विनय सहस्रबुद्धे
यंगूनच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात लोकमान्य टिळकांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडलेचा प्रवास झाला. तोही १ ऑगस्ट हा त्यांच्या पुण्यतिथीचा मुहूर्त साधून..
परवाच्या १ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास आमचं विमान मांडले किंवा मंडालेला उतरलं. पाठय़पुस्तकात आपण मंडाले असं वाचलं असलं तरी अलीकडच्या काळात आणि इथे मात्र या शहराला मांडले असंच म्हणतात! लोकमान्यांच्या आठवणी आणि आख्यायिका’ या टिळकभक्त स. वि. बापट यांनी संपादित केलेल्या पुस्तकामधील (परम मित्र प्रकाशन) लोकमान्यांच्या मंडाले वास्तव्याच्या काळातल्या त्यांनी नोंदविलेल्या अनेक प्रसंगांच्या इथे उतरताच आठवणी मनात येऊन गेल्या.
आत्ताचा म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश! ईशान्य भारताच्या चार राज्यांची सीमा या शेजारी राष्ट्राला भिडलेली आहे. शिवाय खूप जुन्या काळापासून आपले परस्परसंबंधही आहेत. पण असं असूनही आपली अवस्था दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी; अशी! त्यामुळेच ब्रह्मदेशाबद्दल कुतूहल होतं आणि जमेल तेव्हा तिथे जाण्याची तीव्र इच्छाही. खरं तर २०२० मध्ये लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी मांडले शहरात प्रत्यक्ष जाऊन, शक्य झालंच तर तिथे; जिथे टिळक कारावासात होते – त्या तुरुंगामध्ये जाऊन हा कार्यक्रम करावा असा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेत आमचा विचार होता. पण करोनाच्या साथीच्या त्या दिवसांत ते शक्य झालं नाही. पण त्या वर्षी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने दिलेल्या आणि विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेल्या लोकमान्यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरण मांडलेच्या भारतीय वकिलातीत एका कार्यक्रमात घडून आले.
त्या वेळी करोनामुळे हुकलेला तो भाग्ययोग या वर्षी मात्र जुळून आला. यंगूनच्या आमच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात लोकमान्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे जायचं होतंच; त्याला जोडून मग मांडलेचा प्रवासही ठरविला, आणि तोही चक्क १ ऑगस्टचा मुहूर्त साधता येईल या पद्धतीने.
मांडले किंवा मंडालेला जायला भारतातून थेट विमानसेवा नसल्यातच जमा आहे. त्यामुळे मग बँकॉकला जाऊन थेट मांडले गाठले. सुमारे साडेबारा लाख लोकसंख्येचं हे शहर. त्याचा थोडासा अलीकडचा, आधुनिक भाग सोडला तर आपल्या धुळे, जळगावसारखंच. शहराच्या बाजूबाजूने इरावती नदी वाहते, तिच्या नावाचा इथला उच्चार इरावदी. १ ऑगस्टच्या संध्याकाळी तिथल्या भारतीय वकिलातीने टिळक पुण्यतिथीचा विशेष कार्यक्रम योजला होता. पुतळा नेहमीसाठी स्थापित असला तरी तो कार्यक्रमापुरता व्यासपीठावर आणण्यात आला होता. खुद्द मांडलेसारख्या टिळकांच्या तपोभूमीत, अगदी टिळक जिथे राहायचे तिथे नाही, तरी तिथून जवळच भारतीय वकिलातीत या कार्यक्रमाला १ ऑगस्टच्याच दिवशी उपस्थित राहायला मिळालं याचं खूप समाधान मनात होतं.
