सुधीर शालिनी ब्रह्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई वसवण्याच्या प्रक्रियेत शिरीष पटेल यांची कोणती भूमिका होती? कोण होते बाकीचे लोक?

राजकीय नेत्याला साजेल असा पेहराव, मृदू आवाज, मराठीवर प्रभुत्व आणि अत्यंत विनम्र स्वभाव हे शिरीष पटेल यांच्या व्यक्तिमत्वाचे बाह्यवर्णन. नगर नियोजनातील त्यांचे असामान्य योगदान लक्षात घेता त्यांना नवी मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणणे वावगे ठरणार नाही.

२०१४ ची अखेर. नवी मुंबईच्या कालनिहाय विकासावरचे आणि सिडकोने केलेल्या कार्यावरचे पुस्तक मी लिहायला घेतले होते. अडचणी कमी नव्हत्या, अगदी माहिती स्रोतापासून. सिडकोच्या स्थापनेपूर्वीचे आणि स्थापनेपासूनच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींचे दस्तावेजीकरण सिडकोमध्येच झालेले नव्हते. चित्र रेखाटण्याआधीच कॅनव्हास, रंग, कुंचला असावा लागतो हातात. अगदी तस्सच असतं नियोजानाआधीचं पूर्व-नियोजन. ते मला जाणून घ्यायचं होतं.

या नव्या शहराच्या विकासासाठी सिडकोची स्थापना झाली १९७० साली. त्याच्या आधीच्या घटनांची माहिती आणि प्रारंभीच्या काळातील सिडकोचे दिवस जाणून घेण्यासाठी मी शिरीष पटेल यांच्या कार्यालयात फोन करून मी त्यांना भेटायला गेलो. मुंबई विद्यापीठाच्याजवळ त्यांचे कार्यालय आहे. निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे सकाळी ९.३० वाजता मी स्वागत कक्षात बसलो होतो. तेवढ्यात सफेद सुती शर्ट, सुती पँट, सफेद केस, सफेद मिशी अशा सर्व शुभ्र परिवेशातली साधीशी व्यक्ती आली. सत्तरीच्या पुढचे उमदे व्यक्तिमत्व होते ते. आणि देहबोली एकदम विनम्र. माझे हसून स्वागत करत शिरीष पटेल यांनी मला मीटिंग रूममध्ये गेले.

हेही वाचा : ख्रिसमसच्या काही आठवणी…

नवी मुंबईची जडणघडण आणि त्यात सिडकोचे योगदान यावर एक पुस्तक लिहितोय याची कल्पना त्यांना दिली आणि म्हटले, “सर, तुमचे नाव सिडकोच्या मुख्य अभियंत्यांच्या दालनात वाचले. तुम्ही आणि ती सर्व माणसे यांची माहिती मला हवीय”. सिडकोचे पहिले व्यवस्थापकीय संचालक जे.बी. डिसुझा, शिरीष पटेल, चार्ल्स कोराया, के. पी. बत्त्तीवाला, डॉ. फिरोझ मेधोरा, डॉ. किरीट पारीख, डॉ. माधव गोरे आणि विजय तेंडुलकर ही ती नावे.

पटेल सांगू लागले, डिसुझा अभ्यासू वृत्तीचे होते. जी जबाबदारी ते स्वीकारत त्याचा खोलात जाऊन ते विचार करत. सिडकोच्या स्थापनेची शिफारस करणाऱ्या मंडळावर (BMRPB) डिसुझा विशेष निमंत्रित सदस्य होते. त्यांना प्रस्तावित शहराच्या निर्मितीतील बारकाव्यांचे सखोल ज्ञान होते. नवीन शहर आणि मुंबईच्या पुनर्रचनेशी संलग्न असलेल्या एका गटावर डिसुझा होते. मी आणि चार्ल्स कोराया सुद्धा होतो. ‘मार्ग’ (MARG) मासिकात छापला गेलेला‘बॉम्बे – प्लॅनिंग अँड ड्रिमिंग’ हा लेख डिसुझांनी वाचला होता. मी, चार्ल्स कोराया आणि वीणा मेहता या तिघांनी मिळून तो लिहिला होता.

