आपल्याकडे एखाद्या विषयाची माहिती, वर्णन, मांडणी बहुदा एकांगी असते. ती कोण देते/ करते आहे यावर बरेच अवलंबून असते. असे अनेक विषय आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन विषय म्हणजे गाव आणि शेतकरी समुदाय. या दोन्हीविषयी साहित्य, सिनेमा यामध्ये जे चित्र रंगविले जाते त्याचा अनुभव संबधितांना ‘आपला’ वाटत नाही आणि जे संबधित नसतात त्यांना त्यातून मनोरंजनाशिवाय इतर काही तपशील मिळत नाहीत.
सैराट नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यामध्ये बोलली गेलेली भाषा, पुढे अनेक टीव्ही मालिकांमधून किमान एक पात्र त्या ढंगाची भाषा बोलताना दिसू लागले दुसरीकडे खेड्यात तशी भाषा बोलणारे कमी होत आहेत. वीस पंचवीस वर्षापूर्वी शेतकरी नवरा -बायको हेच खरे रोमॅन्टिक जीवन जगत आहे असा भास होणारे चित्रपट, गाणी तयार होत होती. पुढे शेतकरी शेती करतो म्हणजे जणू काही त्याची अधोगतीच सुरू असल्याचा भास व्हावा असे चित्र रेखाटले गेले. त्याचप्रमाणे गावाचे सुद्धा चित्र रेखाटले जाते. जगातली सर्व भोळी भाबडी, माणुसकी असणारी माणसे गावात राहतात, गावकरी बेरकी असतात, गावचा पाटील सरपंच हा बाहेरख्याली असतो, पुढे तो भ्रष्टाचारी दाखविला जात असे. यावर अशी मांडणी करणाऱ्याचा दावा असा असतो की, आम्ही खेड्यांतून,शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे आम्हाला हे काही शिकायची गरज नसते. आम्ही हे अनुभवले आहे. त्यामुळे इतरांना त्याविषयी काही अधिकार असता कामा नये.
आणखी वाचा-उपभोगशून्य स्वामी!
मागे एकदा शेती संशोधन सादरीकरणावेळी आलेला अनुभव नमूद करण्यासारखा आहे. शेती पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्ण झाल्या नंतरचे सादरीकरण होते. त्या समितिमध्ये एक पुण्याच्या सदाशिव पेठेत जन्म झालेले आणि पुढे सांख्यिकी या विषयाचे प्राध्यापक सदस्य म्हणून उपस्थित होते. ते त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने काही सूचना, बदल सुचवत होते. काही वेळा अनुमान चुकीचे ठरवत होते. विषय अंगलट येत आहे असे कळाल्या नंतर इतर प्राध्यापकानी त्यांचे “नाव” घेऊन त्यांना असे सुनावले की आपल्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे माहीत आहे का? त्या प्रश्नावर त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. त्यावर ते उत्तरले माझा तो विषय नाही. मी, जो तपशील दिला आहे आणि त्याचे जे पृथ:करण केले आहे याविषयी बोलतो आहे. त्यांचे कोणी ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. त्यामुळे त्यांच्या सूचनांचे काय झाले असेल याचा अंदाज येतोच. अशा पद्धतीने विषयाला बगल दिली जाते. मागे एकदा रोजगार हमीमध्ये खूप मोठे काम उभे करणाऱ्या एका कार्यकर्तीला मी गमतीने सूचना केली होती की आपण केवळ आडनाव बदलले तर आपण जे सांगत आहात हे आपले अनुभव आहेत असे लोकांना वाटेल आणि ते आपल्या कार्य-अभ्यासापेक्षा जास्त प्रभावी ठरेल. अशी भूमिका ठेवून त्याची मांडणीसाठी ‘अनुभव’ ही पूर्वअट ठेवण्याचा खूप मोठा विपरीत परिणाम असा होतो की अभ्यासक म्हणून जे अभ्यास करतात त्या दोघांचे निष्कर्ष हे दोन टोकाचे (खूपच सुंदर आश्वासक/ खूपच विदारक आशा सोडून द्यावी असे) असतात त्याच्या अधेमध्ये किंवा त्याशिवाय काही नसतेच असा भास होतो.