भारतीय वकिलातीच्या आवारातच आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या स्तंभाला लागून तीन शिलालेख पूर्वीच लावले आहेत. त्यात लोकमान्य टिळक, लाला लाजपतराय आणि नेताजी सुभाष या तीनही स्वातंत्र्यसैनिकांनी मांडलेच्या कारावासात काही ना काही काळ घालविला असल्याची तपशीलवार नोंद आहे. कार्यक्रमाला स्थानिक भारतीय, तसेच मांडले इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीमधील काही बर्मिज आणि काही भारतीय प्राध्यापकही होते. मांडलेमध्ये भारतीय नृत्य शिकविणाऱ्या एका शिक्षिकेसह काही विद्यार्थिनीही होत्या.
मांडले शहराच्या काहीशा सीमावर्ती भागात श्वे नादॉ नावाचा राजप्रासाद आहे. आज तिथे लष्कराचे एक कमांड मुख्यालय आहे. राजवाडा पर्यटकांना खुला आहे खरा, पण फार कुणी येत नसावेत असं तिथल्या वातावरणावरून वाटलं. राजवाडय़ात अनेक दालने आहेत. मध्यवर्ती दालनात ब्रह्मदेशचा राजा थिबॉ आणि त्याची राणी यांचा पुतळा मधोमध मांडून ठेवलेला आहे. मुख्य दालनाच्या मागे एक वस्तुसंग्रहालयदेखील आहे. त्यात राजघराण्यातील राजे आणि राजपुत्रांनी वापरलेली शस्त्रे, त्यांचे काही अंगरखे, राजे आणि राण्या यांची छायाचित्रे आणि क्वचित काही पोर्ट्रेटट्स तसेच राजदरबारातील पदाधिकाऱ्यांचे काही पुतळे असा सगळा ऐवज आहे.
याच वस्तुसंग्रहालयाच्या पिछाडीस पूर्वी तुरुंग होता आणि त्यातल्याच एका बराकीत लोकमान्य टिळक कैदेत होते, असं सांगण्यात आलं. आज त्या मोकळय़ा, ओसाड जागेपर्यंत जाण्यालाही बंदी आहे. तिथल्या व्हिजिटर्स बुकमध्ये मी लोकमान्यांच्या या तपोभूमीत, जिथे ‘गीतारहस्या’ची रचना झाली तिथे किमान एखादा फलक आणि टिळकांचे तैलचित्र लावायला सरकारची अनुमती हवी, अशी मागणी नोंदवली. दुसऱ्या दिवशी यंगूनला सध्याच्या सरकारमधील एका महिला राज्यमंत्र्याची भेट झाली. त्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माजी शिष्यवृत्तीधारकांपैकी एक! त्यांना ‘वैशिष्टय़पूर्ण शिष्यवृत्तीधारक’ पुरस्कार देण्याचा छोटेखानी कार्यक्रम यंगूनमधील आमच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात होता. भारताचे म्यानमारमधील राजदूत विनय कुमार हेही कार्यक्रमात होतेच. त्यांनी या विषयात विद्यमान सरकारचं मन वळविण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. या सर्व विषयातला लक्षात घेण्याजोगा आणखी एक मुद्दा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मांडलेमधील वास्तव्याचं आणि ‘गीतारहस्या’चे जे महत्त्व आपल्या लेखी आहे त्याची योग्य जाणीव म्यानमारच्या शासन व्यवस्थेत निर्माण करण्यासाठीचे आपले प्रयत्न निदान आणखी खूप तीव्र आग्रहाचे आणि गतिशील करण्याची गरज आहे! चांगली गोष्ट अशी की अलीकडेच काही वर्षांपूर्वी एक उच्चपदस्थ भारतीय राजनयिक अधिकारी त्या वेळच्या एका वरिष्ठ म्यानमार नेत्याला भेटला तेव्हा त्या नेत्याने ‘गीतारहस्य’ ग्रंथाविषयी कुतूहल दाखविले होते आणि आपल्याला हा ग्रंथ बर्मीज भाषेत उपलब्ध झाला तर तो आपण जरूर वाचू असंही तोंड भरून सांगितलं