विजया जांगळे
‘जो पैसे भरणार नाही, त्याचं ब्लू टिक राहणार नाही…’ इलॉन मस्क आपल्या या घोषणेवर ठाम राहिले आहेत आणि आता एकामागोमाग एक सेलिब्रिटी, माध्यमसंस्था, नेत्यांच्या ट्विटर खात्यापुढची ब्लू टिक नाहीशी होऊ लागली आहे. आजवर ज्यांना या टिकचा अभिमान होता, त्यांना आता ती गेल्याचं काहीच वाटेनासं झालं आहे. ज्यांची टिक अद्याप कायम आहे, त्यांनाही आता ती नकोशी झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत टिक काढून घेण्याचं काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि तरीही बहुतेक ‘टिकधारी’ पैसे न भरण्यावर ठाम आहेत. असं का झालं? ब्लू टिकचं महत्त्व समजून घेण्यासाठी ती का सुरू करावी लागली, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
झालं असं की, अँथनी (टोनी) ला रुसा या अमेरिकन बेसबॉलपटूच्या नावाने एक बोगस ट्विटर खातं तयार करण्यात आलं होतं. त्या खात्यावरून २००९ मध्ये काही माजी बेसबॉलपटूंच्या मृत्यूविषयी विनोद करण्यात आले होते. टोनी यांनी ट्विटरविरोधात खटला भरला. नंतर त्यांनी तो मागेही घेतला, मात्र त्यामुळे एखाद्या प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तीचं किंवा महत्त्वपूर्ण संस्था, कंपन्यांचं खरंखुरं अकाउंट कोणतं, हे दर्शवण्यासाठी त्यांच्या खात्यासमोर ब्लू टिक करण्यास सुरुवात झाली. टिकमागचा मूळ उद्देश विश्वासार्हता निश्चित करणं हा होता. अर्थात ही टिक देण्यासाठी फॉलोअर्स आणि लोकप्रियतेसारखे काही निकषही निश्चित करण्यात आले होते.
ब्लू टिकवर आक्षेप काय?
ब्लू टिकच्या निकषांत स्पष्टता नाही. ट्विटर एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करतं आणि त्या विचारसरणीविरोधात असणाऱ्यांना ब्लू टिक दिलं जात नाही, त्यांची ट्विट्स बॅन केली जातात, लहान-मोठ्या कारणांवरून अकाउंट्स ब्लॉक केली जातात, अशी तक्रार असणाऱ्यांचा एक वर्ग होता. इलॉन मस्क यांच्या मते ब्लू टिक हे वर्गभेदाचं प्रतीक होतं. त्यांच्या मते शुल्क आकारून ते हा भेद दूर करत आहेत. ‘तुम्ही जेवढे पैसे मोजता तेवढंच तुम्हाला मिळतं,’ अशी म्हण त्यांनी ट्वीट केली होती. हा वर्गभेद दूर करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या सशुल्क टिकच्या सबस्क्रिप्शनला ‘ट्विटर ब्लू’ असं नाव देण्यात आलं आहे.
मालकी इलॉन मस्ककडे गेल्यानंतरचे बदल…
इलॉन मस्क हे स्वतःला अनिर्बंध अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते म्हणवतात. त्यामुळे त्यांनी ट्विटर खरेदी करण्यापूर्वीच आपण कोणतंही खातं ब्लॉक करणार नाही, असं जाहीर केलं होतं. त्यांनी कंपनी खरेदी केल्याबरोबर अल्पावधीत प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात केली. आपण कंपनी खरेदी करण्यापूर्वी जगभरातील ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची संख्या आठ हजारांच्या घरात होती आणि आज अवघे पंधराशे कर्मचारी शिल्लक आहेत, असं त्यांनी नुकतंच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘नोकरकपात केली नसती तर कंपनी दिवाळखोरीत निघाली असती आणि मग कोणाकडेच नोकरी उरली नसती, त्यापेक्षा मी काहींच्या नोकऱ्या टिकवण्याचा निर्णय घेतला,’ असं कारण त्यांनी दिलं. ट्विटर ब्लूच्या सबस्क्रिप्शनवर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी महसुलाचंच कारण दिलं आहे. ‘आम्हाला काहीतरी करून बिलं भरावी लागतात’, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
पैसे देण्यास विरोध का?
