शफी पठाण
‘‘अर्वाचीन मराठी साहित्यातील असे कोणते पुस्तक हजारो खेड्यांतून गेले? आमचे सारे साहित्य शहरी असते. शहरातील काही सुशिक्षितांसाठी असते. पुस्तकाच्या हजार प्रती खपल्या म्हणजे डोक्यावरून पाणी गेले असे वाटते. पुस्तके का खपत नाहीत? लोकात दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, पुस्तके महाग आहेत, ती समजायला जड जातात, जनतेच्या जीवनाशी त्यांचा संबंध नसतो, खपविण्याचीही नीट व्यवस्था नसते, प्रामाणिक पुस्तके खपविणारे मिळत नाहीत. अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे मराठी साहित्य समृद्ध होत नाही.’’… ही वाक्ये आहेत साने गुरुजींच्या ‘गोड निबंध, भाग तिसरा’ या पुस्तकातील. साहित्याच्या शहरी तोंडवळ्यामुळे ग्रामीण साहित्याचे कसे न भरून निघणारे नुकसान होत आहे, हे ज्या साने गुरुजींनी अतिशय पोटतिडिकीने आपल्या पुस्तकात मांडले, खुद्द त्यांच्याच कर्मभूमीत ९७ व्या साहित्य संमेलनाचा मांडव येत्या जानेवारीत उभारला जाणार आहे. साहित्य महामंडळाने गुरुजींचे हे विचार वाचले की नाहीत माहीत नाही. पण, कळत – नकळतपणे का होईना महामंडळाकडून गुरुजींच्या तक्रारीचे निरसन मात्र घडणार आहे!
खान्देशातील छोट्याशा अमळनेरमध्ये साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक प्रकाशित करून आपल्या वाङ्मयीन प्रवासाचा प्रारंभ केला होता. अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण. संमेलनाच्या भव्यतेच्या तुलनेत येथील सुविधा तशा तोकड्याच. पण, साहित्य महामंडळाने आयोजनाचा बहुमान अमळनेरला दिला. तेही सातारा, औंदुबरसारखी निमंत्रणे हातात असताना. हे उत्तम संकेत आहेत. साहित्य सर्वंकष असले तरी आधी संमेलनांच्या प्राधान्यक्रमात मोठी शहरेच असायची. राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या खुर्द आणि बुद्रुकमधल्या साहित्यप्रेमीपर्यंत ते केवळ छायाचित्रांमधूनच पोहोचायचे. संमेलनांचा पंचतारांकित ‘पिंपरी चिंचवड पॅटर्न’ बघून संमेलनाच्या मूळ प्रयोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जायचे. परंतु, आता हे चित्र बदलताना दिसत आहे.
शहरांत प्रतिसाद अल्प, म्हणून?
मागच्या पाच वर्षांचाच विचार केल्यास आधी यवतमाळ, नंतर उस्मानाबाद, उदगीर, वर्धा व आता अमळनेर अशा छोट्या व काही तर तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावात संमेलन भरू लागले आहे. त्यामुळे कायम शहरांच्या प्रेमात असलेल्या महामंडळाला असे अचानक ‘गाव’ का आठवावे लागले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे प्रमुख कारण आहे मोठ्या शहरातील नागरिकांचा संमेलनांना मिळणारा अल्प प्रतिसाद. राहण्याची खाण्याची उत्तम व्यवस्था, प्रवासासाठीची सर्व अत्याधुनिक साधने, गर्भश्रीमंत स्वागताध्यक्ष असूनही संमेलनातील खुर्च्या मात्र रिकाम्या, असे चित्र अनेकदा समोर आले. फार लांब कशाला… ताजे उदाहरण नाशिकचेच आहे. दोन वर्षांआधी छगन भुजबळांच्या स्वागताध्यक्षतेत संमेलन झाले. त्याचे स्वरूप अर्थातच भव्य होते. परंतु. समारोपाच्या दिवशी सेल्फी पॉइंटवर झालेली तुरळक गर्दी सोडली तर संख्यात्मकदृष्ट्या हे संमेलन अपयशीच ठरले. याच्या अगदी उलट चित्र यवतमाळ, उस्मानाबाद, उदगीर अशा छोट्या शहरांमध्ये पाहायला मिळालेे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्यप्रेमी स्वयंप्रेरणेने संमेलनाला आले, कोट्यवधींची पुस्तकविक्री झाली. खुर्द -बुद्रुकमधल्या वाचकांना आपल्या आवडत्या लेखकांना प्रत्यक्ष बघता – ऐकता आले.
