अंकुश काकडे, पुणे
दादा, आज २२ जुलै रोजी आपण ६४ व्या वर्षात पदार्पण करीत आहात. त्यानिमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!
दादा, तसा माझ्या ६४ वर्षाच्या राजकारणात आपल्याशी जवळपास ३२ वर्षे संबंध आला. साहेबांना दरवर्षी दिवाळीला भेटायला आम्ही जात असू. आम्हाला गोविंदबागेपूर्वी काटेवाडीत साहेब बरीच वर्षे भेटत असत. तेथेच आपणाशी साहेबांचे पुतणे म्हणून माझी ओळख झाली. बारामतीमध्ये दिवाळीनिमित्त येणाऱ्या लोकांची व्यवस्था पाहाणे, अगदी सतरंज्या व्यवस्थित टाकल्यात का, स्वच्छतागृह स्वच्छ आहे कां, फराळाची व्यवस्था अशा बारीक सारीक गोष्टींवर आपली नजर असे. त्या वेळी आपण राजकारणात याल असे आम्हास कधी वाटले नाही, कारण पहिल्यांदा आपण व्यवसायात व शेतीमध्ये लक्ष देत होता.
माझ्या मते खऱ्या अर्थाने आपली राजकीय सुरुवात झाली ती १९९१ मध्ये. जेव्हा आपण जिल्हा बँकेवर संचालक मंडळात निवडून येऊन अध्यक्षही झाला. याच वेळी मी देखील जिल्हा बँकेत संचालक मंडळात निवडून आलो. तेव्हापासूनचा आपला खरा संपर्क. (तसे १९८१ मध्ये पुणे-मुंबई बेरोजगार सायकल स्वारीच्या वेळी पनवेल येथील गेस्ट हाऊसमध्ये बारामतीतील कार्यकर्त्यांनी आपली व माझी भेट घडवून आणली होती. अगदी किडकिडीत देहयष्टी असलेल्या आपणांस त्यावेळी मी पाहिले आहे.)दादा, १९९१ मध्ये खासदार, आमदार, राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री असा सर्व प्रवास मी जवळून पाहिला आहे. त्यावर कांही भाष्य करणे योग्य नाही, उभ्या महाराष्ट्राला ते माहीत आहे. हा सर्व प्रवास २ जुलै २०२३ पूर्वीचा, पण २ जुलै २०२३ ला दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरू झालेला प्रवास हा खुद्द आपणांस राजकारणात आणलेल्या थोरल्या साहेबांना देखील धक्का देणारा असा आहे. आपण घेतलेल्या इतक्या टोकाच्या राजकीय निर्णयाचा संशयदेखील त्यांना आलेला नव्हता. थोडीफार कल्पना असेल पण असे इतके धक्कादायक पाऊल दादा उचलतील हे त्यांना देखील स्वप्नात वाटले नसेल, पण ते घडले.
हा राजकीय धक्का येथे थांबेल व पुन्हा काही सुरळीत होईल असे माझ्यासारख्या, आपणांस मानणाऱ्या कार्यकर्त्याला वाटले होते, पण २ जुलैपेक्षाही मोठा भूकंप आपण ५ जुलै रोजी घडवूत आणलात. अर्थात एका पक्षाला यातही मोठा आनंद झाल्याचे जाणवत होते. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ५ जुलैनंतर बसलेल्या धक्क्यातून अजून सावरता आले नाही, अशीच परिस्थिती सर्वच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आहे. दादा, आपण आपले अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, त्याला राजाश्रय तर मिळाला, दिल्लीश्वरांचे अभय देखील मिळाले. हे योग्य की अयोग्य हे काळ ठरवेल! पण झाले हे योग्य झाले नाही असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते.
साहेबांचे पूर्ण पाठबळ पण त्याच बरोबर आपली स्वतःची कार्यक्षमता, निर्णयक्षमता या जोरावर आपण पहिल्या पाच-दहा वर्षातच फार मोठी झेप घेत गेलात, त्याला व्यापक असे समर्थन, कार्यकर्त्यांचा पाठिंबा देखील मिळाला होता. आपल्यावर जी जी जबाबदारी आली ती, ती आपण समर्थपणाने पूर्ण करीत होता, या सर्वांमुळे साहजिकच आपली महत्त्वाकांक्षा वाढत गेली, ती स्वाभाविकही होती आणि त्यामुळे तुमच्या विरोधकांची असे मी म्हणणार नाही पण काही वरिष्ठांची तुमच्याबद्दलची सलदेखील वाढत गेली, अर्थात ती उघडपणे बोलून दाखविण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती, पण ते दबा धरून होते हे निश्चित.राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्यापेक्षाही अनेकजण ज्येष्ठ, दीर्घकाळ मंत्री म्हणून काम केलेले होते, पण आपण मात्र आपल्या कर्तृत्वामुळे त्यांचेपेक्षा उजवे ठरलात. आज राज्याच्या प्रशासनात वचक, असलेले काही मंत्री होऊन गेले त्यात तुमचा क्रमांक फार वरचा होता, आहे हे निश्चित. २००४ साली आपल्याला आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली अशी तुमची सलही सतत तुम्हाला बोचत राहिली, ती स्वाभाविक आहे.
