डॉ. जयदेव पंचवाघ
चेहऱ्यावरली कळ, रुग्णाचा छळ यांवर उपाय सापडेनासा झालेल्या अनेकांना डॉ. पीटर जॅनेटा यांनी रुळवलेली शस्त्रक्रिया माहीत नसते..
ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या वेदनेबद्दलच्या लांबलेल्या लेखांपैकी हा शेवटचा लेख. प्रत्येक लेखानंतरच्या प्रतिक्रियांवरून या विषयीच्या समज- गैरसमजांबाबत प्रकाश पडला हे निश्चित.
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया सेंटरमध्ये अनेक वर्ष वेदना सहन करून व विविध उपचार घेऊन आयुष्यालाच थकलेले रुग्ण एमव्हीडी शस्त्रक्रियेसाठी येतात तेव्हा ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ या म्हणीची प्रचीती येते! चेहऱ्याच्या एका अर्ध भागात अचानकपणे, करंटसारखी, अत्यंत तीव्र अशी येणारी कळ म्हणजेच ट्रायजेमिनल न्यूराल्जिया संदर्भात आपण बोलतो आहोत. या आजाराचं निदान लक्षणांवरून करण्यात येतं हे आपण पाहिलं. निदान झाल्यानंतरची पुढची पायरी म्हणजे ट्रायजेमिनल नस व तिच्या आजूबाजूचा मेंदूचा भाग तसंच रक्तवाहिन्या यांचा एमआरआय या तपासणीद्वारे करण्यात येणारा अभ्यास. या तपासणीविषयी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचंआहे.
पहिली म्हणजे हा एमआरआय नुसत्या मेंदूच्या एमआरआयपेक्षा वेगळा असतो. यात गरज पडल्यास नसेभोवतीच्या रक्तवाहिन्यांची रचना वेगळय़ा ‘सीक्वेन्स’द्वारे तपासावी लागते. दुसरं, ‘एमआर कॉन्ट्रास्ट अँजिओग्राफी’ ही एमआरआय तपासणी काही वेळा करावी लागते. तिसरी गोष्ट म्हणजे तज्ज्ञाच्या देखरेखीखाली ही केली, तर त्यातून अधिक उपयुक्त माहिती मिळते कारण विशिष्ट प्रकारच्या प्रतिमा अधिक संख्येनं आणि बारकाईनं घेता येतात. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमआरआय मशीन वेगवेगळय़ा दर्जाची असतात. सद्य:स्थितीला तीन टेस्लाच्या क्षमतेचं यंत्र सर्वोत्कृष्ट आहे. मागच्या सोमवारच्या लेखात रक्तवाहिन्यांच्या स्पंदनयुक्त दाबामुळे हा आजार कसा सुरू होतो हे आपण पाहिलं. एमआरआयमध्ये एक वा अधिक रक्तवाहिन्या या नसेवर दाब आणताना दिसतात. पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची.. ती म्हणजे काही वेळा जर लहान आकाराची रक्तवाहिनी नसेवर दाब आणत असेल तर ती एमआरआयमध्ये स्पष्टपणे दिसत नाही.
ट्रायजेमिनल न्यूराल्जियाची क्वचितपणे दिसणारी कारणंसुद्धा एमआरआयवर दिसतात. उदाहरणार्थ या नसेवर दाब आणणारी गाठ (ब्रेन टय़ूमर) किंवा मेंदूच्या ज्या भागात ही नस प्रवेश करते त्या भागातल्या चेतातंतूंना झालेला आजार (उदा. मल्टिपल स्क्लेरोसिस).
कधीकधी गाठ तर असतेच, पण या गाठीमुळे रक्तवाहिनी नसेमध्ये ढकलली गेलेली असते. या वेदनेचे अचूक उपचार योग्य निदानावर अवलंबून असतात हे सांगण्यासाठी या तपशिलांचा प्रपंच.
एमआरआय तपासणीत गाठ दिसून आली तर अर्थात ती काढून टाकणं गरजेचं असतं, पण गाठ काढल्यावरसुद्धा रक्तवाहिनीचा दाब तसाच राहिलेला नाही ना, याची खात्री करावी लागते.
ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या जीवघेण्या वेदनेवरच्या उपचारांच्या इतिहासात गेलो तर वेळोवेळी मनुष्याने वेदना निवारणासाठी काय थरापर्यंत प्रयत्न केले आहेत हे बघून अचंबा वाटतो. पण आजच्या काळात, जेव्हा ही कळ येण्याचं कारण स्पष्टपणे कळूनसुद्धा ते दूर करणं सोडून इतर उपचार करण्यात रुग्ण वेळ घालवतात तेव्हा त्या अचंब्याचं रूपांतर दु:खात होतं.
