डॉ. शशांक जोशी
आधुनिक जीवनशैली, जलद शहरीकरण, देशभर (ग्रामीण व तशा दुर्गम भागांतही) झालेला मोबाइल/ संगणक आदी तंत्रज्ञानाचा सुळसुळाट, यामुळे बसून राहण्याची सवय वाढते आहे. वाढती संपन्नता आणि बदलती सामाजिक आर्थिक स्थिती, त्यामुळे अन्नाची सहज उपलब्धता याहीमुळे बैठेपणात वाढ झाली आहे. भारतच नव्हे, तर जगभरातील लोक हल्ली अधिक खातात, हे स्पष्टपणे आपण पाहू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीही झटपटपणाकडे झुकत आहेत. तृणधान्यांची सहज उपलब्धता आणि कमी किमतीत मिळणारे- विशेषतः पॉलिश केलेले तांदूळ, गव्हाचे पीठ, अतिरिक्त साखर, स्टार्च, मीठ आणि चरबी/तेल यांमुळे निव्वळ उष्मांक वाढतात, मग शहरी आणि ग्रामीण भागात वजन वाढण्याची समस्या दिसू लागते. ‘फास्ट फूड’ काही परदेशीच असते असे नाही, आपले चटपटीत खाद्यपदार्थही विशेषत: आरोग्यवर्धनाच्या दृष्टीने तुटपुंजेच ठरतात. हे चटपटीत पदार्थ केवळ चवींवर लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे त्यांची सवय लगेच लागते. ‘टाइप टू मधुमेह’ यासारखे आजार होऊ शकतात… दूध आणि दुग्धजन्य उत्पादने ही अनेक भारतीयांसाठी प्रथिनांचे एकमेव स्त्रोत आहेत आणि ते सेंद्रिय आणि पर्यावरणीय रसायनांपासून मुक्त असल्याची खात्री करण्याव्यतिरिक्त त्यांना ‘व्हिटॅमिन डी’ची जोड देणे आवश्यक आहे. विशेषत: कीटकनाशके आणि रसायनांच्या अवशेषांपासून मुक्त असलेल्या अन्नपदार्थांसाठी अन्न आरोग्य सुरक्षा नियमांची तातडीची गरज आहे कारण ते नियम नसताना बोकाळलेले रसायनयुक्त खाद्यपदार्थ हे केवळ मधुमेहाच्याच पसरण्याला नव्हे तर इतरही असंसर्गजन्य रोगांना आणि काही प्रकारच्या कर्करोगांना देखील कारणीभूत ठरू शकतात. पारंपरिक तसेच आधुनिक भारतीय आहारामध्ये कर्बोदके (कार्बोहायड्रेट) आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त आहे आणि त्यात प्रथिनांचा अभाव आहे. फायबरच्या कमतरतेमुळे आणि फळे आणि भाज्यांचे सेवन शहरी आहारात कमी होत आहे.
भारत हा विविध खाद्य सवयींचा देश आहे. प्रत्येक भारतीय घरात शिजवलेले अन्न वेगळे असते आणि खाणे, सणासुदीचे पदार्थ आणि उपवासाचेही खाद्यपदार्थ या साऱ्याच्या चवी-परी प्रांत, धर्म तसेच कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीनुसार बदलतात. जलद आर्थिक विकास आणि खेड्यांपासून शहरांकडे स्थलांतर यामुळे जीवनशैलीत बदल झाले आहेत. त्यामुळेच मानवी चयापचय प्रक्रियेत व्यत्यय येऊन, कर्करोग आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग यांसारखे असंसर्गजन्य रोग पेरले जात आहेत.
भारतीयांना चविष्ट अन्न हवे असते, जे अनेकदा तळलेले आणि जास्त तेलात शिजवलेले असते. दर महिन्याला प्रति व्यक्ती अर्धा किलोपेक्षा कमी खाद्यतेलाचा वापर करा, वनस्पती तेलातुपासारखे ‘ट्रान्सफॅट’ आहारातून पूर्णपणे बाद करा, तेल किंवा पदार्थ पुन्हा गरम करणे टाळा आणि एकाच प्रकारचे खाद्यतेल न वापरता, दोन प्रकारची खाद्यतेले एकमेकांत मिसळावीत आणि त्यापैकी एक तरी ‘राइस ब्रान’सारखे कमी ऊष्मांकांचे तेल असावे, असे आम्ही डॉक्टरमंडळी सांगत असतो. पण जास्त तळण्यासारख्या स्वयंपाकाच्या सवयींना परावृत्त केले पाहिजे आणि आधुनिक निरोगी स्वयंपाकाच्या सवयींना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच ‘रेडी टू इर्ट’ फास्ट फूडचा ट्रेण्ड त्रासदायक आहे, कारण हे ‘खाण्यास तयार’ पदार्थ सहसा रेफ्रिजरेट केलेले असतात, घरोघरी कृत्रिमरीत्या ते पुन्हा गरम केले जातात. हे पदार्थ पर्यावरणास बाधक रसायनांपासून मुक्त असणे आवश्यक नसते. अनेक खाद्यपदार्थ आणि त्यांच्या ‘पॅकेजिंग’ची अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कठोर तपासणी होत राहाणे आवश्यक आहे. तथापि भारतासह जगभरात असे होत नाही.