२०१४ साल उजाडले आणि या देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. भारतीय राजकारणात एक नवीन मोदी पर्व सुरू झाले. भ्रष्टाचार नष्ट करू, परदेशातील काळा पैस परत भारतात आणू, ‘न खाऊंगा न खाने दूँगा।’ अशा अनेक घोषणा करून देशवासियांना आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले. सत्तेवाचून जगू न शकणारी नेतेमंडळी लगेच त्यांच्या दावणीला जाऊ लागली.
पण २०१७-१८ मध्ये मात्र भारतातील नागरिकांचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली. मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागली, २०१९ मध्ये पुन्हा मोदी सत्तेवर येणार नाहीत असे कांहीचे चित्र दिसू लागले. पण प्रत्यक्षात नेमके उलट झाले. २०१४ पेक्षाही प्रचंड मोठा विजय मोदींना मिळाला, एकेकाळी ३५० पेक्षा जास्त जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष ४४ जागांवर आला. अनपेक्षितपणे एवढी मोठी सत्ता हाती आल्यानंतर आपल्याला आता पर्याय असूच नये म्हणून समोरचे सर्व नेस्तनाबूत करण्याची भूमिका मोदींनी घेतली आणि स्वतःच्या पक्षात, विरोधी पक्षात आपणाला कुणी जाब विचारू शकत नाही या भावनेतून सर्व सरकारी यंत्रणा, न्यायव्यवस्था हातात घेऊन एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू झाली. जो कोणी माझ्याबरोबर नाही त्यांनी शांत बसावे अशा वृत्तीतून संपूर्ण देशातील विरोधकांना नामोहरम करण्यास सुरुवात झाली. अनेक वर्षे सत्तेत राहून स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ, मालमत्ता जमवली त्यांच्या मागे सरकारी यंत्रणांचा ससेमिरा सुरू झाला. अनेक जणांनी मोदींपुढे, भाजपपुढे शरणागती पत्करून स्वतःची कातडी वाचवली. सुडाचे हे दुष्टचक्र दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही, राज्याराज्यांत ते पसरवले गेले. २०१४-२०१९ काळात महाराष्ट्रात महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांना सरकारी यंत्रणांमार्फत त्रास देणे सुरू झाले. अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या. अनेक जण त्यात अडकले गेले, अशा वेळी त्यांचे पुढे दोनच पर्याय दाखवले गेले: एकतर आमच्याकडे या, नाहीतर तुरुंगात जा. प्रत्यक्षात काहींना कोठडीची हवा देखील दाखविली. चौकशीच्या फेऱ्यात आपण अडकू नये असे ज्यांना वाटत होते त्यांनी भाजपची वाट धरली. जे तिकडे गेले त्यांना अभय मिळाले, चौकशी थांबली, काहींना तर सत्तादेखील मिळाली. काहींना रात्री शांत झोपदेखील येऊ लागली.
इकडे महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत हाता-तोंडाशी आलेली सत्ता शरद पवारांच्या मुत्सद्दीपणा निघून गेल्याचे शल्य मनाला इतके लागले की सुडाचे राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सरकारी चौकशी, ‘ईडी’ची चौकशी यांद्वारे त्रास देण्याचे काम सुरू झाले. तीन मोठ्या नेत्यांना कोठडीची वाट दाखवली, त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आजही काही जणांना तोच मार्ग दाखवला जात आहे. अनेकांपुढे दोनच पर्याय एकतर चौकशी, आरोपपत्रही दाखल न होता महिनोनमहिने कोठडी, नाहीतर शरणागती. यातून अनेक मोठ मोठे नेते देखील सुटू नयेत याची काळजी पद्धतशीरपणे घेतली गेली. काही नेत्यांवर २०१४ मध्ये बेछूट आरोप केले, त्यांची सरकारी चौकशी देखील लावली, पण त्यात कांही निष्पन्न झाले नाही, उलट तोंडघशी पडण्याची वेळ आली. पुढे सहकारातील चौकशा सुरू केल्या त्यात काही तथ्य आहे असे दिसू लागले. त्यामुळे पक्षातील काही जणांनी अजितदादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, तुम्हीच काहीतरी करा असा आग्रह आरंभला, त्यात ज्यांना पवार साहेबांनी मोठे केले, भरभरून दिले, साहेबांचे हनुमान अशी ज्यांची ओळख होती ती मंडळी आघाडीवर होती. काहींच्या मालमत्ता जप्त देखील केल्या. तुरुंगाची वारी केव्हा येईल ही भीती त्यांना असणारच. या सर्व मंडळींनी आपणाला पुढे करीत, जे भाजपला हवे होते ते अनासायासपणे करून दिले.