पूर्वीच्या काळात चेहऱ्याला मिरचीची पूड चोळणं किंवा बिब्बा लावणं यांसारखे उपाय केले जायचे. तापलेल्या लोखंडाने चेहऱ्याच्या दुखणाऱ्या भागाला डाग देणं, धारदार चाकूने चेहऱ्यावर ओरखडे काढणं हेसुद्धा केलेलं दिसायचं.
कुठलीही वेदना घालवण्याचा अगणित वर्ष उपयोगात आणला गेलेला उपाय म्हणजे दारू. दारू प्यायल्यावर सर्व चेतासंस्थाच बधिर होते त्याचबरोबर दुखऱ्या नसासुद्धा बधिर होऊन काही काळ दुखणं थांबतं. त्याचप्रमाणे मेंदूसुद्धा बधिर झाल्यामुळे वेदनेची संवेदना व्यवस्थितपणे समजत नाही.. काही असले तरी दारू उतरल्यावर परत दुखणे सुरू होते. याच तत्त्वावर आधुनिक काळात न्यूराल्जियाच्या वेदनेसाठी नसांमधले संदेशवहन कमी करून मेंदूतील वेदनेबाबतची संवेदनक्षमता बधिर करणारी औषधं दिली जातात. अर्थातच या औषधांचा तात्पुरता परिणाम ओसरल्यावर परत दुखणं सुरू होतं आणि म्हणूनच काही वेळानं ही औषधं परत परत घ्यावी लागतात.
आजाराची तीव्रता जशी वाढत जाते तशी या बधिर करणाऱ्या औषधांची मात्रा वाढत जाते. त्यांचे दुष्परिणाम दिसू लागतात. विस्मृती, तोल जाणं, मानसिक औदासीन्य, ग्लानी अशी चेतातंतू बधिर झाल्यामुळे दिसणारी लक्षणं दिसू लागतात. कार्यक्षमता कमी होणं, लैंगिक समस्या दिसू लागणं अशा तक्रारीसुद्धा ऐकू येतात. यापैकी काही औषधे अनेक दिवस घेतली तर यकृत आणि रक्तपेशींवर परिणाम होऊ शकतो. एका बाजूला कळ येण्याची धास्ती तर दुसऱ्या बाजूला औषधांचे नको वाटणारे परिणाम या कचाटय़ात हे रुग्ण सापडू शकतात.
आजाराचं कारण सोडून फक्त लक्षणांना दाबण्याचं काम वेदनाशामकं करत राहतात. मात्र दरम्यान, काळानुसार रक्तवाहिनी नसेत अधिकाधिक खोल घुसत गेल्यानं आजाराची तीव्रता वाढत असते. याचा अर्थ औषधं घेणंच चुकीचं आहे असा नाही. आजाराच्या सुरुवातीच्या काळात छोटय़ा मात्रेत औषधं घेतली जाऊ शकतात. पण वेदनेचं मूळ कारण दूर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे याची पूर्ण जाण ठेवूनच.
आता दुसऱ्या बाजूला ट्रायजेमिनल नसेचा एखादा भागच रेडिओफ्रिक्वेन्सी लहरींनी किंवा इतर मार्गानं जाळणं किंवा कापणं असे उपचारसुद्धा अगदी आजही उपलब्ध आहेत. याचा सर्वात आधुनिक आविष्कार म्हणजे रेडिएशननं नसेचा भाग जाळणं ज्याला ‘गॅमा नाईफ’ असंही म्हणतात.
या सर्व उपचारांपैकी कुठलाही उपचार चुकीचा आहे असे नाही. पण एक तर या उपचारांचा परिणाम काही काळच टिकतो. दुसरं म्हणजे नसेतले काही चेतातंतू जळल्यामुळे त्या नसेमध्ये कायमचा बदल होतो. शिवाय, आजाराचं मूळ कारण दूर करणं सोडून नसेच्या एखाद्या भागाला इजा करून वेदना घालवणं हे न्यूरोसर्जरीच्या आजच्या युगात किती योग्य, याचा विचार गांभीर्यानं करणं गरजेचं आहे. ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ हे अट्टहासाने करावं का? हा ज्यानं त्यानं ठरवण्याचा मुद्दा.. हा सर्वच विचार रुग्णांनाही व्यवस्थित आणि पूर्वग्रह बाजूला करून समजावून सांगणं गरजेचं आहे असं मला हे रुग्ण बघताना वारंवार जाणवतं.
