विबुधप्रिया दास
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बंगलोर’ आणि ‘बेंगळूरु’ या दोन्ही काळांमधल्या लालबाग वनस्पती उद्यानाची ही चित्रमय कथा आहे..
बेंगळूरुतली अलीकडची बातमी पाणीटंचाईची आहे. महानगर होऊ पाहणाऱ्या या शहरात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यालयांमधले ‘वॉटर कूलर’ आता बंद आहेत. टँकरचा सुळसुळाट शहरभर दिसतो आहे. कुणी मोटार धुतली म्हणून मोठा दंड झाल्याच्या बातम्या येत आहेत. दुसरीकडे, उन्हाळी सुट्टय़ांचे वेध सर्वाना लागले आहेत. सुट्टीत दिल्लीकर जसे सिमल्याला जातात किंवा कोलकातावासी दार्जिलिंगला, तसे पुणे/ कोल्हापूर/ सांगलीकर हमखास बंगलोर- म्हैसूर- उटीला जायचे. ‘बेंगळूरु’ला हल्ली कुणी फिरायला जात असेल की नाही कल्पना नाही. पण पूर्वीच्या ‘बंगलोर’मध्ये मात्र भर उन्हाळाही सुखद असायचा. या शहरात आलं की इथली ‘लालबाग’ बघण्यात एखादा तास तरी जायचा.. तोही केवळ धावती भेट म्हणून. त्या भेटीत आधी दोन उंचच्या उंच ख्रिसमस ट्रीचे भालदार-चोपदार दिसायचेच, तिथून पुढलं काचघर पाहायचं, मग थोडं फिरत फिरत गेलं की जिवंत फुलझाडांनी सजलेलं हिरवळीचं घडय़ाळ दिसायचं. या दोन्ही ठिकाणांवर फिल्म कॅमेऱ्याने काढलेले फोटो अनेक कुटुंबांकडे आजही जपलेले असतील. तसेच फोटो सुरेश जयराम यांच्याकडेही होते.
फरक एवढाच की, सुरेश जयराम हे बंगलोरमध्येच राहायचे. लालबाग आणि त्यापेक्षा आकारानं बरंच लहान असलेला ‘कब्बन पार्क’ यांना जोडणाऱ्या मार्गावरच त्यांचं घर होतं. त्यामुळे लहानपणी कधी तरी हौसेखातर काढलेले ते फोटो. पण वय वाढलं, सुरेश जयराम हे चित्रकार झाले, बंगलोरच्याच ‘चित्रकला परिषत्’मध्ये शिकवू लागले, तेही सोडून त्यांनी राहत्या घराला वाढवून ‘वन शांतिरोड’ ही अल्पनिवासी कलाकार योजना सुरू केली, या सर्व काळात त्यांच्या लक्षात येत होतं.. लालबाग हेच आपलं स्फूर्तिस्थान आहे.
हेही वाचा >>>फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
का नसावं? पर्यटकांच्या पायांखालच्या ‘ग्लास हाउस’ आणि ‘फ्लोरल क्लॉक’च्या खेरीज एका टोकाला गणेश मंदिर, दुसऱ्या टोकाला मोठा तलाव आणि त्याच्याही अलीकडे कमळांनी भरलेली दोन छोटी तळी, गुलाब संवर्धनासाठी एक खास आवार आणि वनस्पतिशास्त्र संस्थेची कचेरी, शिवाय एकीकडे बॅण्डस्टॅण्ड आणि त्याभोवती फुलांचे ताटवेच ताटवे.. असं किती तरी आहे लालबागच्या २७० एकरांमध्ये! यावर पुस्तक लिहायचं, असं ठरवून सुरेश जयराम कामाला लागले. लालबागशी माझे नाते या प्रकारचा एक लेख लिहूनही झाला, पण हे आत्मपर पुस्तक नाही, यात निवेदक म्हणून ‘मी’च असलो आणि हा ‘मी’ एक चित्रकार असलो तरी मी माझ्या शहराकडे – त्याच्या वाढीकडे डोळसपणे पाहणारा चित्रकार आहे. त्यामुळेच तर त्या अक्राळविक्राळ आणि काहीशा अनिर्बंध वाढीपासून जरा दूर नेणाऱ्या, ‘बाळा, बैस शांतपणे.. सावकाश चाल जरा’ असं आवाहन करणाऱ्या या ठिकाणाबद्दल मी लिहितो आहे.. तसं असेल तर, ही लालबाग घडली कशी हेही हवं ना लिहायला?
