केतन गजानन शिंदे
अमरावतीतल्या अंजनगावसूर्जी गावातल्या शारदा खारोडे, यवतमाळातील पांढरकवडा गावचे सुधाकर निकम, बीडच्या जातेगावचे भाऊसाहेब चांभारे, वर्ध्याच्या साहूर मधील अरूणराव मोगरे, वाशिमचे तेजस नाळे हे सारे काही उदाहरणार्थ शेतकरी, मागच्या पंधरवड्यात आत्महत्या केलेले अन् वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यातल्या रकान्यात बातमी झालेले. काही दिवसांपूर्वी आणखी एक विधी पार पडला. गतवर्षीच्या मराठवाडा विभागात झालेल्या शेतकरी आत्महत्येचा आकडा विभागीय आयुक्तलयाने जाहीर केला. मराठवाड्यात १०८८ इतक्या शेतकरी आत्महत्या २०२३ सालात झाल्या. २०२२ पेक्षा हा आकडा ६५ ने अधिक आहे. आकड्यांचे असे विधी होत राहतात आणि सरकारी आकडेच इतके भीषण आहेत की जमिनीवरच्या वास्तवाला सामोरे जाण्यासाठी त्राण उरत नाही. माणसांच्या उभ्या जिंदग्या आकड्यात आणून ठेवल्यावर उरतो तो खेळ आकड्यांचाच पण आता आकड्यांचे विधी देखील किती सहज झाले आहेत. इतके थैमान माजले असताना त्याचे पडसाद म्हणून इथे क्षीण सावल्यादेखील उमटत नाहीत.
शेतकरी आत्महत्या ‘न्यू नॉर्मल’ कधी झाला? समाजमन इतके बोथट कधी झाले? महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात रोज शेतकरी मृत्यूच्या दाढेत ढकलला जातोय, त्या संचित असंतोषाचा आवाज कुठे आहे? शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा, उपाय अन् योजना याचे देखील एक साचेबद्ध पुराण आहे. प्रस्तुत लेख वरीलपैकी विषयांना हात न घालता एका मुलभूत प्रश्नावर चर्चा करू पाहतो आहे. महाराष्ट्राच्या शेतीक्षेत्रात साचत चाललेला हा असंतोष, त्याचा राजकीय सामाजिक आवाज अन् त्याचे प्रकटीकरण कुठल्या स्वरूपात होते आहे?
आणखी वाचा-महात्मा गांधी आपल्याला खरंच कळले आहेत का?
मुख्य प्रवाहातले राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, साहित्यिक, नागरी समाज या साऱ्याच पातळीवर शेतकरी आत्महत्येचे दाहक वास्तव आता ‘सामान्य’ झाले आहे. जो काही उरलासुरला आवाज आहे तो समासातला आहे. म्हणून तुमच्या दूरदर्शनवर शेतकरी आत्महत्येची ब्रेकिंग न्यूज येणार नाही किंवा व्हॉट्सअॅपवर तसा फॉरवर्ड येणार नाही. प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होणार नाही. तुम्ही साहित्याच्या कार्यक्रमात जा, तुम्ही काव्य मैफिलीत जा. हे हुंदके तिथे गवसणार नाहीत. इतकेच काय तर तुमची आमची समाजमाध्यमांवरची संभाषणे आपल्यातच या उदासीनतेचा पुरावा आहेत कारण समाजातल्या तफावतीच इतक्या व्यापक झाल्या आहेत की एकाच नेपथ्यावर परस्परांना अज्ञभिन्न असे दोन अंक सुरू आहेत. शेतकरी आत्महत्येची दाहकता या तत्सम असंवेदनशील सामाजिक बांधणीत नसली अन् साचलेल्या या असंतोषाला आवाज उरला नाही म्हणून हा असंतोष अस्तित्वातच नाही असे आपण सोयीस्करपणे गृहित धरू नये. तो मूक ज्वालामुखी काळ्या मातीच्या गर्भात कैक तप खदखदत आहे.
