राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर वाढत चाललेल्या भारामुळे वाघांच्या नैसर्गिक वर्तणुकीवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतो आहे. त्याहीपेक्षा पर्यटनामुळे बाहेर येणारे वाघ आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यजीव संघर्ष. हे सर्व सांभाळणाऱ्या केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल या मंत्रालयांना पर्यटनातून मिळणारा महसूल दिसत होता, पण दुष्परिणामांकडे त्यांनी डोळेझाक केली. आज उत्तराखंडमध्ये काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली म्हणून सर्वोच्च न्यायालयानेदेखील विषयाचे गांभीर्य जाणून घेत काही सूचना केल्या. अर्थातच उत्तराखंडच्या निमित्ताने सर्वच व्याघ्रकेंद्रित राज्यांसाठी त्या देण्यात आल्या, पण या सूचनांचे पालन होईलच, याची शाश्वती ही राज्ये देतील का!

उत्तराखंडमधील कॉर्बेटमध्ये कलागढ वन विभागातील पाखरो येथे १०६ हेक्टरवर व्याघ्र पर्यटन सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी १६३ झाडे तोडण्यासाठी परवानगी असताना सहा हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आली. वाघांसाठी राखीव असणाऱ्या गाभा क्षेत्रात खासगी बसेसना परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. वन्यजीवांचा अधिवास असणाऱ्या भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्यात प्राणिसंग्रहालय व सफारी सुरू करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला. तसे करताना त्यांनी फक्त पर्यटन आणि त्यातून मिळणारा महसूल एवढाच दृष्टिकोन समोर ठेवला. मात्र, पर्यटनाचा विकास करताना वाघांच्या अधिवासाचा बळी दिला जात आहे, ही बाजू दुर्लक्षितच राहिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात एक समिती गठित केली. या समितीने केंद्राच्या निर्णयावर हरकत घेतली. ही मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, प्राण्यांसाठी भ्रमणमार्ग यात प्राणिसंग्रहालय बांधण्याचे आणि सफारी सुरू करण्याचे प्रस्तावच विचारात घेऊ नयेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने अधिसूचित व्याघ्र प्रकल्प आणि त्यांच्या अधिवासाबाहेरील जागेवरच प्राणिसंग्रहालय व सफारींना परवानगी द्यावी, अशाही सूचना समितीने केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार या सूचना कितपत गांभीर्याने घेणार यावरच वाघांचे भवितव्य ठरणार आहे.

जंगलात आतपर्यंत खोलवर असलेल्या वन्यजीवांच्या गाभा अधिवासात पर्यटक प्रवेश करायला लागले, तर वन्यजीवांच्या जगण्यावर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे त्याचे मोठे उदाहरण आहे. पर्यटकांनी भरलेल्या वाहनांभोवती फिरणे, एखाद्या वाहनाचा आरसा चाटणे, एखाद्या वाहनाच्या मागे धावणे, पर्यटकांनी जंगलात फेकलेले प्लास्टिक इतर गुरेढोरांप्रमाणे खाणे हे प्रकार सातत्याने होत आहेत. भारतात आणि जगभरातही पर्यटनाचा किंवा वन्यप्राण्यांसोबत अति मानवी सहवासाचा वाघाच्या नैसर्गिक वर्तणुकीवर होणाऱ्या परिणामांचा वैज्ञानिकदृष्ट्या ठोस अभ्यास झालेला नाही. मात्र, अलीकडच्या काही वर्षांतील वाघांच्या अनैसर्गिक वर्तणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाघाने एखाद्या गावात जाऊन लग्न समारंभ सुरू असलेल्या मांडवात जाऊन तिथल्या लोकांचे पाय चाटणे, मजुराची शिदोरी पळवणे, पर्यटकांनी भरलेल्या वाहनाचा आरसा चाटणे अशा अनेक घटनांनी यावर विचार करायला भाग पाडले आहे. माणसांच्या नैसर्गिक हक्कावर गदा आली तर त्याच्याकडे न्याय मागण्यासाठी अनेक रस्ते आहेत, पण वाघांच्या नैसर्गिक हक्कावर त्याच माणसामुळे गदा येते, तेव्हा त्याने कुणाकडे दाद मागायची?

