माणसांनी वाघाला घाबरायचे की वाघांनी माणसाला, हा प्रश्न तसा विचार करायला लावणारा आहे. निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली अलीकडच्या काही वर्षात जे व्याघ्रपर्यटन सुरू झाले आहे, ते पाहता तो वारंवार विचारला जातो. जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाइतके ‘ग्लॅमर’ त्याला नाही आणि ‘ग्लॅमर’च्या याच झगमगाटात त्या बिचाऱ्या वाघाचा जीव इतका गुदमरत चालला आहे की त्याला त्याच्याच अधिवासात वावरताना पावले इकडून टाकायची की तिकडून असा प्रश्न पडायला लागला आहे. अधिवासाच्या बाहेर जात एखादे पाऊल थोडे वेडेवाकडे पडले की एकतर त्याचा बळी जाणार… नाही तर त्याला कायमचे जेरबंद व्हावे लागणार हे नक्की.

पैसे फेकलेत की कुणाच्याही आयुष्याशी खेळायला आपण मोकळे इतका माणूस स्वार्थी होता आणि आहे. अलीकडच्या काही वर्षातील या घटना हेच तर दर्शवतात. गेल्या काही वर्षांत जंगल पर्यटनाने निसर्ग साक्षरतेऐवजी निसर्ग कसा ओरबडायचा हाच जणू पायंडा घालून दिला आहे.

gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
is Tiger hunt in yavatmal Decomposed body found in Ukani coal mine
वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…

आणखी वाचा- शिक्षण संस्था आणि उद्योगजगत यांचा समन्वय दोहोंच्याही फायद्याचा…

वाघांच्या भरवश्यावर राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पाच्या तिजोऱ्या ओसंडून वाहत आहेत, पण मग त्या वाघाच्या सुरक्षेचा, त्याच्या संरक्षणाचा, त्याच्या स्वातंत्र्याचा विचार हे व्यवस्थापन करत आहे का ? तर याचे उत्तर नाही, असेच आहे. ज्या वाघामुळे राष्ट्रीय उद्यानाची, अभयारण्याची, व्याघ्रप्रकल्पाची ओळख पर्यटनाच्या नकाशावर झाली, त्या वाघाचा विचार आपण करणारच नाही आहोत का ? माणूस त्याच्या हक्कांसाठी, वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी न्यायालयापासन ते मानवी हक्क आयोगापर्यंत सगळीकडचे दरवाजे ठोठावतो. मग मानवी कोंडीत सापडलेल्या ‘त्या’ वाघाने कुणाचे दरवाजे ठोठावायचे ? त्याने त्याच्या हक्कासाठी, त्याच्या अधिवासाच्या सुरक्षेसाठी, त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी कुणाकडे दाद मागायची ? पर्यटकांना वाटते आपण त्याला पाहण्यासाठी पैसे देतो ना, मग त्याने आपल्याला दर्शन द्यायलाच हवे. भलेही मग ‘त्या’ वाहनचालकाच्या, मार्गदर्शकाच्या खिशात अधिकचे दोन पैसे कोंबावे लागलेत तरी चालेल. ते केले की मग आपण ‘त्या’ वाघाच्या घरात शिरायला मोकळे. सरळ मार्गाने जाऊन त्याच्या घरात पोहोचता येत नसेल तर आडवळणाने जायचे, पण काहीही करून त्याच्या घरापर्यंत पोहोचायचे.