होतं. आता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने पुढाकार घेऊन ‘गीतारहस्या’चा बर्मीज भाषेत अनुवाद करण्याचं काम सुरू केलं आहे आणि यंगूनला राहणारे आणि इथेच जन्मलेले आणि वाढलेले शांतीलाल शर्मा हे हिंदी भाषी गृहस्थ या कामात सध्या व्यग्र आहेत. दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री असताना म्हणजे १९७८ मध्ये त्यांनी मांडलेला भेट देऊन राजवाडय़ाच्या पिछाडीला असलेल्या त्या जागेची समक्ष पाहणी करून टिळकांच्या स्मारकवजा स्मृतिस्तंभाची मागणी नोंदवली होती, अशी माहिती यंगूनमधील काही जुन्या भारतीय मंडळींनी दिली. २००५ मध्ये भैरोसिंग शेखावत यांनीही उपराष्ट्रपती या नात्याने या जागेवर जाण्याचा आग्रह धरला होता आणि ते जाऊनही आले होते. टिळकांची कोठडी इथेच होती, असं त्यांना सांगण्यात आलं, तेव्हा भैरोसिंग शेखावत यांनी तिथे साष्टांग नमस्कार घातला आणि तिथली माती कपाळाला लावली, असं त्या वेळी त्यांच्या बरोबर असणाऱ्यांनी विस्तृत तपशिलासह सांगितलं.
दुसऱ्या दिवशी यंगूनला आलो. सुमारे ७० लाख लोकसंख्येचं हे शहर या देशातलं सर्वात मोठं शहर. कोलकात्यात असल्याचा भास होत राहतो इतका दोन्ही शहरांचा तोंडवळा सारखा आहे. शहरात भारतीयांची संख्या एक लाखाच्या घरात आहे. ब्रिटिशांच्या काळात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मोठय़ा प्रमाणात मजुरीसाठी येऊन इथेच स्थायिक झालेली कुटुंबेही लक्षणीय आहेत. म्यानमारच्या बगान नावाच्या शहरात तर खूपच मोठय़ा संख्येने मुळातले भारतीय राहतात. त्यांच्यात तमिळनाडूमधून इतिहासकाळात इथे येऊन स्थायिक झालेल्यांमध्ये चेट्टियार समाजाचे प्रमाण मोठे आहे. शिवाय छोटय़ा-मोठय़ा संख्येत बंगाली, ओरिया, मारवाडी आणि गुजराती लोकही आहेत. भारतीय टीव्हीएस कंपनीची दुचाकी वाहने आणि बजाजच्या रिक्षा सर्वत्र दिसतात. पण गंमत म्हणजे सध्याच्या लष्करी राजवटीचा नियम आहे की कुठल्याही पोलीस अथवा लष्करी चौकीवरून तुम्ही जात असाल तर दुचाकीवरून उतरणे बंधनकारक आहे. अशा वेळी तेवढय़ा अंतरापुरते हाताने दुचाकी ओढत घेऊन जाण्यास पर्याय नाही.
एकूण १३ प्रांत असलेल्या म्यानमारची राजधानी आहे न्याप्यीताव हे नवे शहर. यंगून या जुन्या राजधानीच्या उत्तरेला लष्करशाहांनी नव्याने वसविलेल्या या शहरात जाणे तितके सोपे नाही. देशोदेशींच्या राजदूतांना राजनैतिक कामांसाठीसुद्धा पूर्वअनुमतीशिवाय इथे सहजासहजी जाता येत नाही. यंगूनमध्ये नाही तरी मांडले आणि उत्तरेकडच्या भागात चीनची छाया जाणीवपूर्वक निरीक्षण करणाऱ्यांना जाणवेल अशीच आहे. शान हा प्रांत तर जवळजवळ पूर्णत: चीनच्याच ‘प्रभावाखाली’ आहे. इतरही काही प्रांतांत चीनचा प्रभाव जाणवण्यासारखा आहे. खुद्द मांडले शहरात आणि आजूबाजूच्या परिसरांत चीनमध्ये कायम वास्तव्याला असलेल्या अनेकांनी मधल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. शिवार स्थानिक ऊर्जा निर्माण उद्योगावरही चिनी उद्योगपतींची पकड आहे. इथले कच्चे खनिज तेल मोठय़ा प्रमाणात शुद्धीकरणासाठी चीनमध्ये जाते आणि चढय़ा भावाने ते पुन्हा इथेच खरेदीही केले जाते.