सिडकोचा कार्यभार स्वीकारताच डिसुझा यांनी शिरीष पटेल यांना बोलावून घेतले. सिडकोचा पहिला तांत्रिक कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. सिडकोमधील नियोजन आणि अंमलबजावणीची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली.

पटेल व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागारही होते. पटेल आणि डिसुझा यांच्या पहिल्याच भेटीत शहराच्या जडणघडणीशी संबंधित महत्वाच्या क्षेत्रातील तज्न्य व्यक्तींना सिडकोत आणण्याची एक संकल्पना डिसुझांनी मांडली. एक छोटा ग्रुप त्यांना हवा होता. पटेल यांनी नावे सुचविली. समाजशास्त्रज्ञ डॉ. माधव गोरे त्यावेळी टीसचे (TISS) संचालक होते, भारतीय सांख्यकी संस्थेतील मुख्य अर्थतज्न्य फिरोझ मेधोरा, टाटा हायड्रोमधील वरिष्ठ स्थापत्य अभियंता के. पी. बत्त्तीवाला, ख्यातनाम व्यवस्थापन संशोधक डॉ. किरीट पारीख, ख्यातनाम नाटककार-साहित्यिक विजय तेंडुलकर, ख्यातनाम स्थापत्यविशारद चार्ल्स कोराया आणि पटेल, असा डिससुझांसह आठ जणांचा एक गट तयार झाला. हेच ते सिडकोचं आद्य अष्टप्रधानमंडळ.

या गटाला ‘नियोजन मंडळ’ म्हटलं जात असे. या गटानेच सिडकोचा पाया घातला. सिडकोचे प्राथमिक स्वरूप इथेच निश्चित झाले. बहुपेडी, बहुआयामी आणि बहुजीवी संघटन म्हणून सिडकोची मूलभूत चौकट या गटानेच तयार केली. त्यामुळेच नगर नियोजनातील भारताची अग्रगण्य संस्था ही ओळख सिडकोला मिळवता आली ती डिसुझांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या या गटामुळेच.

हेही वाचा : अविद्योचा ‘अंमल’

तज्ज्ञांचा हा गट प्रारंभी दर सोमवारी भेटत असे, नंतर तो आवश्यकतेनुसार भेटू लागला. व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत प्रकल्प अंमलबजावणीच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होत असे. ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील असली तरी त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू नव्या शहराची उभारणी हाच असे, त्यामुळे विचार प्रक्रियेतील तात्विक मतभेद अंतिमत: सहमतीवर येऊन थांबत. या गटाची ही सौहार्दपूर्ण आणि एकजुटीची कार्यपद्धती १९७३ पर्यंत चालू होती. या गटानेच सर्वंकष विकास आराखड्याची मांडणी केली.

नगर नियोजन ही केवळ स्थापत्यशास्त्रीय संकल्पना नाही, मानवी जीवनाशी संबंधित अनेकविध पैलूंचा विचार करणेही गरजेचे आहे, या मुद्यावर आम्ही परस्परांशी पूर्णतः सहमत होतो, पटेल सांगत होते. नगर रचना अधिक अर्थपूर्ण व फलद्रूप ठरण्यासाठी वाहतूक आणि पायाभूत सोयीसुविधांसह अर्थकारण, समाजशास्त्र आणि पर्यावरण या जीवनाच्या विविध घटकांचा विचार करण्याची गरज आहे असे डिसुझांचे म्हणणे होते.

पटेल मूळचे स्थापत्य अभियंता असले तरी नगर नियोजनातील यांचा अभ्यास डिसुझांना माहीत होता. डिसुझांनी पटेल यांना नियोजन व बांधकाम विभागाचे संचालक, कोरिया यांना प्रधान वास्तुविशारद आणि अभियंता नेमले. बत्त्तीवाला अभियंता, डॉ. मेधोरा अर्थतज्ज्ञ आणि पारिख यांना कार्यव्यवस्था संरचना प्रमुख केले. सिडकोचे सल्लागार किंवा संचालक म्हणून ही मंडळी कार्यरत होती. पटेल म्हणाले, “सिडकोचे बहुपेडी आणि बहुआयामी संघटन हे स्वरूप निश्चित झाले डिसुझांमुळेच”.