आमच्या शेजारील गाव तसे मोठे. बाजारपेठसुद्धा मोठी. त्यागावचे सरपंचपद ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीकडे २० वर्षे होते. गावकऱ्यांना ‘काका’ प्रश्न सोडवतात त्यामुळे काका कोणत्या जातीचे आहेत हा प्रश्न सतावत नव्हता. त्यामुळे ब्राह्मण समाजाचे मतदान ५० नसूनही शेकडोच्या संख्येने असणारे बहुजन त्यांना आपला पुढारी म्हणून निवडून देत होते. पुढे एका समजाच्या संघटनेने जातीय अस्मिता टोकदार करण्यासाठी म्हणून ब्राह्मण समाजाच्या विरोधी मांडणी करण्यास सुरुवात केली. त्याची एक राज्यभर लाट तयार झाली, त्याचे मोठे दूरगामी परिणाम झाले. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून असेल हा ब्राह्मण पुढारी पुन्हा निवडून आला नाही. संख्येने जास्त असणाऱ्या एका जातीकडे ते नेतृत्व गेले. ते पुढील दहा पंधरा वर्ष कायम राहिले. पुन्हा एक अस्मिता तयार झाली आणि एका जातीच्या विरोधी इतर सर्व मागास जाती एकवटून त्यांनी सत्ता (जात)बदल केला. हे एका गावाचे उदाहरण आहे. असा अनुभव असणारी शेकड्यांनी गावे आढळतील. अस्मितेची लाट निर्माण करायची आणि त्यावर स्वार होऊन सत्ता खरे तर अस्मिता बदल करायचा. पूर्वी गावामध्ये तिरंगा आणि वारकऱ्यांचा भगवा असे दोन ध्वज दिसत असत. आज त्यामध्ये अनेक रंगाची भर पडत आहे. रंगांची भर पडणे ही तक्रार असू शकत नाही. ती नसलीसुद्धा पाहिजे परंतु या रंगांच्या गदारोळत खऱ्या प्रश्नांचा तपशील हरवत आहे ही खरी तक्रार आहे.
आणखी वाचा-तरुणाई का अडकते आहे ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात?
शेतकरी तितुका एक असा विचार जसा चुकीचा आहे तसेच सर्व गावे सारखीच असा विचार सुद्धा चुकीचा ठरतो. गावाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलांबून असते. त्यामुळे शेतीमध्ये झालेले बदल हे गावामध्ये बदल होण्यास कारण ठरत नसतील असे मानणे खूप चुकीचे आहे. मागे एकदा मराठी बोली भाषेचा विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी म्हणून गावांमध्ये चर्चा करण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्याला ऊसाचे गुराळ, खळे या अनुषंगाने असणाऱ्या शब्दांचा तपशील समजून घ्यायचा होता. तो समजून देणारे गावकरी त्याला भेटले नाहीत. उलट जे जे शहरात मिळत होते ते सर्व त्या गावामध्ये उपलब्ध होते. हरितक्रांती, शेतीतील निविष्ठांनाचा वापर, सिंचन,धवल क्रांती, सहकार अशा कितीतरी बदलांच्या लाटा गावात येऊन गेलेल्या आहेत. त्यापैकि काही लाटानी जे जे जुने ते सर्व पुसले आहे. काही लाटांनी शेती करण्याचे उद्देश (अन्न स्वावलंबन ते बक्कळ पैसा मिळविणे) बदलले आहेत. त्यानुसार गाव बदलत गेले आहे.
सगळी गावे एकसारखी नसूनही ती एक सारखी दिसत आहेत कारण सगळीकडे विकास सुरू आहे. गावाच्या विकासाच्या म्हणून ज्या योजना आहेत त्यापैकी ९० टक्के योजनांमध्ये विकाससाठी बांधकाम करणे आवश्यकच आहे. त्यामुळे गावामध्ये वर्षभर बांधकामे सुरू असतात. त्याची गरज आहे का? ती मंजूर कशा पद्धतीने होतात? ती पूर्ण करणारे ठेकेदार हा सर्व विषय स्वतंत्र चर्चेचा आहे. बांधकाम केंद्रीत विकास आणि सर्व गावे सारखीच असा विचार यामुळे खरे गाव दिसत नाही. ज्याप्रमाणे शेती मध्ये बदल होत गेले त्याप्रमाणे गाव बदलत गेले तसेच सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा गाव बदलत गेले. आपण सुधारलेले पुढारलेले वाटण्यासाठी असेल किंवा बदलाचा रेटा म्हणून असेल परंतु शहरी लोकांचे अनुकरण करण्याच्या अट्टहसापोटी गावतील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा बदल होत गेले. पूर्वी गावामध्ये होत होणारी लग्ने आणि त्याची पद्धत हे सर्व बदलून त्यावर शहरी आणि सिनेमाचा पगडा वाढत गेला. सर्व सण हे शेती संस्कृतीशी निगडीत होते त्यामुळे ते साजरे करण्याची पद्धत सुद्धा वेगळी होती. ती सुद्धा पार बदललेली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यांतून किमान पाच दहा कुटुंबे पुण्या-मुंबईत गेली. ती तिथे बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली. त्यांना गाव नको म्हणून ती तिथे गेली परंतु त्यांना चुलीवरचे जेवण, लाकडी घाण्यावरील तेल असे जे जे म्हणून पूर्वीच्या गावाची ओळख होती त्या सर्वांचा सोस त्यांना आहे. त्यांना चुलीवरील भाकरी खाण्यासाठी पुण्यात फिरावे लागते आहे तर त्यांच्या गावकडील महिलांना नाश्त्याला थालीपीठ पोह्यांऐवजी इडली डोसा बनवावा असे वाटते आहे. पुण्यात चुलीवरील जेवण बनविणारी हॉटेल आहेत तसेच मोठ्या खेड्यात चायनीजचे गाडे लागले आहेत.