१९६२ पासून थेट आजपर्यंत मधल्या पाच वर्षांचा कालखंड वगळला तर या देशात निरंतर लष्कराचीच राजवट राहिली आहे. मधल्या काळात स्टेट काऊन्सेलर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पण पंतप्रधान दर्जाच्या पदावर ज्या निवडून आलेल्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यू ची यांचे वडीलही लष्कराचे अधिकारीच होते. लष्कराने स्यू ची यांच्याकडे सत्ता सोपविताना या देशाच्या राज्यघटनेत अशी तरतूद केली होती की लष्कराने नियुक्त करावयाच्या २५% खासदारांच्या मदतीशिवाय घटनेत दुरुस्ती करून लष्कराला वळसा घालून पुढे जाणे अशक्य व्हावे. पण स्यू ची यांनी इतके घवघवीत यश मिळविले की उद्या आपल्या अधिकारांवर गदा येऊ शकते अशी लष्कराची धारणा झाली. तीन वर्षांपूर्वी स्यू ची यांची गच्छंती होऊन पुन्हा लष्कराने सत्ता काबीज करण्याच्या घटनाक्रमाचा उद्गम लष्कराला वाटणाऱ्या या संभावनेत आहे. आजमितीस लष्कराची पकड घट्ट आहे, परंतु जनतेत स्वीकार्यता मिळविणे या राजवटीला अद्याप शक्य झालेले नसल्याने वातावरणात एक प्रकारची हतबलता आहे. काहींचे असेही म्हणणे आहे की ७९ वर्षीय आंग सान स्यू ची यांनी थोडय़ा सबुरीने आणि चतुराईने, घाई न करता हालचाली केल्या असत्या, थोडे चुचकारून लष्कराला काबूत ठेवले असते तर मध्यंतरीची लोकशाही इतकी अल्पजीवी ठरली नसती.
संयुक्त राष्ट्र संघ आणि अमेरिका व अन्य राष्ट्रांनी लष्करी राजवटीला विरोध म्हणून बरेच प्रतिबंध आणले आहेत. पण त्यामुळे आपल्या उत्तरेकडच्या शेजारी राष्ट्रांचे चांगलेच फावले आहे ही बाब नाकारता येण्याजोगी नाही. एका प्राध्यापकाने सांगितले की आमच्या देशातल्या लोकशाहीबद्दल जगात सर्व जण चिंता व्यक्त करतात आणि आमच्यावर प्रतिबंध लादतात. पण थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी देशांतही अस्सल लोकशाहीची तशी वानवाच आहे. ‘आम्हाला मात्र सर्वाचा उपदेश आणि त्यांच्यावर मात्र कोणतेही प्रतिबंध वगैरे काहीच नाहीत,’ असेही त्यांचे म्हणणे आहे. भारतासाठी अर्थातच तारेवरची कसरत अपरिहार्य आहे. ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ यासारख्या स्थितीमुळे आपण ‘पुरस्कार नाही पण प्रतिबंधांच्या परिणामांचेही यथायोग्य भान’ असे धोरणात्मक पातळीवरचे विवेकपूर्ण संतुलन साधून पुढे जाताना दिसतो आहोत आणि सद्य:स्थितीत त्याला काही पर्यायही नाही.
लोकपातळीवरही म्यानमारमधील जनतेच्या मनात ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे भारतीय सैनिक अनेकदा वसाहतकाळाचे प्रतिनिधी मानले जातात. त्यांच्या पाठोपाठ बाहेरून आलेले बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, मणिपूर आणि ईशान्य भारतातील अन्य लोक यांच्याविषयीदेखील इथे ममत्व, आपलेपणा आढळत नाही. पूर्वीच्या काळी ब्रह्मदेशीय नागरिक भारतीयांना ‘कला’ म्हणजे वर्णाने काळा असे म्हणत असत, असंही जुन्या मंडळींनी गप्पांमध्ये सांगितलं. अर्थात भारतीय योगशास्त्र, आयुर्वेद आणि भारतीय चित्रपट इथेही लोकप्रिय आहेतच. मांडले शहरात सकाळच्या वेळी उद्यानांमधून योग वर्ग चाललेले आढळले आणि यंगूनमध्ये हिंदी शिकण्याबाबत एतद्देशीय लोकांमध्ये उत्सुकताही दिसून आली. ललन देसाई नावाची एक मराठी महिला यंगूनच्या सांस्कृतिक केंद्रात कथक आणि भरतनाटय़मचे वर्ग घेते आणि त्यांना बर्मीज लोकांचाही चांगला सातत्यपूर्ण प्रतिसाद आहे.
मांडले शहर असो की यंगून, दुकानांमधून सर्वत्र स्त्रियाच मोठय़ा प्रमाणावर काम करताना दिसतात. इथल्या समाजात लग्न न करता आई -वडिलांच्या साथीने राहणाऱ्या जबाबदार स्त्रियांचे प्रमाण अलीकडे वाढत असल्याचे जाणकारांनी सांगितले. इथल्या तरुणांमध्ये मादक द्रव्यांच्या सेवनाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढतेय. भारताचा ईशान्य भाग आणि विशेषत: मणिपूर, नागालँड, मिझोरम; म्यानमार आणि थायलंड हा मादक द्रव्य व्यापारातला सुवर्णत्रिकोण आजही सक्रिय आहे असं माहीतगार सांगतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मणिपुरातील सध्याच्या स्थितीचा संदर्भ हा या देशातील सामाजिक-आर्थिक स्थितीशी आणि इथल्या राज्यकर्त्यांच्या भारतविषयक भूमिकेशी जोडता येण्याजोगे अनेक घटक इथल्या वस्तुस्थितीत आहेत.
शेवटी एक सांगायला पाहिजे ते हे की, दोन्ही देशांत म्हणावे तसे भाषासेतू निर्माण झालेले नाहीत. संस्कृत आणि पाली या भाषा इथे शिकविल्या जातात, पण बर्मीज भाषा भारतात फक्त एकाच विद्यापीठात शिकविली जाते. हे प्रमाण वाढायला हवे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते याचे भान आपल्यामध्ये आणखी लख्ख असायला हवे. ऐतिहासिक, प्राचीन काळात झालेल्या विश्वसंचाराच्या पाऊलखुणा आजही सर्वत्र आहेत. पण आता आपण नुसते त्याबद्दल समाधान मानून स्वस्थ बसणे पुरेसे नाही. वैश्विकीकरण झालेल्या आजच्या जगात आपल्या संगीताला, आपल्या चित्रपटांना, फार काय आपल्या योगशास्त्रालाही वैश्विक स्पर्धेत आव्हान देणारे घटक सर्वदूर आपला प्रभाव निर्माण करीत आहेत. अशा वेळी आपली आपल्या शेजार-भाषांच्या संदर्भात तसेच भारतीय कला आणि पारंपरिक भारतीय ज्ञान-क्षेत्राच्या वैश्विक प्रभावासंदर्भात विचारपूर्वक बनविलेली एक धोरणचौकट असायला हवी. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद सध्या याच विषयात अधिक सक्रियतेने काम करीत आहे.
vinays57@gmail.com