कृष्णकुमार

 ‘चारधाम यात्रा’ कोणत्याही महिन्यात करता यावी, यासाठी बांधलेला ‘बारमाही महामार्ग’ पुन्हा जागोजागी खचल्याची बातमी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आली आणि ही यात्रा बेमुदत स्थगित केल्याचे प्रशासनाने जाहीर केले. याच उत्तराखंड राज्यातील डेहराडूनमध्ये एका ‘डिफेन्स अकॅडमी’ची इमारत कशी खचून कोसळली, हे महाराष्ट्रातही अनेकांनी समाजमाध्यमांवरून पाहिले असेल. हिमाचल प्रदेशाच्या राजधानीचे शिमला शहर आता संपर्क तुटल्यागत झाले आहे. शिमल्याकडे जाणाऱ्या छोट्या रेल्वेगाडीचे रूळच खचले आहेत. कालका आणि शिमल्याला जोडणाऱ्या पर्वतीय महामार्गांवर हेच दृश्य दिसते. मनालीकडे जाण्याच्या मार्गावरील महत्त्वाच्या फाट्यावरचे मंडी शहर जलमय झाले आहे… या बातम्यांकडे एरवी कदाचित भारतातील अन्य राज्यांचे कमी लक्ष गेले असते, पण आता प्रत्येक राज्यातून या दोन हिमालयीन राज्यांत पर्यटकांची वर्दळ वाढतच असते.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…

या पर्यटकांसाठीच तर इथले रस्ते ‘चारपदरी महामार्ग’ म्हणून ‘विकसित’ केले जातात. त्यासाठी अभियांत्रिकीचा अक्षरश: अत्याचारच हिमालयासारख्या तुलनेने भुसभुशीत पर्वतरांगांवर होत राहातो. मग दर पावसाळ्यात- किंवा हिवाळ्यातील जलवृष्टीने- चकचकीत हायवेवर धारदार कापलेले उतार तुंबत राहतात. मजूर आणि त्यांचे कंत्राटदार मलबा साफ करण्यासाठी परततात. यंदाच्या मुसळधार पावसामुळे हे झालेच, पण हल्ली जवळपास प्रत्येक मोसमात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सर्व प्रमुख पर्यटन स्थळे अधूनमधून त्रास सहन करत आहेत. आणि पर्यटकांच्या दिमतीसाठी निसर्गाच्या गरजा विसरून जाणे, ही समस्या काही फक्त हिमाचल प्रदेश वा उत्तराखंडची नाही, ती जागतिक समस्या आहे, तरीसुद्धा पर्यटक-संख्या मर्यादित करण्याची चर्चा कधी होत नाही.

उलट ‘लोक पुन्हा प्रवास करत आहेत’ ही अगदी आंतरराष्ट्रीय टीव्ही चॅनेलवर वारंवार ऐकली- पाहिली जाणारी आनंदवार्ता असते. विशेषत: करोना टाळेबंदीनंतर, मोठ्या संख्येने लोक सुट्टी घेऊ लागले आहेत. त्यांपैकी अनेक पर्यटकांना अशा ‘नैसर्गिक’(?) आपत्तींचा सामना करावा लागत आहे — जंगलातील आग, अभूतपूर्व उच्च तापमान, पूर, भूस्खलन अशा एक ना दोन आपत्ती जगात कुठे ना कुठे आहेतच. ग्रीससारखा देश वर्षानुवर्षे युरोपीय उन्हाळी पर्यटनावर इतका अवलंबून राहू लागला आहे की असे अनेक देश, पर्यटकांना निराश करण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. ग्रीससारखाच युरोपीय पर्यटकांना आकर्षित करणारा स्पेन आणि अमेरिका खंडातली हवाई बेटे येथील जंगलांमध्ये मोठ्या आगी लागल्या, गावे बेचिराख झाल्याच्या बातम्या आल्या… पण म्हणून पर्यटकांचा हिरमोड झालेला नाही. त्यांनी मौजमजेसाठी पैसे मोजले आहेत आणि हवामानाचा अंदाज काहीही असला तरीही पर्यटक चालले आहेत मजा करायला!

या पार्श्वभूमीवर, ॲमस्टरडॅमहून आलेली बातमी नवलाची आहे. समुद्रपर्यटनाच्या ‘क्रूझ’ जहाजांना शहरालगतच्या समुद्रात थांबण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अमॅस्टरडॅमच्या महापौरांनी घेतला आहे. त्या शहरात २०२१ मध्ये केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की एक मोठे क्रूझ जहाज एका दिवसात ३० हजार ट्रक जितके नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जित करतील, तितके प्रदूषण करते. प्रत्येक क्रूझ जहाज सात हजार पर्यटकांना आणते, यामुळे शहरात काम आणि व्यवसाय निर्माण होतो. तरीही हा कटू निर्णय ॲमस्टरडॅमने घेतला. पण म्हणून पर्यटन थांबते की काय? नाहीच- आणि पर्यटनाला प्रसारमाध्यमांतून दिली जाणारी प्रतिष्ठा तर वाढतच असते… व्हर्जिन गॅलेक्टिक नावाच्या कंपनीने आता अंतराळ-पर्यटनाचीही युक्ती लढवली आहे, त्या पर्यटनाची माहिती देणाऱ्या बातम्या टीव्हीवर पाच- पाच मिनिटे चालतात, पण ॲमस्टरडॅमच्या महापौरांना याच पाश्चात्य टीव्ही वाहिन्यांवर सेकंदभराचा वेळ मिळतो. अंतराळ पर्यटनाची मोठ्ठी बातमी देताना एका तज्ज्ञाला थोडक्यात एवढेच सांगण्याची परवानगी मिळाली की, या अंतराळ पर्यटनामुळे होणारे कार्बन – उत्सर्जन हे त्याच्या संभाव्य वैज्ञानिक आणि आर्थिक फायद्यांपेक्षा अधिक नुकसानकारक आहे.