शस्त्रक्रियेत धोके असतात आणि इतर उपचार पद्धतीत धोके नसतात हा अजून एक परंपरागत गैरसमज. किंबहुना ‘साधे वाटणारे उपचार आधी करून बघू’ हा कुठल्याही व्यक्तीला सहजपणे पटणारा तर्क त्याला सांगताना या उपचारांमुळे बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही ना ? हे उपचार करताना त्याचे दुष्परिणाम बघून ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी स्थिती तर येणार ना ? हे तात्पुरते उपचार केल्यानं आजार कायमचा बरा करण्याची क्षमता असलेली शस्त्रक्रिया निष्प्रभ होणार नाही ना, याचा विचार झालाच पाहिजे.
औषधासकट सर्व उपचारांमध्ये धोके असतात. मात्र आजार कायमचा बरा करण्याची क्षमता एमव्हीडी शस्त्रक्रियेतच आहे हेच सत्य आहे.
मायक्रोव्हॉस्क्यूलर डीकॉम्प्रेशन- (एमव्हीडी) ही शस्त्रक्रिया या आजाराचं मूळ कारण दूर करण्यासाठी तयार झालेली आहे.
या शस्त्रक्रियेत ट्रायजेमिनल नस आणि त्यावर दाब आणणाऱ्या रक्तवाहिन्या एकमेकांपासून दूर करून त्यामध्ये टेफ्लॉन नावाच्या वस्तूचा स्पंज ठेवला जातो आणि त्यामुळे स्पंदनयुक्त दाब नाहीसा होतो. मी मागेच लिहिल्याप्रमाणे डॉ. पीटर जॅनेटा यांनी ही शस्त्रक्रिया प्रथम केली. या शस्त्रक्रियेवर अनेक शोधनिबंध लिहिले गेले आहेत. पुण्यात कार्यरत असलेल्या एमव्हीडी शस्त्रक्रिया संस्थेनंही या विषयावर निरंतर काम केलं आहे. डॉ. जॅनेटा यांच्या कार्याची आणि नैपुण्याची प्रेरणा अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायक आहे. पीटर जेनेटा यांचा या शस्त्रक्रियेचा अनुभव, त्यांचे शोधनिबंध आणि भावी पिढीसाठी केलेली आव्हानं यांतले काही निष्कर्ष देऊन हा विषय इथे संपवतो.
हे निष्कर्ष असे..
* एमव्हीडी ही शस्त्रक्रिया ट्रायजेमिनल आजाराच्या पहिल्या काही वर्षांत केली तर त्याचे परिणाम उत्कृष्ट असतात.
* ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियावरील इतर उपचारांच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया रुग्णाला जास्तीत जास्त काळापर्यंत वेदनामुक्त ठेवू शकते. या शस्त्रक्रियेनं बहुसंख्य रुग्ण कायमचे वेदनामुक्त होऊ शकतात.
*अगदी तरुण वयापासून ते वृद्धांपर्यंत ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते. किंबहुना पीटर जॅनेटा यांनी एका ठिकाणी नमूद केल्यानुसार वृद्धांमध्ये ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्टय़ा अधिक सोपी असते. हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मध्यवयात वा सत्तरीमध्ये ही करता येत नाही असा नाहक गैरसमज अगम्य कारणाने पसरलेला दिसतो.
*ही शस्त्रक्रिया ज्या केंद्रांमध्ये नियमित केली जाते, ज्या सर्जन व एकूणच टीमला या शस्त्रक्रियेचा जास्त अनुभव असतो, अशा ठिकाणी ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
* नसेला हानी पोहोचवणारे इतर उपचार करण्याआधी जर एमव्हीडी शस्त्रक्रिया केली तर तिचे सर्वोत्कृष्ट परिणाम दिसतात. उदाहरणादाखल, रेडिओफ्रीक्वेन्सी लहरींनी नसेतील काही तंतू जाळणे किंवा नसेत अल्कोहोल टोचून नस बधिर करणे यांसारख्या उपायांच्या आधी एमव्हीडी शस्त्रक्रिया केली तर तिचे परिणाम चांगले होण्याची शक्यता अधिक.
डॉ. जॅनेटा यांच्या या निरीक्षणांचे रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी नीट वाचन करून बोध घ्यावा.
लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.
brainandspinesurgery60@gmail.com