आणखी वाचा-आजच्या राजकारणात आहे फक्त स्वार्थ… त्यात समाजकारण कुठे आहे?
माहिती तंत्रज्ञांनाच्या विस्फोटानंतरचे गाव आणि गावातील युवा-महिला वर्गांच्या महत्वाकांकक्षा असा काही अभ्यास झाला आहे का, हे माहीत नाही. परंतु गावामध्ये फिरताना त्याचा प्रभाव खूप जाणवतो. त्या प्रभावामुळे काय काय बदलत आहे असा विचार केला की सामाजिक प्रश्नांचा परीघ वाढतो आहे हे लक्षात येईल. तपशील कुणालाच समजून घ्यायचा नसतो. सर्वांना माहिती हवी असते, त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी वेळ नसतो किंवा ती करायची कशी याची माहिती नसते. महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. त्या दरम्यान अनेक वेळा इंटरनेट बंदी करावी लागली आहे हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.
काही एक उद्देशाने बदल होत असेल तर तक्रार असण्याचे कारण नसते. बदल हवा असतो, तो रेट्यामुळे होत असतो. त्यामुळे त्याविषयी तक्रार असू शकत नाही. परंतु शेती त्यातील प्रश्न, गावाचे प्रश्न त्याचे विविध पैलू असा सर्व समग्र विचार केला असता बदल हवा परंतु तो कशासाठी? तो कसा हवा? या सर्व तपशीलावर काम झाल्याशिवाय बदलाला दिशा मिळणार नाही.
आणखी वाचा-जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…
आज खेडेगावातील लग्न, जेवणावळी, बंगले, गाड्या पाहिल्या की लगेच वाटते की गाव गरीब राहिले नाही परंतु थोडा तपशील समजून घेतला की प्रकर्षाने जाणवते की गरीबी सुद्धा तुलनेने खेडे गावातच जास्त आहे. केवळ माहिती, तपशील जाणून घेण्याबद्दलची उदासिनता जोडीला संदर्भ म्हणून खेडेगावाविषयीची चुकीची आकडेवारी(कोरडवाहू शेतीतील भात पीक याविषयीचे संशोधन केंद्र तुळजापूर येथे आहे. संपूर्ण धारशीव जिल्ह्यात किती क्षेत्र आहे? उत्पादकता किती आहे? पीक घेणारी गावे कोणती शेतकरी कोणते या कशाचीही माहिती मिळत नाही मात्र उतार्यावर क्षेत्र किमान ३० हेक्टर कायम आहे. हे केवळ उदाहरण आहे.असे कितीतरी मजेशीर अनुभव आहेत) आणि हे सर्व प्रश्न मांडणारे “शेतकरी पुत्र” आणि त्यांचे पूर्वग्रह यामुळे खरे गाव, त्यांच्या समस्या आणि हव्या असणार्या सुविधा याकडे लक्ष देणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने “विकासाला” आडकाठी ठरते. दुसर्या बाजूला हवामान बदल, नैसर्गिक संसाधने त्याचा कार्यक्षम वापर, जैव विविधता, भूजल, पर्यावरण अशा विषयावर काम करणारी मंडळी पुण्यामुंबईत असते. त्यांच्या कडे अभ्यास असतो परंतु ते त्या “गावचे” नसतात. अशा सर्व पेचात गाव अडकले आहे. त्यातून सुटका म्हणजे टोकदार अस्मितावादी राजकारणाची सुरुवात करणे होय.
जाता जाता- मागील चार वर्षापासून पंचायत समिति आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत. त्याविषयी जनतेचा आजिबात आग्रह नाही की तक्रार नाही. कारण त्या व्यवस्थेने जी कामे केली पाहिजेत त्या कामाची मागणी आमची नव्हती असा मानणारा (सुधारलेल्यांचा) एक गट, ती कामे होतच आहेत असा अनुभवणारा (विकासवादी ठेकेदार) एक गट, त्या व्यवस्थेमुळे आमच्या रोजच्या संघर्षात काही फरक पडत नव्हता असा मानणारा एक गट (वंचित बेदखल समुदाय)अशा सर्व गटांना काही फरक पडत नाही. हा लोकशाहीव्यवस्थेला धोक्याचा इशारा आहे असे मानायचे की नाही?