तेही लिहिलं सुरेश जयराम यांनी. केम्पेगौडा हे विजयनगरचे सरदार, त्यांनी बेंगळूरु शहर वसवलं तेव्हा या भागातला निसर्ग तसाच ठेवला. नंतरच्या हैदर अली आणि टिपू सुलतानाने इथं मुघल पद्धतीची बाग उभारायचं ठरवलं आणि तडीलाही नेलं. ‘मुघल गार्डन’ हे उद्यानकलेतल्या प्रकाराचं नाव भारतात रुळलं खरं, पण उद्यानांची ही पद्धत मूळची पर्शियन. ‘चारबाग’ हे या पद्धतीचं आणखी एक नाव. ते चार सारख्या तुकडय़ांत विभागलेल्या बागेमुळे आलं. चारही तुकडय़ांभोवती वाटा, प्रत्येक वाटेशेजारी वाहतं पाणी, अगदी मध्यभागी कारंजं, निरनिराळय़ा वासांच्या फुलांची चार भागांत वाटणी, अशी ही चारबाग रचना असते. ही चारबाग हा आजही लालबागचा गाभा. याच्या जवळच आज प्राणिसंग्रहालय आहे. ते मात्र ब्रिटिशांनी उभारलं. एखाद्या ठिकाणाचा नकाशाच बदलून टाकण्याची नव्या राजकर्त्यांची हौस ही केवळ हौस नसते. राजकीय वर्चस्वाचं प्रदर्शन करण्याचा हेतू त्यामागे असतो. हेच ब्रिटिशांनी लालबागच्या बाबतीत केलं. तरीदेखील ब्रिटिशांचे आभारच मानले पाहिजेत की, त्यांनी मूळ ठिकाणांना धक्का लावला नाही. तळी बुजवली नाहीत किंवा ‘मंडप’ म्हणून ओळखलं जाणारं मंदिर (जे हैदर आणि टिपूच्याही काळात तिथं होतंच) परधर्माचं म्हणून तोडलं नाही.
हेही वाचा >>>माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…
लालबागच्या सौंदर्यात ब्रिटिशांनी जी भर घातली, ती केवळ ‘ग्लास हाउस’च्या उभारणीपुरती नव्हती. लालबागचं हे नवं केंद्र ब्रिटिशांनी प्रस्थापित केलं आणि चारबागेच्या पलीकडे ‘बॅण्डस्टॅण्ड’ उभारला. पण खरी भर ब्रिटिशांनी घातली ती विदेशी वृक्षांची. इथले चाफे दक्षिण अमेरिकेतून आले, जावा बेटावरून ‘नांद्रुक’ ही उंबरासारख्या जाड पानांची झाडं आली, ग्लास हाउसचे भालदार-चोपदार शोभणारी ती झाडं (होय तीच, पर्यटक ज्यांचे फोटो ‘ख्रिसमस ट्री’ म्हणून काढतात, ती!) इतकी उंच आहेत, कारण ती ‘अराउकारिया कूकी’ जातीची आहेत. चिले या दक्षिण अमेरिकी देशातल्या अराऊको या शहराजवळच्या पर्जन्यवनातून ती आलेली आहेत. कॅप्टन जेम्स कूक यानं १७७२ ते १७७५ या तीन वर्षांत जहाजातून केलेल्या जगप्रदक्षिणेमुळे ही झाडं ब्रिटिशांना माहीत झाली, मग ती इथं आली, आणि लालबागमध्ये मात्र दर नाताळात ‘ख्रिसमस ट्री’सारखीच त्यांची सजावट होऊ लागली, अशी माहिती सुरेश जयराम देतात. नाताळातल्या मेजवान्यासुद्धा लालबागेतल्या काचघरात व्हायच्या. त्याचं एक छायाचित्रंही या पुस्तकात आहे. अशी अनेक ब्रिटिशकालीन छायाचित्रं, त्या वेळच्या वनस्पती- चित्रकारांनी काटेकोरपणे एकेका झाडा/ फळा/ फुलाची शास्त्रीय वैशिष्टय़ं नोंदवण्यासाठी केलेली काही ‘बोटॅनिकल ड्रॉइंग्ज’ असा पाहण्याजोगा मजकूर या पुस्तकात भरपूर आहे.