आज प्रमुख राजकीय पक्षांच्या भूमिका विधिमंडळात ते कुठल्या बाकावर बसतात यावरून ठरलेल्या आहेत. शेतकरी आत्महत्येच्या राजकारणाची चाकोरी त्यांनी आखून ठेवली आहे. प्रामुख्याने ‘राजकीय’ स्वरूप असलेला हा असंतोष एका चाकोरीत मर्यादित ठेवला जातो. समासातले राजकीय आवाज एकतर क्षीण पडतात किंवा चाकोरीत सामावले जातात. परिणामी व्यापक संघटित लढा उभा राहत नाही. ज्या वर्षात एकट्या मराठवाड्यात १०८८ शेतकरी आत्महत्या करतात त्याच वर्षी शेतीच्या अर्थकारणात काय काय घडत असतं? गहू, साखर, तांदळाची आयात केली जाते. खाद्यतेल अन् कडधान्ये निर्यात केली जातात. शेतकऱ्यांच्या मुळावर प्रहार करणारे हे निर्णय निःसंकोचपणे रेटले जातात. कुठल्याच राजकीय पक्षाला नवउदारमतवादी अर्थकारणाचा पुरस्कार करताना संकोच वाटत नाही पण त्याच वेळी ते स्वयंघोषित शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे देखील भासवून देऊ शकतात. याहून प्रचंड विरोधाभास आणखी काय असू शकतो? शेतकरी वर्गाचे ‘अराजकीयीकरण’ करण्यात इथल्या राजकारणाला यश आले आहे अन् म्हणून निवडणुकांचे राजकारण फावले जाते. उरतो तो असंतोष… तसाच पुरून राहिलेला, वाचा नसलेला.
आणखी वाचा-जातीयवादातून मागासपणा वाढतो की मागासपणातून जातीयवाद?
आपल्या आपल्या विशिष्ट सामाजिक राजकीय स्थितीवरून आज आपण आपले राजकारण, आपले विश्व नापतो आहोत. आपल्या दृष्टीला आपल्याच भोवतालची झापडे लागली आहेत. परंतु विदर्भाच्या अन् मराठवाड्याच्या खेड्यापाड्यात राखेच्या डोंगराखाली एक वर्ग घुसमटून जातोय. आणखी लाखो आहेत ज्यांनी अजून फास जवळ केला नाही, विहीर जवळ केली नाही पण ते जिवंत मृतदेहाचे सांगाडे काळोखे दिवस मोजत आहेत.
तुमची गगनाला भिडणारी पोकळ शहरे, तुमचे फुशारक्या मारणारे अर्थकारण, तुमचे उन्मादी राजकारण यांना या असंतोषाची भनक नाही. म्हणून तुमच्या सहानुभूतीची भीक नको. तुमच्या गळे काढणाऱ्या, शेतकरी आत्महत्येच्या भावनिक भांडवलावर लिहिलेल्या कविता नकोत. राजकारणाची तीच तीच निवडणुकांच्या आधीची कैवारी भूमिका नको. महाराष्ट्राने आपली झापडे फेकून द्यावीत अन्यथा येता काळ एका एका देहाची किंमत चुकती करून घेणार आहे. माथ्यावरून कोस उंच पाणी केव्हाचे वाहते आहेच. समाज म्हणून आपण आपल्या मूळ संवेदना तपासल्या तरच आकड्यांची माणसं होतील. हीच ती माती जिथे रयतेचे स्वराज्य उभे राहिले, याच मातीत ‘शेतकऱ्यांचा असूड’ लिहिला गेला. इथल्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या चळवळींनी देशाला दिशा दिली. महाराष्ट्राच्या समाजमनाला आणखी अभ्यासू वा प्रतिबद्ध होण्याची गरजच नाही, गरज आहे मुलभूत प्रेरणेला पुनर्जीवित करण्याची, माणूस होण्याची.
लेखक राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत.
ketanips17@gmail.com