आपल्या हिमालयीन प्रदेशाचा विचार केला तर, पर्यटनामुळे त्रास होतो हे सांगायला किंवा ऐकायला कोणालाच आवडत नाही. हिमाचल प्रदेश या राज्याने अलीकडेच अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या विध्वंसाचा वेध घेतला आहे. तेथील मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असे की, “हिमाचलने नेहमीच पावसाचा, नद्यांचा रोष सहन केला आहे…” वर, आपण निसर्गाच्या पावित्र्याचा आदर केला पाहिजे, असेही हे मुख्यमंत्री म्हणतात. येत्या काही वर्षांत पर्यटन अनेक पटींनी वाढू शकते. बेकायदेशीर खाणकाम आणि जंगलतोड थांबवण्याच्या हिमाचल प्रदेशच्या योजनांबद्दल हे मुख्यमंत्री बोलले, परंतु आता राज्यातून जाणाऱ्या महामार्गांबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही… कारण – त्यांनी न सांगितलेला भाग असा की, आपापल्या गाड्या घेऊन येणाऱ्या, प्रदूषण वाढवणाऱ्या पर्यटकांचे हिमाचल प्रदेशात स्वागत आहे!

या अशा पर्वतीय महामार्गांवरील भूस्खलन आणि वाहून गेलेल्या पुलांमुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील आर्थिक नियोजनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. एकीकडे विकासाच्या गप्पा केल्या जातात, पण या दोन्ही हिमालयीन राज्यांसाठी ‘पर्यटन उद्योग’ हाच विकासाच्या केंद्रस्थानी मानला जातो आहे. संपूर्ण हिमालयीन प्रदेशात, तुमच्या लक्षात येईल की, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जंगले नाहीशी होण्याबाबत किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती कमी काळजी घेते, जे शेवटी नदीत विसर्जित केले जाते. दुसऱ्या बाजूला निसर्ग संरक्षकांचा आक्रोश आहे. हे निसर्गनिष्ट, पर्यावरणनिष्ठ लोक ‘क्लायमेट चेंज’च्या – म्हणजे ‘हवामान बदला’च्या दुष्परिणामांचे इशारे देत राहातात… पण लोकांना ते कसे पटावेत? कारण लोकांना तर भलताच ‘बदल’ हवामानात दिसत असतो. उदाहरणार्थ यंदाच्या उन्हाळ्यात, उत्तर भारतातील अनेक भागांत ‘लू’ म्हणून ओळखले जाणारे गरम वारे वाहात नव्हते, तेव्हा लोकांनी हवामान बदलाचा ‘सुपरिणाम’ म्हणून त्याचे स्वागत केले… आता काय म्हणणार?

हिमाचल प्रदेशात गेल्याच महिन्यात आलेल्या पुराच्या प्रकोपामुळे निसर्गाने मनालीजवळील चौपदरी महामार्गाचा संपूर्ण भाग बलाढ्य बियास नदीत वाहून गेला. महामार्ग आणि पुलांचे तुटलेले तुकडे पुन्हा बांधून देण्याच्या कामाला सरकार अर्थातच प्राधान्य देईल. पण जे तुकडे तुटून बियास नदीच्या पात्रात पडले, त्याने झालेली नदीची हानी कोण निस्तरणार आहे आणि कधी? निसर्गाचा प्रकोप होत राहातो, त्या रौद्ररूपातून खरे तर धोरणकर्त्यांनाही संदेश मिळत असतो… पण धोरणकर्त्यांकडे तो संदेश वाचण्याची साक्षरता नसते. ‘पर्यटन उद्योग ही समृद्धीची गुरुकिल्ली आहे’ या समजुतीने धोरण नियंत्रित केले जाते. हिमालयाच्या नाजूक पर्यावरणापेक्षाही बेलगाम पर्यटनालाच महत्त्व मिळत राहाते.

‘पर्यावरणनिष्ठ पर्यटन’ वगैरे केवळ गप्पाच वाटाव्यात, असे बहुसंख्य पर्यटकांचे वर्तन असते. कोणत्याही परिस्थिती मौजमजाच करायची असे ठरवूनच आलेले लोक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना आलिशान सुखसुविधा प्रदान करणे हा ‘उद्योगा’चा अविभाज्य भाग मानला जातो, अगदी तीर्थक्षेत्रांमध्येही- जिथे खरे खडतर यात्रा हेच आध्यात्मिक बळाची परीक्षा घेणारे वैशिष्ट्य मानले जायचे- तिथेही पर्यटक आता ‘सुखसुविधा’ पाहातात. उन्हाळ्यात जंगलात लागलेली आग आणि पावसाळ्यात भूस्खलन आणि पूर या हल्लीच्या काळात वारंवार येणाऱ्या आपत्ती आहेत… याचा दोष आपल्यावरही आहे, आपल्या प्रवासाच्या शैलीमुळे डोंगरांना इजा होते हे पर्यटकांच्या लक्षातच येत नाही. हे बधिरपण इतके आहे की, पर्यटकांना ऐन सुट्टीवर असताना जरी एखाद्या आपत्तीमुळे त्रास भाेगावा लागला तरी त्याचा संबंध ते त्यांच्यासारख्या अनेकांच्या सुट्टीच्या योजनेशी जोडत नाहीत.

लेखक अध्यापक होते आणि ‘थँक यू, गाधी’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.