दिवसेंदिवस वाढत चाललेला हा माणसाचा स्वार्थीपणा वाघांच्या मुळावर उठलाय. ज्यावर वनखात्याचेच नियंत्रण राहिलेले नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वाघांच्या भरवश्यावर खात्याची तिजोरी भरत आहे ना, मग जे चालतंय ते चालू द्या, असाच या खात्याचा खाक्या. व्याघ्रकेंद्रित पर्यटनातून होणाऱ्या अर्थकारणापुढे वाघाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची ते कशाला पर्वा करतील ? निसर्ग पर्यटनाचे नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे हा खेळ खेळला जातोय आणि यात नाहक बळी जातो आहे तो वाघाचा. एकीकडे सांगायचे की, ‘बघा… आम्ही कसे नियमानुसार २० टक्के क्षेत्रातच पर्यटन करतो आहेत, ८० टक्के क्षेत्र पर्यटनविरहीत ठेवलंय’. पण म्हणून या २० टक्के क्षेत्रात अनिर्बंध पर्यटन होऊ द्यायचे का ? जोपर्यंत वर्तमानपत्रात बातमी येत नाही, समाजमाध्यमावर त्याच्या चित्रफिती सामायिक होत नाहीत, तोपर्यंत हा प्रकार मुकाट्याने चालू द्यायचा. वाघांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टी उघड झाल्या, की मग त्या पर्यटक मार्गदर्शक, पर्यटक वाहन चालकाला बळीचा बकरा बनवायचे. पर्यटकांकडून दोन पैसे अतिरिक्त मिळतात म्हणून तो नियम बाजूला सारून पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन घडवून आणतो. त्यामुळे तो दोषी आहेच, पण मग त्याला अतिरिक्त पैसे देऊन मनसोक्त व्याघदर्शन घडवून आणण्याचा अट्टाहास धरणाऱ्या पर्यटकांचे काय ? पर्यटकदेखील तेवढेच दोषी आहेत आणि पर्यटनाची यंत्रणा हाताळणारे वनखातेही तेवढेच दोषी आहे. कारण पर्यटकांना पर्यटनासोबतच जंगलाची ओळख करून देण्यात, नियम आणि कायद्याची ओळख करून देण्यात आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात ते कमी पडत आहेत.

आणखी वाचा-पुण्यात ‘सिमला ऑफिस’ का आहे? भारतीय हवामानशास्त्रात त्याचे योगदान काय?

हल्ली तशीही जंगलातील पर्यटनाची सूत्रे खात्याच्याच हाती खरंच राहिली आहेत का, हा प्रश्न आहेच. कारण ही सूत्रे धनदांडग्या रिसॉर्टचालकांच्या हातात गेली आहेत. उमरेड-पवनी-कऱ्हांडला यासारख्या अभयारण्यात धनदांडग्यांचे रिसॉर्ट पर्यटन प्रवेशद्वाराची सीमा पार करते आणि वाघ त्यांच्या रिसॉर्टपर्यंत जाऊन पोहोचतात, त्याठिकाणी वाघांची अडवणूक करण्याचे प्रकार आपसूक घडतात ! त्या रिसॉर्ट चालकांना नियमांचे बंधन नाही तर मग ‘त्या’ बिचाऱ्या दैनंदिन पर्यटन फेरीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या पर्यटक मार्गदर्शक आणि पर्यटक वाहचालकावरच नियमांचे बंधन का ? तोही दोन पैसे कमावण्यासाठी नियमाची पायमल्ली करत पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडवण्यासाठी ‘त्या’ वाघाची वाट अडवतो आणि मग कारवाईचा बडगा त्याच्यावरच उगारला जातो. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात याआधीही वाघाची वाट अडवण्याचे प्रकार घडले आहेत. या व्याघ्रदर्शनाच्या नादात पर्यटक वाहनाने वेगमर्यादा ओलांडली आणि हे वाहन उलटले. अशावेळी त्याठिकाणी वाघ आला असता आणि त्या वाहनातील पर्यटकांवर त्याने हल्ला केला असता, तर ‘वाघाने पर्यटकांवर हल्ला केला’ म्हणून एकतर त्या वाघाला कायमचे जेरबंद केले असते, नाही तर त्याला गोळी घालून ठार तरी केले असते. म्हणजे येथे बळी शेवटी वाघाचाच गेला असता.