ज्यांना शुल्क लागू होण्याआधीच ब्लू टिक मिळली आहे, अशा अकाउंट्सना ‘लीगसी अकाउंट’ म्हणून संबोधलं जातं. अशी अकाउंट्स असणाऱ्यांत कोट्यधीशांची संख्या प्रचंड आहे. शिवाय ट्विटर ब्लूचं सबस्क्रिप्शन प्रतिष्ठितांना आणि बड्या संस्थांना न परवडण्याएवढं महागही नाही. तरीही अनेकांनी पैसे भरण्यास नकार दिला आहे. लीगसी अकाउंटधारकांपैकी अनेकांना आता त्यांची ब्लू टिक नकोशी झाली आहे. आम्ही इलॉन मस्क यांच्याशी सहमत नाही. ब्लू टिक कायम राहिल्यास आमचा त्यांच्या धोरणांना पाठिंबा आहे, असा गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे आम्हाला आता टिक नको, अशा स्वरूपाची ट्वीट्स केली जात आहेत. काहींना तर आता ट्विटरवर राहण्यात अर्थच नाही, असं वाटतं. कोणीही आमच्या नावे अकाउंट उघडेल, टिक खरेदी करेल आणि मनमानी ट्वीट करेल, यातून आमची बदनामी होईल, अशी भीती ते व्यक्त करत आहेत.
नेमकं खरं अकाउंट कसं ओळखणार?
२ एप्रिलला ट्विटरने व्हेरिफाइड अकाउंटची माहिती देणारा मजकूर बदलला. त्यात ‘हे खातं व्हेरिफाइड आहे कारण, त्या खात्यासाठी एकतर ट्विटर ब्लूचं सबस्क्रिप्शन घेण्यात आलं आहे किंवा ते लीगसी अकाउंट आहे,’ असं म्हटलं आहे. त्यामुळे मुळात ब्लू टिक कमावलेलं खातं कोणतं आणि विकत घेतलेलं खातं कोणतं हे जाणून घेण्याचा पर्यायच राहिलेला नाही.
किती पैसे भरावे लागणार?
ट्विटर ब्लूच्या सबस्क्रिप्शनसाठी संकेतस्थळावरून ट्विटर वापरणाऱ्यांना दरमहा ६५० आणि मोबाइल ॲप वापरणाऱ्यांना दरमहा ९०० रुपये भरावे लागणार आहेत. वर्षभराचं सबस्क्रिप्शन एकदाच घेणाऱ्यांना सहा हजार ८०० रुपये एवढं शुल्क आकारण्यात येईल, त्यामुळे त्यांचं दरमहा शुल्क ५६७ रुपये एवढं होईल. अमेरिकेत दरमहा आठ डॉलर्स आकारण्यात येणार आहेत. आयफोन किंवा आयपॅडवरून ट्विटर वापरणाऱ्यांना दरमहा ११ डॉलर्स भरावे लागतील. संस्थांच्या खात्यांसाठी दरमहा हजार डॉलर्स भरावे लागतील.
सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना ‘ग्राहकां’चे अधिकार?
एखाद्या सेवेसाठी एक रुपयाचंही शुल्क आकारलं की ते भरणारी व्यक्ती ग्राहक ठरते आणि त्यासोबत त्या व्यक्तीला ग्राहकाचे अधिकारही मिळतात. आजवर सेवा निःशुल्क होती, त्यामुळे ट्विटर एखादं खातं ब्लॉक करू शकत होतं किंवा एखादं ट्वीट बॅन करू शकत होतं. त्या माध्यमावरच्या मजकुरावर अल्प प्रमाणात का असेना कंपनीचं नियंत्रण होतं. आता सबस्क्रिप्शन घेणारे ट्विटरचे ग्राहक ठरतील. त्यांनी आक्षेपार्ह आशय ट्वीट केला तर कंपनीचे त्यांच्यावर नियंत्रण राहील का, अशा ग्राहकाचं अकाउंट ब्लॉक केलं, तर ती व्यक्ती किंवा संस्था ग्राहक हक्क कायद्यानुसार दाद मागू शकेल का, असे प्रश्नही उपस्थित होतात.
या सबस्क्रिप्शनच्या मोबदल्यात काही विशेष सेवा-सुविधाही मिळणार आहेत. सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना कमी प्रमाणात जाहिराती दाखविल्या जातील, अधिक लांबीचे व्हिडीओ ट्वीट करता येतील, त्यांच्या ट्वीट्सना अधिक ठळकपणे प्रमोट केलं जाईल, ट्वीट केल्यानंतर काही ठरावीक वेळात ते एडिट करता येईल.
इतर ॲप्स अनुकरण करण्याची शक्यता
ट्विटरच्या पावलावर पाऊल ठेवून अन्य समाजमाध्यम कंपन्यांनीही आपापल्या महसुलात भर घालण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल जाहिरातींचा ओघ आटत असताना, महसुलात भर घालण्यासाठी हा पर्याय अधिकाधिक समाजमाध्यम कंपन्या स्वीकारतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी बहुतेक लीगसी अकाउंट्सनी ब्लू टिकसाठी पैसे भरण्यास नकार दिला आहे. कारभार इलॉन मस्क यांच्या हाती गेल्यापासून घेण्यात आलेल्या वादग्रस्त निर्णयांत आणखी एकाची भर पडली आहे.
vijaya.jangle@expressindia.com