शाहू पाटोळे
धगधगत्या मणिपूरच्या विषयावर केंद्र सरकारची बाजू दोन महिन्यांच्या अवकाशानंतर कुणाला तरी जाहीरपणे मांडावीशी वाटली, याबद्दल खरे तर ‘युरोपीय संसदे’लाही धन्यवाद दिले पाहिजेत, कारण ज्या समस्येकडे समस्या म्हणून बघितले जात नव्हते, तो विषय युरोपीय संसदेत उपस्थित झाला; म्हणून हा प्रश्न देशांतर्गत असल्याची जाणीव संबधित यंत्रणांना झाली असावी आणि अखेर केंद्र सरकारच्या वतीने भारतीय मध्यामात ‘भाष्य’ करण्यास भाग पडले असावे. राम माधव यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिलेला लेख (हीलिंग टच, नॉट प्रोपगंडा- १५ जुलै) आणि ‘मणिपूरच्या शांततेत ‘प्रचार’ विघ्न’ हा ‘लोकसत्तामधील (१८ जुलै) लेख, हा अशा भाष्याचा नमुना ठरतो. वास्तविक देशांतर्गत मणिपूरच्या समस्येवर वेळीच ‘देशी इलाज’ केला असता तर युरोपीय संसदेसारख्या बाह्यशक्तींना भारताच्या अंतर्गत विषयावर बोलण्याची वा ‘अपप्रचार’ करण्याची संधीच मिळाली नसती.
राम माधव हे मणिपूरसंबंधी जे ‘वास्तव’ लिहिताहेत त्यातील काही बाबी ते संदिग्धपणे सांगताहेत. जसे ते मणिपूरच्या भूगोलाबद्दल आणि भूभागाबद्दल सांगत असताना मध्येच लोकसंख्येच्या बाबतीत घोळ घालतात. ६० टक्के लोक इंफाळच्या खोऱ्यात राहतात, पण या खोऱ्यातीलच जमीन सुपीक आहे आणि बाकीची ९० टक्के जमीन सुपीक नाही; याबद्द्ल ते लिहीत नाहीत. ६० टक्के लोक ज्या सुपीक भागात राहतात ती जमीन त्यांना अपुरी पडते, हे वास्तव नाकारता येत नाही. पण ते त्या ६० टक्के मैतेईंमधून ते आठ टक्के मुस्लिमांना का वगळतात? या मणिपुरी मुस्लिमांची स्थानिक ओळख ‘मणिपुरी पांगल’ अशीच आहे. त्यांचीही भाषा ही मणिपुरी आहे. म्हणजेच मणिपुरी मुस्लिम जर आठ टक्के असतील तर, मैतेईंचा ‘टक्का’ वाढतो. लेखक सकळ मैतेईंमधून जसे मुस्लिमांना वगळतात तसे मैतेईंच्या लोकसंख्येत सुमारे आठ टक्के असलेल्या ‘सनामाही’ या वैष्णव-हिंदू नसलेल्या पण ‘पारंपरिक बहुदेववादी निसर्गपूजक ‘ मैतेईना’ कसे काय हिंदू म्हणून गृहीत धरतात? मैतेईंमधून मैतेई मुस्लिम वगळले, तर मग सनामाहीदेखील का वेगळे काढले नाहीत? महत्त्वाची बाब म्हणजे, लेखकाच्या म्हणण्यानुसार सकळ मैतेईंच्यांमध्ये ख्रिस्ती मैतेईंची संख्या पाच ते २० टक्के असेल, तर त्यांनाही ते ‘मैतेई’ असलेल्या पांगल मुस्लिमांसारखे ‘मैतेई ख्रिश्चन’ का म्हणत नाहीत? लेखकाच्या म्हणण्यानुसार ‘सगळेच मैतेई हे प्रामुख्याने हिंदू आहेत, पण त्यांच्यामध्ये ख्रिश्चन लोकसंख्या वाढत आहे – वेगवेगळ्या अंदाजानुसार ख्रिस्ती मैतेईंचे प्रमाण पाच टक्के ते २० टक्के असू शकते.’ लेखक ‘सगळेच मैतेई हे हिंदू’ असल्याचा तर्क कोणत्या आधारावर देतात? एकाच वाक्यात इतकी विसंगती कशी काय असू शकते? लेखकाला मुस्लिम, नागा आणि कुकी यांच्या लोकसंख्येची टक्केवारी जशी नेमकी माहीत आहे, तशी ख्रिश्चन मैतेईंचीही माहीत असायला हवी होती. ‘मैतेई ख्रिश्चनांची लोकसंख्या वाढत आहे,’ हे लेखक कशाच्या आधारावर म्हणत आहेत? हिंदू मैतेईंचे तिकडे धर्मांतर होत आहे की, मैतेई ख्रिश्चनांच्या प्रजनन-दरात ‘आवाजी’ वाढ झाली आहे? तिकडे राहून मैतेईंचे धर्मांतर करणारे कोण आहेत? कारण ईशान्य भारतात आता कुणी परदेशी ख्रिस्ती मिशनरी असण्याची शक्यता नाही आणि असतील तर केंद्र सरकारने त्यांच्या विरोधात सत्वर कारवाई करायला हवी.
ख्रिश्चनधर्मीय मैतेई काय अलीकडल्या आठनऊच वर्षांत ख्रिश्चन धर्मात गेले आहेत का? लेखक आणि माध्यमेसुद्धा, मैतेईना सतत हिंदू संबोधण्यासोबत ‘मैतेई जमात’ असेही संबोधतात! नागा, कुकी वा तिकडच्या अन्य तीसेक जमातींच्या सारखी मैतेई ही ‘एकवांशिक’ जमात आहे का? कुकी, नागा आणि अन्य जमातींमध्ये जशी जाती आणि वर्णव्यवस्था नाही, तशी एकसंध सामाजिक व्यवस्था मैतेईंच्यामध्ये आहे का? तसे असेल तर मग हिंदू असलेल्या मैतेईंच्यातच फक्त जाती आणि वर्णव्यवस्था का आहे?
लेखक हिंदू असलेल्या मैतेईंची बाजू घेऊन लिहितात, तेव्हा मणिपुरी हिंदूंमधील जाती आणि वर्ण व्यवस्थेबद्दल काहीच सांगत नाहीत. मैतेईंच्या सामाजिक व्यवस्थेत ब्राह्मणांपासून ते अस्पृश्यापर्यंत जाती आहेत की नाहीत? मणिपुरी शासकांच्या परवानगीने मणिपूर राज्यात १८९६ साली बाप्टिस्ट मिशनची स्थापना झाली होती, ती थंकुल नागांच्या प्रदेशात. तर इ .स. १८९३ साली ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी पहिली मणिपुरी अर्थात मैतेई स्त्री होती ती म्हणजे, निन्गोल काबोक्लेइ ( Ningol Kaboklei ). याचा अर्थ असा होतो की, मैतेईनी काही अलीकडेच ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला नाही. उलट लेखकाने याचा मागोवा घ्यायला हवा की, मैतेईंच्यामधील कोणत्या जाती वा वर्णाचे लोक ख्रिश्चन झाले आणि का झाले असतील? ख्रिश्चन मैतेईंमध्ये ओबीसी वा अनुसूचित जातीचे मैतेई आजही आहेत की नाही?