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली म्हणतात त्याप्रमाणे व्याघ्र पर्यटनाची दिशा नक्कीच भरकटली आहे. पूर्वी या पर्यटनाचा उद्देश लोकांना या सर्व गोष्टींची जाणीव करून देणे, त्यांना वन्यप्राण्यांची ओळख करून देणे, आणि त्याचसोबत त्याच्या अधिवासाची, निसर्गाची सुरक्षा करून देणे हा होता. आता याउलट झाले आहे. आताचे पर्यटन व्याघ्रकेंद्रित झाले आहे. त्यातून मिळू लागलेला कोट्यवधीचा महसूल त्या व्याघ्र प्रकल्पावर आणि परिणामी वाघांवर पर्यटनाचे ओझे टाकत आहे. उमरेड-करांडला अभयारण्यात २०१६ साली तब्बल १० ते १५ मिनिटे पर्यटकांचा श्वास रोखला होता. कारण वाघ पर्यटकांनी भरलेल्या त्या वाहनाभोवती फिरत होता. तेवढ्यात त्याला त्या वाहनाच्या आरशात त्याची प्रतिमा दिसली आणि तो त्या आरशाला (म्हणजेच आरशातील त्याच्या प्रतिमेला) चाटू लागला. त्या वाहनातील पर्यटकांच्या शरीराचा गंध घेण्यापासून आरशाशी खेळण्यापर्यंतचे प्रकार त्याने केले. थोड्या वेळाने तो निघून गेला म्हणून ठीक, अन्यथा पर्यटकांवर त्याने हल्ला केला असता तर अघटित घडण्याचीदेखील शक्यता होती. अशा वेळी दोषी तोच वाघ ठरला असता. डिसेंबर २०१७ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांनी त्यांचे आणलेले डबे एका ठिकाणी ठेवले आणि ते कामाला निघून गेले. तेवढ्यात अंदाजे एक-सव्वा वर्षाचा वाघ त्या डब्याजवळ घुटमळला आणि डबा असलेली एक पिशवी तोंडात पकडून निघून गेला. याच महिन्यात मध्य प्रदेशातील मनुसखापा गावात एक वाघ लग्नमंडपात शिरला. त्याने कुणावर हल्ला केला नाही, फक्त लग्नातील वऱ्हाड्यांचे पाय चाटले. फेब्रुवारी २०१८ साली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रदर्शनासाठी पर्यटकांची वाहने पोहोचली. ती एका वाघाच्या चहूबाजूने उभी राहिली. आधी तो शांत राहिला आणि नंतर मात्र त्याने आक्रमक पवित्रा दाखवला.

वास्तविक वाघ हा माणसाला टाळणारा आणि माणसापासून दूर राहात स्वत:ची स्वतंत्र वाट चोखाळणारा प्राणी. अति पर्यटनामुळे मात्र माणूस आणि वाघ जवळ येऊ लागले आहेत. तो माणसाळायला लागला आहे आणि त्याच्या नैसर्गिक सवयी बदलू लागल्या आहेत. पर्यटकांसाठी व्याघ्रदर्शन सुखावहच, त्यासाठी वाटेल तो पैसा मोजण्याची त्यांची तयारी असते आणि त्याच पैशातून वन खात्याची तिजोरी भरत असल्याने खात्याचा, परिणामी सरकारचा मोह वाढत चालला आहे. त्याच्या बदलत्या मानसिकतेचे परिणाम पर्यटकांवरील हल्ल्यात होऊ शकतात, पण याची जाणीव माणसाला नाही. तरुणाईला ज्याप्रमाणे नवीन काही तरी करून पाहण्याची इच्छा असते, तशीच ती वाघांमध्येही असते. अशा नावीन्यपूर्ण कृतीत पर्यटकांचा बळी गेला, तर बदनाम वाघच होणार आहे. वाढत्या पर्यटनामुळे वाघांची माणसाबद्दलची भीती कमी झाली आहे. वाघ माणसाला घाबरतो हे आता कथेत ऐकल्यासारखे वाटते. वाघाची मनोवृत्ती बदलत चालली आहे. त्याच्या नैसर्गिक सवयींमध्ये बदल होत आहे.

वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा जसा मानवी शरीरावर परिणाम होतो, तसाच तो वाघांवरही होतो. त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. हृदयाचे ठोके वाढतात. त्याच्या प्रजननक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अमरावती विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख आणि वन्यजीव अभ्यासक दिवंगत डॉ. गणेश वानखेडे यांनी वाघांच्या संदर्भात एक अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासात वाघाच्या विष्ठेत त्यांना जनावरांच्या शरीरावरील जिवाणू दिसून आले होते. भारतात अलीकडच्या काळात वाघांच्या नैसर्गिक वर्तणुकीत जे बदल घडून येत आहेत, तेच बदल आफ्रिकेच्या जंगलातील सिंहांच्या बाबतीतही घडले होते.

मॅट हायवर्ड आणि जिना हायवर्ड यांनी अति पर्यटनामुळे सिंहांच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतो, यासंदर्भात २००८ साली अभ्यास केला. या अभ्यासात अति पर्यटनामुळे आणि माणसांच्या सततच्या सहवासामुळे जंगलातील सिंह प्रचंड तणावात असल्याचे दिसून आले. अगदी सिंहाच्या जांभई देण्यापासून तर त्याच्या एकूणच वर्तनावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. सिंहांच्या हृदयाची स्पंदने वाढून ते अस्वस्थ होतात आणि त्यांची शारीरिक ऊर्जा कमी होते ही बाब त्यांनी नोंदवली. सिंहांच्या नैसर्गिक जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याचे त्यांना दिसून आले. असाच अभ्यास भारतात झाला तर हेच निष्कर्ष निघू शकतील. व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर भर देऊन सरकार त्यांच्या नैसर्गिक हक्कांवर गदा आणत आहे.