उस्मानाबादमध्ये तर आयोेजकांनी राजकारण्यांना मंचबंदी केली होती. त्यामुळे पैशांचा ओघ आटला. परंतु, येेथील लोकांनी पदरमोड करून संमेलनाला हातभार लावला. ते चर्चा होईल इतपत यशस्वी करून दाखवले. सुविधांच्या तुलनेत मराठवाड्यातीलच उदगीर उस्मानाबादपेक्षा जास्त मागास. संमेलनात सहभागींच्या निवासाचा, भोजनाचा भार पेलवेल इतकीही सुविधा या गावात नव्हती. पण, संमेलनातील सर्व सत्रे गर्दीने तुडुंब भरून वाहात होती. ग्रामीण भागात संमेलनांना मिळणाऱ्या या प्रतिसादाचे कारण : ग्रामीण भागातील वाचकांची वाङ्मयीन भूक जास्त आहे. शिवाय सकस लेखनासाठी अनुभवांचा विशाल पटही येथील लेखकांकडे आहे. मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती आणि त्याद्वारे जागरणाची प्रक्रिया येथे सतत घडत असते. ग्रामीण साहित्याची चळवळ केवळ प्रस्थापितांविरुद्ध परिवर्तनाच्या हेतूने आकारास आलेली नाही. तिच्या अंतरंगात डोकावले तर लक्षात येईल की सामाजिक अस्वस्थता, असंतोष आणि शोषणग्रस्तांच्या वेदना ग्रामीण साहित्यातून अविरत झिरपत असतात. म्हणूनच अशा वंचितांच्या भूमीवर जेव्हा संमेलनाचा मांडव पडतो तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही… संमेलनाचे तीनही दिवस येथील साहित्यप्रेमी मिळेल तितके साहित्यसंचित आपल्या पदरात ओढून घेतात.
मोठ्या शहरात याच्या अगदी उलट चित्र असते. शहरातील नियमित वाचकांचा एक सन्मानजनक अपवाद सोडला तर येथे साहित्य संमेलनाला अनुत्पादक विषय समजले जाते. लोक नाटक, चित्रपटाला जातील पण संमेलनात पाय ठेवत नाहीत. सुविधा पंचतारांकित असल्या तरी मांडव मात्र रिकामा असतो. या रिकाम्या मांडवाच्या पुढे बातम्या होतात व अशा संमेलनांचे आयोजन करणाऱ्या साहित्य महामंडळावर टीकेची झोड उठते. त्यामुळेही असेल कदाचित, पण साहित्य महामंडळ आता ‘शहाण्या’सारखे वागताना दिसत आहे. शहर व ग्रामीण भागातील संमेलनाच्या यशस्वितेमधले अंतर महामंडळालाही ठळकपणे जाणवू लागले असावे. म्हणूनच साताऱ्यासारख्या ठिकाणाला साभार नकार कळवून संमेलनासाठी अमळनेरला प्राधान्य देण्यात आले.
जिवाला जीव लावणारी बहिणाबाईंच्या खान्देशातील माणसे महामंडळाच्या या निर्णयाने प्रचंड आनंदली आहेत. संमेलन नेत्रदीपक करण्यासाठी पुढे सरसावली आहेत. संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर व पर्यायाने साने गुरुजींच्या मौलिक कार्यालाही नव्याने उजळा मिळणार आहे. शिवाय गांधी- विनोबा- साने गुरुजी असा संमेलन प्रवासाचा वैचारिक त्रिकोणही साधला जाणार आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शहरातील भरजरी दिवाणखान्यातून उतरून साहित्याचा हा ठेवा गावातल्या गल्लीबोळांत मिरवणार आहे. साहित्य संमेलनांच्या आतापर्यंतच्या प्रवासातील हे मोठेच स्थित्यंतर आहे.
shafi00p@gmail.com