डॉ. गोरे आणि तेंडुलकर यांची काय भूमिका होती, असे मी विचारले. पटेल म्हणाले, “या जोडगोळीने केलेल्या सूचना आणि मार्गदर्शनामुळे नवी मुंबईत एका निकोप, सर्वसमावेशक आणि सर्वधर्म समानतेच्या समाजव्यवस्थेने मूळ धरले. वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा असलेल्या जनसमुदायांच्या सशक्त आणि सकारात्मक सह-अस्तित्वासाठी जे धोरण ठरविण्यात आले ते या दोघांमुळेच, पटेल म्हणाले. “डिसुझा यांना मानवकेंद्रित विकास अपेक्षित होता. विविध समाज गटांचे सहजीवन, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सौहार्दता नव्या शहरात नांदावी हे त्यांना अभिप्रेत असावे. गोरे यांना सहाय्यक म्हणून तेंडुलकरांची नेमणूक झाली असावी”.

डिसुझा यांनी हाच मुद्दा आपल्या पुस्तकात छेडला आहे . डिसुझा लिहितात, “बरेच महिने घेतलेला नगर समाजशास्त्रज्ञाचा (urban sociologist) आमचा शोध अयशस्वी ठरला”. स्वतःला मिळत असलेल्या (अवघे रुपये २२५०) पगारापेक्षा अधिक पगार योग्य, जाणकार आणि स्वयंप्रेरित अशा सक्षम व्यक्तीला देण्याची तरतूद डिसुझांनी केली होती. समाजशास्त्रज्ञ म्हणून पटेल यांनी एका व्यक्तीला बोलावले.ती व्यक्ती त्या पदास योग्य होती, अनुभवी होती. परंतु डिसुझा यांनी त्यांची नेमणूक केली नाही. त्या व्यक्तीचे नाव योगायोगाने डिसुझा होते. “आणखी एक ‘डिसुझा’ नको” असे पटेल यांना डिसुझांनी सागितले. वशिलेबाजीचा ठपका आपल्यावर ठेवला जाऊ नये म्हणून ते सजग होते. सार्वजनिक क्षेत्रात संवेदनशील प्रशासकीय अधिकारी आपल्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून किती सजगतेने वागतो याचे हे उत्तम उदाहरण होय.

हेही वाचा : आंबेडकरांचे नाव घेण्याची अपरिहार्यता

डॉ. माधवराव गोरे आणि विजय तेंडुलकर या दोघांनी नगर समाजशास्त्रज्ञाची उणीव समर्थपणे भरून काढली. या दोघांच्या विचारांचे, प्रत्यंतर सिडकोच्या सामाजिक धोरणात आढळते. सर्वधर्मियांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिडकोच्या प्रत्येक नोडमध्ये लोकसंखेच्या गरजेनुसार समाज मंदिरे, ग्रंथालये आदि सेवा-सुविधा विकसित झाल्या त्या त्यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच.

ती भेट संपताना पटेल म्हणाले, “जाता-जाता तुम्ही ‘युड्री’ला (UDRI) म्हणजेच अर्बन डिझाईन अँड रीसर्च इंस्टिट्यूटला भेट देऊन जा, ही संस्था इथून जवळच आहे. त्यांना माझा संदर्भ द्या. चार्ल्स कोरियांचं आर्काइव्ह पाहून जा,’ असे म्हणून त्यांनी “UDRI” आणि इमारतीचे नाव लिहून दिले.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. नवी मुंबईचा साद्यंत इतिहास असणारे ‘एक्सप्लोरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नवी मुंबई’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urban planner shirish patel contribution in navi mumbai city planning through cidco loksatta article css