दादा, आपण पक्ष उभा केला आहे, पक्षासाठी अपार कष्ट घेतले आहेत. पण तुमच्या अष्टप्रधान मंडळींनी काय केले हे जरा आपण पाहा. वेळप्रसंगी आपण उपमुख्यमंत्री होऊ नये अशी कारस्थाने देखील केली आहेत. हे आपण कसे विसरता ? साहेबांच्या काही चुका झाल्या असतील, निर्णय चुकीचे झाले असतील, पण हे सर्व त्यांनी कशासाठी, कुणासाठी केले, याचा आपण शांतपणे विचार करणार की नाही. आपल्यानंतर १०-१५ वर्षांनी सुप्रियाचा अपघाताने राजकारणात प्रवेश झाला. आपल्याप्रमाणेच बारामतीकरांची तिला साथ मिळाली. खासदार म्हणून संसदेत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या बरोबरीने पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. आपल्यात कधी मतभेद झाले तर तुमचा शब्द अंतिम असा मनाचा निश्चय केला. ताई दिल्लीत – दादा राज्यात हे सर्वश्रुत समीकरण महाराष्ट्रात रूढ झाले. कार्यकर्त्यांनीही ते मनापासून स्वीकारले.
पण राष्ट्रवादी काँग्रेस संपविल्याशिवाय राज्यात पर्याय नाही, हे भाजपच्या लक्षात आले. एकीकडे शिवसेना सोडून गेली, शिंदेंचे काही खरे नाही- अशावेळी तुमच्यावर त्यांनी गळ घातली, तुम्हीदेखील या काही मंडळींच्या आग्रहामुळे त्याला बळी पडला, असे मला वाटते. आपण हे साहेबांना सांगून पाहिले, पण साहेबांची संमती नाही असे स्पष्ट झाल्यावर आपण वेगळा मार्ग स्वीकारला. ज्यामुळे १९९९ पासून एक परिवार म्हणून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, सर्वांचीच द्विधा मनस्थिती झाली. काहींनी तुमचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी साहेबांची पाठराखण केली. साहेबांशी आपले अनेकवेळा मतभेद झाले असतील, पण आपण आपले स्पष्ट मत त्यांच्यासमोर मांडता, वेळप्रसंगी आपल्या मनासारखा निर्णय झाला नाही, तरी साहेबांचा शब्द अंतिम अशी आपली भूमिका मी अनेकवेळा अनुभवली आहे. पण हा निर्णय आपण साहेबांच्या मनाविरुद्ध घेतला. याचे राहून राहून आश्चर्य वाटते, दुःख वाटते!
दादा, साहेब आज ८२ वर्षाचे झालेत. त्यांची वाटचाल शंभरीकडे सुरू आहे, ती पूर्ण व्हावी अशी तुमचीच काय उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. अशावेळी त्यांना त्रास होईल असे कुणीच काही करू नये, असे मला वाटते. २०२४ ची निवडणूक साहेबांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असेल. भारतातील लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. मतदार कधी कुणाला घरी बसवतील, हे सांगता येत नाही. आज देशात मोदींच्या विरोधात सुप्त लाट आहे, हे दिसणार नाही, पण ती मतपेटीतच उतरेल अशी परिस्थती आहे. ती प्रत्यक्षात उतरली तर त्यांना पर्यायी चेहरा हा फक्त साहेबांचाच असेल, हे निर्विवाद सत्य आहे.
आणि या अशा महत्त्वपूर्ण प्रसंगी तुम्ही साहेबांबरोबर नसाल, तर कसे होईल? हेदेखील ध्यानात घ्यावे लागेल. उद्या तुम्हालादेखील आम्हाला महाराष्ट्राच्या खुर्चीत बसल्याचे पाहावयाचे आहे. त्यासाठी साहेब तुमच्याबरोबर असावेत असे वाटत नाही का? अशा एक ना अनेक बाबी आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होत असलेली ससेहोलपट, नव्या उमेदीच्या तरुणांचे राजकीय भवितव्य हे या प्रसंगामुळे अंधकारमय झाले आहे. संधिसाधूंचे मात्र यात सर्व काही साधले जात आहे, हे कटू सत्य नाकारता येत नाही. ते आज तुमच्याबरोबर आहेत, २०२४ मध्ये कुठे असतील हे कुणीच सांगू शकणार नाही.
दादा, या सगळ्या गोष्टींचा आपण शांतपणे विचार करावा. राजकारणात मी तुमच्यापेक्षा फार छोटा कार्यकर्ता आहे. पण वयाने तुमच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा, एवढ्याच नात्याने हे सर्व आपणांस लिहिले आहे. शेवटी निर्णय आपण घ्यायचा आहे, तो सकारात्मक असेल अशी अपेक्षा करतो.
कळावे आपला, अंकुश काकडे