याच व्याघ्रप्रकल्पात काही वर्षांपूर्वी पर्यटकांचे वाहन अगदी त्या वाघाच्या इतके जवळ पोहोचले की ‘त्या’ वाघाने पर्यटक वाहनाची काच चाटली. एवढ्यावरच तो वाघ थांबला नाही तर त्या वाहनातील महिला पर्यटकाचे हातही त्याने चाटले. त्यानंतर तो तिथून निघून गेला म्हणून बरे, नाही तर काय…? बरं.. हा प्रकार एकट्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातच घडतो काय ? तर नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातही असे कित्येक प्रसंग घडले आहेत. ‘माया’ ही या व्याघ्रप्रकल्पातील जगप्रसिद्ध वाघीण. ती तिच्या बछड्यांना शिकारीचे धडे देत होती आणि पर्यटक वाहन त्याठिकाणी येऊन धडकले. व्याघ्रदर्शन घेऊन त्या वाहनाने परत जावे तर त्यांनीही तिथेच ठाण मांडले. मग काय ! तिने थोडा वेळ वाट पाहिली आणि आता ती पर्यटकांच्या वाहनावर धावून जाणार, तेवढ्यात चालकाने वाहन मागे घेतले. कितीतरी असे किस्से या जंगल पर्यटनादरम्यान रोज घडत असतात. त्यातले काहीच बाहेर येतात आणि बरेचसे येतही नाहीत.

आणखी वाचा-पंडित नेहरूंचे राक्षसीकरण!

व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा हा डोलारा इतका पसरत चालला आहे की वाघाला त्याचे खासगी जीवन शांतपणे जगता येत नाही. एवढेच नाही तर वाघ आणि वाघिणीचे मीलनही पर्यटकांना कॅमेऱ्यात कैद करायचे असते. याच जागी माणसाने स्वत:ला ठेवून पाहिले तर…! अगदी पर्यटकांनाच हा प्रश्न विचारावा, ‘तुमच्या आयुष्यातील खासगी क्षण इतरांनी बघितले तर तुम्हाला चालेल का ?’ तो प्राणी आहे.. त्याला बोलता येत नाही.. त्याच्यासाठी आपण पैसे मोजतो, म्हणून त्याचे वैयक्तिक आयुष्याचे स्वातंत्र्य हिरावण्याचा हक्क माणसाला कुणी दिला ? खरंतर माणसाला टाळणे हा वाघाचा मूळ स्वभाव, पण सतत त्याच्या जवळ जाऊन त्याचा हा नैसर्गिक गुण बदलायला त्याला आपणच भाग पाडले आहे. म्हणूनच तर तो आता माणसाळू लागला आहे. अतिपर्यटन त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे ठरत आहे. यावर अभ्यास झाला तर ते अधिकृतपणे पुढे येईलही. दक्षिण आफ्रिकेत २००८ साली सिंहांच्या बाबतीत हे संशोधन झाले. मॅट हायवर्ड व जिना हायवर्ड यांनी पर्यटनामुळे सिंहाच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो यावर संशोधन केले. मानवाचे अस्तित्त्व सातत्याने आसपास असल्याने सिंह प्रचंड तणावात असल्याचे त्यांना दिसून आले. एवढेच नाही तर त्याच्या नैसर्गिक गोष्टींवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे त्यांना दिसून आले. हे राज्यातील वाघांच्या बाबतही घडत आहे. केवळ भ्रमणध्वनी बंदी करून हा प्रश्न सुटणारा नाही. कारण आजकाल सर्वसामान्य माणसांकडे कॅमेरे नसतात, भ्रमणध्वनी असतात. अशावेळी जंगलपर्यटनाच्या आठवणी जपणारे भ्रमणध्वनी हे एकच साधन ठरते. या बंदीऐवजी पर्यटनक्षेत्रात भ्रमणध्वनीसाठी ‘जॅमर’ लावता येऊ शकतो. जेणेकरून वाघ दिसला म्हणून इतर पर्यटक वाहनांना त्याठिकाणी बोलावून गर्दी करता येणार नाही, पण भ्रमणध्वनीतून छायाचित्र काढता येतील. त्यामुळे या घटनांमधून पळवाटा शोधण्याऐवजी खात्याने नियम आणि कायद्यांसह पर्यटन यंत्रणा अधिक सक्षम करणे अपेक्षित आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader