देशासाठी पथदर्शक ठरलेल्या रोजगार हमी योजनेचे प्रणेते वि. स. पागे यांचा आज (२१ जुलै) जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीचा आढावा-
रवींद्र माधव साठे
रोजगार हमी योजनेचे (रोहयो) जनक वि. स. पागे यांची आज (२१ जुलै) जयंती आहे. संसदीय कार्यपद्धतीत व विधिमंडळ कामकाजात ज्या परंपरा व संकेत आज रूढ झाले आहेत, ते रुजविण्यात पागे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९५२-१९६० अशी आठ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेत आधी सदस्य व त्यानंतर १९६०-१९७८ ही १८ वर्षे सलगपणे त्यांनी राज्याच्या या सर्वोच्च सभागृहाचे सभापतीपद सांभाळले. १९६२ -१९७८ या काळात ते राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बागणी गावी झाला. त्यांचे पूर्वज पेशव्यांचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन त्यांच्या पागेवर अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या घराण्याचे नाव कालांतराने ‘पागे’ असे झाले. घराण्याच्या वारशामुळे देशभक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती. तासगाव येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. संस्कृत विषयात कला शाखेत पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून ते काँग्रेस चळवळीकडे ओढले गेले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी दारूगुत्यांवरील निदर्शनात सहभाग घेतला. १९३० च्या ‘कायदेभंग चळवळीत’ व १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. सत्यशोधक चळवळ व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेल्या पत्री सरकारच्या चळवळीत पागे यांनी समन्वयाची प्रमुख भूमिका बजावली. काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांनी सांगली जिल्हा चिटणीस, अध्यक्ष व पुढे अखिल भारतीय समिती सदस्य म्हणून काम केले. काँग्रेस पक्षावर त्यांची एवढी निष्ठा होती की त्यांनी स्वत:चे घर पक्ष कार्यालय म्हणून वापरण्यासाठी तयारी दर्शविली होती. ते अनेक वर्षे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकारणात होते, तरी त्यांनी धर्म, अध्यात्म, नीती याचा आग्रह सोडला नव्हता. राजकारण आणि अध्यात्म यांची सांगड घालत राजकारणाचे अध्यात्मीकरण करता येते, हे आपल्या आचरणातून त्यांनी दाखवून दिले.
पागे यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. ते थोर स्वातंत्र्यसैनिक, वकील, साहित्यिक, उत्तम संसदपटू, ग्रामीण आणि शेतीच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. ते संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक होते. मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘पहाटेची नौबत’, ‘अमरपक्षी’ हे काव्यसंग्रह तसेच ‘निवडणुकीचा नारळ’, ‘विश्वदर्शन’ ही त्यांची नाटके व ‘लोकमान्यांवरील भाषणे’, ‘बेकारी निर्मूलनातून ग्रामविकास’ ही मराठी पुस्तके आणि ‘‘अ डायलॉग विथ दी डिवाइन’’ हे इंग्रजीतील पुस्तक आदी ग्रंथसंपदा म्हणजे त्यांच्या सिद्धहस्त लेखणीचा आविष्कार होता. ते स्वत: उत्तम गात तर असतच, त्याबरोबर हार्मोनियम व वीणाही उत्कृष्ट वाजवत. सहकाऱ्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल ते नेहमी प्रोत्साहन देत. मग ते सभागृहातील सदस्याचे भाषण असो वा सभागृहाबाहेर केलेली कामगिरी असो. रा. सु. गवई, प्रा. ना. स. फरांदे, डॉ. अशोक मोडक यांना पागे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप ही वानगीदाखल उदाहरणे.
हेही वाचा >>>आगामी अर्थसंकल्पात काय असायला हवे?
सभापतीपदाचा काळ
सभापतीपदाच्या कार्यकाळात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात उत्तम प्रकारे त्यांनी समन्वय व संवाद ठेवला होता. त्यामुळे सभागृहात खेळीमेळीचे वातावरण राही व तेथील चर्चाही सकारात्मक व फलदायी होत असे. नि:स्पृहता व नि:पक्षपातीपणा हे त्यांचे नोंद घेण्याजोगे गुणविशेष. विधान परिषदेचे सभापती असताना काही काळ ते महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचेही अध्यक्ष होते. खादी मंडळास दिशा देण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी कारागीर रोजगार हमी योजना त्यांच्या पुढाकारानेच चालू झाली. आज केंद्रातील ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ याच योजनेचा परिपाक आहे. या मंडळाचा अहवाल किंवा त्याच्या कार्याविषयी मुद्दे सभागृहापुढे चर्चेस येत त्यावेळी ते जाणीवपूर्वक पीठासनावर न बसता उपसभापती किंवा तालिकेवरील अन्य सदस्यास पीठासनावर बसवत. उद्देश हा की खादी मंडळावरील चर्चा निकोप व्हावी व कोणावरही दडपण येऊ नये. आजच्या काळात असा पीठासीन अधिकारी मिळणे हे दुर्मीळच. सभापतीचा कार्यकाळ संपल्यानंतर १९७९-९० पागे हे रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष होते. शासनाने त्यासाठी त्यांना मंत्रीपदाचा दर्जा व अन्य सुविधा देऊ केल्या परंतु त्यांनी केवळ मासिक एक रुपया मानधनावर काम केले हे विशेष. राजकारणाबरोबरच, स्वयंसेवी क्षेत्र, सहकार, शिक्षण, दलित, श्रमिक व शेतकरी या क्षेत्रांचा व त्यातील समस्यांचा त्यांचा अभ्यास होता. सभागृहातील त्यांच्या भाषणांमधून याची प्रचीती येत असे.
१९८७ मध्ये विधान परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पुणे येथे टिळक स्मारक मंदिरात एक कार्यक्रम योजला होता. त्या कार्यक्रमात एका वक्त्याने महाराष्ट्रातील ८० टक्के खेडय़ांमध्ये वीज पोचल्याचे अभिमानाने सांगितले. वि. स. पागे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. समारोपाच्या भाषणात ते म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रात ८० टक्के खेडय़ांमध्ये वीज पोचली आहे, त्याबदद्ल आनंदच आहे; परंतु या खेडय़ांतील ८० टक्के घरांमध्ये मात्र आज अंधार आहे, याचेही भान आपण ठेवले पाहिजे.’’ ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांच्या अंत:करणात असलेली संवेदना यातून स्पष्ट होते. लोकशाहीवर त्यांचा गाढा विश्वास होता. संविधानातील मानवी हक्क व मूल्यांची जपणूक करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. १८ वर्षे सलगपणे पीठासीन अधिकारी म्हणून राहण्याचा त्यांनी विक्रम केला. विधिमंडळाची सभ्यता व शान वाढविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. भारतात प्रतिवर्षी सर्व पीठासीन अधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद होण्याचा एक पायंडा आहे. १९६८ मध्ये या परिषदेने नेमलेल्या एका समितीचे पागे यांनी अध्यक्षपद भूषविले होते. देशातील संसद व विधिमंडळातील कामकाजासंदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना याबद्दल या समितीने चर्चा केली व त्यावर अहवाल सादर केला. आजही या अहवालातील माहिती विधिमंडळातील कामकाजासाठी सर्वदूर आधारभूत मानली जाते. सभापतीपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी विधिमंडळ कामकाज, त्याचे नियम आणि त्यातील उणिवांचा सखोल अभ्यास केला. विधिमंडळ कामकाजातील नियमांत त्यांनी २० दुरुस्त्या सुचविल्या. यांत स्थगन प्रस्तावाऐवजी नियम ९३ अन्वये सूचना देणे, अनियतदिन प्रस्तावाची तरतूद, अशासकीय कामासाठी एक निश्चित दिवस, एका दिवशी दोन ऐवजी तीन लक्षवेधी सूचना घेण्याची सुधारणा, घटनादुरुस्तीचे अनुमोदन व अनुसमर्थन विधानसभेप्रमाणे, विधान परिषदेतही होणे आवश्यक, अधिवेशनच्या अंतिम दिवशी मांडावयाच्या प्रस्तावाबाबतची सूचनावजा सुधारणा इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होता. आज सदनांतील सदस्यांना वर नमूद केलेले हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत त्याचे सर्वस्वी श्रेय वि. स. पागे यांच्याकडे जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पहिल्यावहिल्या सार्वजनिक संघटनेची शताब्दी
शेवटच्या माणसासाठी..
महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना गरिबांतील गरीब किंवा या शृंखलेतील शेवटचा माणूस हा त्यांच्या विचारांचा केंद्रिबदू होता. रोजगार हमी योजनेची कल्पना त्यांना जी सुचली त्याची पार्श्वभूमी रोचक आहे. महाराष्ट्रातील गरिबी व दुष्काळ याचा विचार करताना त्यांनी आपल्या पत्नीस विचारले की ‘प्रभा, आपल्या घरात किती पैसे शिल्लक आहेत?’ त्यावर प्रभाताईंनी ‘‘७०० रुपये असल्याचे सांगितले’’. पागे यांनी पुन्हा पत्नीस विचारले की ‘या शिल्लक ७०० रुपयांत शेतावर किती गडी राबू शकतील?’ त्यावर प्रभाताई उत्तरल्या की ‘‘सुमारे २० दिवस १४-१५ गडी सहज काम करू शकतील’’. त्यावेळी महाराष्ट्रात स्व. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. पागे यांनी मुख्यमंत्र्यांना त्वरित पत्र लिहिले ‘मा. मुख्यमंत्री साहेब, माझ्या शेतावर ७०० रुपयांत १४-१५ दिवस मला २० गडी मजुरीला लावता येत असतील तर मग महाराष्ट्र सरकारने १०० कोटी बाजूस काढले तर किती मजुरांना काम देता येईल?’’ मुख्यमंत्र्यांनी पागे यांना मुंबईत बोलवून घेतले. कल्पना चांगली परंतु १०० कोटी कुठून आणायचे हा प्रश्न होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील मंडळीसह विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलाविली. विधानसभेत कृष्णराव धुळप हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनीही या योजनेचे स्वागत केले व ते म्हणाले की ‘‘नाईक साहेब, गरीब जनतेस या योजनेमुळे काम मिळत असेल तर या योजनेसाठी १०० कोटी रुपये उभे राहण्यासाठी विधानसभेत आम्ही कर प्रस्ताव घेऊन येतो.’’ जगाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात सत्ताधारी पक्षास संपूर्णपणे मदत करण्यासाठी कर प्रस्ताव आणण्याचा महाराष्ट्रात झालेला हा प्रथम प्रयोग.
रोजगार हमी विधेयक
८ ऑगस्ट १९७७ रोजी एकमताने रोजगार हमी विधेयक संमत झाले. त्यावेळी रूढ संकेत बाजूस ठेवून सभापती पागे यांनी विशेष प्रसंग म्हणून विधेयकाबद्दल मनोगत व्यक्त केले. ते म्हणतात ‘‘माझ्या जीवनाचे जीवित कार्य, मिशन म्हणून मी हे कार्य केले आहे. मी आशा करतो की, भारतातील सर्व प्रांत या दृष्टीने वाटचाल करतील व केंद्र सरकार या गोष्टीला आशीर्वाद देईल’’. २१ डिसेंबर २००४ रोजी डॉ. मनमोहन सिंग सरकारने राष्ट्रीय रोजगार हमी कायदा-२००४ हे संसदेत मांडलेले विधेयक म्हणजे पागे यांच्या स्वप्नाची पूर्ती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या योजनेमुळे ग्रामीण क्षेत्रात अकुशल व अंग- मेहनत करणाऱ्या कोणत्याही प्रौढ व्यक्तीस रोजगाराची हमी व काम मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आज त्यामुळेच आपल्यास रस्ते, पाझर तलाव, नाला बंडिंग व विहिरी खोदकाम ही कामे दृष्टिपथास पडतात. रोहयो मागची भूमिका मांडताना पागे म्हणतात की, ‘‘आजवरच्या नियोजनात बेकारीचे निर्मूलन हे कधीच उद्दिष्ट नव्हते. त्यास कायम दुय्यम दर्जा दिला गेला. सर्वाना काम हेच आपले यापुढे ब्रीद असले पाहिजे. सुरुवातीस ही योजना एका गावात प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली. त्यानंतर १०० गावांत व पुढे २००० गावांत तिचा विस्तार झाला. १९७२ मध्ये संपूर्ण राज्यात ही कार्यान्वित झाली. १९७२ मधील भीषण दुष्काळानंतर काही वर्षे ती स्थगित होती, परंतु टंचाईची परिस्थिती संपल्यावर ती योजना पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली.’’ भारतीय राज्य घटनेच्या ४१ व्या कलमात ‘काम करण्याचा हक्क’ ( फ्रॠँ३ ३ ६१‘) याचा उल्लेख आहे. या तत्त्वाच्या पूर्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोहयो हे प्रथम पाऊल होते. पागे यांनी या योजनेची मूलभूत तत्त्वे मांडली होती. तळागाळातील लोक, अकुशल प्रौढ व्यक्ती हा केंद्रिबदू, योजनेत सर्वात्मक दृष्टिकोन, वेतन हे कामाचा दर्जा व प्रमाण यांच्याशी निगडित असणे, शासन व लाभार्थी यांच्यामध्ये दलाल असता कामा नये, पुरुष व स्त्रिया असा भेदभाव न करता ‘‘समान काम, समान दाम’’, आदींचा समावेश यात आहे. या योजनेबद्दल पागे यांची भूमिका लवचीक होती. या योजनेची वेळोवेळी समीक्षा होण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली होती. त्यांचे म्हणणे असे की, काम करण्याचा हक्क मिळणे ही योजना नसून ते राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. ते तत्त्व आहे, धोरण आहे, योजना आहे तसा उपक्रमही आहे. त्यामुळे काळानुरूप त्याचे स्वरूपही बदलू शकते. गरीब व पीडित ग्रामीण जनतेविषयी त्यांच्या मनात आस्था होती. महात्मा गांधीच्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेचे ते पुरस्कर्ते होते. त्यातून रोहयोचा उगम झाला. ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना कामाची हमी देणारी जगातील एकमात्र योजना म्हणून आज गणली जाते. महाराष्ट्रात कोटय़वधी रुपयांची कामे या योजनेमधून झाली. ही योजना म्हणजे दारिद्रय़निर्मूलन आणि ग्रामीण विकासास गती देणारे प्रभावी साधन आहे. केंद्रात सुरू असलेली ‘मनरेगा’ याच योजनेचे विस्तारित स्वरूप आहे.
ज्या समाजातील लोक स्वत:च्या परिस्थितीबाबत समाधानी असून पददलितांच्या उत्थानासाठी काही प्रयत्न करतात, त्या समाजाची नेहमी प्रगती होते. रोजगार हमी योजनेमागची वि. स. पागे यांची नेमकी ही सैद्धांतिक भूमिका होती. पुणे विद्यापीठाच्या गीतामध्ये प्रारंभी असे म्हटले आहे की ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान.’ पागे यांच्या जीवनास हे बोधवाक्य तंतोतंत लागू पडम्ते. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! (सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ )