादित नव्हता. .. .. टिळक उपरोक्त शिवकालीन समजुतींपेक्षा काही एक वेगळी मांडणी करताना दिसतात. .. .. त्यासाठी मधल्या काळात घडलेल्या घटनांचा विचार करायला हवा. शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचा जो पाया घातला, त्यावर उत्तरकालीन मराठय़ांनी औरंगजेबासारख्या जागतिक कीर्तीच्या साम्राज्याच्या सम्राटावर यशस्वी मात करून आपले साम्राज्य उभे करण्याचा घाट घातला. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास इंग्रजांनी हिरावून घेतला. इंग्रजी राज्यामुळे पूर्वीचे राज्यकर्ते मुगल आणि आत्ताचे व कदाचित भविष्यातील राज्यकर्ते मराठे, दोघांनाही इंग्रजी सत्तेचे गुलाम व्हावे लागले.
अशा परिस्थितीत टिळकांना शिवछत्रपतींचा कित्ता गिरवावा असे वाटले असल्यास नवल नाही. शिवछत्रपतींचे राज्य त्यांच्या धर्माचा विचार केला असता हिंदूंचे राज्य असले, तरी ज्या अर्थाने बहुतेक मुस्लीम धर्मीय सत्ताधाऱ्यांचे इस्लामी राज्य इस्लामी होते, त्यात त्यांच्या धर्मीयांना विशेष वागणूक दिली जात असायची व इतर धर्मीयांना काफीर समजून त्यांच्याबरोबर र्दुव्यवहार केला जात असायचा, त्या अर्थाने हिंदूंचे नव्हते. ज्याप्रमाणे इस्लामी राजवटीतील हिंदूंवर धर्मातराची टांगती तलवार सदैव असायची, त्याप्रमाणे शिवरायांच्या या हिंदू राजवटीत तशी टांगती तलवार मुसलमानांवर नव्हती.
हेही वाचा >>>विकासाकडे न पाहणारा अनाकलनीय जनादेश
त्याही पुढच्या इतिहासाचा विचार केला असता असेच म्हणावे लागते की, अठराव्या शतकात मराठय़ांनी दिल्लीच्या मुगल बादशहाला आपल्या हातात ठेवून भारताचा कारभार करण्याची नवी नीती अवलंबिली, तरी त्या पातशाहीचा अपहार करण्याची अभिलाषा बाळगली नव्हती, तसेच आपल्या हाती असलेल्या सत्तेचा गैरफायदा घेत मुसलमानांवर सूडबुद्धीने अत्याचार करण्याचा विचारही कधी कुणी केला नव्हता. उलट असे करू पाहणाऱ्या औरंगजेबासारख्या बलाढय़ सत्ताधीशाला खडे बोल सुनावण्यास स्वत: शिवराय मागे-पुढे पाहत नसत. या संदर्भात त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राची पुरेशी चर्चा झाली आहे. त्यात त्यांनी अकबरासारख्या सहिष्णू बादशहाची प्रशंसा केली आहे. हा खरा धर्म नसल्याचेही त्यांनी ठणकावले आहे. मिर्झा राजा जयसिंगाला पाठवलेल्या पत्रातही महाराजांनी औरंगजेबाऐवजी दारा शुकोह बादशहा झाला असता, तर मग परिस्थिती चांगली राहिली असती, असे म्हटले आहे. साहजिक धार्मिकदृष्टय़ा टिळकांना शिवराज्य हे आदर्श राज्य वाटत होते. याशिवाय भविष्यातील राज्यव्यवस्था ही राजेशाही नसून, लोकशाही असल्याचे त्यांना ठाऊक होते व ते स्वत:ही त्याच राज्यपद्धतीचे पुरस्कर्ते होते. या व्यवस्थेत धर्म ही बाब ज्याची त्याची वैयक्तिक असेल. ना हिंदू मुसलमानांना सतावतील, ना मुसलमान हिंदूंना त्रास देतील. अशी परिस्थिती वास्तवात आणायची असेल, तर व्यवस्था लोकशाही असली तरी काही व्यक्ती अनुकरणीय आदर्श अशा पुढे ठेवाव्या लागतात.. . अशा परिस्थितीत टिळकांनी शिवछत्रपतींना प्राधान्य देणे स्वाभाविक म्हणावे लागते.
शिवराज्याभिषेकावरील ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळकांचे विवेचन थोडय़ा विस्ताराने करायचे कारण म्हणजे टिळक हे या अभिषेकाच्या वार्षिकोत्सवाचे प्रवर्तक होते. त्यांचा त्या मागचा उद्देश समजून घेतल्याशिवाय पुढे जाणे उचित ठरले नसते. टिळकांच्या शिवोत्सवाला स्वातंत्र्यलढय़ाचा संदर्भ होता, तर जोतिराव फुले यांच्या मांडणीला सामाजिक समतेच्या चळवळीचा. टिळकांच्या हयातीतच जोतिरावांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा घेऊन ब्राह्मणेतर चळवळीने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रवेश केला. या चळवळीला करवीर छत्रपती शाहू महाराजांनी बळ दिले व महाराज असतानाच या चळवळीला राजकीय परिमाण प्राप्त झाले. ब्राह्मणेतर पक्ष निवडणुकांचे राजकारण करू लागला. दरम्यान, महाराष्ट्राचे हे दोन्ही मातब्बर एकापाठोपाठ एक कालवश झाले, त्यामुळे त्यांना मानणारे अनुयायी पोरकेच झाले असे म्हणावे लागेल, त्यामुळेच १९२०-३० हा कालखंड गोंधळाचा, दुहीचा गेला असे म्हणावे लागते. १९३० नंतर शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर अनुयायांना काही एक दिशा सापडल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करून स्वातंत्र्यलढय़ात सामील झाले. शिवाय तेथे गांधी-नेहरू-पटेल यांच्यासारखे मातब्बर असल्याने महाराष्ट्रात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रुजू लागली. टिळकांच्या अनुयायांचा एक मोठा गट आधीपासूनच काँग्रेसमध्ये दाखल झाला होता. (पण) योग्य नेतृत्व नसल्यामुळे त्यांची पीछेहाट होत राहिली. शेवटी १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची रत्नागिरीतील स्थानबद्धता संपुष्टात आल्याने या मंडळींनी त्यांना आपले नेतृत्व देऊ केले, त्यांच्या काँग्रेसविरोधाला हिंदू महासभेचा प्लॅटफॉर्म मिळाला. त्यांनी हे राजकारण करताना अर्थातच आपण शिवाजी महाराजांचीच हिंदूुत्ववादी भूमिका घेतली असल्याचा पवित्रा घेतला होता. शिवराय आणि महाराष्ट्र यांच्यामधील अनुबंधावर ते नेहमीच भर देत राहिले. इकडे काँग्रेसकडे गांधी-नेहरूंसारखे समकालीन प्रभावी नेते असल्यामुळे त्यांना शिवरायांचे नाव किंवा प्रतिमा वापरायची फारशी गरज राहिली नाही.
हा उतारा अनिल पवार यांनी संकलीत केलेल्या ‘कृष्णा पब्लिकेशन्स’च्या ‘शिवराज्याभिषेक’ या पुस्तकातील आहे.