१९९० च्या दशकातील दंगलींचा हवाला देऊन लेखक एकीकडे म्हणतात की, ‘मात्र,धर्म किंवा इतर कोणत्याही अस्मितेशी या संघर्षाचा काहीही संबंध नाही. हे संघर्ष मुख्यत्वे लोकांच्या जगण्याशी संबधित समस्यांबद्दल आहेत. तणावामागे जमीन हे प्रमुख कारण आहे.’ या समस्येचे जमीन हे मूळ दुखणे असेल, तर मग लेखक मैतेईतील हिंदू ख्रिश्चन, मैतेई आणि मैतेई मुसलमान यांच्यातील दंगल वा नागा – कुकी यांच्यातील संघर्ष यावर लिहिण्यापेक्षा आत्ताची समस्या ताबडतोब कशी थांबवता येईल या बद्धल काहीही भाष्य करीत नाहीत.
मैतेईंची एक मुख्य मागणी आहे ती, मैतैईना ‘अनुसूचित जातीचा दर्जा’ देण्याची. मैतेईंच्या या मागणीला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे की नाही; यावर लेखक काहीच बोलत नाहीत. सरकार सरसकट सर्व मैतेईना ( हिंदू, सनामाही, ख्रिश्चन आणि मुस्लिम) ‘अनुसूचित जातीचा दर्जा’ देणार आहे की, निवडक जातींना? भविष्यात डोंगररांगांवर राहणाऱ्या ज्या मूळ जमाती आहेत, त्यांचा जातीय दर्जा कोणता असणार आहे? भविष्यात एकवेळ मैतेईतील काही जातींतील ख्रिश्चनांची ‘घरवापसी’ होऊ शकेल, असे लेखातील मांडणीवरून वाटते. नव्याने कुणाला कोणत्या जातीचा ‘दर्जा द्यायचा ‘ याची लोकशाहीमध्ये एक ‘प्रक्रिया’ आहे, मणिपूरच्या निमित्ताने याची जाणीव सरकारला आणि मणिपुरी जनतेला झाली असेल!
सतत पुढे केला जाणारा प्रश्न जमिनीचा. त्यासाठी ‘अफूची शेती, मादक पदार्थांचा व्यापार, कुकी आणि अन्य जमातींचे म्यानमार मधून होणारे तथाकथित स्थलांतर’ असे मुद्दे घेऊन अपप्रचार झाला. पण यामागचा मूळ मुद्दा कुठला असेल तर तो आहे, भारतीय राज्यघटनेने मणिपूरसाठी दिलेल्या विशेष ‘३७१ (सी)’ या कलमाचा! त्या कलमाबद्दल राम माधव यांनी, अथवा सत्ताधाऱ्यांशी जवळच्या कुणीही आजतागायत काहीच म्हटलेले नाही. केंद्र सरकारचे मौन तर कायमच आहे. मणिपूरमधील जमिनीचे ‘असमान वाटप’ झाल्याचा दावा मात्र विद्यमान सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारे करतात. हे वाटप समान करायचे असेल, तर अगोदर राज्य विधिमंडळापासून कलम ३७१ (सी) रद्द करण्याची कायदेशीर सुरुवात करावी लागेल किंवा काश्मीर साठीचे कलम ३७० जसे रद्द केले तसे हे कलम ३७१(सी) बाबत केंद्र सरकार करू शकेल.
मणिपूर संघर्ष पेटविण्यात माध्यमांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न राम माधव यांनी या लेखात मोठ्या खुबीने केलेला दिसतो. पण ख्रिश्चन आणि आदिवासींबद्दल ‘अपप्रचार’ करणाऱ्या कोणत्या शक्ती आहेत, याबद्दल कसलाही उल्लेख केलेला नाही. तरीही जाता जाता लेखक म्हणातात की, ‘कुकी ही म्यानमार आणि बांगलादेशातही असलेली ईशान्येकडील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय जमात आहे.’ त्याच वेळी ते हे विसरतात की, नागा जमाती जशा भारतात आहेत, तशाच त्या म्यानमारमध्येही आहेत. आणि हो; मैतेई जसे भारतात आहेत, तसेच ते म्यानमार आणि बांगलादेशातही आहेत! मग कुकींच्याप्रमाणे लेखक त्यांना ‘आंतरराष्ट्रीय धर्मीय’ का ठरवत नसावेत?