याउलट आरोग्याला उपकारकच ठरणाऱ्या खाद्यपदार्थांच्याही उपलब्धतेत वाढ झाली असली तरी ते महाग आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीत. त्यामुळे स्थानिक आरोग्यदायी फळे आणि भाजीपाला तसेच स्थानिक पातळीवर बनवलेले भारतीय अन्न यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे जेणेकरून योग्य पौष्टिक संतुलन राखले जाईल. आयात केलेल्या काजू-पिस्त्यांऐवजी स्थानिक बाजरी आणि ‘मेड इन इंडिया नट्स’ला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. म्हणजे, साधे शेंगदाणे किंवा कडधान्ये किंवा सोया हे प्रथिनांचे उत्कृष्ट किफायतशीर स्त्रोत आहेत ( मुख्यतः शाकाहारी भारतीय आहारासाठी). तर अंडी, मासे, चिकन हे मांसाहारी प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाल मांस टाळले पाहिजे.
‘माइंडफुल ईटिंग’
पारंपरिक भारतीय थाळी कुठल्याही प्रांतातील असो, ती ‘विविधरंगी’ असते, तेव्हा एकंदर पौष्टिक सामग्रीमधून जे काही आवश्यक असते ते अशा थाळीत पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळेच ‘फूड फॅड्स’ आणि ‘फास्ट फूडला’ प्रोत्साहन देणे थांबवून, तसेच ‘जागतिक आहार पिरॅमिड्स’ वगैरेचाही बडिवार न माजवता आपण आपल्या पारंपरिक आहारांमध्ये आरोग्यदायी बदल केले पाहिजेत. परंतु लक्षात ठेवा : खाणे – अन्न खाणे – ही एक कला आणि शास्त्र आहे. वेळेवर खाणे, हळूहळू खाणे आणि कमी खाणे हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. हल्ली ‘माइंडफुलनेस’चा बोलबाला आहे- ‘माइंडफुलनेस’ म्हणजे जणू जगण्याचे शास्त्र आणि कला. तर ‘माइंडफुल ईटिंग’ हा नवीन युगाचा शब्द आहे… जो निरोगी जीवनाकडे नेणारा आणि पालन करण्यास सोपा आहे. माइंडफुलनेस वाढवणे ही आपल्या आहारातील वागणूक ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी आपण याला चालना दिली पाहिजे, त्यासाठी डॉक्टर मंडळींनीही सोप्या कल्पनांचा वापर करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, मोठा नाश्ता मध्यम जेवण आणि रात्रीचे हलके जेवण आपले वजन कमी करते तर याउलट क्रमाने (चटावरची न्याहारी, बाहेरच दुपारचे जेवण आणि रात्री मात्र घरचे भरपेट भोजन) आपले वजन वाढवते. संयम ही गुरुकिल्ली आहे तसेच कमी खाणे ही गुरुकिल्ली आहे… हे सांगणे जुनेच आहे पण आरोग्याच्या क्षेत्रातील मंडळींनी हे कल्पकपणे, सोप्या शब्दांत सांगत राहिले पाहिजे.
‘फूड फॅड्स’ किंवा ‘फॅड डाएट्स’ यांचा प्रसार व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांमुळे जरा जास्तच वाढला आहे पण ‘त्यांत विज्ञानाचा अंश किती?’ हा प्रश्नही विचारला गेलाच पाहिजे. त्यापैकी काही हानिकारक देखील असू शकतात. ‘केटो डाएट’, ‘इंटरमिटन्ट फास्टिंग’ प्रथिनयुक्त आहारावरच नको तेवढा भर काय… या सर्वांचा अल्पकालीन फायदा होऊ शकतो ; परंतु नंतर हेच गंभीर आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते. त्यामुळेच हे असले प्रयोग स्वत:वर करायचेच असतील तर आपल्या आरोग्याची स्थिती माहीत असलेल्या पात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. सार्वत्रिकपणे विज्ञानाने जे दाखवले आहे ते म्हणजे उष्मांक निर्बंध – जसे की कमी खाणे नेहमीच कार्य करते. बाकी सर्व काही- जसे की कार्बोहायड्रेट नियंत्रण ते प्रथिने किंवा चरबीचे प्रमाण वाढवणे- हे फक्त ठरावीक परिस्थितीतच कार्य करू शकते. मात्र ते नेहमीच आणि सर्वांनाच लाभदायक ठरेल, अशी आकडेवारी अद्याप तरी नाही. म्हणून असल्या ‘फूड फॅड’ला स्वीकारण्याची घाई करू नका. समजूतदारपणे, विचारपूर्वक आणि कमी खाण्यासाठी विवेकी अक्कल वापरा; तीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार. आणखीही एक गोष्ट लक्षात ठेवा : कोणताही आहार जीवनशैली आणि व्यायाम यांच्या संयोगाशिवाय काम करत नाही.
लेखक ‘इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन’ च्या दक्षिणपूर्व आशिया विभागाचे अध्यक्ष आहेत.