आपल्या राज्याचे वनवैभव पाहता यावे, एका उमद्या प्राण्याचा रुबाब अनुभवता यावा, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि अभयारण्याच्या परिसरातील स्थानिकांना रोजगार मिळावा… ही व्याघ्रसफारी सुरू करण्याची उद्दिष्टे. मात्र पर्यटकांच्या जिप्सींनी वाघांना घेरल्याची घटना पाहता, ही सर्व उद्दिष्टे धुळीला मिळाल्याचे आणि वाघापेक्षा व्याघ्रदर्शनालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट होते…

गेल्या १७ एप्रिलला जगप्रसिद्ध ताडोबात एका वाघिणीला घेरणाऱ्या सर्व पर्यटकांचा जाहीर सत्कार करायला हवा. व्याघ्रदर्शनातून पैसे कमावण्याच्या नादात व्यवसायकेंद्री झालेल्या वन खात्यानेच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या सर्व पर्यटकांनी नोंदणी करून ताडोबात प्रवेश केल्याने त्यांची नावे व संपर्क क्रमांक सहज मिळतील. त्याचा आधार घेत या सर्वांना एका व्यासपीठावर बोलावण्याचे पुण्यकर्म अधिकाऱ्यांनी जरूर पार पाडावे.

Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
Who are the Bahelia hunters on the trail of tigers in Maharashtra Why are tigers in danger from them
महाराष्ट्रातील वाघांच्या मागावर आहेत बहेलिया शिकारी! कोण आहेत बहेलिया? त्यांच्यापासून वाघांना मोठा धोका का?
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

त्या वाघिणीच्या अगदी जवळ गेल्यावर नेमके कसे वाटले? गर्दीने घेरल्यावर तिच्या हालचाली नेमक्या कशा होत्या? ती असाहाय्य व अगतिक दिसत होती की गुरगुरत होती? ती तुमच्याकडे रोखून बघत होती की मला जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या अशी याचना तिच्या नजरेत दिसत होती? कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिच्यासोबत छायाचित्र काढताना तिचा चेहरा नेमका कसा झालेला दिसला? त्याच्या लखलखाटात तिचे डोळे दिपल्यासारखे वाटले की नाही? तुम्ही जेव्हा तिला घेरले तेव्हा तिने डरकाळी फोडली का? तिने एखाद्या वाहनावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला का? तुमच्या आरोळ्या, शिट्ट्या यामुळे ती विचलित झालेली वाटली का? तिला बघितल्यावर तुमच्यातील प्राणीप्रेम जागृत होऊन तिला कुणी काही खायला देण्याचा प्रयत्न केला काय? टी ११४ असे अधिकृत नामकरण असलेल्या या वाघिणीला लाडाने एखादे टोपणनाव देण्याचा प्रयत्न कुणी केला काय? दिले तर ते कोणते? पर्यटनातील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन तुम्हाला कसे वाटले? इतक्या जवळून तिला बघितल्यावरसुद्धा तिच्या बाजूला उभे राहून छायाचित्र काढता आले असते तर किती बरे झाले असते असे किती जणांना वाटले? हे दाव्याने सांगता येईल की, या प्रश्नांमधील खोच लक्षात येईल असा एकही पर्यटक सापडणार नाही. यातून दर्शन घडेल ते पर्यटकांच्या वाघाकडे बघण्याच्या मनोवृत्तीचे.

हेही वाचा >>> लोकांना मोफत धान्य देऊ नका, ते कमावण्याचे कौशल्य द्या…

केवळ ताडोबाच नाही तर देशातल्या कोणत्याही व्याघ्रप्रकल्पातील पर्यटकांचे अनुभव अभ्यासा. ते याच पद्धतीने व्यक्त होताना दिसतील. वाघ हा निसर्गसाखळीतला महत्त्वाचा प्राणी आहे. त्याचे स्वत:चे असे विश्व आहे. त्यात एकटे रमायला त्याला आवडते. अकारण तो कुणाच्या वाट्याला जात नाही. त्यामुळे त्याच्या वावरात आपण हस्तक्षेप करणे योग्य नाही. त्याला जेवढे दुरून न्याहाळता येईल तेवढे पुरे. मानवांच्या गर्दीत हा अबोल प्राणी कावराबावरा होतो, त्यातून त्याची वृत्ती हिंसक वळण घेऊ शकते असा विचार अंगी बाळगणाऱ्या पर्यटकांची संख्या किमान भारतात तरी नगण्य. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायाच्या केंद्रस्थानी आलेल्या व्याघ्रदर्शनाच्या सहली धोक्याच्या वळणाकडे वाटचाल करू लागल्या. ताडोबाची घटना हे त्याचेच निदर्शक. याला केवळ पर्यटकांना जबाबदार धरून चालणारे नाही. वन खाते, त्यावर नियंत्रण ठेवून असणारे सरकार व पर्यटनाच्या साखळीत काम करणारा प्रत्येक घटक तेवढाच जबाबदार. सध्या या वाघदर्शनाच्या वेडाने परमोच्च बिंदू गाठला आहे. पाहिजे तर लाख रुपये घ्या पण वाघाचे जवळून दर्शन घडवा असे आर्जव करणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. त्याला या साखळीतला प्रत्येकजण बळी पडतो. ज्याच्या जिवावर हा आर्थिक डोलारा उभा झाला तो वाघ मात्र या घुसखोरीने त्रासला आहे.