चित्र दाखवत गोष्ट सांगत जावं, तसं या पुस्तकाचं लिखाण आहे. त्यामुळे ‘कलोनियल इंटरल्यूड’ या प्रकरणाच्या अखेरीला लेखक स्वत:च्या लहानपणीचे अगदी कौटुंबिक फोटोही दाखवतो, कारण त्यातून अगदी बंगलोरवासींना देखील ग्लास हाउस किंवा बॅण्डस्टॅण्ड हीच महत्त्वाची ठिकाणं वाटू लागली होती, हे त्याला सांगायचं आहे. झाडांबद्दलच्या प्रकरणात मात्र स्वत:चा उल्लेख अगदी कमी वेळा येतो. कुठलं झाड कुठून आलं, कसं आणि लालबागेत कुठे आहे, असे काही काही उल्लेख येत राहतात. पण शेवटून दुसऱ्या- ‘द थिगळाज्’ या प्रकरणात आज्यापणज्यांची आठवण लेखक सकारण काढतो, कारण ‘थिगळा’ ही क्षत्रिय म्हणवणारी आणि झाडांची निगा राखणारी जमात. या जमातीला हैदरनं बंगलोरमध्ये वसवलं. लालबागेच्या जवळच त्यांची वस्ती होती. आम्ही मूळचे थिगळा. माझ्या आजीचं माहेर तर लालबागच्या कुंपणालगतच होतं, असं लेखक सांगतो.
हे लालबागचं वैभव सांगताना, तळय़ामधलं पाणी थोडंफार आटतं आहे, हेही लेखक नोंदवतो. पण अगदी अखेरच्या ‘सिटी अराउंड द गार्डन’ या प्रकरणात मात्र नकारात्मक सूर (आवश्यकतेपेक्षा) कमी आहे. बेंगळूरुकर हे फुलांवर प्रेम करणारे, फुलांना रोजच्या जगण्याच्या धार्मिकच नव्हे तर धर्म-निरपेक्ष भागातही स्थान देणारे आहेत, त्यांचं या शहराच्या ओळखीवर प्रेम आहे, अशा आशावादी सुरात या पुस्तकाचा मजकूर कधी संपला आणि अखेरच्या पानांवरचे फुलांचे सुंदर फोटो कधी सुरू झाले कळतही नाही.
पुस्तकाचं स्वरूप ‘टूरिस्ट गाइड’सारखं होण्याचा मोठा धोका सुरेश जयराम यांच्यामुळे टळला आहे. चित्रकार म्हणून त्यांनी केलेल्या दृश्य-नोंदीसुद्धा ठिकठिकाणी आहेतच. पण आजकाल बंगलोरहून पाणीटंचाईच्या बातम्या येत असताना या पुस्तकाची आठवण झाली तरी त्यातल्या ‘बाओबाब’च्या वर्णनामुळे. इथलं हे झाड बरंच जुनं आहे. ते मूळचं अरबी झाड. त्यामुळे पाणी साठवून ठेवणं ही त्याची खासियत. झाडाचा आकारच अतिप्रचंड बाटलीसारखा. लालबागेतल्या झाडाला तिळं खोड आहे. म्हणजे खोडासारख्याच दिसणाऱ्या, एकाच झाडाच्या तीन मुख्य शाखा. मग या शाखांना आणखी किडकिडीत फांद्या. या झाडामध्ये २५० लिटर पाणी सहज असेल, अशी नोंद आहे बंगलोरमध्ये. अरबस्तानात पाण्यासाठी उंट कापल्याच्या कथा असतात, तसं बेंगळूरुमध्ये झालं तर?
बेंगलोर्स लालबाग- अ क्रॉनिकल
ऑफ द गार्डन अॅण्ड द सिटी
लेखक : सुरेश जयराम,
प्रकाशक : वन-शांतिरोड आणि ‘प्रेसवर्क्स’
पृष्ठे : १९० (मोठा आकार); किंमत : १२५० रु.