जिथे जिथे व्याघ्रप्रकल्प आहेत त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांत वाघांच्या मानवावरील हल्ल्यांत अलीकडे कमालीची वाढ झाली आहे. अभ्यासकांच्या मते याला एकमेव कारण आहे ते पर्यटनाचा अतिरेक. मानवापासून दूर पळण्याच्या नादात अनेकदा वाघ अधिवास सोडतो, दुसरीकडे जागा शोधण्याच्या प्रयत्नात आधी बफर क्षेत्रात जातो आणि नंतर जंगलाबाहेर पडतो. तिथेही त्याचा सामना होतो तो मानवाशीच. मग संघर्ष अटळ असतो. मानवी घुसखोरीमुळे वाघ चिडचिडे झाल्याची उदाहरणेसुद्धा अलीकडे दिसू लागली आहेत. दुर्दैव हे की हा धोका अजून कुणी लक्षात घेण्यास तयार नाही. पर्यटकांना कोणत्याही स्थितीत वाघ पाहायचा असतो व पर्यटनावर नियंत्रण ठेवणाऱ्यांना तो दाखवायचा असतो. त्यामुळे पर्यटकांसाठी राखीव असलेल्या मार्गालगत कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. त्याच भागात वाघाचे सावज जास्त प्रमाणात कसे उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाते. एकूणच मानवाजवळ असलेल्या बुद्धीचा वापर करून वाघाला ‘दर्शन सापळ्यात’ बरोबर अडकवले जाते.

व्याघ्रप्रकल्पात रोज किती वाहने सोडावीत, त्यांच्यात अंतर किती असावे, वाहनांची गर्दी होणार नाही यासाठी वेळा कशा निश्चित कराव्यात यासंबंधीचे नियम राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने कधीचेच तयार केले आहेत. त्यांचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आल्यावर प्रत्येक वाहनावर ‘बघिरा ॲप’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा सर्वप्रथम उपयोग सुरू झाला तो मध्य प्रदेशात व नंतर महाराष्ट्रात. यावरून कोअर व बफर क्षेत्रात वाहनांची गर्दी कुठे झाली, कुणी नियम मोडले हे पटकन कळते. या ॲपवर नियंत्रण असते ते प्रकल्पातील अधिकाऱ्यांचे. ताडोबाच्या या ताज्या घटनेतून हे ॲप केवळ शोभेची वस्तू ठरल्याचेच सिद्ध झाले. अशा प्रकल्पांमध्ये नेमलेल्या पर्यटक मार्गदर्शकाला किती मोबदला द्यावा याचाही नियम ठरलेला आहे. हे मार्गदर्शक याच भागातील स्थानिक तरुण असतात. त्यांना पर्यटकांकडून जास्तीत जास्त वाघ दाखवण्यासाठी मोठी बक्षिशी देण्याचे आमिष दाखवले जाते. त्याला हे तरुण बळी पडतात. यात दोष केवळ या तरुणांचा नाही तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचासुद्धा आहे.

नियम व कायदा मोडणे हा तसाही भारतीयांचा आवडता उद्योग. त्यामुळे जंगल सफारी करताना पर्यटकांनी स्वनियमन करावे ही अपेक्षा कधीचीच फोल ठरली आहे. इतकी वाईट परिस्थिती असताना कोंडी कुणाची होणार तर वाघांचीच. सर्वत्र नेमके हेच घडताना दिसते. ताडोबाच्या घटनेने हे वास्तव चव्हाट्यावर आले इतकेच. खरे तर पैसे कमावणे अथवा व्यावसायिक वृत्ती जोपासणे हे सरकारचे काम नाही. मात्र वाघ व जंगलावर मालकी हक्क गाजवण्याच्या नादात हा सरकारप्रणीत धंदा सुरू झाला. त्याला जोड दिली गेली ती प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची. आज ३० वर्षांनंतरची स्थिती काय? व्याघ्रप्रकल्पाच्या आजूबाजूची गावे या पर्यटनातून मिळणाऱ्या पैशातून खरोखर श्रीमंत झाली आहेत का? काहींना रोजगार मिळाला पण अख्खे गावच्या गाव आर्थिक सुस्थितीत आले असे एकतरी उदाहरण सरकार दाखवू शकते का? गावकऱ्यांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे असाही या कमाईमागचा उद्देश होता. तो कितपत सफल झाला? झाला असेल तर अजूनही वाघाच्या हल्ल्यात माणसे मरतात कशी? या पैशाचा दुुरुपयोग होतो अशातलाही भाग नाही. मात्र या परिसराच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत फार फरक पडला नाही. या पर्यटनातून गब्बर कोण झाले तर प्रकल्पाच्या आजूबाजूला हॉटेल्स व रिसॉर्ट उभारणारे व्यावसायिक. त्यांचा स्थानिक बाजारपेठेतला सहभाग १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे या परिसरातील पेठांचीही अवकळा कायम असलेली. सध्या भरावर असलेल्या या पर्यटनाच्या साखळीत मानवाच्या वाट्याला काही येत नसेल तर त्यावर आवाज उठवता येईल, पण वाघांच्या गळचेपी अथवा कोंडीचे काय? या रुबाबदार पण मुक्या प्राण्याच्या जिवावर आर्थिक संपन्नतेत लोळणाऱ्या यंत्रणांना हा प्रश्न कधी पडणार? उद्या हे वाघच शिल्लक राहिले नाही तर हा धंदाही बसेल हे यांच्या लक्षात येत नसेल काय? यासारखे अनेक प्रश्न केवळ या एका छायाचित्राने निर्माण केले आहेत.

Story img Loader